तक्रारदार :तक्रारदार त्यांचे वकीलामार्फत हजर.
सामनेवाले :सा.वाले त्यांचे वकील श्री.मनाडीया यांचे मार्फत हजर.
*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*--*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. तक्रारदार ही बँकींग सुविधा पुरविणारी कंपनी आहे. सा.वाले यांनी तक्रारदारांना त्यांचे वापराकरीता क्रेडीट कार्ड दिले होते. व त्याचा कालावधी 05/05 ते 05/09 असा होता. तक्रारदारांनी त्या क्रेडीट कार्डचा वापर केला.
2. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे त्यांनी ऑगस्ट,2006 ते फेब्रुवारी 2007 चे दरम्यान व वेग वेगळया दिवशी क्रेडीट कार्डचा वापर केला. व त्या वापराची देय रक्कम रु.38,275/- होती. सा.वाले यांचेकडून तक्रारदारांना 3 महिन्याचे क्रेडीट कार्डचे देयक प्राप्त झाले नाही व त्यांना मार्च 2007 मध्ये क्रेडीट कार्डचे देयक प्राप्त झाले. व त्यामध्ये बरीच मोठी रक्कम बाकी दाखविली होती. तक्रारदारांनी सा.वाले यांचे अधिका-यांना संपर्क प्रस्तापित केला व पुढील 12 धनादेशावदारे थकबाकीची रक्कम अदा करण्याची तंयारी दर्शविली. परंतु सा.वाले यांचे अधिका-यांनी तक्रारदारांना असे सूचविले की, तक्रारदारांनी त्यांचे सोई प्रमाणे हप्त्याने रक्कम जमा करावी व ती थकबाकीतुन वजा करण्यात येईल. अशा पध्दतीने थकबाकीची रक्कम नष्ट होईल. सा.वाले यांनी असे सांगीतले की, जर तक्रारदारांनी त्यांचे सांगणेप्रमाणे रक्क्म जमा केली तर तक्रारदारांचे खात्यावर व्याज, दंडव्याज, उशिराने रक्कम जमा करण्या बद्दलचे शुल्क, सेवा कर ई. बाबी आकारण्यात येणार नाही. तक्रारदारांचे कथना प्रमाणे या आश्वासनावर विसंबून तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे सप्टेंबर, 2006 ते जानेवारी 2009 चे दरम्यान एकूण रक्कम रु.46,910/- जमा केली. तरी देखील थकबाकीची रक्कम पूर्ण फेड झाली नाही असे सा.वाले यांचे देयकातून दिसून आले. या उलट थकबाकीची रक्कम रु.53,422/- दाखविण्यात आलेली होती. तक्रारदारांनी त्या नंतर सा.वाले यांचे अधिका-यांकडे वेळोवेळी दूरध्वनीवर संपर्क प्रस्तापित केला व देय रक्कमेची पूर्णफेड झाल्याचे दाखविण्यात यावे अशी विनंती केली. परंतु सा.वाले यांनी त्यास नकार दिला. या उलट दूरध्वनीव्दारे तसेच आपल्या कर्मचया-यामार्फत तक्रारदारांना धमक्या दिल्या व मनस्ताप दिला. अंतीमतः तक्रारदारांनी दिनांक 12.12.2009 रोजी प्रस्तुतची तक्रार दाखल केली. व त्यामध्ये सा.वाले यांनी क्रेडीट कार्ड खात्यावर ज्यादा जमा केलेली रक्कम रु.8,635/- तक्रारदारांना परत करावी. तसेच मानसीक त्रास,कुचंबणा, व गैरसोय या बद्दल रु.1 लाख नुकसान भरपाई तक्रारदारांना द्यावी. व तक्रारदारांच्या क्रेडीट खात्यामध्ये देय रक्कम पूर्ण परतफेड झाल्याबद्दल प्रमाणपत्र सा.वाले यांनी द्यावे अशी दाद मागीतली.
3. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केली, व त्यामध्ये तक्रारदारांनी क्रेडीट कार्डचा वापर केला व ऑगस्ट,2007 पर्यत तक्रारदार यांनी नियमितपणे रक्कम जमा केली परंतु नंतर मात्र तक्रारदारांनी क्रेडीट कार्डचे खात्यामध्ये थकबाकी ठेवल्याने त्यावर व्याज तसेच उशिराने रक्कम जमा केल्या बद्दलचे शुल्क आकारण्यात आले. काही वेळेस तक्रारदारांनी क्रेडीट कार्डचे मर्यादेपेक्षा जास्त रक्कम उचल केली. त्यावरुनही तक्रारदारांना शुल्क आकारण्यात आले. शासनाच्या नियमाप्रमाणे सेवा शुल्क तक्रारदारांकडून वसुल करण्यात आले. या प्रकारे सा.वाले यांनी असे कथन केले की, तक्रारदार हे क्रेडीट कार्डच्या खात्यामधील रक्कम परतफेड करण्यास विलंब करीत होते. दरमहा रक्कम जमा करीत नव्हते. व त्यामुळे थकबाकी वाढतच राहीली. सा.वाले यांनी असेही कथन केले की, त्यांनी तक्रारदारांचे क्रेडीट कार्डच्या खात्यामध्ये कुठलीही रक्कम ज्यादा लावली असून नियमा प्रमाणे लावण्यात आलेली आहे. व तक्रारदार रक्कम अदा करण्यास अनियमीत असल्याने थकबाकीची रक्कम वाढत गेली असे सा.वाले यांनी कथन केले. व आपल्या कृतीचे समर्थन केले. तक्रारदारांनी सा.वाले यांचे कैफीयतीनंतर आपले प्रति उत्तराचे शपथपत्र दाखल केले. तसेच यादीसोबत वेग वेगळी कागदपत्रे दाखल केली. त्यामध्ये ई-मेल संदेशाच्या प्रती दाखल आहेत.
4. सा.वाले यांनी पुराव्याचे शपथपत्र दाखल केले व वर्ष 2005 ते मार्च 2009 पर्यतच्या तक्रारदारांच्या क्रेडीट कार्ड खात्याच्या देयकाच्या प्रती हजर केल्या. सा.वाले यांनी त्यांचे अधिकारी सौरभ देशपांडे यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. दोन्ही बाजुंनी लेखी युक्तीवाद दाखल केला. दोन्ही बाजुच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला.
5. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. |
मुद्दे |
उत्तर |
1 |
सा.वाले यांनी तक्रारदारांना क्रेडीट कार्डचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? |
नाही. |
2 |
तक्रारदार सा.वाले यांचेकडून तक्रारीत मागीतल्या प्रमाणे दाद मिळण्यास पात्र आहेत काय ? |
नाही. |
3 |
अंतीम आदेश ? |
तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा
6. सा.वाले यांनी तक्रारदारांना त्यांचे वापराकरीता क्रेडीट कार्ड दिले होते व तक्रारदारांनी क्रेडीट कार्डचा वापर केला या बद्दल वाद नाही. ते क्रेडीट कार्डचा वापर जून 2005 पासून पुढे सुरु होता. तक्रारदारांनी तक्रारीत असे कथन केले आहे की, त्यांनी ऑगस्ट,2006 पासून क्रेडीट कार्डच्या खात्याच्या संदर्भात सा.वाले यांचेकडून अनियमितता दिसून आली. तक्रारदारांनी तक्रारीच्या पृष्ट क्र.2 वर असे कथन केले आहे की, त्यांना क्रेडीट कार्डची देयके अंदाजे तिन महीने प्राप्त झाली नाहीत. व मार्च,2007 मध्ये त्यांना देयक प्राप्त झाले व त्यानंतर त्यांना असे दिसून आले की, क्रेडीट कार्डच्या खात्यावर बरीच मोठी थकबाकी आहे. त्यामुळे त्यांनी मासीक हप्त्यामध्ये ती रक्कम फेड करण्याचे ठरविले. तक्रारदार असे म्हणतात की, त्यांना मार्च,2007 मध्ये क्रेडीट कार्डची देयके प्राप्त झाली. तक्रारदारांनी त्या क्रेडीट कार्डचे उतारे तक्रारी सोबत दाखल केलेले आहेत. त्यामध्ये पहीला उतारा हा ऑगस्ट 2006 ते सप्टेंबर, 2006 या महीन्याचा आहे. सा.वाले यांनी त्यांच्या वेगळया यादीसोबत दिनांक 26.4.2011 रोजीच्या क्रेडीट कार्ड खात्याची स्टेटमेंट दाखल केलेली आहे. त्यातील नोंदी वरुन असे दिसते की, जून 2005 मध्ये एकूण रक्कम रु.9,868/- देय होती. तक्रारदारांनी ती रक्कम जुलै ,2005 मध्ये देय केल्याचे जुलैच्या उता-या वरुन दिसून येते. त्यानंतर तक्रारदारांनी ऑगस्ट,2005 मध्ये रु.1,280/- ची खरेदी केली तसेच रु.16,200/- येवढया रक्कमेची खरेदी केली. परंतु सप्टेंबर,2005 चे स्टेटमेंट मधील नोंदी असे दर्शवितात की, तक्रारदारांनी दिनांक 25.8.2005 रोजी रु.16,200/- चा धनादेश सा.वाले यांना दिला. 18 डिसेंबर,2005 ची स्टेटमेंट असे दर्शविते की, मागील बाकी रु.3,450/- होती. व तक्रारदारांनी नोव्हेंबर दिनांक 29.11.2005 मध्ये रु.3,450/- धनादेशाव्दारे अदा केले होते. या प्रकारे डिसेंबर,2005 पर्यत तक्रारदार नियमितपणे व त्यांचे खात्यावरील क्रेडीट कार्डच्या वापराची रक्कम जमा करत होते व थकबाकी रहात नव्हती. तथापी त्यानंतर तक्रारदारांनी क्रेडीट कार्डच्या वापराप्रमाणे दिलेल्या देयकाची रक्कम जमा केली नाही असे सा.वाले यांचे कथन आहे. सा.वाले यांनी अंतरीम मनाई हुकुमाचे उत्तराचे शपथपत्रात तसेच कैफीयतमध्ये सप्टेंबर,2006 ते मार्च 2009 येवढया कालावधीची तक्रारदारांच्या क्रेडीट कार्डच्या खात्यावरील व्यवहारा बद्दलची माहिती देणारे चौकटी दिलेल्या आहेत. त्यातील माहिती व नोंदी सा.वाले यांनी त्यांच्या कागदपत्राची यादी दिनांक 26.4.2011 सोबत दाखल केलेल्या स्टेटमेंटची प्रत याचेशी सुसंगत आहे. त्यातील नोंदी वरुन असे दिसते की, सप्टेंबर,2006 मध्ये मागील बाकी रु.3000/- होती. तक्रारदारांनी यसा महीन्यामध्ये कुठलीही रक्कम जमा केलेली नाही. या उलट रु.4,594/- चा क्रेडीट कार्डचा वापर केला. सहाजिकच तक्रारदारांनी येणेबाकी रक्कमेबद्दल कुठलीही रक्कम जमा केलेली नसल्याने सा.वाले यांनी तक्रारदारांचे खात्यामध्ये रु.300/- नांवे टाकले. व सेवा कराबद्दल रु.36.72 नांवे टाकले. तसेच व्याजा बद्दल रु.283.96 नांवे टाकले. ऑक्टोबर 2006 मध्ये मागील बाकी रु.8,249.44 होती. तक्रारदारांनी त्या महीन्यामध्ये फक्त रु.560/- जमा केले. व क्रेडीट कार्डचा वापर मात्र रु.3000/- केला. त्यामुळे सा.वाले यांनी व्याजा बद्दल रु.301/- व सेवा करा बद्दल रु.36.92 तक्रारदारांचे नांवे टाकले. नोव्हेंबर,2006 मध्ये मागील बाकी रु.11,027/- होती. तक्रारदारांनी या महीन्यामध्ये सा.वाले यसांचेकडे काहीच रक्कम जमा केली नाही. उलट क्रेडीट कार्डचा वापर मात्र रु.5,689/- येवढा केला. त्यामुळे सा.वाले यांनी रु.300/- दंडाबद्दल ( Late payment fees ) सेवा कराबद्दल रु.36/- व्याजा बद्दल रु.564/- व व्याज व सेवा कर रु.56/- अशी रक्कम नांवे टाकली. व एकूण बाकी रु.17,434/- नांवे दाखविण्यात आलेली आहे. प्रत्येक महीन्यातील तालीकेतील नोंदीची चर्चा केलीतर न्याय निर्णयाची लांबी बरीच वाढेल. परंतु थोडक्यात असे म्हणता येईल की, तक्रारदार हे सा.वाले यांना रक्कम अदा करण्याचे संदर्भात नियमित नव्हते. उदा.नोव्हेबर,2006 मध्ये जानेवारी 2006, मे,2007, जुलै,2007, सप्टेंबर,2007 डिसेंबर,2007 फेब्रृवारी,2007 मे,2008, जुलै,2008 ऑगस्ट,2008, नोव्हेंबर,2008, डिसेंबर,2008, फेब्रृवारी,2009, मार्च,2009 या महीन्यामध्ये क्रेडीट कार्डच्या खात्यामध्ये असलेली देय रक्कम जमा केली नाही. सा.वाले यांनी दाखल केलेल्यास क्रेडीट कार्डच्या खात्यावरील नोंदी व सा.वाले यांच्या कैफीयतीतील बनविण्यात आलेल्या तालिकेतील नोंदी एका आड एक महीना तक्रारदार सा.वाले यांचेकडे क्रेडीट कार्डच्या खात्यामध्ये रक्कम जमा करीत होते. परंतु क्रेडीट कार्डचा वापर मात्र प्रत्येक महीन्यामध्ये होत होता. उदा. ऑक्टोबर,2006 रु.560/- जमा केले. तर नोव्हेंबर,2006 मध्ये काहीच नाही. डिसेंबर,2006 मध्ये रु.1,410/- जमा केले तर जानेवारी, 2007 मध्ये काहीच जमा नाही. फेब्रृवारी 2007 मध्ये रु.2,290/- जमा केले तर मार्च 2007 मध्ये काहीच जमा नाही. तर एप्रिल 2007 मध्ये रु.4000/- जमा केले तर मे,2007 मध्ये काहीच जमा केलेले नाहीत. जुन,2007 मध्ये रक्कम जमा केली तर जुलै,2007 मध्ये नाही. तर ऑगस्ट,2007 मध्ये 4200/- जमा केले तर सप्टेंबर,2007 मध्ये काहीच जमा केले नाहीत. या प्रकारे एका आड एक महीन्यामध्ये काही रक्कम सा.वाले यांचेकडे जमा करीत होते. त्यातही रक्कम जमा करण्याचा आकडा हा संपूर्ण देय रक्कम नसून क्रेडीट कार्ड खाते चालु ठेवण्याकरीता जेवढी कमीत कमी रक्कम जमा करावी लागते तेवढीच रक्कम सा.वाले यांचेकडे तक्रारदार जमा करीत होते. उदा. ऑक्टोबर,2006 रु.560/- डिसेंबर,2006 रु.1,410/-, फेब्रृवारी 2006 रु.2,290/- जुन,2007 रु. 4,140/- नोव्हेंबर, 2007 रु.2,310/- जानेवारी,2008 रु.4,230/-, मार्च,2008 मध्ये रु.4,240/- एप्रिल,2008 मध्ये 2100/- हया सर्व रक्कमा आडनीळ
( Odd ) संख्याच्या असून त्या पूर्ण रक्कमा नाहीत. सा.वाले यांनी आपल्या लेखी युक्तीवादामध्ये तक्रारदारांच्या या प्रवृत्तीवर बोट ठेवले व असे कथन केले की, तक्रारदारांना त्यांचे क्रेडीट कार्ड चालु ठेवण्याकरीता कमीत कमी किती रक्कम जमा करावी लागते याची माहिती तक्रारदारांना असल्याने एक आड एक महीन्यामध्ये ते कमीत कमी रक्कम जमा करीत होते. व क्रेडीट कार्डच्या खात्याचा मात्र वापर नियमित करीत होते. तरी देखील तक्रारदार आपल्या लेखी युक्तीवादात व त्यांचे वकील तोंडी युक्तीवादात असे कथन करतात की, सा.वाले यांनी क्रेडीट कार्डच्या खात्यामध्ये अनाधिकाराने रक्कम नांवे टाकल्याने तक्रारदारांच्या क्रेडीट कार्डच्या खात्यातील मुळची रक्कम जमा होऊ शकली नाही व नांवे बाकी रक्कम वाढतच राहीली. या प्रकारे संपूर्ण युक्तीवाद खोटेपणा व ढोंगीपणाचा आहे.
7. तक्रारदारांचे वकीलांनी असाही युक्तीवाद केला की, मुळातच तक्रारदारांनी क्रेडीट खात्यामध्ये व्याज देणे, दंड व्याज देणे , अथवा सेवा सुविधा शुल्क अदा करणे हया बाबी नमुद नसल्याने तक्रारदार सा.वाले यांना व्याज, उशिरा रक्कम जमा करण्या बद्दल शुल्क, अथवा क्रेडीट कार्ड मर्यादेपेक्षा जास्त वापरा बद्दलचे शुल्क अथवा सेवा शुल्क देण्यास जबाबदार नाहीत. सा.वाले ही व्यवसाय करणारी बँक असल्याने व धर्मदाय संस्था नसल्याने विना व्याजाने त्यांचे ग्राहकांना क्रेडीट कार्ड वापराकरीता देईल अशी समज तक्रारदारांची असेल तर ती निराधार आहे. या प्रकारचा आर्थिक व्यवहार व्यावसाईकाकडून होत नाही. त्यातही तक्रारदारांनी क्रेडीट कार्ड सोबत आलेल्या अटी व शर्ती व करार नाम्याची प्रत दाखल केलेली नाही. तक्रारदारांनी या मुद्यावर तक्रार दाखल केलेली असल्याने ते कथन सिध्द करण्याची जबाबदारी तक्रारदारांची होती. त्यातही तक्रारदारांनी आपल्या तक्रारीच्या पृष्ट क्र.2 वर असे म्हटले आहे की, सा.वाले यांचे अधिका-यांनी तक्रारदारांना असे सूचविले होते की, थकबाकी हप्त्या हप्त्याने जमा केली तर ज्यादा व्याज, उशिरा रक्कम जमा करण्याचे शुल्क, सेवा शुल्क, अथवा क्रेडीट कार्ड मर्यादा शुल्क लागू होणार नाही. तक्रारदारांच्या तक्रारीतील हे कथन असे दर्शविते की, तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे नियमितपणे रक्कम जमा केली नाही तर त्यांना व्याज व ज्यादा शुल्क आकारले जातील ही बाब तक्रारदारांना माहीत होती. तरी देखील युक्तीवादाचे दरम्यान त्या बद्दल आपण अनभिज्ञ होतो असे तक्रारदार दर्शवितात. एकूणच तक्रारदारांचे वर्तन अप्रमाणिकपणाचे व खोटेपणाचे दिसून येते. तक्रारदारांनी क्रेडीट कार्डचा वापर मात्र सतत केला परंतु रक्कम जमा करण्याचे बाबतीत मात्र ते अनियमित होते. त्यामुळे थकबाकी वाढत राहीली. त्या बद्दल तक्रारदार हे स्वतः जबाबदार आहेत.
