निकालपत्र :- (दि.20/10/2010) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (01) तक्रार स्विकृत करुन सामनेवालांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांना नोटीस लागू होऊन सामनेवाला त्यांचे वकीलामार्फत हजर झाले व त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. उभय पक्षांचे वकीलांचा युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार ही कर्जाच्या हप्त्यामध्ये जादा रक्कम वसुल करुन सेवेत त्रुटी ठेवलेमुळे दाखल केलेली आहे. (02) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) सामनेवाला बँक ही बँकींग रेग्युलेशन अक्ट व बँकींग कंपनीज अक्ट खाली स्थापन झालेली बँक आहे. तिच्या ब-याच शाखा आहेत. पैकी कोल्हापूर येथे वरील नमुद पत्त्यावर एक शाखा आहे. ब) तक्रारदाराने ट्रॅक्टर क्र.MH-09-AL-6038 खरेदीकरिता सामनेवाला यांचेकडून रक्कम रु.3,44,000/- इतक्या रक्कमेचे कर्ज घेतले. दि.01/11/2003 रोजी तक्रारदार व सामनेवाला यांचेमध्ये कर्ज करार क्र.LFKPR0000164410 दि.01/11/2003 अन्वये करार झाला. सदर कराराप्रमाणे तक्रारदाराने कर्जाची रक्कम द.सा.द.शे. 14.42 टक्के दराने अदा करावयाची होती. सदर कर्जाचा सहामाही हप्ता हा रक्कम रु.49,450/- चा ठरला होता. त्याप्रमाणे तक्रारदाराने दि.20/0/2008 रोजी सामनेवाला बँकेला विनंती केली की पुढील सहामाही हप्त्याची रक्कम रु.49,450/- आगाऊ भरुन घ्यावी व त्यावरील होणा-या व्याजाची रक्कम कपात करुन मिळावी. परंतु सामनेवाला यांनी तक्रारदाराची विनंती मान्य केली नाही व पुढील हप्ता आगाऊ भरुन घेणेस नकार देऊन सेवेत त्रुटी केली आहे. तसेच त्यामुळे तक्रारदारास मानसिक त्रास झालेला आहे. क) तक्रारदार हे शेतकरी असून त्यांनी त्यांचे स्वत:चे शेती व्यवसायाकरिता व शेतजमिनीकरिता ट्रॅक्टर खरेदी केला आहे. सामनेवाला यांनी दि.20/05/2008 रोजी तक्रारदाराचा पुढील सहामाही हप्ता भरुन न घेऊन सेवेत त्रुटी ठेवली आहे. त्यामुळे तक्रारदारास मानसिक त्रास झालेला आहे. सन-2004 मध्ये सामनेवाला बँकेने बेकायदेशीर तक्रारदारांचा सदरचा ट्रॅक्टर ताब्यात घेतला होता. दि.22/11/2004 रोजी तक्रारदाराने सामनेवाला बॅंकेला ट्रॅक्टर ताब्यात देणेची विनंती केली तेव्हा सामनेवाला बँकेने रक्कम रु.14,100/- इतर चार्जेस व रेपो चार्जेसची रक्कम रु.7,000/- असे एकूण रक्कम रु.21,100/- तक्रारदाराकडून बेकायदेशीररित्या वसुल केले. त्यामुळे तक्रारदाराने त्यांचा व सामनेवाला यांचेमधील कर्ज करार संपलेला नसताना सामनेवाला यांना वकीलांमार्फत दि.28/01/2009 रोजी नोटीस पाठवली. सदरची नोटीस सामनेवाला यांना मिळूनही त्यांनी सदर नोटीसची दखल घेतली नाही किंवा सदर नोटीसला उत्तर दिले नाही. सबब सामनेवाला यांनी तक्रारदाराकडून वसुल केलेली जादाची रक्कम रु.21,100/-, पुढील हप्ता भरुन न घेतलेने झालेले नुकसान रु.10,000/-,तक्रारदारचे गैरसोयीबद्दल रक्कम रु.5,000/-, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/-व सामनेवाला यांना पाठविलेल्या कायदेशीर नोटीसचा खर्च रु.2,000/-,तक्रारीचा खर्च रु.5,000/-असे