उभय पक्षकार गैरहजर. मा.अध्यक्षानुसार दिलेले निकालपत्र. तक्रारदाराची थोडक्यात तक्रार खालील प्रमाणे. 1. तक्रारदार हे मॅनपॉवर प्लेसमेंट येथे सेल्स एक्झिक्यूटिव्ह म्हणून नोकरीला होते. त्यांना मासीक रु.6,394/- पगार होता. त्यानी आयसीआयसीआय बँक (सा.वाले क्र.1) यांच्याकडून दिनांक 15/11/2006 रोजी रुपये 42,529/- रुपयाचे कर्ज घेतले. त्याचा मासीक हप्ता रु.3002/- असा होता. तक्रारदाराने सा.वाले क्र.2 यांच्याकडून ALL-SAFE-SECURE MIND POLICY घेतली होती. त्याचा मासीक हप्ता रु.450/- होता. वरील कर्जाच्या हप्त्यात हया हप्त्याचा समावेश होता. पॉलीसीच्या कालावधी दिनांक 30/12/2006 ते 29/12/2008 असा होता. जर तक्रारदाराची नोकरी गेली तर या पॉलीसी प्रमाणे 3 इएमआय चे पैसे तक्रारदारास देण्यास सा.वाले जबाबदार होते. तक्रारदाराने मार्च 2007 पर्यत कर्जाचे चार हप्ते भरले व पॉलीसीचे 5 हप्ते भरले. तक्रारदाराची नोकरी गेल्यानंतर त्यांनी सा.वाले क्र.2 कडे पॉलीसीखाली क्लेम दाखल केला. सा.वाले यांनी तक्रारदाराचा क्लेम पॉलीसीच्या एक्सक्ल्यूझन क्लॉजखाली नाकारला. याबद्दल उभय पक्षकारात दुमत नाही. 2. तक्रारदाराचे म्हणणे की, या पॉलीसी प्रमाणे तक्रारदाराची नोकरी गेली तर 3 इएमआय चे पैसे म्हणजे रु.9006 देणे सा.वाले यांची जबाबदारी होती. पण त्यांनी त्याचा कायदेशीर क्लेम नाकारला ही त्यांच्या सेवेत न्यूनता आहे. त्यांनी सा.वाले क्र.2 यांचेशी त्याबाबत बराच पत्रव्यवहार केला, पण काही उपयोग झाला नाही. म्हणून सदरहू तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराचे म्हणणे की, त्याला नोकरी नसल्यामुळे व उत्पादनाचे साधन नसल्यामुळे उर्वरित इएमआय ची रकम त्याला सामनेवाले यांनी माफ करावयास हवी होती. सा.वाले यांनी पॉलीसीखाली आश्वासीत 3 इएमआयची रकम त्याला द्यावी, सा.वाले क्र.2 यांनी त्याने विम्याचे हप्त्यापोटी भरलेली रकम रु.2250/- व्याजासहीत परत करावी, या तक्रारीसाठी झालेला खर्च व इतर खर्च सा.वाले यांनी द्यावा अशी तक्रारदाराची मागणी आहे. 3. सा.वाले क्र.1 यांना या तक्रारीची नोटीस मिळूनही ते हजर झाले नाही, म्हणून त्यांचेविरुध्द तक्रार एकतर्फा चालविण्यात आली. 4. सा.वाले क्र.2 यांनी तक्रारीला उत्तर देऊन तक्रारदाराचे आरोप नाकारले. त्यांचे म्हणणे की, पॉलीसीची शर्त व अट अशी आहे की, पॉलीसी सुरु झाल्यापासून 90 दिवसाचे आत जर पॉलीसीधारकाची नोकरी गेली तर पॉलीसीच्या एक्सक्ल्यूझन क्लॉज III (2.3.3 ) प्रमाणे कंपनी क्लेम देण्यास जबाबदार नाही. कारण सदरची घटना पॉलीसीखाली कव्हर होत नाही. त्यांचे म्हणणे की, तक्रारदाराने एप्रिल, 2007 पासून पॉलीसीचे हप्ते न भरल्याने त्याची पॉलीसी रद्द झालेली आहे. त्यांनी तक्रारदाराचा क्लेम नाकारला त्यात त्याच्या सेवेत न्यूनता नाही. 