श्री. एस. के. कापसे, मा. सदस्य यांचेनुसार
:- निकालपत्र :-
दिनांक 24 नोव्हेंबर 2011
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. माहे जून 2005 मध्ये जाबदेणार बँकेचा प्रतिनिधी तक्रारदारांकडे गृहकर्ज योजना व सुविधांसंदर्भात आला होता. तक्रारदारांना गृहकर्जाची आवश्यकता असल्याने तक्रारदारांनी जाबदेणार बँकेकडे गृहकर्जासाठी अर्ज केला होता. त्यानुसार बँकेनी सदनिका क्र.201, क्षेत्रफळ 89.65 चौ.मिटर, बी 1, डहाणूकर रिजन्सी, कोथरुड, सर्व्हे नं.31/2/2/1 अधिक 30/1 बदल्यात रुपये 19,00,000/- कर्ज मंजुर केले होते. जाबदेणार बँकेपेक्षा कमी व्याजदरात इतर काही बँका गृहकर्ज देतात असे तक्रारदारांना कळले होते. म्हणून तक्रारदारांनी जाबदेणार बँकेकडून घेतलेले सर्व कर्ज एकरकमी परत फेडण्याचे ठरविले. तक्रारदारांनी जाबदेणार बँकेकडून घेतलेले सर्व कर्ज एस.बी.आय बँकेमार्फत फेडले. जाबदेणार बँकेने तक्रारदारांना पत्र क्र. LAN No. LBPUN 00001100327 as N.O.C. letter dated 23/6/2009 दिले. जाबदेणार बँकेने दिनांक 13/7/2009 रोजी तक्रारदारांना सदनिके संदर्भातील सर्व मुळ कागदपत्रे, पावत्या परत केल्या परंतू सर्व कागदपत्रे पाण्यामुळे भिजलेली, फाटलेल्या अवस्थेत होती. जाबदेणार बँकेनी दिनांक 13/7/2009 रोजीच्या पत्रान्वये पावसाच्या पाण्यामुळे मुळ कागदपत्रे खराब झाल्याबद्यल तक्रारदारांकडून लेखी क्षमा मागितली. तक्रारदारांनी एस.बी.आय बँकेकडे गृहकर्जासाठी अर्ज केला होता. एस.बी.आय बँकेने देखील तक्रारदारांकडून सदनिकेसंदर्भातील नीट अवस्थेतील सर्व मुळ कागदपत्रे मागितली होती. जाबदेणार बँकेने मुळ कागदपत्रे नीट ठेवली नाही, ती खराब अवस्थेत परत केली. तक्रारदारांना सदरहू सदनिकेची विक्री करावयाची आहे परंतू मुळ कागदपत्रे खराब झालेली असल्यामुळे सदनिकेचे मुल्यांकन कमी येते. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार नुकसान भरपाईपोटी जाबदेणार बँकेकडून रुपये 15,00,000/- व तक्रारीचा खर्च मागतात. तक्रारदारांनी तक्रारीसोबत कागदपत्रे, शपथपत्र व कुलमुखत्यारपत्र दाखल केले आहे.
2. जाबदेणार बँकेला मंचाची नोटीस लागल्यानंतर बँकेतर्फे अॅड. अभ्यंकर दिनांक 28/1/2010 रोजी मंचापुढे हजर झाले व त्यांनी अपिअरन्स पुरसिस दाखल केली व लेखी जबाब दाखल करण्यासाठी वेळ मागितला. दिनांक 10/3/2010 रोजीच्या अर्जाद्वारे बँकेनी परत लेखी जबाब दाखल करण्यासाठी वेळ मागितला. अर्ज मंजूर करण्यात आला होता. परंतू तदनंतर बँकेच्या वकीलांनी वकालतनामा व लेखी जबाब दाखल केला नाही, म्हणून बँकेविरुध्द दिनांक 15/6/2010 रोजी “No w.s.” आदेश पारीत करण्यात आला होता.
3. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. दिनांक 5/11/2011 रोजी तक्रारदार मंचासमोर स्वत: हजर होते व सोबत त्यांचे डेप्यु मॅनेजर जयु मुंजे यांनी मुळ अॅग्रिमेंट व इतर कागदपत्रे मंचास दाखविण्यासाठी घेऊन आले. मंचाने त्याची पाहणी केली. ती सर्व कागदपत्रे व करारनामा भिजलेल्या अवस्थेत, स्टॅम्प व सहया पाण्याने पुसलेल्या अवस्थेत दिसून आले. पत्र फाटलेल्या अवस्थेत, पावत्या हया दुस-या कागदास चिकटवलेल्या होत्या. त्यामुळे ओळखून येण्याच्या पलिकडील अवस्थेत होते. यावरुन जाबदेणार आय.सी.आय.सी.आय बँक लि. यांनी तक्रारदारांच्या सदनिकेच्या संदर्भातील मुळ कागदपत्रे जतन करतांना योग्य ती काळजी घेतली नाही, पाण्यामुळे सर्व मुळ कागदपत्रे खराब झाली होती हे तक्रारदारांचे म्हणणे सिध्द होते. ही जाबदेणार बँकेची सेवेतील त्रुटी, निष्काळजीपणा आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारदारांना त्यांच्या सदनिकेची विक्री करावयाची असल्याने त्यांनी वृत्तपत्रात जाहिरात दिल्यानंतर त्यासंदर्भातील श्री. अनिल मधुकर पाटील, नवी सांगवी यांचे दिनांक 24/9/2009, श्री. प्रकाश पाटील, नाशिक यांचे दिनांक 21/10/2009 व श्री. विशाल कुलकर्णी यांचे दिनांक 22/10/2009 च्या पत्रांची छायांकीत प्रत तक्रारदारांनी मंचासमोर दाखल केलेली आहे. तक्रारदारांच्या सदनिके संदर्भातील मुळ कागदपत्रे जाबदेणार बँकेनी खराब केल्यामुळे तक्रारदारांना त्या कागदपत्रांच्या सत्यप्रतीसाठी पुढील कार्यवाही करावी लागेल व त्यासाठी निश्चितच आर्थिक, मानसिक, शारिरीक त्रास सहन करावा लागेल, त्यामुळे नुकसान भरपाई मिळणेस पात्र आहेत. तक्रारदारांनी नुकसान भरपाईपोटी रुपये 15,00,000/- ची मागणी केलेली आहे. परंतू यासंदर्भात कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे त्यांची नुकसान भरपाई पोटीची रुपये 15,00,000/- मागणी अवास्तव आहे असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. तक्रारदार जाबदेणार बँकेकडून नुकसान भरपाईपोटी रक्कम रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1,000/- मिळण्यास पात्र आहेत असे या मंचाचे स्पष्ट मत आहे.
वरील विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मान्य करण्यात येते.
2. जाबदेणार बँकेनी तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 10,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी.
3. जाबदेणार बँकेनी तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रुपये 1,000/- अदा करावेत.
4. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.