द्वारा- श्री. एस. के. कापसे, मा. सदस्य
निकालपत्र
दिनांक 29 मार्च 2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. जाबदेणार क्र.1 बँक असून जाबदेणार क्र.2 त्यांचे फ्रन्चायसी व जाबदेणार क्र.3 हे जाबदेणार क्र.2 यांचे कर्मचारी आहेत. तक्रारदारांनी दिनांक 7/8/2001 रोजी जाबदेणार क्र.1 यांच्याकडून रुपये 5,00,000/- 18 टक्के व्याजदराने घेतले होते, दरमहा 60 हप्ते, प्रत्येकी रुपये 12,696/- प्रमाणे परतफेड करावयाचे होते. जूलै 2002 मध्ये जाबदेणार क्र.3 यांनी तक्रारदारांना व्याजाचा दर कमी झाल्याचे सांगून तक्रारदारांच्या वीस रुपयांच्या को-या स्टॅम्प पेपरवर व इतर कागदपत्रांवर सहया घेतल्या. जाबदेणार क्र.1 यांना सदरहू कागदपत्रे देण्याआधी त्याची एक प्रत तक्रारदारांना देण्यात येईल असेही तक्रारदारांना सांगण्यात आले. दिनांक 7/10/2002 रोजी जाबदेणार क्र.1 यांनी रुपये 12,696/- ऐवजी रुपये 28,858/- चा चेक तक्रारदारांच्या खात्यात जमा केला. तक्रारदारांनी विचारणा केली असता तक्रारदारांना अतिरिक्त रुपये 5,00,000/- कर्ज मंजुर झाल्याचे तक्रारदारांना सांगण्यात आले. जाबदेणार यांनी तक्रारदारांची फसवणूक केली. तक्रारदारांनी सर्व कर्जाची परतफेड न केल्यास तक्रारदारांची मालमत्ता जप्त केली जाईल असेही जाबदेणार यांनी तक्रारदारांना सांगितले. म्हणून तक्रारदारांनी दिनांक 24/3/2003 च्या रुपये 5,02,053/-चेकद्वारे कर्जाची परतफेड केली. नंतर जाबदेणार क्र.1 यांनी तक्रारदारांचे कर्ज खाते बंद करुन रुपये दहा लाखांसंदर्भात नो डयुज प्रमाणपत्र दिले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार तक्रारदारांनी रुपये 5,00,000/- कर्ज घेतले होते, जाबदेणार यांनी रुपये 28858/- चे दोन चेक भरुन तक्रारदारांकडून रुपये 57,716/- वसूल केले, म्हणून तक्रारदारांनी रुपये 2,35,460/- भरुन रुपये पाच लाख कर्जाची परतफेड केली, जाबदेणार बँकेनी जबरदस्तीने रुपये 5,02,053/- चा चेक तक्रारदारांकडून घेतला, अशारितीने तक्रारदारांनी रुपये 7,37,513/- जाबदेणारांकडे भरले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार जाबदेणार क्र.3 यांनी जाबदेणार क्र.1 व 2 यांच्या मदतीने रुपये पाच लाख कर्जासंदर्भात खोटी कागदपत्रे तयार केली होती, जाबदेणार यांनी तक्रारदारांकडून रुपये 2,35,460/- अधिक रुपये 19,408.38 अधिक रुपये 61,941.45 अधिक रुपये 400/- अधिक रुपये 5806.39 एकूण रुपये 3,23,016.22 तक्रारदारांकडून वसूल केले. म्हणून तक्रारदारांनी दिनांक 16/2/2003 रोजी जाबदेणार क्र.1 यांना नोटीस पाठविली परंतू उपयोग झाला नाही म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून रुपये 3,23,016.22 18 टक्के व्याजासह मागतात, तसेच नुकसान भरपाई पोटी रुपये 2,00,000/-, फोरक्लोझर नंतरचे चेक क्र.221435 ते 221480 जाबदेणार क्र.1 यांच्याकडून परत मागतात, तक्रारीचा खर्च व इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार क्र.1 यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. तक्रारदारांनी जाबदेणार क्र.1 यांच्याकडे पर्सनल लोन रुपये 5,00,000/- ची मागणी केल्यानुसार जाबदेणार क्र.1 यांनी दिनांक 28/6/2001 रोजी रुपये पाच लाख कर्ज तक्रारदारांना मंजुर केले होते. दरमहा हप्ता रुपये 12696/-, एकूण 60 हप्ते भरावयाचे होते. सप्टेंबर 2002 मध्ये तक्रारदारांनी सदरहू कर्ज खाते टर्मिनेट करण्यासाठी आले व रुपये दहा लाख, 48 दरमहा हप्त्यात कर्जाऊ मिळण्यासाठी विनंती केली. रुपये 4,32,733/- आधीच्या कर्जापोटी त्यातून वळते करण्यात यावे अशीही विनंती तक्रारदारांनी केली. तक्रारदारांच्या विनंती नुसार रुपये दहा लाख कर्ज दिनांक 7/9/2002 रोजी मंजुर करण्यात आले होते. त्याचा कालावधी 48 दरमहा हप्त्यांचा होता. रुपये दहा लाखांतून रुपये 4,32,733/- आधीच्या कर्जापोटी वळते करण्यात आल्यानंतर रुपये 5,55,922/- तक्रारदारांना कर्ज देण्यात आले होते. कराराच्या अटी व शर्तीनुसार टर्मिनेशन व इतर आकारणी करण्यात आली होती. सहा महिन्यांपर्यन्त दिनांक 7/10/2002 ते 8/4/2003 या कालावधीत दरमहा रुपये 28,858/- तक्रारदारांनी भरले. नंतर तक्रारदारांनी उर्वरित कर्जाची परतफेड टर्मिनेशन व इतर आकारणी सह केली. त्यानुसार तक्रारदारांना नो डयुज प्रमाणपत्र देण्यात आले होते. त्यानंतर एक वर्षाच्या कालावधीनंतर दिनांक 24/2/2004 रोजी तक्रारदारांनी तक्रार दाखल केलेली आहे. एक वर्षामध्ये तक्रारदारांनी कुठलीही कायदेशिर कारवाई केलेली नाही. जाबदेणार यांनी खोटी कागदपत्रे तयार केली होती हे तक्रारदारांचे म्हणणे जाबदेणार अमान्य करुन तक्रार नामंजुर करावी अशी मागणी जाबदेणार क्र.1 करतात.
3. मंचानी दिनांक 30/6/2009 रोजी जाबदेणार क्र.2 व 3 यांच्या बाबत तक्रारदारांनी काहीही स्टेप्स न घेतल्यामुळे त्यांच्याविरुध्दची तक्रार नामंजुर केलेली आहे.
4. उभय पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. जाबदेणार क्र.1 यांनी तक्रारदारांचे कर्ज खाते अॅग्रीमेंट नं LPPUN 00000752904 स्टेटमेंट दिनांक 21/10/2010 चे अवलोकन केले असता तक्रारदारांना दिनांक 7/9/2002 रोजी रुपये 10,00,000/- कर्ज मंजुर केल्याचे, कर्ज कालावधी 7/10/2002 ते 7/09/2006 असल्याचे दिसून येते. रुपये 4,32,733/- आधीच्या कर्जापोटी वळते करण्यात आल्यानंतर रुपये 555922/- तक्रारदारांना कर्ज देण्यात आले होते. या रकमेच्या दरमहा हप्त्यांपोटी तक्रारदारांनी दिनांक 7/10/2002 ते 8/4/2003 या कालावधीत दरमहा रुपये 28,858/- भरल्याचे स्पष्ट होते. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार जर तक्रारदारांनी रुपये पाच लाख कर्जाची मागणीच केलेली नव्हती, जाबदेणार क्र.1 यांनी खोटी कागदपत्रे तयार केली होती, तर तक्रारदारांनी दरमहा कर्जाचे हप्ते न भरता जाबदेणार यांच्याविरुध्द योग्य ती कायदेशिर कारवाई करणे आवश्यक होते, तसे तक्रारदारांनी केल्याचे आढळून येत नाही. त्यानंतर उर्वरित रकमेच्या कर्जाची परतफेड तक्रारदारांनी केल्याचे व त्यानुसार जाबदेणार यांनी नो डयुज प्रमाणपत्र दिल्याचे दाखल प्रमाणपत्रावरुन स्पष्ट होते. तक्रारदारांनी प्रस्तूतची तक्रार एक वर्षानंतर दिनांक 24/2/2004 मध्ये जाबदेणारांविरुध्द दाखल केलेली आहे. तक्रारदारांना जर जाबदेणारांविरुध्द कायदेशिर कारवाई करावयाची होती तर ती तक्रारीस कारण घडल्यापासून लगेचच, म्हणजेच दुसरे कर्ज मंजुर झाल्यापासून लगेचच करावयास हवी होती, त्यामुळे तक्रारदारांची तक्रार after thought आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. यामध्ये जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी मंचास दिसून येत नाही म्हणून तक्रार नामंजुर करण्यात येत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येते आहे-
:- आदेश :-
1. तक्रार नामंजुर करण्यात येते आहे.
2. खर्चाबद्यल आदेश नाही.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.