5. तोंडी युक्तीवादाचे वेळी उभय पक्षकार गैर हजर राहीले. तक्रारदार यांनी शपथपत्र व लेखी युक्तीवाद दाखल केलेला आहे. सा.वाले क्र.2 यांनी तक्रारीला उत्तर दिले आहे व शपथपत्र दाखल केले आहे. तसेच उभय पक्षकारांनी काही कागदपत्रं दाखल केली आहेत. आम्ही तक्रारीत सर्व कागदपत्रं वाचली. 6. या तक्रारीत मुद्दा उपस्थित होतो की, सा.वाले यांनी तक्रारदाराचा क्लेम नाकारला त्यात त्यांची सेवेत न्यूनता आहे काय ? सा.वाले क्र.2 यांनी पॉलीसीच्या शर्ती व अटी दाखल केलेल्या आहेत. त्यातील एक्सक्ल्यूझन क्लॉज मधील शर्त व अट खालील प्रमाणे आहे. 2.33 EXCLUSIONS APPLICABLE TO SECTION III 1. ---------------------------------------------------- 2. The Company shall not be liable to make any payment under this Policy in Connection with or in respect of : d) Unemployment at the time of inception of the policy period or arising within the first 90 days of inception of the policy period. वरील शर्ती व अटी वरुन हे स्पष्ट आहे की, पॉलीसी सुरु झाल्यानंतर 90 दिवसाचे आत जर पॉलीसी धारकाची नोकरी केली तर या एक्सक्ल्यूझनक्लॉज प्रमाणे ती बाब पॉलीसीखाली कव्हर होत नाही, व इनश्युरन्स कंपनी क्लेम देण्यास जबाबदार नाही. तक्रारदाराने क्लेम फॉर्मची कॉपी दाखल केलेली आहे. त्यावरुन असे दिसते की, दिनांक 05/01/2007 रोजी त्याची नोकरी गेली. पॉलीसी दिनांक 30/12/2006 पासून सुरु झाली. म्हणजेच पॉलीसी सुरु झाल्यापासून 90 दिवसाचे आत तक्रारदाराची नोकरी गेली ही बाब पॉलीसीखाली कव्हर होत नसल्यामुळे सा.वाले क्र.2 यांनी तक्रारदाराचा क्लेम नाकारण ही त्यांची सेवेत न्यूनता दिसत नाही. कारण पॉलीसीच्या शर्ती व अटी तक्रारदार यांचेवर बंधनकारक होत्या. 7. तक्रारदाराचे असे म्हणणे की, त्यांची नोकरी गेली व त्याला उत्पन्नाचा मार्ग नाही, त्यामुळे त्याचे उर्वरित हप्ते सा.वाले क्र.2 यांनी माफ करावेत. परंतु पॉलीसीच्या अटी व शर्ती मध्ये तशी काही तरतुद नाही. त्यामुळे तक्रारदाराची ही मागणी मान्य करता येत नाही. तक्रारदाराने एप्रिल,2007 पासून विम्याचे हप्ते भरले नव्हते. त्यामुळे सा.वाले यांचे म्हणणे की, त्यांची पॉलीसी रद्द झालेली आहे.(लॅप्स्) यातही सा.वाले यांचे सेवेत न्यूनता दिसत नाही. 8. वरील विवेचन लक्षात घेता मंचाला या तक्रारीत काही तथ्य दिसत नाही. ती रद्द होणेस पात्र आहे. म्हणून मंच खालील प्रमाणे आदेश करीत आहे. आदेश 1. तक्रार क्र. 533/2007 रद्दबातल करण्यात येते. 2. उभय पक्षकारांनी या प्रकरणी आपापला खर्च सोसावा. 3. आदेशाच्या प्रमाणित प्रती दोन्ही पक्षकारांना विनामूल्य पाठविण्यात याव्या.
| [HONORABLE G L Chavan] Member[HONABLE MRS. S P Mahajan] PRESIDENT | |