तक्रारदारांतर्फे - अॅड.श्रीमती. जयश्री कुलकर्णी
जाबदारांतर्फे - अॅड.श्रीमती. आरती सोमण
// निकाल //
पारीत दिनांकः- 19/03/2013
(द्वारा- श्रीमती. अंजली देशमुख, अध्यक्ष )
तक्रारदारांनी फोर व्हिलर ओमिनी व्हेईकल दि. 27/7/20009 रोजी खरेदी केली होती. त्यानंतर त्यांनी जाबदारांकडून गाडीची पॉलिसी घेतली होती, त्याचा कालावधी दि.27/7/2009 ते दि.26/7/2010 असा होता. दि. 29/4/2010 रोजी तक्रारदार त्यांचे मित्र श्री. जाधव हे गाडीवर जात असताना दुपारी 4.30 वाजता बोपोडी सिग्नलजवळ थांबले आणि त्याचवेळेस तेथे अनोळखी इसमाने गाडी थांबविण्यास सांगितले त्यामुळे त्यांनी त्यांची गाडी बाजूला घेतली. त्या इसमाने तक्रारदारास ते स्वत: पोलीस आहे आणि गाडी चेक आणि ट्रायल घ्यावयाची आहे म्हणून सांगितले त्यावेळेस तक्रारदारांनी कारचे बेल्ट लावलेले नव्हते त्यामुळे तक्रारदार घाबरलेल्या अवस्थेत होते म्हणून त्यांनी गाडीचा ताबा त्या अनोळखी इसमास दिला. चाव्या घेऊन गाडी चालू करुन तो इसम निघून गेले नंतर आलेच नाही. तक्रारदारांनी त्यांची गाडी चोरीला गेल्याचे कळले म्हणून ते खडकी पोलीस स्टेशन येथे अनोळखी इसमाविरुध्द केस दाखल करावयास गेले. त्याचवेळेस गाडी चोरीला गेल्याची माहिती इन्श्युरन्स कंपनीला कळविली. गाडीचा क्लेम पाठवून दिला. दि.30/4/2010 रोजी खडकी पोलीस स्टेशनकडून ए समरी चा अहवाल प्राप्त झाला. तक्रारदारांनी ही सर्व कागदपत्रे जमा करुन जाबदारांकडे पाठवून दिली. दि.30/8/2010 रोजी जाबदारांनी तक्रारदारांचा क्लेम तक्रारदारांनी त्यांची गाडीची व्यवस्थित काळजी घेतली नाही या कारणावरुन नामंजूर केला. तक्रारदार जाबदारांकडून रक्कम रु.2,11,277/- 18 टक्के व्याजदराने आणि रक्कम रु.25,000/- आणि इतर दिलासा मागतात.
तक्रारदारांनी शपथपत्र, आणि कागदपत्रे दाखल केली आहेत आणि मा. वरिष्ठ न्यायालयाचे निवाडे दाखल केले आहेत.
2) जाबदारांनी त्यांच्या लेखी जबाबाद्वारे तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदारांच्या म्हणण्यानुसार तक्रारीमध्ये गुंतागुंतीचा प्रश्न असल्यामुळे सिव्हील कोर्ट हे योग्य कोर्ट आहे. तक्रारदारांची गाडी दि.29/4/2010 रोजी चोरी झाली त्यावेळी तक्रारदारांनी जाबदारांकडे क्लेम दाखल केला. त्यानंतर जाबदारांनी त्यांचे इनव्हेस्टीगेटर मे. चार्टर हाऊस डिटेक्टीव्ह सर्व्हीसेस यांना नियुक्त केले. दि.26/10/2010 रोजी इनव्हेस्टीगेटरने त्यांचा अहवाल जाबदारांकडे दाखल केला. इनव्हेस्टीगेटरने त्यांच्या अहवालामध्ये खालीलप्रमाणे म्हणणे दिलेले आहे.
ए. तक्रारदारांनी त्यांच्या मित्रासोबत दि.29/4/2010 रोजी जात असताना अनोळखी इसमाने गाडी थांबविली आणि ट्रायलसाठी गाडीच्या चाव्या मागितल्या त्यानंतर गाडी परत आलीच नाही.
बी. तक्रारदारांचा अक्षम्य निष्काळजीपणा दिसून येतो.
सी. तक्रारदारांनी त्यांची गाडी बंद अवस्थेत ठेवली नाही. (The Complainant has
kept the Vehicle unlocked).
डी. तक्रारदारांनी त्यांची गाडी खरेदी केल्याबद्दलचा इनव्हॉईस जाबदारांना दिला
नाही.
ई. तक्रारदारांनी सी.आर.पी.सी. कलम 174 प्रमाणे गाडी मिळून येत नाही
(Untraced report) असा अहवाल दाखल केला नाही.
फ. तक्रारदारांनी गाडीच्या चाव्यांचा दुसरा सेट जाबदारांना दिला नाही.
3) या सर्वांवरुन असे दिसून येते की, तक्रारदारांनी त्यांची गाडी अनलॉक स्थितीत ठेवून अक्षम्य निष्काळजीपणा केलेला आहे. त्यांनी गाडीची व्यवस्थित काळजी घेतली नाही. या निष्काळजीपणावरुन तक्रारदारांनी पॉलिसीच्या अटी व शर्तींचा भंग केला आहे. त्यामुळे जाबदार क्लेमची रक्कम देण्यास जबाबदार नाहीत.
4) दि.30/8/2010 रोजी जाबदारांनी तक्रारदाराचा क्लेम योग्य त्या कारणावरुन नामंजूर केला म्हणून सदरील तक्रार नामंजूर करावी अशी मागणी जाबदार करतात. जाबदारांनी शपथपत्र दाखल केले आणि पॉलिसीच्या अटी व शर्ती दाखल केल्या आहेत.
दोन्ही पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली.
5) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत गाडी खरेदी केल्याचा दि. 27/7/2009 रोजीचा इनव्हॉईस दाखल केला आहे. यावरुन गाडी खरेदी केल्याचे दिसून येते. दि.29/4/2010 रोजी तक्रारदार व त्यांचे मित्र बोपोडीकडे जात असताना एका अनोळखी इसमाने त्यांची गाडी थांबवून तो स्वत: पोलीस असल्याचे सांगून गाडीची ट्रायल आणि चेकींग करावयाचे आहे असे सांगून तक्रारदारांकडून गाडीच्या चाव्या घेतल्या. ट्रायलसाठी गाडी घेतल्यानंतर तो परत आलाच नाही त्यामुळे तक्रारदारांनी खडकी पोलीस स्टेशनकडे एफ्.आय्.आर. नोंदविली. त्याचवेळेस तक्रारदारांचा जबाब घेतलेला दिसून येतो. पोलीस जबाबामध्ये तक्रारदारांनी ते आणि त्यांचा मित्र जात असताना पाठीमागून एक इसम मोटरसायकलवर येऊन जवळ थांबविली आणि सीट बेल्ट लागलेला नाही, स्वत: पोलीस आहे गाडी साईडला लावा असे सांगितल्यावरुन तक्रारदारांनी गाडी साईडला लावली, असे तक्रारदार सांगतात. ते पुढे असे म्हणतात की, जो अनोळखी इसम होता त्याच्या अंगावर पांढरा सिव्हील शर्ट व खाकी फुल पॅण्ट, काळा बुट घातलेला इसम होता आणि तो स्वत: पोलीस आहे असे सांगितले. गाडीची ट्रायल घेतो गाडी नवीन आहे असे म्हणून ड्रायव्हर सीटवर बसून पुण्याच्या दिशेने कार घेऊन गेला. यावर तक्रारदार व त्यांच्या मित्राने एक-दोन तास वाट पाहिली परंतु तो आला नाही असे त्यात त्यांनी नमुद केले आहे. हा जबाब दि.3/5/2010 रोजी तक्रारदारांनी आर.टी.ओ. यांनाही कळविल्याचे दिसून येते, त्याबद्दलची कागदपत्रे तक्रारदारांनी दाखल केली आहेत. तसेच खडकी पोलीसांमार्फत ज्यूडी. मॅजि. वर्ग-1 कोर्ट, खडकी, पुणे यांचा “अ” वर्ग समरी अहवाल तक्रारदारांनी दाखल केला आहे. यावरुन तक्रारदारास गाडी एका अनोळखी इसमाने पोलीस आहे असे भासवून घेऊन गेले आणि परत आणून दिली नाही. तक्रारदारास तो इसम पोलीस आहे असे खोटेच सांगून चोरीच्या हेतूने (malicious act) गाडी घेऊन गेले ही त्यांची वर्तणूक ही चोरीच्या उद्देशाने होती म्हणजेच चोरीची ठरते असे मंचाचे मत आहे. यासाठी तक्रारदारांनी मा. राज्य आयोग, केरळ 2011 (3) CPR 54 Oriental Insurance Company Ltd. V/s. V. Mujeeb Rahman दाखल केले आहे. प्रस्तुतच्या केसमध्ये तक्रारदारांची गाडी त्यांचा स्वत:चा मित्र घेऊन गेला. ती परत केलीच नाही हे त्या मित्राचे वर्तन चोरीचे आहे त्याचप्रमाणे (malicious act) ठरते असे मा. राज्य आयोग, केरळ यांनी नमुद केले आहे. यामध्ये ओरीएंटल इन्श्युरन्स कंपनीने दाखल केलेले अपील डिसमीस केलेले आहे. म्हणूनच हा निवाडा प्रस्तुतच्या तक्रारीस लागू होतो असे मंचाचे मत आहे. या प्रकरणामध्येही अनोळखी इसमाने तक्रारदारास पोलीस आहे असे भासवून गाडी ट्रायलसाठी घेऊन गेले आणि परत आणलीच नाही.
6) जाबदारांनी चुकींच्या अटींवर तक्रारदारांचा क्लेम नामंजूर केलेला आहे कारण जी अट क्रमांक 4 :-
“The Insured shall take all responsible steps to safeguard the vehicle from loss or damage and to maintain it in efficient condition and the Company shall have at all times free and full access to examine the vehicle or any part thereof or any driver or employee of the insured. In the event of any accident or breakdown, the vehicle shall not left unattended without proper precautions being taken to prevent further damage or loss and if the vehicle be driven before the necessary repairs are effected any extension of the damage or any further damage or loss and if the vehicle be driven before the necessary repairs are effected any extension of the damage or any further damage to the vehicle shall be entirely at the insured’s own risk”.
यावर विसंबून त्यांनी तक्रारदाराचा क्लेम नामंजूर केलेला आहे. तक्रारदारांनी त्यांच्या गाडीची काळजी घ्यावयास पाहिजे अशी होती परंतु अनोळखी इसमाने पोलीस भासवून गाडीच्या चाव्या मागितल्या त्यामुळे ही अट क्लेम नामंजूर करण्यास योग्य नव्हती या अटीवर तक्रारदारांचा क्लेम नामंजूर केला ही जाबदारांनी तक्रारदारांना सेवा देण्यामध्ये त्रुटी ठरते.
7) तक्रारदारांनी त्ंयाच्या गाडीचा दि. 27/7/2009 रोजीचा इनव्हॉईस दाखल केलेला आहे. हे वाहन दि.29/4/2010 रोजी चोरीला गेले. सदरहू तक्रार अर्जामध्ये तक्रारदार किंवा जाबदार यांनी गाडीच्या डेप्रीसिएशनची व्हॅल्यू मंचात दाखल केली नाही. अशा परिस्थितीत पॉलिसी अंतर्गत डेप्रीसीएशनच्या नियमानुसार गाडीची किंमत तक्रारदारास जाबदारांनी दयावी. म्हणून मंच जाबदारांना असा आदेश देते की, जाबदारांनी तक्रारदारास पॉलिसी अंतर्गत डेप्रीसीएशनच्या नियमानुसार गाडीची किंमत दि.30/8/2010 पासून 9 टक्के व्याजाने दयावे. तसेच तक्रारदारास तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.2,000/- दयावे.
वरील सर्व विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
// आदेश //
1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2 जाबदारांनी पॉलिसी अंतर्गत डेप्रीसीएशनच्या नियमानुसार गाडीची किंमत दयावी. सदर रक्कम दि.30/08/2010 पासून द.सा.द.शे. 9 टक्के व्याजदराने दयावी.
3. जाबदारांनी तक्रारदारांना अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.,2,000/- (रक्कम रु. दोन हजार मात्र) दयावेत.
4. वर कलम 1 ते 3 च्या आदेशाची पूर्तता जाबदारांनी हा आदेश प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांचे आत करावयाची आहे.
5. निकालाच्या प्रती दोन्ही बाजूंना नि:शुल्क
पाठविण्यात याव्यात.