श्री.विजयसिंह राणे, मा. अध्यक्ष यांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 22/08/2011)
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे. या प्रकरणातील तक्रारकर्त्याची तक्रार अशी आहे की, त्यांनी गैरअर्जदारांकडून वाहन खरेदी करण्याकरीता कर्ज घेतले होते. पुढे त्या कर्जाची परतफेड केली. त्यामध्ये अंतिम तडजोड झालेली होती. मात्र गैरअर्जदार यांचेकडून त्रास होत असल्यामुळे त्यांनी ग्राहक मंचात तक्रार दाखल केली. तीमध्ये 15.12.2009 मध्ये मंचाने आदेश पारित करुन तक्रार अंशतः मंजूर केली आणि तक्रारकर्त्याला नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. पुढे गैरअर्जदारांनी त्या आदेशाचे पालन केले. त्या आदेशानंतर गैरअर्जदारांनी त्यांच्याकडे जमा असलेले पाच कोरे धनादेश, ना हरकत प्रमाणपत्र दुचाकी वाहनाचे सर्व मुळ कागदपत्रे यांची मागणी केली. त्यासाठी दि.07.05.2010 रोजी लिखित स्वरुपात रजिस्टर्ड पोस्टाने मागणी केली. मात्र गैरअर्जदाराने त्याबाबत काहीही केले नाही. उलट तक्रारकर्त्याचे त्यांचेजवळ जमा असलेला धनादेश क्र.384288 हा वटविण्यासाठी टाकला आणि तो वटला नाही, या कारणावरुन तक्रारकर्त्यावर फौजदारी प्रकरण दाखल करण्याचा नोटीस वकिलामार्फत तक्रारकर्त्याला दिला. त्यास तक्रारकर्त्याने सविस्तर उत्तर दिले आणि शेवटी ही तक्रार दाखल केली व तीद्वारे गैरअर्जदाराने त्यांच्याकडे जमा असलेले पाच कोरे धनादेश तक्रारकर्त्याला परत करावे, त्याचा गैरवापर करु नये. दुचाकी वाहनाची सर्व मुळ कागदपत्रे परत करावे, झालेल्या मानसिक त्रासापोटी रु.50,000/- नुकसान भरपाई मिळावी, तक्रारीच्या खर्चापोटी रु.10,000/- मिळावे अशी मागणी केली आहे. आपल्या तक्रारीसोबत तक्रारकर्त्यांनी मंचाने पारित केलेल्या आदेशाची प्रत, नोटीसची प्रत, पोस्टाच्या पावत्या आणि नोटीसचे उत्तर दाखल केलेले आहे.
2. गैरअर्जदारांना सदर तक्रारीची नोटीस देण्यात आली. त्यांनी लेखी उत्तर दाखल केले व सर्व विपरीत विधाने नाकबूल केली. त्यांचे म्हणणे असे आहे की, मंचाने पारित केलेल्या आदेशाप्रमाणे आदेशाचे पालन त्याने केलेले आहे. मात्र मंचाने आपल्या आदेशात तक्रारकर्त्याकडून गैरअर्जदार काहीही घेणे लागत नाही असे घोषित केलेले नाही. त्यांच्याकडील हिशोबाप्रमाणे दि.08.12.2010 रोजी ते तक्रारकर्त्यांकडून रु.20,273/- एवढी रक्कम वसुल करण्यास पात्र आहे. त्याचे परिणाम व तक्रारकर्त्यांनी ती रक्कम न दिल्यामुळे त्यांनी संबंधित धनादेश वटविण्यास टाकले व तक्रारकर्त्यांनी जाणून बुजून त्या खात्यात पैसे न ठेवल्यामुळे तो परत आला. थोडक्यात तक्रारकर्त्याची तक्रार चुकीची व गैरकायदेशीर आहे असे उजर घेतला आहे.
3. सदर प्रकरण युक्तीवादाकरीता आल्यानंतर मंचाने उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकला. तसेच दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले.
-निष्कर्ष-
4. यातील तक्रारकर्त्याने दाखल केलेली मुळ तक्रार 391/09 यामध्ये दि.15.12.2009 रोजी आदेश पारित केला. या आदेशात पृष्ठ क्र. 7 वर मंचाने स्पष्टपणे आपले निरीक्षणात नमूद केले आहे की, “तक्रारकर्त्याचे गैरअर्जदारासोबत कर्ज प्रकरणासंबंधी पूर्ण तडजोड झालेली आहे आणि ती स्विकारणे गैरअर्जदार क्र. 1 ला गरजेचे आहे, असे या न्यायमंचाचे मत आहे. त्यामुळे गैरअर्जदार व तक्रारकर्ता एकमेकांचे काहीही देणे-घेणे लागत नाही. तसेच गैरअर्जदार क्र. 2 हेसुध्दा तक्रारकर्त्याचे काहीही देणे-घेणे लागत नाही. मात्र गैरअर्जदार क्र. 1 ने कर्जाचे प्रकरण चुकीचे बनविले आहे.”ही बाब स्पष्ट असतांना गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यांचे त्यांचेजवळ जमा असलेले धनादेश पुन्हा वसुलीसाठी बँकेत टाकणे आणि तो वटला नाही या कारणावरुन तक्रारकर्त्यास नोटीस देणे आणि त्रास देणे हे जाणुन-बुजून केलेली गैरकृती आहे व उघड अनुचित व्यापार प्रथा आहे आणि सेवेतील त्रुटी आहे असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. असे दिसते की, गैरअर्जदाराने सदरची कृती ही तक्रारकर्त्यावर राग काढण्याच्या दृष्टीने जाणुन-बुजून केलेली आहे. यास्तव खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यास त्यांचेकडे असलेले पाच सह्या केलेले कोरे धनादेश क्र. 384288, 384289, 384290, 391781 व 391782 आणि ना हरकत प्रमाणपत्र, वाहनासंबंधीचे सर्व मुळ दस्तऐवज, सदर आदेश प्राप्त झाल्यापासून एक महिन्याचे आत परत करावे.
3) तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक त्रासाबद्दल गैरअर्जदाराने रु.25,000/- एवढी नुकसान भरपाई तक्रारकर्त्यास द्यावी. सदरची रक्कम गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यास देऊन आदेशाचे पालन करावे. गैरअर्जदारातर्फे हे दृष्कृत्य करणा-या अधिका-यांच्या शोध घेऊन त्याचे वेतनातून सदर रक्कम कपात करावी.
4) तक्रारीच्या खर्चाबाबत गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यास रु.2,000/- द्यावे.
5) सदर आदेशाचे पालन गैरअर्जदाराने आदेशाची प्रत मिळाल्यापासून एक महिन्याचे आत करावे.