तक्रारदार : त्यांचे मुखत्यार अनिलकुमार तिवारी मार्फत हजर.
सामनेवाले : त्यांचे वकीलामार्फत हजर.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सा.वाले क्र.1 ही विमा कंपनी आहे. तर सा.वाले क्र.2 हे सा.वाले क्र.1 कंपनीचे विमा सर्वेक्षक आहेत. तक्रारदारांनी आपले निवासस्थान व त्यातील चिज वस्तु यांचे संबंधात विमा पॉलीसी घेतली होती. निवासस्थानाच्या इमारतीच्या विम्याची रक्कम रु.24 लाख होती. तर चिज वस्तुकरीता विम्याची रक्कम रु.3 लाख होती. वर्षे 2006-07 मध्ये तो विमा करार वैध होता.
2. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे 6 ऑगस्ट, 2006 रोजी मुंबई येथे अतिवृष्टी झाली व तक्रारदारांचे निवासस्थानामध्ये पाणी घुसले. व घराच्या भिंती पडल्या व चिज वस्तु खराब झाल्या. तक्रारदारांनी सा.वाले क्र.1 विमा कंपनीकडे सुचना दिली व विमा कंपनीचे प्रतिनिधींनी दिनांक 8.8.2006 रोजी तक्रारदारांचे निवासस्थानाची पहाणी केली. त्यानंतर तक्रारदारांनी नविन निवासस्थान/एक खोली बांधणेकरीता बालाजी कन्सलटंट यांचेकडून दिनांक 10.8.2006 रोजी निविदा प्राप्त केली. व सा.वाले यांचे कडे दिली. त्याचप्रमाणे घरातील सर्व नष्ट झालेल्या वस्तु व दागिने यांची यादी त्याचप्रमाणे त्या नविन खरेदी करणेकामी लागणा-या निविदा सा.वाले यांचेकडे हजर केल्या. सा.वाले यांनी त्याचे पत्र दि.21.8.2006 अन्वये तक्रारदारांना विमा कराराप्रमाणे फक्त रु.30,000/- देवू केले. तक्रारदारांनी ते स्विकारले नाही.
3. त्यानंतर सा.वाले यांनी तक्रारदारांच्या खोलीची पुन्हा तपासणी करण्यात येईल असे तक्रारदारांना कळविले व त्याप्रमाणे दिनांक 23.8.206 रोजी सर्वेक्षकांनी तपासणी केली. त्यानंतर सा.वाले यांनी तक्रारदारांकडून अधिकची काही माहिती व कागदपत्रे मागीतली. तरी देखील सा.वाले यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई अदा केली नाही. त्यानंतर तक्रारदारांनी वकीलामार्फत सा.वाले विमा कंपनीस दिनांक 18.1.2007 रोजी व दिनांक 19.2.2007 रोजी अशा दोन नोटीसा दिल्या. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले यांचे विरुघ्द विमा कराराप्रमाणे तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा अरोप करुन प्रस्तुतची तक्रार दाखल केली. व त्यामध्ये सा.वाले यांचे कडून नुकसान भरपाई रु.10,12,356/- व्याजासह तसेच रु.5 लाख नुकसान भरपाई अशी दाद मागीतली.
4. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केली. व त्यामध्ये तक्रारदारांनी त्यांचे निवासस्थान/खोलीचा व तसेच अतिचीज वस्तुंचा विमा काढला होता व विमा करार अस्तीत्वात होता ही बाब मान्य केली. त्यानंतर सा.वाले यांनी विमा सर्वेक्षकाची नेमणूक केली. व विमा सर्वेक्षकाने तक्रारदारांना अनेक पत्रे लिहूनही तक्रारदारांनी कुठली माहिती किंवा कागदपत्र विमा सर्वेक्षकांकडे दिली नाही. त्यानंतर सर्वेक्षकांनी सर्व बाबींची पहाणी करुन तक्रारदारांना रु.1,00,378.42 येवढे नुकसान झाले आहे असा अहवाल दिला. तरी देखील सा.वाले यांचे समाधान न झाल्याने सा.वाले यांनी सखोल सर्वेक्षण करण्याचे हेतुने मे.पाथफाइंडर या कंपनीची नेमणूक केली. व त्या सर्वेक्षकांनी जागेची मालमत्तेची पहाणी केली व साक्षीदारांचे जबाब घेतले व असा अहवाल दिला की, तक्रारदारांची खोलीची जागा शासनाने पुर्नवसनकामी ताब्यात घेतली असून ती जागा अस्तित्वात नाही. तसेच तक्रारदारांनी घटणेपूर्वीच दिनांक 10.7.2006 रोजी बालाजी कन्सलटंट यांचेकडून बांधकामाची निवीदा घेतली होती. म्हणजे तक्रारदारांना आपले मोडकळीस आलेले घर बांधावयाचे होते असा तर्क सर्वेक्षकांनी केला. दुसरे सर्वेक्षक म्हणजे मे.पाथफाइंडर यांनी काही नुकसान देय नाही असा अहवाल दिला आहे असे सा.वाले यांनी कथन केले. या प्रमाणे सा.वाले यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई अदा न करण्याच्या कृतीचे समर्थन केले.
5. तक्रारदारांनी सा.वाले यांच्या कैफीयतीस आपले प्रति उत्तराचे शपथपत्र दाखल केले. त्याचप्रमाणे तक्रारदारांच्या जागे जवळ दुकान चालविणारे श्री.इंद्रजीत देवप्रसाद मिश्रा यांचे शपथपत्र दाखल केले. दोन्ही बाजुंनी पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्र दाखल केले. तसेच लेखी युक्तीवाद दाखल केला.
6. प्रस्तुत मंचाचे तक्रार, कैफीयत, शपथपत्र, व कागदपत्रे यांचे वाचन केले. व दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकला. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदारांना विमा कराराप्रमाणे नुकसान भरपाई अदा करण्यास नकार देवून सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. |
2. | तक्रारदार सा.वाले यांचेकडून तक्रारीत मागीतल्याप्रमाणे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय- परंतु रु.2 लाख फक्त. |
3 | अंतीम आदेश | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
7. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत विमा कराराची प्रत हजर केलेली आहे. त्यावरुन तक्रारदारांच्या जागेचा विमा काढण्यात आलेला होता हे स्पष्ट होते. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे बालाजी कन्सलटंट यांनी तक्रारदारांचे खोली नव्याने बांधून देण्याचे जी निवीदा दिली होती त्याची प्रत हजर केली आहे. त्यामध्ये बालाजी कन्सलटंट यांनी रु.5,14,740/- येवढी रक्कम अंदाजी नमुद केली होती. ती रक्कम खोलीचे संपूर्ण बांधकामाबद्दल होती. त्या निविदेवर दिनांक 10.7.2006 ही तारीख आहे व घटणा दिनांक 6.8.206 रोजी घडली म्हणजे घटणेपूर्वीच ही निवीदा घेण्यात आली होती. तक्रारदारांनी आपल्या युक्तीवादात असा खुलासा केला आहे की, त्यावरील दिनांक हा चुकीचा होता. व तो दिनांक 10.8.2006 समजण्यात यावा. तक्रारदारांचा खुलासा स्विकारला तरीही असे दिसून येते की, बालाजी कन्सलटंट यांची निविदा ही रु.5,14,740/- येवढी आहे. तर कल्पतरु डेकोरेटर यांची निविदा रु.6,49,675/- येवढया किंमतीची आहे. या दोन्ही निविदांचे वाचन केले असतांना असे दिसून येते की, त्या निविदामध्ये ब-याच बाबी नविन बांधकामाच्या होत्या. तक्रारदारांच्या जुन्या खोलीमध्ये ज्या सुविधा व साहित्य असेल त्यापेक्षा हया निविदा ज्यादा बाबीच्या असतील तर त्या निविदा मधील रक्कम नुकसान भरपाईकामी स्विकारल्या जावू शकत नाही.
8. मुळातच तक्रारदारांची जागा म्हणजे खोली पुराच्या पाण्यामध्ये पूर्ण नष्ट झाली किंवा भिंती पडल्या असा पुरावा उपलब्ध नाही. तक्रारदारांनी त्यांचे साक्षीदार श्री. इद्रजीत मिश्रा यांचे शपथपत्र दाखल केलें आहे. परतू इंद्रजीत मिश्रा यांनी आपले शपथपत्र येवढेच कथन केले आहे की, चाळीमधील घरामध्ये पाणी खुसले होते. इंद्रजीत मिश्रा यांनी आपल्या शपथपत्रात असे कथन केले नाही की, तक्रारदारांच्या खोलीच्या भिंती पुराव्या पाण्यामुळे पडल्या. व घराच्या खोलीचे छत देखील नष्ट झाले.
