(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार - सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 14/02/2011) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 22.03.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र.2 कडून होंडा एक्टीवा हे वाहन खरेदी करण्याकरता गेला असता त्या ठिकाणी गैरअर्जदार क्र.1 यांचे प्रतिनिधींशी भेट झाली. तक्रारकर्त्याने पुढे नमुद केले आहे की, त्याला होंडा एक्टीवा हे वाहन गैरअर्जदार क्र.2 यांचेमार्फत खरेदी करावयाचे होते. त्याकरीता त्याने गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून कर्ज घेण्याचे ठरविले व त्या अंतर्गत रु.32,000/- वाहन कर्ज 7.14% दराने गैरअर्जदार क्र.1 चे प्रतिनिधींनी ऑफर दिली होती व त्याची परतफेड रु.1,204/- च्या 42 मासिक हप्त्यात करावयाची होती. त्याकरीता तक्रारकर्त्याने आवश्यक कागदपत्रे, बँक खात्याची प्रत, पॅनकार्ड, ओळखपत्र, राहण्याचे प्रमाणपत्र, फोटो आणि 5 कोरे धनादेश त्वरीत गैरअर्जदार क्र.1 चे प्रतिनिधींकडे केले. त्यानंतर गैरअर्जदार क्र.1 चे प्रतिनिधीने डिलेव्हरी ऑर्डर क्र.471 दि.28.09.2006 रोजी सदर्शन मोटर्सचे नावाने काढला व त्यावर तक्रारकर्त्याची सही घेतली. तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले आहे की, होंडा एक्टीवा या गाडीची प्रतिक्षा जवळपास 3 ते 4 महिन्यांची असल्यामुळे व त्यास तातडीने वाहनाची गरज असल्यामुळे तक्रारकर्त्याने होंडा एक्टीवा हे वाहन खरेदी करण्याचा विचार सोडला व तशी विनंती गैरअर्जदारांना केली. तसेच गैरअर्जदार क्र.1 यांचे प्रतिनिधीला विनंती केली की, त्याने दाखल केलेली कागदपत्रे परत करावी. तक्रारकर्ता मध्यंतरीच्या काळात कामामध्ये व्यस्त होता व जानेवारी-2009 ते सप्टेंबर-2009 पर्यंत आजारी असल्यामुळे तो कागदपत्रे परत घेण्यांस जाऊ शकला नाही. 3. तक्रारकर्त्याचे पुढे असे म्हणणे आहे की, त्याची प्रकृति सुरळीत झाल्यावर त्याचे खाते क्र.624205006747 चे विवरणाचे निरीक्षण केले असता त्याचे लक्षात आले की, त्याचे खात्यातुन दरमाह रु.1,204/- स्थानांतरीत करण्यांत आले होते व सदर रक्कम वाहन कर्ज खाते क्र. LTNAG0007990685 ला वळते करण्यांत आले. तक्रारकर्त्याचे मुखत्वे म्हणणे असे आहे की, त्याने याबाबत गैरअर्जदारांशी संपर्क साधला असता त्याला लक्षात आले की, वाहन कर्ज प्रकरणामधे वाहन क्रमांक एमएच-31/बीएक्स-575 चे वाहन खरेदी करण्यांत आल्याचे दर्शविण्यांत आले. परंतु प्रत्यक्षात तक्रारकर्त्याने असे कोणतेही वाहन खरेदी केले नाही. तसेच तक्रारकर्त्याचे नाव ‘सी बील’ मध्ये देण्यांत येईल व वर्तमान पत्रात नाव देण्यांत येईल असे गैरअर्जदार क्र.1 ने कळविले. तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, त्याने कर्ज घेतले नसतांना गैरअर्जदार क्र.1 यांनी त्याचे खात्यातुन रु.43,000/- फसवणूक करुन बेकायदेशिररित्या वटविणे हा गैरअर्जदारांचा निष्काळजीपणा आहे. तक्रारकर्त्याने या संदर्भात वकीला मार्फत दि.15.01.2010 रोजी नोटीस पाठवुन सदर बाब गैरअर्जदारांचे निदर्शनास आणून दिली तरीपण त्यावर काहीही कारवाई न झाल्यामुळे तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल केलेली आहे व त्याव्दारे रु.43,344/- 18% व्याजासह परत मागितली असुन मानसिक, शारीरिक त्रासाबद्दल रु.2,50,000/- ची व तक्रारीच्या खर्चाबद्दल रु.5,000/- ची मागणी केलेली आहे. 4. प्रस्तुत प्रकरणी मंचामार्फत गैरअर्जदारावर नोटीस बजावण्यांत आली असता, गैरअर्जदार क्र.1 यांनी सदर तक्रारीला खालिल प्रमाणे उत्तर दाखल केलेले आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी आपल्या प्राथमिक आक्षेपात सदर तक्रार ही खोटी व वाईट हेतुने दाखल केलेली असुन ती खारिज करण्याची विनंती केलेली आहे. त्यांनी पुढे परिच्छेद निहाय उत्तरात नमुद केले आहे की, गैरअर्जदार क्र.1 च्या कोणताही प्रतिनिधी कोणत्याही व्यावसायीक प्रतिस्ठानात उपस्थित राहत नाही. त्यांनी पुढे असे नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याने त्यांचेकडे वाहन कर्ज मिळविण्याकरता अर्ज केला होता व कर्जाची रक्कम रु.41,228/- देण्याची हमी दिली होती. त्यांनी पुढे असेही नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याने त्यांना Purchase Order रद्द करण्यांची कोणतीही तोंडी विनंती केलेली नाही. तसेच गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारकर्त्याचे इतर सर्व विपरीत विधाने अमान्य केली असुन तक्रार खारिज करण्याची मंचास विनंती केलेली आहे. 5. गैरअर्जदार क्र.2 यांनी सदर तक्रारीला आपले उत्तर दाखल केले असुन त्यात तक्रारकर्त्याने त्यांचेकडे होंडा एक्टीवा करता नोंदणी केली नव्हती व मार्जिन मनीपण दिले नसल्याचे नमुद केले असुन तक्रारकर्त्याला होंडा एक्टीवा दिली नाही हे ही मान्य केलेले आहे. गैरअर्जदार क्र.2 ने नमुद केले आहे की, सदर गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारकर्त्याचे खात्यातून रक्कम वळती केली असेल तर ती तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून घ्यावी. तसेच त्यांचे विरुध्दची तक्रार खारिज करण्यांत यावी अशी मंचास विनंती केलेली आहे. 6. प्रस्तुत तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.05.02.2011 रोजी आली असता मंचाने उभय पक्षांचा युक्तिवाद त्यांचे वकीला मार्फत ऐकला. तसेच तक्रारीत दाखल दस्तावेज व उभय पक्षांचे कथन यांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 7. तक्रारकर्ता हा गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे होंडा एक्टीवा हे वाहन खरेदी करण्याकरता गेला होता व सदर दुचाकी वाहन खरेदी करण्याकरता त्याने गैरअर्जदार क्र.1 यांचेकडे कर्जाची मागणी केली होती, ही बाब उभय पक्षांचे कथनावरुन स्पष्ट होत असल्यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदारांचा ‘ग्राहक’ ठरतो असे मंचाचे मत आहे. 8. गैरअर्जदार क्र.2 यांचे लेखी उत्तरावरुन ही बाब स्पष्ट होते की, त्यांनी तक्रारकर्त्याला तक्रारीत नमुद होंडा एक्टीवा हे वाहन दिले नाही व तक्रारकर्त्यासोबत कोणताही खरेदी विक्रीचा व्यवहार न झाल्याचे मान्य केले आहे. या उलट गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारकर्त्याने त्यांचेकडे वाहन खरेदी करण्याकरता अर्ज केला होता ही बाब आपल्या लेखी उत्तरात नमुद केलेली आहे. तसेच त्यांनी आपल्या लेखी उत्तरासोबत कर्ज घेण्याकरता लागणारा अर्ज सादर केला आहे. सदर अर्जाचे अवलोकन केले असता तो पूर्णपणे भरलेला असुन बहुतांशी जागा खाली आहे. गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारकर्त्याला कर्ज मंजूर झाल्या संदर्भात कोणताही दस्तावेज दाखल केला नाही किंवा कर्ज मंजूर झाल्याचे कोणतेही पत्र तक्रारकर्त्यास दिल्याचे दाखल केले नाही. तसेच त्यांनी तक्रारकर्त्यास जो वाहनाचा क्रमांक एमएच-31/बीएक्स-575 दिलेला आहे, असे कोणतेही वाहन तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र.2 कडून खरेदी केले नसल्याचे स्पष्ट होते. असे असतांनाही गैरअर्जदार क्र.1 यांनी सदर वाहनाचा क्रमांक कुठून प्राप्त केला याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. 9. गैरअर्जदार क्र.1 यांचे वकीलांनी युक्तिवादाचे वेळी म्हटले आहे की, त्यांनी मंजूर कर्जाची रक्कम ही गैरअर्जदार क्र.2 यांना दिली मात्र प्रत्यक्षात अशी कोणताही रक्कम मिळाली नसल्याचे गैरअर्जदार क्र.2 चे वकीलांनी युक्तिवादाचे वेळी स्पष्ट केले. गैरअर्जदार क्र.1 ही बँक असुन त्यांनी गेरअर्जदार क्र.2 यांना रक्कम दिल्या संबंधीचा दस्तावेज दाखल करावयास पाहिजे होता. गैरअर्जदार क्र.1 यांनी फक्त तक्रारकर्त्याचे कर्जाचे विवरण दाखल केलेले आहे व त्यामधे तक्रारकर्त्याला दिलेले कर्ज व त्याची रक्कम कर्ज खात्यात वळती केल्याचे विवरण आहे. गैरअर्जदार क्र.2 यांना तक्रारकर्त्याने कोणतेही मार्जिन मनी दिले नसल्याचे स्पष्ट केले आहे, यावरुन सदर प्रकरणामध्ये गैरअर्जदार क्र.1 यांचाच निष्काळजीपणा स्पष्ट होतो. तक्रारकर्त्याने कोणतेही वाहन खरेदी केले नसतांना व वाहन तक्रारकर्त्याला मिळाल्याचा कोणताही दस्तावेज गैरअर्जदार क्र.2 व्दारे गैरअर्जदार क्र.1 यांना प्राप्त झालेला नसतांना वाहनाचा क्रमांक दर्शवीणे व कर्जाची रक्कम तक्रारकर्त्याचे खात्यातून वळती करणे ही गैरअर्जदार क्र.1 ची अनुचित व्यापार पध्दत असल्याचे मंचाचे मत आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदार क्र.1 यांनी तक्रारकर्त्याचे खात्यातून कर्जाची रक्कम रु.43,344/- जी वळती केली ती तक्रारकर्त्यास तक्रार दाखल केल्याचा दिनांक 01.04.2010 रोजी पासुन द.सा.द.शे. 9% व्याजासह रक्कम अदा होईपर्यंत मिळण्यांस पात्र राहील तसेच तक्रारकर्ता हा रु.5,000/- मानसिक त्रासाकरीता व तक्रारीच्या खर्चापोटी रु.2,000/- मिळण्यांस पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता वरील परिस्थितीचा विचार करुन आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदार क्र.1 तक्रारकर्त्यास सेवेत त्रुटी दिल्याचे घोषीत करण्यांत येते. 3. गैरअर्जदार क्र. 1 यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याचे खात्यातून कर्जाची रक्कम रु.43,344/- जी वळती केली ती तक्रार दाखल केल्याचा दिनांक 01.04.2010 रोजी पासुन द.सा.द.शे. 9% व्याजासह रक्कम अदा होईपर्यंत अदा करावी. 4. गैरअर्जदार क्र.1 यांना आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या मानसिक त्रासाबद्दल रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चाचे रु.2,000/- अदा करावे. 5. गैरअर्जदार क्र.2 विरुध्दची तक्रार खारिज करण्यांत येते. 6. वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदार क्र.1 यांनी आदेशाची प्रत मिळाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |