निकाल
दिनांक- 09.10.2013
(द्वारा- श्रीमती मंजूषा चितलांगे, सदस्य)
तक्रारदार शिवाजी भानुदास पवार यांनी सदरील तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 अन्वये सामनेवाला यांनी सेवा देण्यामध्ये कसूर केल्याबाबत नुकसान भरपाई मिळणेबाबत तसेच रु.79,000/- भरले असे घोषित करणेबाबत दाखल केलेली आहे.
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे, तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 बँकेकडून दि.22.10.2006 रोजी शेती औजारे खरेदी करण्यासाठी कर्ज घेतले होते. त्या कर्जाची मुदत दि.22.10.2006 ते 22.04.2010 अशी ठरलेली होती. सामनेवाला क्र.1 ही नावाजलेली बँक असून सामनेवाला क्र.2 हे सामनेवाला क्र.1 बँकेचे वसूली अधिकारी आहेत. सामनेवाला क्र.2 हे सामनेवाला क्र.1 च्या अधिपत्याखाली काम करतअसल्यामुळे त्यांचे कृत्यास सामनेवाला क्र.1 हे जबाबदार आहे. सदर कर्जाची परतफेड तक्रारदार यांनी नियमितपणे केलेली आहे. कर्जाच्या परतफेडीपोटी रक्कम रु.3,32,050/- ही सामनेवाला क्र.2 मार्फत सामनेवाला क्र.1 यांचेकडे जमा केलेली आहे, अशा पावत्या सामनेवाला क्र.2 यांनी तक्रारदारास दिल्या आहेत.
तक्रारदाराने नियमितपणे सामनेवाला क्र.2 मार्फत सामनेवाला क्र.1 यांच्याकडे भरणा केल्यामुळे व नेहमीच्या संबंधामुळे तक्रारदाराचा सामनेवाला क्र.2 वर पूर्ण विश्वास होता व दि.22.06.2010 रोजी सामनेवाला क्र.2 हे तक्रारदाराकडे आले व म्हणाले की, आपणाकडे थकीत असलेली कर्ज रक्कम रु.79,000/- त्वरीत जमा करणे आवश्यक आहे. तेव्हा तक्रारदाराकडे एवढी रक्कम नगदी स्वरुपात नसल्यामुळे तक्रारदाराने सामनेवाला क्र.2 यांचे नावे दि.22.06.2010 रोजीचा रक्कम रु.79,000/- चा धनादेश दिला.सदरच्या प्रकरणात सदर धनादेश वटण्यास टाकून खात्यावर रक्कम जमा करण्यास सांगितले. सदर धनादेश सामनेवाला यांनी दि.24.06.2010 रोजी वटवून रक्कम उचललेली आहे.
तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 कडून घेतलेल्या कर्ज रकमेच्या भरणापोटी एकूण रक्कम रु.4,11,050/-भरणा केले आहे असे असताना देखील सामनेवालाक्र.1 यांनी तक्रारदारास रु.1,10,660/- थकीत कर्ज बाकी आहे असे नमुद करुन वकीलामार्फत नोटीस पाठविली होती. तक्रारदाराने सामनेवाला क्र.2 मार्फत सामनेवाला क्र.1 कडे धनादेश द्वारे रक्कम रु.79,000/- भरलेली असताना देखील सामनेवाला यांनी सदर रक्कम भरणा केली नाही असे नोटीसमध्ये नमुद करुन सदर रक्कम मिळाली नसल्याबाबत तक्रारदारास सांगितले आहे. सदर रक्कम तक्रारदाराने सामनेवाला क्र.2 मार्फत सामनेवाला क्र.1 कडे कर्जाच्या स्वरुपात परतफेड केलेली आहे. सामनेवाला क्र.2 हे सामनेवाला क्र.1 च्या अधिपत्याखाली काम करतात.त्यामुळे सामनेवाला क्र.1 व 2 यांनी तक्रारदारास सेवा देण्यामध्ये कसूर केलेली आहे,व त्यांच्या कृत्यामुळे तक्रारदारास जो मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रासझालेला आहे याबाबत तक्रारदाराने सामनेवाला कडून नुकसान भरपाई म्हणून रु.50,000/- तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- मिळावे अशी मागणी केलेली आहे. तसेच तक्रारदाराने धनादेश द्वारे भरणा केलेली रक्कम रु.79,000/- सामनेवाला क्र.1 कडे जमा आहे असे घोषित करणे आवश्यक आहे म्हणून सदर तक्रार दाखल केली आहे.
सामनेवाला क्र.1 हे हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. सामनेवाला क्र.1 यांनी तक्रारीतील काही मजकूर मान्य केलेला आहे. त्यांच्या अधिक लेखी म्हणण्यानुसार सामनेवाला ही बँक कंपनी आहे. सदर प्रकरणात तक्रारदाराने शेती औजारे खरेदी करण्याकरता कर्ज घेतले होते. सदर कर्ज हे दि.15.05.2006 रोजी रक्कम रु.3,00,000/- मंजूर करण्यात आले होते. कर्जाच्या परतफेडीचा हप्ता हा प्रत्येकी 6 महिन्याचा होता. कर्जाची परतफेड मुदत ही दि.22.10.2006 ते 22.04.2010 पर्यंत होती, ही बाब मान्य केली आहे. कर्ज परतफेडीचा हप्ता हा सहा महिन्याचा करारातील अटी व शर्ती नुसार असल्यामुळे सदर कर्ज हप्ता परतफेडीची तारीख आल्यानंतर तक्रारदारास वेळोवेळी हप्ता मुदतीत भरा असे कळविण्यात यायचे. तक्रारदाराने नियमित तसेच मुदतीत हप्ता केव्हाही भरलेले नाहीत. कर्ज दिल्यानंतर पहिला हप्ता दि.22.10.2006 रोजी भरणे गरजेचे होते परंतू तक्रारदार यांनी दि.02.11.2006 रोजी सदर रक्कम त्यांचे प्रतिनिधीकडे जमा केले होते, नंतर त्याचे कर्ज खात्यावर रक्कम दि.11.11.2006 रोजी जमा झाली. शेवटचा हप्ता दि.22.04.2010 चा होता परंतू तक्रारदाराने एकूण 8 हप्त्यापैकी 6 हप्ते बँकेत जमा केले होते. अशाप्रकारे तक्रारदार यांच्याकडून 2 हप्ते व दंड व्याज देणे बाकी आहे.
तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 यांना हप्त्यापोटी रक्कम रु.79,000/- चा धनादेश दिला होता, त्यावेळी सामनेवाला क्र.2 हे सामनेवाला क्र.1 यांचे प्रतिनिधी नव्हते. जर ते बँकेचे अधिकृत प्रतिनिधी असते तर, सामनेवाला क्र.2 यांनी पुर्वीप्रमाणे तक्रारदारास बँकेची पावती दिली असती. तक्रारदार यांनी कसलीही शहानिशा न करता सामनेवाला क्र.2 यांच्याकडे सामनेवाला क्र.1 यांच्या नावे धनादेश देण्याऐवजी सामनेवाला क्र.2 यांच्या दिला असता. सदर व्यवहाराचा सामनेवाला क्र.1 याचेशी काहीही संबंध नाही. तक्रारदार यांनी शहानिशा न करता धनादेश देऊन चूक केलेली आहे. सामनेवाला क्र.1 याच्या विरुध्द खोटी तक्रार दाखल केली आहे, खोटया माहितीच्या आधारे सदर प्रकरण दाखल केलेले आहे. त्यामुळे सदरील प्रकरण हे खारीज करणे योग्य व न्यायाचे ठरेल.
सामनेवाला क्र.2 यांना मंचाची नोटीस बजावण्यात आली होती.सदर नोटीस ही ‘सदर नावाची व्यक्ती दिलेल्या पत्त्यावर राहात नाही म्हणून परत’. अशा पोस्टाच्या शे-यासह परत आली. नंतर तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.2 यांना मंचात हजर राहणेसाठी लोकमत पेपरमधून जाहीर प्रगटनाद्वारे कळवले होते, असे असताना सुध्दा सामनेवाला क्र.2 हे मंचासमोर हजर झाले नाही. त्यामुळे त्यांचे विरुध्द सदर प्रकरण हे एकतर्फा चालविण्याचा आदेश झालेला आहे.
तक्रारदाराने दाखल केलेले कागदपत्र व तक्रारदाराच्या वकीलांनी केलेला युक्तीवाद याचे अवलोकन केले असता त्यावरुन न्यायनिर्णयासाठी खालील मुददे उपस्थित होतात.
मुददे उत्तर 1) तक्रारदार यांना सामनेवाला यांनी सेवा देण्यास त्रुटी ठेवली आहे, ही बाब सिध्द केली आहे काय? होय.
2) तक्रारदार हे तक्रारीत मागणी केलेली रक्कम मिळण्यास पात्र आहे काय? होय. 3) आदेश काय? अंतिम आदेशाप्रमाणे.
कारणमिमांसा
मुददा क्र.1 ते 3 ः- तक्रारदार यांनी पुराव्याकामी आपले शपथपत्र दाखल केले आहे. तसेच कर्जाची परतफेड म्हणून सामनेवाला क्र.2 यांना दिलेल्या हप्त्याची पावती व तसेच रक्कम रु.79,000/-चा सामनेवाला क्र.2 यांनी स्विकारलेल्या धनादेशाची पावती, बँकेचा खाते उतारा व सामनेवाला यांची नोटीस इत्यादी कागदपत्राच्या छायांकित प्रती दाखल केल्या आहे. तक्रारदाराचे कथन असे की, तक्रारदार याने सामनेवालाकडून कर्ज घेतले होते. सदर कर्जाचा हप्ता हा सहा महिन्याचा होता. त्यांनी नियमित प्रमाणे कर्जाची परतफेड म्हणून हप्त्याची रक्कम सामनेवाला क्र.2 यांच्याकडे जमा केली व सामनेवाला क्र.2 यांनी सामनेवाला क्र.1 यांच्याकडे जमा केली व पावत्या दिल्या. असे असताना सामनेवाला क्र.2 यांनी राहिलेल्या कर्जाची रक्कम रु.79,000/- भरावयाचे आहे असे सांगितले तेव्हा एवढी रक्कम तक्रारदार यांच्याकडे नव्हती. म्हणून त्यांनी सामनेवाला क्र.2 यांना रक्कम रु.79,000/-चा धनादेश दिला.
सामनेवाला यांच्या कथनेनुसार त्यांनी तक्रारीतील काही मजकूर मान्य केला आहे व काही मजकूर अमान्य केला आहे. त्यांच्या कथनेनुसार तक्रारदार यास कर्ज स्वरुपात रु.3,00,000/- दिले. सदर कर्जाचा हप्ता हा सहा महिन्याचा होता. सदर कर्जाची रक्कम वसूल करण्याकरीता सामनेवाला क्र.2 हे सामनेवाला क्र.1 चे वसूली अधिकारी होते. तदनंतर सामनेवाला यांचे कथन की, 2009 पासून सामनेवाला क्र.2 हे आमचे प्रतिनिधी नव्हते असे सांगितले आहे.म्हणून रक्कम रु.79,000/- हे सामनेवाला क्र.1 यांच्याकडे जमा झालेली नाही.
तक्रारदारानी दाखल केलेले कागदपत्र पुराव्याकामी शपथपत्र व तक्रारदाराचे वकील श्री.भगत यांनी केलेला युक्तीवाद तसेच सामनेवाला क्र.1 यांचे वकील श्री.धांडे यांनी केलेला युक्तीवाद याचे अवलोकन केले. तक्रारदार यांनी सामनेवाला क्र.1 कडून कर्ज घेतले होते.सदर कर्जाची परतफेड म्हणून कर्जाचा हप्ता ते नियमित प्रमाणे सामनेवाला क्र.2 यांच्याकडे जमा करत होते. रक्कम जमा झाल्यानंतर सामनेवाला क्र.2 हे त्यांना पावत्या देत होते. तक्रारदारानी दाखल केलेल्या पावतीवरुन ही बाब सिध्द होते की, सामनेवाला क्र.2 हे सामनेवाला क्र.1 चे एजंट म्हणून होते. तक्रारदार हे नियमित कर्जाची हप्त्याची रक्कम सामनेवाला क्र.2 यांच्याकडे देत असत व सामनेवाला क्र.2 हा ती रक्कम सामनेवाला क्र.1 यांच्याकडे जमा करत असत.
तक्रारदार यास दि.22.06.2010 रोजी रक्कम रु.79,000/-त्वरीत जमा करावी असे सांगितले होते. म्हणून तक्रारदाराने एवढी रक्कम नगदी स्वरुपात नसल्यामुळे त्यांनी सदर रकमेचा धनादेश कर्जाचा हप्ता परतफेड म्हणून सामनेवाला क्र.2 यांना नियमितपणे दिला व सामनेवाला क्र.2 यांनी सदर रक्कम तक्रारदाराच्या खात्यातून वटवून जमा करुन घेतली होती. सामनेवाला क्र.2 हे सामनेवाला क्र.1 चे वसूली अधिकारी असल्यामुळे सदरची रक्कम ही सामनेवाला क्र.1 कडे जमा झाली आहे.
सामनेवाला क्र.1 चे वकील श्री.धांडे यांनी युक्तीवाद केला की, सामनेवाला क्र.2 हे आमचे 2009 पासून प्रतिनिधी नव्हते. परंतू सामनेवाला क्र.2 हे प्रतिनिधी नव्हते, याबाबत कोणताही पुरावा दाखल केला नाही.
तक्रारदाराने दाखल केलेल्या बँकेचा उतारा याचे अवलोकन केले असता मंचाचे असे मत आहे की, सदर रक्कम ही तक्रारदाराच्या खात्यातून सामनेवाला क्र.2 कडे जमा झाली आहे. सामनेवाला क्र.2 हे सामनेवाला क्र.1 वसूली अधिकारी म्हणून काम करत होते. म्हणून रक्कम रु.79,000/- हे सामनेवाला क्र.1 यास मिळाली आहे असा निष्कर्ष निघतो.
तक्रारदाराने दाखल केलेले कागदपत्र व वकीलांनी केलेला युक्तीवाद यावरुन सामनेवाला क्र.2 हे सामनेवाला क्र.1 चे वसूली अधिकारी (एजंट)होते असा निष्कर्ष निघतो. असे मंचाचे मत आहे.
तक्रारदाराने रक्कम रु.79,000/- कर्जाचा हप्ता सामनेवाला क्र.1 हयांच्याकडे जमा केली आहे. तक्रारदारास तक्रार दाखल करावी लागल्यामुळे मानसिक, शारिरिक त्रास झाला आहे. म्हणून तक्रारदार हे तक्रारीतील मागणी केलेली रक्कम मिळण्यास पात्र आहे. म्हणून मुददा क्र.1 व 2 चे उत्तर होकारार्थी देण्यात येते.
सबब, मंच खालीलप्रमाणे आदेश देत आहे.
आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते.
2) तक्रारदाराने सामनेवाला क्र.1 यांच्याकडे कर्जाच्या हप्त्याची
रक्कम रु.79,000/- पूर्णतः जमा केली आहे, असे घोषित करण्यात
येते. तक्रारदार यांच्याकडून कोणत्याही प्रकारची रक्कम सामनेवाला
क्र.1 यांना येणे नाही.
3) सामनेवाला क्र.1 यांनी, तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरिक
त्रासापोटी रक्कम रु.3,000/- व तक्रारीचा खर्च रु.1,500/-द्यावे.
4) ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अधिनियम 2005 मधील कलम
20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत
करावेत.
श्रीमती मंजूषा चितलांगे, श्री.विनायक लोंढे,
सदस्य अध्यक्ष