9. सा.वाले क्र.1 यांनी सा.वाले क्र.2 यांचे विमा सर्वेक्षक म्हणून नेमणूक केली हेाती. सा.वाले क्र.2 यांनी दिलेल्या अहवालाची प्रत सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीसोबत दाखल केलेली आहे. सा.वाले क्र.2 यांनी तक्रारदारांना दिनांक 25.9.2006, दिनांक 4.10.2006 व दिनांक 16.10.2006 च्या पत्राव्दारे वेगवेगळया कागदपत्रांची मागणी केली. परंतू तक्रारदार कुठलीही कागदपत्र हजर करु शकले नाही. तक्रारदारांनी ही बाब आपल्या लेखी युक्तीवादात मान्य केलेली आहे. सा.वाले क्र.2 सर्वेक्षक यांनी बालाजी कन्सलटंट यांनी दिलेली निविदा व त्यातील नमुद केलेल्या खर्चाच्या बाबी व रक्कमा व प्रत्यक्षातील जागेवरील परिस्थिती यांची पहाणी करुन आपल्या अहवालासोबत एक तालीका तंयार केली, ज्यामध्ये खोलीच्या इमारतीचे संपूर्ण आयुष्य 50 वर्षे गृहीत धरले असून ती खोली 35 वर्षे वापरण्यात आलेली होती. व त्याकरीता घसा-याची किंमत बालाजी कन्सलटंट यांच्या निविदेतून कमी करण्यात आली व देय रक्कम रु.35,634/- दाखविण्यात आली. सा.वाले क्र.2 सर्वेक्षक यांनी आपल्या अहवालासोबत खोलीची काही छायाचित्रे बाहेरील व आतील बाजुची दाखल केलेली आहेत. त्यांचे काळजीपूर्वक निरीक्षण केले असतांना असे दिसून येते की, घरातील चिज वस्तु हया आस्ताविस्त पडल्या होत्या. परंतु घराच्या संपूर्ण भिंती पडल्या होत्या व छतही मोडून पडले होते अशी परिस्थिती नव्हती. यावरुन केवळ खोलीचे दुरुस्तीकामी नुकसान भरपाई देय होती. तक्रारदारांनी आपल्या शेजा-यांचे किंवा प्रत्यक्ष साक्षीदारांचे शपथपत्र दाखल करुन संपूर्ण खोली पडली होती किंवा नष्ट झाली होती असा पुरावा दाखल केलेला नाही.
10. सा.वाले क्र.2 यांनी मे.पाथफाइंडर या सर्वेक्षकाची नेमणूक केली. व त्यांनी दिलेला अहवाल आपल्या कैफीयत सोबत दाखल केलेला आहे. पाथफाइंडर यांनी आपल्या अहवालात स्पष्ट नुमुद केले की, ती संपूर्ण चाळ तक्रारदारांच्या खोलीसह शासनाने ताब्यात घेतली असून शासनाने पुर्नवसनकामी मे.गोईनकर बिल्डर यांना पुर्नविकासाचे कत्राट दिलेले आहे. मे.पाथफाइंडर सर्वेक्षकांनी आपल्या अहवालात नमुद केले आहे की, तक्रारदारांची खोली मोडण्यात आली असून नविन पुर्नवसन कार्यवाही चालु आहे. अहवालात असेही नमुद आहे की, त्या चाळीमध्ये तक्रारदारांच्या पाच खोल्या होत्या. ही वस्तुस्थिती असेल तर तक्रारदारांना शासनाकडून पुर्नवसनानंतर नविन बांधकामामध्ये खोलीची जागा निच्छित मिळू शकेल.
11. तक्रारदारांच्या घरातील चिज वस्तुंच्या संदर्भात तक्रारदारांनी तक्रारीचे निशाणी ब वर नष्ट झालेल्या चिज वस्तुंची यादी दिलेली आहे व त्यांची किंमत रु.2,61,500/- दाखविली आहे. हया वस्तु नविन खरेदी करावयाचे असल्यास अंदाजे खर्च किती येईल याचे अनुमान बांधणेकामी तक्रारदारांनी त्या चिज वस्तुंच्या निविदा वेग वेगळया दुकानदारांकडून घेतल्या व त्या हजर केलेल्या आहेत. तक्रारदारांनी आपल्या चिज वस्तुची जी यादी दिलेली आहे. निशाणी ब त्याचे निरीक्षण केले असता असे दिसून येते की, त्यामध्ये ब-याच इलेक्ट्रोनिक्स वस्तु, घरगुती वस्तु व दागिने संमल्लीत आहेत. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीत असे कथन केलें आहे की, पुराचे पाणी खोलीमध्ये जमा होऊ लागल्यानंतर तक्रारदारांनी खोली बंद करुन स्थलांतर केले. त्या परिस्थितीमध्ये कुठलीही सर्वसामान्य व्यक्ती दागीने व रोख रक्कम आपल्या सोबत घेईल व खोलीमध्ये ठेवणार नाही. तक्रारदारांनी दागीने नष्ट होण्याचे संदर्भात चोरीची फीर्याद दिली नाही म्हणजे तक्रारदारांचे कथनाप्रमाणे चोरी झाली नाही. या परिस्थितीमध्ये नुकसान भरपाईचे आकडयामध्ये दागीने रु.60,000/- ही उघड उघड खोटी मागणी दिसते. याच प्रकारचा निष्कर्ष लोखंडी कपाट, लोखंडी पलंग, टेबल, खुर्ची, लाकडी कपाट या संदर्भात काढता येर्इल. लाकडी फर्नीचर व वस्तु पुराच्या पाण्याचे खराब होतील, परंतू नष्ट होणार नाही. लोखंडी वस्तुंचा जंग चढेल परंतु त्या वाहून जाणार नाही. थोडक्यामध्ये तक्रारदारांच्या घरातील कलेक्ट्रॉनिक्स वस्तु नष्ट झाल्या असतील असा निष्कर्ष काढता येतो. परंतू भांडे, लाकडी फर्नीचर, व लोखंडी वस्तु या संदर्भात तसा निष्कर्ष काढता येत नाही.
12. वर नमुद केल्याप्रमाणे सा.वाले क्र.2 विमा सर्वेक्षक यांनी आपल्या प्राथमिक अहवालात नुकसान भरपाई रु.30,000/- प्रस्तावित केली होती. सा.वाले क्र.2 यांनी अंतीम अहवालामध्ये तो नुकसान भरपाईचा आकडा रु.1,00,378.42 असा दाखविला तर दुसरे विमा सर्वेक्षक मे.पाथफाइंडर नुकसान भरपाई देय नाही असा अहवाल नोंदविला. तथापी तक्रारदारांचे कुठल्याही प्रकारचे नुकसान झाले नाही असा निष्कर्ष काढणे शक्य नाही. सा.वाले यांचे देखील तसे कथन नाही. पुराचे पाण्यामुळे तक्रारदारांच्या घराची म्हणजे खोलीची काही स्वरुपात नुकसान निच्छितच झाले असेल ज्याकामी दुरुस्ती आवश्यक होती. त्याच प्रमाणे तक्रारदारांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तु नष्ट झाल्या असतील व इतर वस्तुंना नुकसान पोहोचले असेल. प्रकरणातील एकंदर पुराव्यांचा विचार करता सा.वाले यांनी विमा कराराप्रमाणे तक्रारदारांना अदा करावयाच्या रक्कमेचा आकडा रु.2 लाख निच्छित करण्यात येतो. व मंचाचे असे मत आहे की, ही नुकसान भरपाई योग्य व न्याय राहील. सा.वाले यांनी विहीत मुदतीत नुकसान भरपाईची रक्कम अदा न केल्यास त्यावर व्याज देय राहील.
13. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील आदेश करण्यात येतो
आदेश
1. तक्रार क्रमांक 45/2008 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना विमा कराराप्रमाणे नुकसान भरपाई अदा करण्यास नकार देवून तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले क्र.1 यांनी तक्रारदारांना विमा कराराप्रमाणे नुकसान भरपाई बद्दल रु.2 लाख (रु.दोन लाख फक्त) न्याय निर्णयाची प्रत मिळाल्यापासून आठ आठवडयाचे आत अदा करावी असा आदेश देण्यात येतो. अन्यथा विहीत मुदतीनंतर त्यावर 9 टक्के दराने व्याज रक्कम अदा करेपर्यत द्यावे.
4. खर्चाबद्दल आदेश नाही.
3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.