ग्राहक तक्रार अर्ज क्र.83/2011 ग्राहक तक्रार अर्ज दाखल दि.30/03/2011 अंतीम आदेश दि.29/09/2011 नाशिक जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, नाशिक श्री.देवेंद्र मधुकर लोहाटे, तक्रारदार रा.फ्लॅट नं.13/14, अर्चित विहार, (अँड.के.बी.चांदवडकर) बी-विंग, विद्या विकास हॉस्पीटल समोर, पंपींग स्टेशन, गंगापूर रोड, नाशिक-13. विरुध्द आय.सी.आय.सी आय.बँक लि., सामनेवाला क्राऊन कमर्शियल कॉम्प्लेक्स, (अँड.श्रीमती एम.के जाधव) राजीवगांधी भवन समोर, शरणपूर रोड, नाशिक-2. (मा.अध्यक्ष श्री.आर.एस.पैलवान यांनी निकालपत्र पारीत केले) नि का ल प त्र सामनेवाला यांचेकडून चेकची रक्कम रु.25,000/- व या रकमेवर 18 टक्के दराने दि.19/02/2010 पासून व्याज मिळावे, मानसिक, शारिरीक ,आर्थीक त्रासापोटी रु.25,000/- मिळावेत, अर्जाचे खर्चापोटी रु.10,000/- मिळावेत या मागणीसाठी तक्रारदार यांचा अर्ज आहे. या कामी सामनेवाला यांनी पान क्र.16 लगत लेखी म्हणणे व पान क्र.17 लगत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे. अर्जदार व सामनेवाला यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे विचारात घेवून पुढीलप्रमाणे मुद्दे विचारात घेतले आहेत. 1) अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत काय?- होय. 2) सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यात कमतरता केली आहे काय? - होय 3) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून चेकची रक्कम व्याजासह परत मिळण्यास पात्र आहेत काय?- होय. 4) अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम वसूल मिळणेस पात्र आहेत काय?- होय. 5) अंतीम आदेश?- अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे. तक्रार क्र.83/11 विवेचन
या कामी अर्जदार यांनी पान क्र.18 लगत लेखी युक्तीवाद दाखल केलेला आहे तसेच अर्जदार यांचे वतीने अँड.के.बी.चांदवडकर यांनी युक्तीवाद केलेला आहे. सामनेवाला यांचे वतीने अँड.श्रीमती मनिषा के. जाधव यांनी युक्तीवाद केलेला आहे. आहे अर्जदार यांचे नावे सामनेवाला बँकेमध्ये क्र.002701020507 या क्रमांकाचे सेव्हींग खाते आहे ही बाब सामनेवाला यांनी अमान्य केलेली नाही. अर्जदार यांनी पान क्र.6 लगत सेव्हींग खात्याचा खाते उतारा दाखल केलेला आहे. सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व पान क्र.6 चा खाते उतारा याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणे व प्रतिज्ञापत्रामध्ये “चेक क्र.872580 हा रु.25,000/- चा चेक सिग्नेचर मिसमॅच या कारणाने डिसऑनर झाला ही बाब अर्जदार यांना एस एम एस द्वारे कळवली परंतु अर्जदार हे चेक घेण्यास आले नाहीत व त्यांनी सामनेवाला यांना न कळविता पुन्हा नव्याने शामु भुजंत्री यांचे नावे रु.25,000/- करीता नवीन चेक क्र.872581 चा चेक दिला. ही रक्कम अतिरीक्त आहे व ही अतिरीक्त रक्कम शामु भुजंत्री यांना द्यावयाची आहे असे सामनेवाला यांनी गृहीत धरुन चेक वटविलेला आहे. सेवा देण्यात कमतरता केली नाही.” असे म्हटलेले आहे. परंतु अर्जदार यांनी त्यांचे तक्रार अर्जामध्ये “सामनेवाला बँकेमध्ये अर्जदार यांचे नावे क्र.002701020507 या क्रमांकाचे सेव्हींग खाते आहे. या खात्यावरील रक्कम रु.25,000/- चा चेक क्र.872580 हा चेक दि.17/02/10 रोजी अर्जदार यांनी शामु भुजंत्री यांना दिला होता. परंतु चेक डिसऑनर झाला. याबाबत सामनेवालाकडे चौकशी केली असता सिग्नेचर मिसमॅच होत असल्याने चेक परत गेला असे सामनेवाला यांनी सांगितले. यानंतर अर्जदार हे बँकेमध्ये गेले व त्यांनी शामु भुजंत्री यांचे नावाने 872581 नंबरचा नवीन चेक रु.25,000/- करीता दिला. हा चेक पास झालेला आहे व यानंतर पुर्वीचा 872580 या क्रमांकाचा चेक सिग्नेचर मिसमॅच होत असतांनाही सामनेवाला यांनी वटविलेला आहे.” असे म्हटलेले आहे. जरी सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये “त्यांनी अर्जदार यांना चेक सिग्नेचर मिसमॅचमुळे वटत नाही ही माहिती एस एम एस द्वारे कळवली व त्यानंतर अर्जदार हे सदरचा चेक घेण्यास आले नाहीत व त्यांनी कुठल्याही प्रकारची तोंडी तक्रार क्र.83/11 अथवा लेखी माहिती दिलेली नाही.” असा उल्लेख केलेला असला तरीही एखादा चेक बँकेने न वटविल्यास तो कोणत्या कारणास्तव वटविला नाही याची लेखी माहिती अर्जदारास देण्याची जबाबदारी सामनेवाला यांचेवर होती. अर्जदार यांचे चेक क्र.872580 या चेकबाबत सिग्नेचर मिसमॅच होत असल्यामुळे चेक वटवता येत नाही ही बाब सामनेवाला यांनी अर्जदार यांना लेखी कळवली आहे हे दर्शवण्याकरीता सामनेवाला यांनी कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. चेक क्र.872580 हा चेक सिग्नेचर मिसमॅच या कारणामुळे एकदा डिसऑनर झाल्यानंतर तोच चेक पुन्हा पास करण्याबाबत सामनेवाला यांना कोणतेही योग्य कारण घडलेले नव्हते व नाही. तोच चेक पास करावयाचा होता तर त्याबाबत अर्जदार यांचेकडून योग्य तो खुलासा करुन घेण्याबाबतची जबाबदारी सामनेवाला यांचेवर होती. कारण अर्जदार यांनी पुन्हा शामु भुजंत्री याच व्यक्तीला तितक्याच रकमेचा म्हणजेच रु.25,000/- चा चेक क्र.872581 चा चेक दिलेला आहे व तो सामनेवाला यांनी पास केलेला आहे. पुर्वीचा न वटलेला चेकचा क्र.872580 व नवीन वटलेल्या चेकचा क्रमांक 872581 असा आहे म्हणजे दोन्ही व्यवहार एका पाठोपाठ घडलेले आहेत. यामुळे सामनेवाला यांनी 872580 हा चेक सुरुवातीला डिसऑनर झाल्यानंतर पुन्हा पास करण्याकरीता अर्जदार यांनी योग्य ती संमती घेणे गरजेचे होते. वरील सर्व कारणांचा विचार होता सामनेवाला यांच्या निष्काळजीपणामुळेच अर्जदार यांचे खात्यावरुन 872580 हा चेक पास झालेला आहे हे स्पष्ट होत आहे. याचा विचार होता सामनेवाला यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे. सामनेवाला यांचे निष्काळजीपणामुळे अर्जदार यांचे सेव्हींग खात्यावरुन चेक क्र.872580 या चेकची रक्कम रु.25,000/- इतकी रक्कम कमी झालेली आहे. शामु भुजत्री यांनी अर्जदार यांना आज अखेर रु.25,000/- इतकी रक्कम परत केलेली नाही ही बाब अर्जदार व त्यांचे वकिलांना मंचासमोर मान्य केलेली आहे. याचा विचार होता सामनेवाला यांचे कृत्यामुळे अर्जदार यांचे रु.25,000/- इतक्या रकमेचे नुकसान झालेले आहे असे दिसून येत आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून रक्कम रु.25,000/- इतकी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. सामनेवाला यांचे चुकिच्या कृत्यामुळे अर्जदार यांचे खात्यावरुन दि.19/02/10 रोजी रक्कम रु.25,000/- इतकी मोठी रक्कम कमी झालेली आहे. दि.19/02/10 पासून अर्जदार यांना रु.25,000/- इतकी मोठी रक्कम वापरता आली नाही यामुळे तक्रार क्र.83/11 निश्चीतपणे अर्जदार यांना आर्थीक नुकसान सहन करावे लागले आहे. वरील सर्व कारणांचा विचार होता अर्जदार हे आर्थीक नुकसान भरपाई म्हणून सामनेवाला यांचेकडून मंजूर रक्कम रु.25,000/- या रकमेवर दि.19/02/10 पासून संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.से.6 टक्के दराने व्याज मिळण्यास पात्र आहेत.असे या मंचाचे मत आहे. सामनेवाला यांचेकडून चेकची रक्कम वसूल होवून मिळावी म्हणून अर्जदार यांना सामनेवाला यांचेविरुध्द या मंचामध्ये दाद मागावी लागली आहे. या कारणामुळे निश्चीतपणे अर्जदार यांना निश्चीतपणे मानसिक त्रास सहन करावा लागलेला आहे तसेच तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी खर्चही करावा लागला आहे. याचा विचार होता अर्जदार हे सामनेवाला यांचेकडून मानसिक त्रासापोटी रक्कम रु.2500/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.1000/- इतकी रक्कम वसूल होवून मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. या कामी अर्जदार यांनी पान क्र.19 लगत पुढीलप्रमाणे वरीष्ठ कोर्टाची निकालपत्रे दाखल केलेली आहेत.
1) 1(2010) सि.पी.जे. तामीळनाडु राज्य आयोग. पान 372. एम जयंती मिनल विरुध्द. कारुर वैश्य बँक 2) 2(2003) सि.पी.जे. पश्चिम बंगाल राज्य आयोग. पान 234. युको बँक विरुध्द अजीत सहाय 3) 3(2010) सि.पी.जे. राजस्थान राज्य आयोग. पान 71. प्रमोद कुमार नागलिया विरुध्द एस.बी.बी.जे.व इतर 4) 3(2010) सि.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 280. अँटोकेड विरुध्द स्टँडर्ड चार्टर्ड बँक 5) 4(2010) सि.पी.जे. राष्ट्रीय आयोग. पान 72. सुरेशकुमार विरुध्द स्टेट बँक ऑफ बिकानेर अँण्ड जयपूर अर्जदार यांनी दाखल केलेले व वर उल्लेख केलेल्या वरीष्ठ कोर्टाचे निकालपत्रामधील हकिकत व प्रस्तुतचे तक्रार अर्जामधील हकिकत यामध्ये साम्य आहे. यामुळे वरील निकालपत्रांचा आधार या कामी घेतलेला आहे. अर्जदार यांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, त्यांनी दाखल केलेली सर्व कागदपत्रे, वकिलांचा व लेखी युक्तीवाद, वरीष्ठ कोर्टाची निकालपत्रे तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे, प्रतिज्ञापत्र, वकिलांचा युक्तीवाद आणि वरील सर्व विवेचन याचा विचार होवून तक्रार क्र.83/11 पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.
आ दे श
1) अर्जदार यांचा तक्रार अर्ज सामनेवाला यांचेविरुध्द अंशतः मंजूर करण्यात येत आहे. 2) आजपासून 30 दिवसांचे काळात अर्जदार यांना सामनेवाला यांनी पुढीलप्रमाणे रकमा द्याव्यात. अ) रक्कम रु.25,000/- द्यावेत व आर्थीक नुकसान भरपाई म्हणून या मंजूर रकमेवर दि.19/02/2010 पासून संपुर्ण रक्कम फिटेपर्यंत द.सा.द.शे.6 टक्के प्रमाणे व्याज द्यावे. ब) मानसिक त्रासापोटी रु.2500/- द्यावेत. क) अर्जाचे खर्चापोटी रु.1000/- द्यावेत.
(आर.एस.पैलवान) (अँड.सौ.व्ही.व्ही.दाणी) अध्यक्ष सदस्या ठिकाणः- नाशिक. दिनांकः-29/09/2011 |