मंचाचे निर्णयान्वये - श्री. मिलींद केदार , सदस्य //- आदेश -// (पारित दिनांक – 06/10/2010) 1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 कलम 12 अन्वये दाखल केलेली असून तक्रारकर्त्याची तक्रार अशी आहे की, त्याने गैरअर्जदाराकडून गृह कर्ज रु.75,00,000/- घेतले व त्याची परतफेड ही एकूण 48 समान हफ्त्यामध्ये नियमितपणे केली. यानंतर परत तक्रारकर्त्याने रु.25,00,000/- चे कर्ज गैरअर्जदाराकडून घेतले असता याही कर्जाचा भरणा नियमितपणे तो करीत होता. परंतू तक्रारकर्त्याच्या असे लक्षात आले की, गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्याच्या नकळत व संमतीविना बरीच मोठी रक्कम त्याच्या खात्यातून वळती केली आणि त्यामुळे त्यावेळेस तक्रारकर्त्याने जिवन विमा निगमला दिलेला चेक हा वटविल्या गेला नाही. एकाच महिन्यात रक्कम दोनदा वळती केली याबाबत वारंवार तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराला सुचित केले असता व त्यावर बैठकी झाल्या असता व पत्र आणि कायदेशीर नोटीस पाठविला असता काहीही निष्पन्न झाले नाही. तक्रारकर्त्याला सदर रक्कम न मिळाल्याने त्याला देणगी देऊन आयकरातून सूट घेता आली नाही, तसेच त्याला आवश्यक असलेले ऍक्युरस मशिन व त्यापासून मिळणारे फायदे तो घेऊ शकला नाही. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याविरुध्द निगोशिएबल इस्ट्रुमेंट्स कायद्याअंतर्गत पुणे येथे खोटी केस दाखल केलेली आहे. जेव्हा की, तक्रारकर्त्याने कधीच गैरअर्जदाराला कुठलाही धनादेश दिलेला नाही. तक्रारकर्ता नामांकित नेत्र शल्य चिकित्सक असून त्यांना गैरअर्जदारांच्या सदर कृतीने मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला, म्हणून तक्रारकर्त्याने सदर तकार दाखल करुन गृह खात्यात जास्तीची घेतलेली रक्कम व्याजासह वळती करुन नियमित करण्यात यावी, आयकर, त्यातील सुट व बचती करीता झालेल्या नुकसानाची भरपाई, तक्रारीचा खर्च, कर्ज खात्याच्या बैठकीकरीता आलेला संपूर्ण खर्च इ. रकमा या व्याजासह मिळण्याची मागणी केलेली आहे. 2. सदर तक्रार मंचासमोर आल्यानंतर, मंचाने गैरअर्जदारावर नोटीस बजावला. गैरअर्जदाराने तक्रारीस लेखी उत्तर दाखल करुन परिच्देदनिहाय उत्तरात तक्रारकर्त्याचे तक्रारीतील संपूर्ण कथन नाकारुन विशेष कथनात नमूद केले की, तक्रारकर्त्याचे दोन्ही कर्ज करार हे ARCIL चे ताब्यात असल्याने कर्जाची परतफेड ही ARCIL कडेच करावी लागले. तसेच सदर तक्रारीत ARCIL ला विरुध्द पक्ष न केल्याने सदर तक्रार खारीज करण्याची मागणी गैरअर्जदाराने केलेली आहे. गैरअर्जदाराच्या मते त्यांनी एकाच महिन्यात खात्यातील रक्कम दोनदा वळती केलेली नसून रीशेड्युलमेंटला सहा महिन्याचा जो जास्तीचा काळ लागला, त्याकरीता जून 2006 मध्ये रीवर्स एंट्री केलेली आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याला सदर तक्रार दाखल करण्याचा हक्क नाही, म्हणून सदर तक्रार ही तथ्यहीन असून ती खारीज करण्याची मागणी केलेली आहे. 3. सदर तक्रार मंचासमोर दि.29.09.2010 रोजी युक्तीवादाकरीता आली असता गैरअर्जदारांचा युक्तीवाद मंचाने ऐकला. तक्रारकर्ता व त्यांचे वकील युक्तीवादाकरीता संधी देऊनही मंचासमोर युक्तीवाद केला नाही. म्हणून मंचाने प्रकरण उपलब्ध दस्तऐवजांच्या आधारे गुणवत्तेवर निकाली काढण्याकरीता संपूर्ण दाखल दस्तऐवजांचे सुक्ष्मपणे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. -निष्कर्ष- 4. मंचाने तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तऐवजांचे अवलोकन केले असता व गैरअर्जदाराने लेखी उत्तरात नमूद केल्याप्रमाणे तक्रारकर्त्याचे कर्ज खाते गैरअर्जदाराकडे होते, म्हणून तक्रारकर्ता गैरअर्जदाराचा ग्राहक असल्याचे स्पष्ट होते. 5. गैरअर्जदाराने आपल्या उत्तरात मान्य केले आहे की, तक्रारकर्त्याने त्यांच्याकडून LBNAG00000651098 व LBNAG00001227917 अन्वये कर्ज घेतले होते व सदर कर्जाचा करार ARCIL (ASSET RECONSTRUCTION CONPANY (INDIA) LIMITED) जवळ आहे व सदर बाब ही गैरअर्जदाराने दाखल केलेल्या दस्तऐवज क्र. 3 वरुन स्पष्ट होते. तसेच सदर कर्जाच्या करारनाम्यामुळे ARCIL ला विरुध्द पक्ष करणे गरजेचे होते असे गैरअर्जदाराने नमूद केले आहे. मंचाचे सुध्दा असे मत आहे की, सदर करारनामा हा गैरअर्जदार व ARCIL मध्ये होऊन त्याद्वारे तक्रारकर्त्याला कर्ज देण्यात आले असल्यामुळे सदर प्रकरणाचा निवाडा करण्याकरीता ARCIL ला विरुध्द पक्ष करणे गरजेचे आहे. त्यामुळे ARCIL विरुध्द पक्ष करुन तक्रारकर्त्याला परत तक्रार दाखल करण्याची मुभा देऊन सदर तक्रार निकाली काढण्यात येते. उपरोक्त निष्कर्षावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार त्याला परत तक्रार दाखल करण्याची मुभा देऊन निकाली काढण्यात येत आहे. 2) तक्रारीच्या खर्चाबाबत काहीही आदेश नाही. 3) तक्रारकर्त्याने दाखल ‘ब’ व ‘क’ फाईल्स (सदस्यांकरीता फाईल्स) घेऊन जावे.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |