श्री. विजयसिंह राणेयांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 10/01/2012)
1. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली असून तक्रारकर्त्यांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, त्यांनी क्रेडीट कार्ड क्र. 4477474517132000 अन्वये गैरअर्जदारांची सेवा प्राप्त केली होती. त्यांना दि.26.03.2010 रोजी बँक स्टेटमेंट प्राप्त झाले, त्याप्रमाणे रु.3,872.96 रक्कम त्यांना देय होती आणि अंतिम तारीख 12.04.2010 होती. त्यांनी या रकमेबाबतचा बँक ऑफ बडोदाचा चेक गैरअर्जदारांना दिला, तो वटला आणि त्याची रक्कम गैरअर्जदारांना मिळाली. मात्र त्यानंतर वेळोवेळी फोन करुन वा अन्य प्रकारे रकमेची मागणी गैरअर्जदारांनी करणे सुरु ठेवले व जास्त रकमेची देयके पाठविणे सुरु ठेवले. म्हणून लिखित पत्र व नोटीस दिली आणि प्रत्यक्ष भेटून वस्तूस्थिती समजावून सांगितली. परंतू त्याचा काहीही उपयोग झाला नाही, म्हणून तक्रार दाखल केली व तीद्वारे 27.03.2010 नंतरचे सर्व विवरणे रद्द करावे, मानसिक त्रासाबाबत रु.25,000/- नुकसान भरपाई मिळावी, तक्रारीचा खर्च रु.10,000/- मिळावा आणि मानहानीबद्दल रु.2,00,000/- मिळावे अशा मागण्या करण्यात आल्या.
2. गैरअर्जदारांनी मंचाचे नोटीसवर हजर होऊन, तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले व तक्रारीतील प्रत्येक विधाने नाकबुल केली. त्यांच्या तर्फे कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी नसून ही खोटी तक्रार त्यांच्याविरुध्द दाखल करण्यात आलेली आहे असा उजर घेतला आहे.
3. प्रकरण युक्तीवादास आले असता, तक्रारकर्त्यांनी प्रतिज्ञालेख दाखल केला व नंतर गैरअर्जदारांनी लेखी युक्तीवाद दाखल केला. मंचाने प्रकरणातील उपलब्ध कागदपत्रांचे सुक्ष्म अवलोकन केले असता मंचाचे निष्कर्ष खालीलप्रमाणे.
-निष्कर्ष-
4. यातील तक्रारकर्त्यांनी गैरअर्जदारांना रु.3872.96 एवढी रक्कम दिली आहे ही बाब तक्रारकर्त्यांनी बँक ऑफ बडोदा यांनी दिलेल्या प्रमाणपत्रावरुन सिध्द केलेली आहे. गैरअर्जदारांनी त्यांच्या बँकेचे स्टेटमेंट दाखल करुन ही रक्कम मिळाली नाही असे दर्शविले नाही.
5. हे जरीही खरे असले तरीही, तक्रारकर्त्यांचे क्रेडीट कार्ड त्यानंतर बंद करण्यात आले व त्यात कोणताही व्यवहार झालेला नाही, ही बाब तक्रारकर्तेसुध्दा स्वतः सिध्द करु शकले नाही. तक्रारकर्त्यांनी दाखल केलेल्या विवरणावरुन व नोंदीवरुन असे दिसून येते की, त्यांनी एप्रिल महिन्यात क्रेडीट कार्डचा उपयोग केलेला आहे. त्यामध्ये लांबा ट्रेडर्स, कॅफे कॉफी डे-जगत दोनवेळा, सुंदर ऑटो सेंटर अशा स्वरुपात एप्रिल 2010 मध्ये झाल्याचे दिसून येते. याचाच अर्थ तक्रारकर्त्यांनी कार्डचा वापर थांबविला नव्हता असे स्पष्ट होते. तक्रारकर्त्यांनी यासंबंधीचा खुलासा तक्रारीत केलेला नाही. याच बरोबर गैरअर्जदारांनी सुध्दा तक्रारकर्त्यांचे नोटीसला उत्तर दिले नाही, पत्राला उत्तर दिले नाही, या बाबीसुध्दा ठळकपणे दिसून येतात. वरील सर्व परिस्थितीचा विचार करता काही बाबी स्पष्ट आहेत, त्या म्हणजे तक्रारकर्त्याचे रु.3,872.96 एवढी रक्कम गैरअर्जदाराला दिली. ती गैरअर्जदाराने 12 एप्रिल 2010 ला प्राप्त झालेली आहे. मात्र गैरअर्जदारांनी ती रक्कम आपल्या हिशोबात घेतल्याचे दिसून येत नाही. ती त्यांनी आपल्या बाकीतून वगळणे गरजेचे आहे. म्हणजे त्या रकमेवर पुढे अन्य प्रकारे व्याज देणे योग्य नाही आणि तक्रारकर्त्यांनी त्यांच्याकडे 29.09.2010 रोजी दिलेले पत्र लक्षात घेता, तेथून पुढे गैरअर्जदारांनी त्यास उत्तर न दिल्यामुळे, पुढील व्याज घेण्याचे प्रयोजन दिसून येत नाही. याप्रमाणे आवश्यक त्या दुरुस्त्या गैरअर्जदाराच्या खात्यात होणे गरजेचे आहे. वरील सर्व परिस्थितीचा विचार करुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदारांनी दि.12.04.2010 रोजी तक्रारकर्त्याकडून रु.3837/- प्राप्त झालेले आहेत, असे त्यांनी आपल्या खात्यात दर्शवावे आणि त्यांनी पुढे त्या रकमेवर
कोणतेही व्याज, दंडात्मक शुल्क इ. आकारु नये व त्याप्रमाणे आपले खाते दुरुस्त करुन उर्वरित येणे रक्कम तक्रारकर्त्याकडून मागावी व ती देण्याची जबाबदारी तक्रारकत्यांची आहे.
3) तक्रारकर्त्यास तक्रारीच्या खर्चादाखल रु.1,000/- गैरअर्जदारांनी द्यावे. तक्रारकर्त्याकडून काही रक्कम येणे असल्यास गैरअर्जदार ती समायोजित करु शकतील.
4) आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदारांनी आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावी.