(आदेश पारीत व्दारा - श्री शेखर पी. मुळे, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 22 सप्टेंबर 2016)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली आहे. ही तक्रार विरुध्दपक्ष इंशुरन्स विमा कंपनीने तक्रारकर्त्याच्या क्षतिग्रस्त गाडीचा विमा दावा नाकारल्यामुळे दाखल केली. तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे.
2. तक्रारकर्ता हा ट्रक क्रमांक MH-40- N 1830 चा मालक आहे. त्या गाडीचा विमा रुपये 10,38,012/- चा विरुध्दपक्षाकडे काढण्यात आला होता. विम्याचा अवधी दिनांक 25.2..2011 ते 24.2.2012 असा होता. विरुध्दपक्षाने त्याला फक्त पॉलिसीची कव्हरनोट दिली ज्यामध्ये अटी व शर्तीचा उल्लेख केलेला नव्हता. विरुध्दपक्षाने त्यांच्याकडून प्रस्ताव फार्म किंवा NCB बाबत घोषणापञ लिहून घेतले नव्हते. विम्याच्या मुदतीमध्ये त्या ट्रकला जानेवारी 2012 मध्ये अपघात झाला व त्यामध्ये भारी नुकसान झाले. घटनेची सुचना पोलीस व विरुध्दपक्षाला देण्यात आली. विरुध्दपक्षाने सर्व्हेअरची नेमणूक केली त्याने क्षतिग्रस्त ट्रकची तपासणी केली व त्याच्या परवानगीने त्या ट्रकला दुस-या वाहनासोबत दुरुस्तीकरीता पाठविण्यात आले. त्यानंतर दिनांक 7.1.2012 ला विरुध्दपक्षाकडे रुपये 5,98,015/- चा विमा दावा दाखल करण्यात आला. तसेच फायनल असेसमेंटसाठी सर्व्हेअरला पाठविण्याची विनंती करण्यात आली, त्यानुसार सर्व्हेअरने त्याचे अंतिम तपासणी केल्यानंतर ट्रकला दुरुस्तीसाठी उघडण्यात आले. परंतु, तो ट्रक दुरुस्ती करण्या पलीकडे होते म्हणून तक्रारकर्त्याला एक स्टॅम्प पेपरवर तो रुपये 3,10,000/- कॅशलॉस बेसीसवर घेण्यास तयार आहे असे लिहून देण्यास सांगितले. त्याचप्रमाणे त्याने त्याची पुर्तता केली, परंतु त्यानंतर त्याचा दावा या कारणास्तव नाकारण्यात आला की, त्याने भरलेला प्रिमियम कमी असून NCB बद्दल त्याने चुकीचे घोषणापञ दिले होते. दावा नाकारण्याचे या कारणाशी असहमती दर्शवून तक्रारकर्त्याने रुपये 3,10,000/- चा दावा व्याजासह तसेच नुकसान भरपाई व खर्च मागितला आहे.
3. विरुध्दपक्ष यांनी आपला लेखी जबाब निशाणी क्र.8 खाली दाखल केला, त्यात विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याची ट्रकवरील मालकी आणि ट्रकचा विमा मान्य केला आहे. परंतु, तक्रारकर्त्याला अटी व शर्तीचे दस्ताऐवज दिले नाही हे नाकबूल केले, तसेच ट्रकला झालेला अपघातात व त्या संबंधीची पोलीसांना दिलेली सुचना या गोष्टी सुध्दा नाकबूल केल्या आहेत. घटनास्थळाचे निरिक्षण करण्यासाठी सर्व्हेअरची नेमणूक केली होती, परंतु हे नाकबूल करण्यात आले होते की, त्याच्या परवानगीने त्या ट्रकला दुसरा वाहनाणासोबत जोडून दुरुस्तीकरीता पाठविण्यात आले. तक्रारकर्त्याने रुपये 5,98,015/- चा दावा केला हे सुध्दा नाकबूल केले. सर्व्हेअरने केलेली अंतिम तपासणी मान्य करुन हे नाकबूल केले की, तक्रारकर्त्याने सर्व कागदपञांची पुर्तता केली होती. त्याचा दावा कराराच्या अटी व शर्तीनुसार फेटाळण्यात आला. तक्रारकर्त्याने पूर्वीच्या विमा कंपनीकडून NCB (No Claim Bonus) घेतले होते, परंतु विरुध्दपक्षाकडून विमा काढतांना ही गोष्ट लपवून ठेवली. त्यामुळे त्याला कमी प्रिमियम चुकीने लावण्यात आले. तक्रारकर्त्याने अशाप्रकारे महत्वाची बाब लपवून ठेवली व कराराचा भंग केला, म्हणून तक्रार खारीज करण्याची विनंती केली.
4. दोन्ही पक्षाचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला. तसेच अभिलेखावरील दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील निष्कर्ष देण्यात येते.
// निष्कर्ष //
5. या प्राकरणात जे मुख्य दोन मुद्दे उपस्थित होतात ते असे की, तक्रारकर्त्याने पूर्वीच्या विमा कंपनीकडून NCB (No Claim Bonus) घेतले होते काय आणि जर घेतले असेल तर ती बाब विरुध्दपक्षाकडून नव्याने विमा काढतांना लपवून ठेवली होती काय. कारण विरुध्दपक्षाने विमा पॉलिसी देतांना तक्रारकर्त्याला 20 टक्के NCB (No Claim Bonus) साठी प्रिमियम मधून सुट दिली होती आणि त्याचप्रमाणे प्रिमियमची रक्कम ठरविण्यात आली. ज्यावेळी विरुध्दपक्षाने या प्रकरणाची शहानिशा केली त्यावेळी असे आढळून आले की, तक्रारकर्त्याने पूर्वीच्या विमा कंपनीकडून ‘’चोलामंडलम् विमा कंपनी’’ NCB (No Claim Bonus) घेतला होता, म्हणून विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला दिनांक 11.4.2011 लाह पञ देवून कळविले होते की, त्याच्या पूर्वीच्या चोलामंडलम् विमा कंपनीकंडून चौकशी केली असता त्याने NCB (No Claim Bonus) घेतल्याचे निष्पन्न झाले होते. परंतु त्या संबंधी त्याने खोटे घोषणापञ विरुध्दपक्षाकडे सादर केले, म्हणून त्याला 15 दिवसाचे आंत वाढीव पिमियमची रक्कम भरण्यास सांगितली, अन्यथा त्याला नुकसानीबद्दल दावा करण्याचा अधिकार राहणार नाही असे सुचीत केले. विरुध्दपक्षाच्या या पञावर तक्रारकर्त्याकडून कुठलेही प्रतीउत्तर देण्यात आलेले नाही, म्हणजेच तक्रारकर्त्याला या पञा विषयी कुठलाही आक्षेप नाही असे म्हणावे लागेल.
6. यावरुन असे दिसून येते की, तक्रारकर्त्याने खोटे घोषणापञ व फसवणुकीच्या मार्गाने विरुध्दपक्षाकडून गाडीचा विमा उतरविला व अशाप्रकारे विमा कराराच्या तत्वाचा भंग केला. त्यांनी तक्रारीमध्ये गाडीच्या पूर्वीच्या विमा संबंधी किंवा NCB (No Claim Bonus) संबंधी काहीही उल्लेख केलेला नाही. ज्याअर्थी असे निष्पन्न झाले की, तक्रारकर्त्याने पूर्वीच्या विमा कपंनीकडून NCB (No Claim Bonus) घेतले होते, परंतु त्यानंतर विरुध्दपक्षाकडून विमा काढतांना 20 टक्के NCB (No Claim Bonus) घेतले यावरुन हे दिसून येते की, तक्रारकर्त्याने खोट्या घोषणापञावर गाडीचा विमा व त्यासंबंधी प्रिमियमचा हप्ता ठरवून घेतला. “New India Assurance Company Ltd. –Vs.- Dinesh Kumar, Revision Petition No. 1046 of 2015 राष्ट्रीय आयोगाने दिनांक 12.10.2015” ला दिलेल्या निवाड्यानुसार जर तक्रारकर्ता विरुध्दपक्षाकडून खोट्या घोषणापञावर तक्रारकर्त्याने विमा पॉलिसी काढली असेल तर अशी विमा पॉलिसी ही कायद्याने Null and Void असते आणि तक्रारकर्त्याला विमाकृत वाहनाच्या नुकसानीबद्दल नुकसान भरपाई मिळण्याचा अधिकार राहात नाही. अशाप्रकारचा निवाडा “Tata AIG General Insurance Company Ltd. –Vs.- Gulzari Sing , Revision Petition No. 1255 of 2009, यात दिनांक 26.2.2010” ला निवाडा दिला आहे.
7. वरील सर्व वस्तुस्थिती व निवाड्याचा विचार करता वरील कारणास्तव आम्ही ही तक्रार खारीज करीत आहोत. सबब खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्ताची तक्रार खारीज करण्यात येते.
(2) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 22/09/2016