तक्रारदारातर्फे : वकील श्री. कुरीयन जॉर्ज
सामनेवालेतर्फे : वकील श्री. निखिल मेहता
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सामनेवाले ही विमा कंपनी असून तकारदारांनी त्यांचे मोटरसायकलचा विमा सामनेवाले यांचेकडे उतरविला होता, व ती विमा पॉलीसी डिसेंबर 2006 ते डिसेंबर 2007 या कालावधीकरीता वैध व अस्तित्वात होती.
2. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथनाप्रमाणे दिनांक 8/6/2007 रोजी आपले वाहन घरापुढे लावले, व काही वेळातच तक्रारदार वाहनाकडे परत आले असतांना त्यांना वाहन जागेवर दिसून आले नाही. तकारदारांनी वाहनाचा शोध घेतला परंतु वाहन आढळून आले नाही. तक्रारदारांनी दुसरे दिवशी म्हणजे दिनांक 9/6/2007 रोजी मालवणी पोलीस स्टेशन येथे वाहन चोरीची फीर्याद दिली व सामनेवाले यांचेकडे नुकसानभरपाईची मागणी नोंदविली. सामनेवाले यांनी घटनेमध्ये तक्रारदारांचा निष्काळजीपणा असल्यामुळे दिनांक 1/1/2008 रोजीच्या पत्राद्वारे तक्रारदारांची मागणी नाकारली. त्यानंतर तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली. व सामनेवाले यांनी विमा कराराप्रमाणे सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली असा आरोप केला, व नुकसानभरपाईची मागणी केली.
3. सामनेवाले यांनी हजर होऊन आपली कैफीयत दाखल केली व विमा करार मान्य केला. परंतु तक्रारदारांनी वाहन सुरु करण्याची किल्ली ठेवून वाहन तसेच सोडून गेल्याने तक्रारदारांचा निष्काळजीपणा असल्याने विमा कराराच्या शर्ती व अटी प्रमाणे तक्रारदार नुकसानभरपाई मिळण्यास पात्र नाहीत, असे कथन केले.
4. तक्रारदार व सामनेवाले यांनी आपले पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्रे दाखल केले व लेखी युक्तीवाद दाखल केला. तक्रारदारांच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला.
5. प्रस्तुत मंचाने तक्रारदारांची तक्रार, कैफीयत शपथपत्रे, कागदपत्रे व लेखी युक्तीवादाचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीच्या निकालकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सामनेवाले यांनी तक्रारदार यांना विमा करारातंर्गत नुकसानभरपाई नाकारुन सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली, ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. |
2 | तक्रारदार सामनेवाले यांचेकडून नुकसानभरपाई वसूल करण्यास पात्र आहे काय ? | होय. |
3. | अंतीम आदेश ? | तक्रार अंशतः मंजूरकरण्यात येते. |
कारण मिमांसा
6. तक्रारदारांचा दुचाकी वाहनाबद्दल विमा करार सामनेवाले यांनी केला होता, व विमा करार घटनेच्या दिवशी वैध होता याबद्दल वाद नाही. विमा करारप्रमाणे वाहनाची चोरी झाल्यास सामनेवाले नुकसान भरपाई अदा करण्यास जबाबदार होते. सामनेवाले यांच्या कथनाप्रमाणे घटनेमध्ये तक्रारदारांचा निष्काळजीपणा असल्यामुळे तक्रारदार नुकसानभरपाई वसूल करण्यास पात्र नाही.
7. तक्रारदारांनी पोलीस स्टेशनकडे जी तक्रार दाखल केली त्यामध्ये तक्रारदारांनी आपले घरासमोर सकाळी 10-30 च्या सुमारास वाहन लावले होते. व स्नान करुन 10-45 च्या सुमारास तक्रारदार वाहनाकडे परत आले असतांना त्यांना वाहन जागेवर दिसून आले नाही. याप्रकारे केवळ 15 मिनिटांच्या कालावधीमध्ये तक्रारदाराचे वाहन चोरीला गेल्याचे दिसून आले. वाहन सोडून जात असतांना वाहन सुरु करण्याची किल्ली वाहन मालकाने स्वतःकडे ठेवावी हे जरी योग्य असले तरी देखील काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये व दरम्यानचा कालावधी फार विलंबाचा नसल्याने वाहन मालक/चालक वाहनाची चावी वाहनास लावून दुसरीकडे जातो. सर्वसामान्य परिस्थितीमध्ये याप्रकारची वर्तणूक वाहन चालकाचा निष्काळजीपणा समजला जात नाही. प्रस्तुतच्या प्रकरणात देखील तक्रारदार यांना लगेचच वाहनाचा वापर करुन बाहेर जायचे होते, व दरम्यान तक्रारदार स्नान करणेकामी आपले घरात गेले असतांना वाहन चोरीला गेले. त्यातही तक्रारदारांचे वाहन त्यांचे घरासमोर लावलेले होते. जी तक्रारदारांची वाहन लावण्याची नेहमीची जागा असेल. त्या परिस्थितीत तक्रारदारांचा वाहनाच्या किल्लीसह वाहन सोडून जाण्याची कृती निष्काळजीपणाची होती असा निष्कर्ष काढता येत नाही.
8. या संदर्भात तकारदार यांनी पंजाब उच्च न्यायालयाचे प्रकरण इफको टोकियो विरुध्द मेसर्स गोल्डन आयकॉन व इतर रिट याचिका क्रमांक 12565/09 दिनांक 19/8/2009 या न्याय निर्णयाचा संदर्भ दिला. त्यामध्ये देखील याच प्रकारची घटना असतांना मा. पंजाब उच्च न्यायालयाने वाहन चालकाचा निष्काळजीपणा असल्याने विमा कंपनीने नुकसानभरपाईची मागणी नाकारण्याचा निर्णय चूकीचा होता असा अभिप्राय नोंदविला. प्रस्तुतच्या प्रकरणात वरील अभिप्राय लागू होतो. सबब विमा कंपनीने तक्रारदारांना विमा करारातंर्गत सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली असा निष्कर्ष नोंदवावा लागतो.
9. तक्रारदारांनी वाहनाची पूर्ण किंमत रुपये 28,718/- परत मागितलेली आहे परंतु विमा करारामध्ये ती रक्कम रुपये 22,757/- अशी नमूद आहे सबब तक्रारदार केवळ रुपये 22,757/- वसूल करण्यास पात्र राहतील. सामनेवाले यांनी चूकीचा निर्णय घेऊन तक्रारदारांची मागणी फेटाळल्याने तक्रारदार मूळ रक्कम 9 टक्के व्याजासह वसूल करण्यास पात्र आहेत.
11. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 166/20009 अंशतः मंजूर करण्यात येतात.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना विमा करारातंर्गत सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली असे जाहिर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदारांना विमा करारांतर्गत नुकसानभरपाई म्हणून रुपये 22,757/- दिनांक 1/1/2008 पासून 9 टक्के व्याजाने अदा करावेत, असा आदेश सामनेवाले यांना देण्यात येतो.
4. या व्यतिरिक्त सामनेवाले यांनी तक्रारदारांना खर्चाबद्दल रुपये 2000/- अदा करावेत असाही सामनेवाले यांना आदेश देण्यात येतो.
5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 02/09/2013
( एस. आर. सानप ) ( ज. ल. देशपांडे )
सदस्य अध्यक्ष
एम.एम.टी./-