8. तक्रारदारांचे वकीलांनी आपल्या युक्तीवादाचे पृष्टयर्थ काही न्याय निर्णयाच्या प्रती हजर केलेल्या आहेत. व त्यामध्ये मा.सर्वोच्च न्यायालयाच्या LUCKNOW DEVELOPMENT AUTHORITY V/S M.K.GUPTA AIR 1994 SUPREME COURT 787या न्यायनिर्णयामध्ये असा अभिप्राय नोंदविला आहे की, ग्राहक संरक्षण कायदा 1986 हा समाजाचे हिताकरीता निर्माण केलेला कायदा असून तो शासकीय संस्था, स्थानिक स्वराज्य संस्था, यांना देखील लागू होतो. हया मा.सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निर्णयाबद्दल दुमत असण्याचे काही कारण नाही. तक्रारदारांनी त्यानंतर मा.सर्वोच्च न्यायालायाच्या J.J.MERCHANT (Dr) & OTHERS V/S SHRINATH CHATURVEDI 2003 (1) BOM.C.R.24या न्याय निर्णयाचा संदर्भ दिलेला आहे. त्यामध्ये एखाद्या ग्राहक तक्रार निवारण मंचापुढे दाखल झालेल्या प्रकरणामध्ये गुंतागुंतीचे मुद्दे असतील तर मंचाने दिवाणी न्यायालयात जाण्याचा सल्ला पक्षकारांना देऊ नये असा अभिप्राय नोंदविला आहे. तो देखील मंचास बंधनकारक आहे. व प्रस्तुत मंच बहुतेक प्रकरणामध्ये पुराव्याची छाननी करतो व आपला निष्कर्ष नोंदवितो. यामध्ये मंचाने जबाबदारी टाळण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. त्यानंतर तक्रारदारांचे वकीलांनी मा.सर्वोच्च न्यायालायाच्या MARUTI SUZUKI INDIA LTD V/S RAJIV KUMAR LOOMBA & ANR.ETC. AIR 2010 SUPREME COURT 3141 या न्याय निर्णयाचा संदर्भ दिलेला आहे. त्यामध्ये मोटर वाहनाचे विक्रेत्याने त्यातील विशिष्ट भागावर ज्यादा रक्कम आकारली होती. ती परत करण्यात यावी असे निर्देश ग्राहक मंचाने दिले होते. मा.सर्वोच्च न्यायालयाने तो निर्णय कायम केला. प्रस्तुत प्रकरणामध्ये तक्रारदारांनी मुळचा करारनामा दाखल केलेला नसल्याने व नियमित रक्कम अदा करुन देखील ज्यादा दराने व्याज लावले आहे असा पुरावा उपलब्ध नसल्याने प्रस्तुतचा न्याय निर्णय या प्रकरणास लागू होणार नाही.
9. वरील उपलब्ध पुराव्यावरुन असे दिसून येते की, तक्रारदारांचे तक्रारीतील कथनात तथ्य नसून त्यांना देय असलेली रक्कम टाळण्याचे दृष्टीने अथवा विलंब करण्याचे दृष्टीने प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे. सहाजिकच तक्रारदार तक्रारीमधील कुठलीही दाद मिळण्यास पात्र नाही.
10. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 111/2009 रद्द करण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्यपाठविण्यात
याव्यात.