निकाल
पारीत दिनांकः- 17/02/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1] तक्रारदार, जाबदेणार बँकेचे ICICI Bank Kingfisher Credit Card No. 4076 5151 2317 9002 आणि ICICI Bank EMI Credit Card No. 4477 4653 1751 1005 हे दोन क्रेडीट कार्ड वापरत होते. तक्रारदारांनी दि. 18/9/2008 रोजी या दोन्ही क्रेडीट कार्ड संदर्भातील देय रकमेसाठी धनादेश क्र. 060606 किंगफिशर कार्डसाठी आणि धनादेश क्र. 060607, असे दोन धनादेश विमाननगर शाखेतील ए.टी.एम. ड्रॉप बॉक्समध्ये टाकले होते. त्यापैकी धनादेश क्र. 060607 हा व्यवस्थित वटला गेला, परंतु धनादेश क्र. 060606 हा देयकाची तारीख होऊन गेली तरी वटवण्यात आला नव्हता. या संदर्भात वारंवार बँकेकडे विचारणा केली असता, तक्रारदारांना योग्य ती माहिती मिळाली नाही. त्यामुळे तक्रारदारास लेट पेमेंट चार्जेस आकारण्यात आले, बाजारामधील त्यांच्या आर्थिक पतला धक्का बसला आणि बँकेच्या कर्ज वसूली पथकाकडून त्यांना वारंवार धमकीचे फोन येऊ लागले. यासंबंधी बँकेकडे विचारणा केली असता, सदरचा धनादेश क्र. 060606 हा थांबवावा व त्याचे स्टॉप पेमेंट करण्याचा सल्ला दिला व त्याचा खर्चही तक्रारदारांनाच करावा लागेल असा सल्ला दिला. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, त्यांची दुसरी तक्रार म्हणजे त्यांच्या EMI Credit Card No. 4477 4653 1751 1005 ची मे महिन्याच्या देयकाची रक्कम रु. 2234.45 इतकी होती व त्यांच्याकडे सुट्टे पैसे नसल्यामुळे त्यांनी रक्कम रु. 2240/-, म्हणजे रु. 5.55/- जास्त देय तारखेच्या अगोदर भरले, परंतु जास्तीची रक्कम भरल्यामुळे जाबदेणारांनी तक्रारदारांना रक्कम रु. 199/- चा दंड आकारला व त्यावर सेवाकर व व्याज आकारले. या संदर्भातही वारंवार बँकेकडे विचारणा केली असता, तक्रारदारांना योग्य ती माहिती मिळाली नाही. या सर्वाचा त्यांना मानसिक व शारीरिक त्रास झाला, म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणारांकडून धनादेश क्र. 060606 ची रक्कम त्यांच्या क्रेडीट कार्ड खात्यात त्वरीत जमा करावी, त्यांच्यावरील आतापर्यंतचे सर्व चार्जेस रद्द करावेत आणि दोन्ही कार्ड पुन्हा सुरु करावेत. तसेच मानसिक त्रासापोटी रक्कम रु. 19,00,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रक्कम रु. 1000/- मागतात.
2] तक्रारदारांनी तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केले.
3] जाबदेणारांना नोटीस पाठविली असता, ते मंचासमोर हजर झाले व त्यांच्या लेखी जबाबाद्वारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांनी धनादेश क्र. 060606 आणि धनादेश क्र. 060607, असे दोन धनादेश विमाननगर शाखेतील ए.टी.एम. ड्रॉप बॉक्समध्ये टाकले होते, हे खरे आहे. जाबदेणार त्यानंतरच्या परिच्छेदामध्ये, तक्रारदार दि. 18/9/2008 रोजी सदरचे चेक विमाननगर शाखेतील ए.टी.एम. ड्रॉप बॉक्समध्ये टाकले होते हे अमान्य करतात. किंगफिशर कार्डसंदर्भातील धनादेश क्र. 060607 वटला गेला हे जाबदेणार मान्य करतात, परंतु धनादेश क्र. 060606 हा मुद्दामपणे वटविला नाही हे अमान्य करतात. तक्रारदारांना लेट पेमेंट चार्जेस आकारण्यात आले, त्याचप्रमाणे इतर सर्व बाबी जाबदेणार अमान्य करतात. तक्रारदारांच्या दुसर्या तक्रारीसंदर्भात, तक्रारदारांनी रक्कम रु. 5.55/- जास्तीचे भरले म्हणून त्यांना दंड आकारण्यात आला, हे चुकीचे असून, जर क्रेडीट कार्डची रक्कम रोखीने भरली तर बँकेच्या नियम व नियमावलीप्रमाणे रक्कम रु. 100/- प्रीपेमेंट चार्जेस व इतर चार्जेस आकारण्यात येतात, असे जाबदेणारांचे म्हणणे आहे. यासंदर्भात तक्रारदारांनी चौकशी केली असता त्यांना सर्व माहिती सांगण्यात आलेली होती. यामध्ये त्यांची कोणतीही सेव्तील त्रुटी नाही, म्हणून तक्रार नामंजूर करावी अशी मागणी जाबदेणार करतात.
4] जाबदेणारांनी त्यांच्या लेखी जबाबापुष्ठ्यर्थ शपथपत्र दाखल केले.
5] दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी एकाच दिवशी म्हणजे दि. 18/9/2008 रोजी दोन धनादेश क्र. 060606 व 060607 त्यांच्या दोन क्रेडीट कार्डच्या देयकासंदर्भात विमाननगर शाखेतील ए.टी.एम. ड्रॉप बॉक्समध्ये टाकले होते. जाबदेणार, ही बाब त्यांच्या लेखी जबाबाच्या परिच्छेद क्र. 3 मध्ये मान्य करतात व परिच्छेद क्र. 4 मध्ये अमान्य करतात. तक्रारदारांनी विमाननगर शाखेतील ए.टी.एम. ड्रॉप बॉक्समध्ये धनादेश टाकले नाहीत, यासाठी जाबदेणारांनी कोणताही पुरावा दाखल केला नाही. जाबदेणारांनी, तक्रारदारांनी एकाच दिवशी टाकलेला एक चेक वटविला व दुसरा चेक वटविला नाही, त्यासाठी लेट पेमेंट चार्जेस आकारले. तसेच तक्रारदारांना कर्ज वसुली पथकाडून वारंवार धमकीचे फोन येत होते, त्यामुळे त्यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला. जाबदेणारांनी त्यांच्या चुकीमुळे तक्रारदारांचा चेक वटविला नाही. यावरुन जाबदेणारांचे कर्ज वसुली करणारे अधिकारी, ए.टी.एम.च्या ड्रॉप बॉक्समधून चेक काढणारे कर्मचारी, स्टेटमेंट देणारे कर्मचारी या सर्वांमध्ये समन्वय आढळून येत नाही व या सर्वाचा त्रास तक्रारदारांना सहन करावा लागला. जाबदेणारांच्या या एकुण वर्तणुकीमुळे, तक्रारदारांचे जाबदेणारांकडे असलेले सेव्हिंग अकाऊंट व डी-मॅट अकाऊंट त्यांनी होल्ड करुन ठेवलेले आहे असे तक्रारदारांनी तोंडी युक्तीवादाच्या वेळी सांगितले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जाबदेणारांनी जर त्यांचे नाव सेबिल येथे पाठविले, तर त्यांना कुठेही कर्ज मिळू शकणार नाही. मंचाच्या मते तक्रारदारांनी एकाच दिवशी टाकलेल्या दोन चेकपैकी एक चेक वटविणे व दुसर्या चेकसाठी लेट पेमेंट चार्जेस आकारणे, तसेच जाबदेणारांची स्वत:ची चुक असताना, तक्रारदारांचे अकाऊंट्स होल्ड करुन ठेवणे आणि लेट पेमेंट चार्जेस लावणे, ही जाबदेणारांची सेवेतील त्रुटी ठरते तसेच यावरुन जाबदेणारांनी अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केल्याचे दिसून येते. त्यासाठी जाबदेणार तक्रारदारास नुकसान भरपाई देण्यास जबाबदार आहेत. त्याचप्रमाणे जाबदेणारांनी जर तक्रारदारांचे नाव सेबिल येथे पाठविले असेल तर त्वरीत ते तेथून काढून द्यावे व लेट पेमेंट चार्जेस तक्रारदारास परत करावेत.
तक्रारदाराची दुसरी तक्रार, म्हणजे त्यांनी रक्कम रु. 5.55/- जास्तीचे भरल्यामुळे जाबदेणारांनी त्यांच्याकडून रक्कम रु. 199/- दंड आकारला. जाबदेणारांनी सदरचा दंड हा त्यांच्या नियम व नियमावलीप्रमाणे आकारला असल्यामुळे मंच, तक्रारदाराची ही मागणी अमान्य करते. तक्रारदारांनी तक्रारीमध्ये धनादेश क्र. 060606 ची रक्कम त्वरीत त्यांच्या खात्यामध्ये जमा करावी अशी मागणी केलेली आहे, परंतु जर धनादेश वटलाच नसेल व तक्रारदारांनी जर “stop payment” च्या सुचना दिल्या असतील, तर त्यांच्या खात्यामधून सदरच्या धनादेशाची रक्कम वजा झालेलीच नसेल, म्हणून मंच तक्रारदारांची ही मागणीही अमान्य करते.
तक्रार मंचासमोर प्रलंबीत असताना जाबदेणारांनी अनेकवेळा तक्रारदारांचे दोन्ही क्रेडीट कार्ड चालू करुन देतो असे सांगितले, परंतु दिले नाहीत. यावरुन जाबदेणारांचा ढिसाळ व अनागोंदी कारभार दिसून येतो.
6] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते.
** आदेश **
1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणारांनी तक्रारदारांचे दोन्ही क्रेडीट कार्ड
त्वरीत सुरु करुन द्यावे, तसेच तक्रारदारांचे नाव
सेबिल येथे पाठविले असल्यास त्वरीत ते तेथून
काढून द्यावे व लेट पेमेंट चार्जेस आणि रक्कम
रु. 25,000/-(रु. पंचवीस हजार फक्त) नुकसान
भरपाई व रक्कम रु. 1,000/- (रु. एक हजार
फक्त) तक्रारीचा खर्च म्हणून या आदेशाची प्रत
मिळाल्यापासून सहा आठवड्यांच्या आंत द्यावेत.
3. निकालाच्या प्रती दोन्ही बाजूंना नि:शुल्क
पाठविण्यात याव्यात.