द्वारा- श्री. एस. के. कापसे, मा. सदस्य
निकालपत्र
दिनांक 17 फेब्रुवारी 2012
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदार जाबदेणार बँकेचे फेब्रुवारी 2007 ते 19/12/2009 या कालावधी करिता क्रेडिट कार्ड क्र.4477465229486007 धारक होते. तक्रारदारांनी वेळोवेळी चेक/रोख स्वरुपात क्रेडिट कार्डासंदर्भातील रक्कम भरुन क्रेडिट कार्ड खाते बंद केले होते. जाबदेणार यांनी दिनांक 19/12/2009 च्या पत्रान्वये सदरहू खाते बंद करण्यात आलेले असून तक्रारदारांकडून कुठलीही रक्कम येणे नसल्याचे कळविलेले होते. मे 2010 च्या सुमारास जाबदेणार यांच्या प्रतिनिधींनी तक्रारदारांना क्रेडिट कार्डा संदर्भात काही रक्कम येणे असल्याबाबत तक्रारदारांना कळविले तसेच तक्रारदारांचे क्रेडिट कार्ड खाते क्र.4477465229486007 चे रुपांतर खाते क्र.4477465229486015 मध्ये झालेले असून तक्रारदारांकडून रक्कम येणे असल्याचेही सांगितले. तक्रारदारांनी खातेधारक क्र. 4477465229486015 तपासले असता सदरहू खातेधारकांचा पत्ता ए 604, सुर्यकिरण, प्लॉट नं 11 व 12, सेक्टर 34, कामोठे, नवी मुंबई असल्याचे निदर्शनास आले, तक्रारदार कधीही त्या पत्त्यावर रहात नव्हते, तसेच सदरहू घराचे मालक कोण आहेत याचीही त्यांना माहिती नाही. तक्रारदारांनी जाबदेणार यांचे प्रतिनिधी श्री. अभिषेक पारेख यांना सर्व माहिती सांगूनही उपयोग झाला नाही. म्हणून तक्रारदारांनी जाबदेणार यांना दिनांक 23/5/2011 रोजी कायदेशिर नोटीस दिली परंतू नोटीस न बजावता नॉट क्लेम या शे-यासह परत आली, म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून नुकसान भरपाई पोटी रुपये 3,00,000/-, त्यावर तक्रार दाखल दिनांकापासून 9 टक्के दराने व्याज, खर्च रुपये 25,000/- व इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांना मंचाची नोटीस लागूनही गैरहजर. म्हणून जाबदेणार यांच्याविरुध्द एकतर्फा आदेश मंचाने दिनांक 18/10/2011 रोजी पारीत केला.
3. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. जाबदेणार यांनी तक्रारदारांना दिलेल्या दिनांक 19/12/2009 च्या पत्राचे अवलोकन केले असता त्यात “ Sub- ICICI Bank EMI Card Account No. 4477465229486007. We hereby confirm that there are no dues pending against the above mentioned EMI Card account.” असे नमूद करण्यात आल्याचे दिसून येते. यावरुन तक्रारदारांचे क्रेडिट कार्ड खाते क्र. 4477465229486007 दिनांक 19/12/2009 रोजीच्यापत्रान्वये जाबदेणार यांनी तक्रारदार काहीही देणे लागत नसल्याचे कळविल्याचे स्पष्ट होते. असे असतांनाही जाबदेणार यांनी तक्रारदारांना दिनांक 6/5/2010 ते 13/5/2010 या कालावधीकरिता खाते क्र. 4477465229486015 व त्यावर तक्रारदारांचे नाव नमूद करुन क्लोझिंग बॅलेन्स रुपये 1,47,586/- दर्शविण्यात आल्याचे दाखल स्टेटमेंटवरुन दिसून येते. वास्तविक तक्रारदारांचा क्रेडिट कार्ड खाते क्र. 4477465229486015 नसून 4477465229486007 होता. यावरुन दुस-याच क्रेडिट कार्ड खातेधारकाच्या नावे बाकी असलेल्या दिनांक 6/5/2010 ते 13/5/2010 या कालावधीच्या रकमेची मागणी तक्रारदारांकडून करण्यात आल्याचे स्पष्ट होते. म्हणून भविष्यात तक्रारदारांकडून क्रेडिट कार्ड खाते क्र. 4477465229486015 संदर्भात जाबदेणार यांनी कोणतीही मागणी करु नये असे मंचाचे स्पष्ट मत आहे. यासर्वांवरुन जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी व निष्काळजीपणा दिसून येतो. जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी व निष्काळजीपणामुळे तक्रारदारांना निश्चितच शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला आहे असे मंचाचे मत आहे. म्हणून तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 5000/- मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. तक्रारदारांनी नुकसान भरपाई पोटी रुपये 3,00,000/- 9 टक्के व्याजासह मिळावेत व तक्रारीचा खर्च रुपये 25,000/- मिळावा अशी मागणी केलेली आहे. परंतू सदरहू मागणी अवास्तव आहे, त्याबाबत तक्रारदारांनी पुरावा सादर केलेला नाही. यासदंर्भात मंचाने मा. सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा 2000 DGLS 1448 चरणसिंह विरुध्द हिलींग टच हॉस्पिटल चा आधार घेतला. सदरहू निवाडयात नमूद केल्याप्रमाणे “It is for the Consumer Forum to grant compensation to the extent it finds it reasonable, fair and proper in the facts and circumstances of a given case according to established judicial standards where the claimant is able to establish his charge.”
वर नमूद विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
[1] तक्रार अंशत: मान्य करण्यात येत आहे.
[2] जाबदेणार यांनी भविष्यात तक्रारदारांकडून क्रेडिट कार्ड खाते क्र. 4477465229486015 संदर्भात जाबदेणार यांनी कोणतीही मागणी करु नये.
[3] जाबदेणार यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 5000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावेत.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.