एकूण रक्कम रु.53,100/- सामनेवाला यांचेकडून 18 टक्के व्याजासह वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (03) तक्रारदाराने आपल्या तक्रारीसोबत अकौन्ट स्टेटमेंटस, सामनेवाला बॅंकेने टर्मिनेशन पत्र, तक्रारदारांना सामनेवाला यांना पाठविलेले पत्र,पोच पावती, सामनेवाला यांना वकीलांमार्फत पाठविलेली नोटीस,त्याची पोहोचपावती,तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे रक्कम भरणा केलेल्या पावत्या इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. (04) सामनेवाला यांचे लेखी म्हणणेनुसार अ) तक्रारदाराची तक्रार नाकारलेली आहे. ते आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, तक्रारदार हा स्व्च्छ हाताने मे.मंचासमोर आलेला नाही. तक्रारदाराने सामनेवाला यांना त्रास देणेचे हेतुने व सामनेवाला यांचेकडून पैसे उकळण्याच्या हेतुने सदरची तक्रार दाखल केली आहे.तसेच तक्रारदारास कर्जाची रक्कम रु.1,22,209/-भरावयास लागू नये याकरिता सदरची बनावट तक्रार तक्रारदाराने दाखल केली आहे. ब) तक्रारीतील कलम 1 मधील वस्तुस्थिती नोंद आहे. तसेच कलम 2 मधील मजकूर बरोबर आहे. कलम 3 मधील मजकूर अंशत3 बरोबर आहे व बाकी मजकूर अमान्य केलेला आहे. तक्रारदाराने नमुद केलेप्रमाणे तक्रारदार दि.20/05/008 रोजी पुढील हप्त्याची रक्कम रु.49,150/- आगाऊ भरणेकरिता कधीही सामनेवाला यांचेकडे आले नव्हते व तक्रारदारने कधीही सदर हप्त्याची होणारी व्याजाची रक्कम कमी करणेकरिता विनंती केली नव्हती. सदर कर्जाबाबत झालेल्या करारानुसार हप्त्याच्या वेळापत्रकानुसार त्यादिवशी हप्ता भरणेचा असून तत्पुर्वी नाही सबब तक्रारदार हा मे. मंचाची सहानुभूती मिळवणेसाठी खोटी व काल्पनीक तक्रार दाखल केली आहे. कलम 4 व 5 मधील मजकूर नाकारलेला आहे. सामनेवाला बँकेने तक्रारदाराचा ताब्यात घेतलेला ट्रॅक्टर तक्रारदाराने रक्कम रु.1,20,000/- इतकी रक्कम रिसीट क्र.2634738 दि.22/11/2004 रोजी भरलेनंतर सदर ट्रॅक्टर परत दिलेला आहे. सदर रक्कमेपैकी रक्कम रु.98,900/- दोन थकीत मासिक हप्त्यापोटी तर रु.14,100/- ओव्हरडयु चार्जेस व रु.7,100/- रेपो चार्जेस म्हणून आकारलेले आहेत. सदर रेपो चार्जेस हे एजन्सी व गोडावून चार्जेससाठी घेतले जातात. सध्या प्रति मासिक हप्ते रु.98,900/-तसेच ओव्हर डयु चार्जेस रु.23,309/-असे एकूण रु.1,22,209/-तक्रारदार देय लागतात.सदरची रक्कम तक्रारदाराने तो थकीत राहिल्याने सवत:हून भरलेली आहे व तसेच नमुद वाहन ताब्यात देणेबाबत विनंती केलेली आहे. तसेच पुढील मासिक हप्ते देय तारखेस भरणेची हमी दिलेली आहे. मात्र तो आपल्या शब्दापासून फिरला आहे व प्रस्तुतची तक्रार पैसे उकळण्याच्या हेतूने दाखल केली आहे. कलम 7 व 8 मधील मजकूर खोटा व आधारहीन आहे.कलम 6 मधील मजकूर खोटा व चुकीचा व सत्यापासून दुर जाणारा आहे. सामनेवालांनी कधीही बेकायदेशीरपणे तक्रारदाराचा ट्रॅक्टर ताब्यात घेतलेला नाही.सामनेवालांचे एजंट हे कार्यालयीन वेळेत सकाळी 9 ते संध्याकाळी 6.30पर्यंत कर्जदारांना रक्कमा भरणेबाबत वारंवार सांगत असतात. सबब तक्रारदाराच्या कथनावर विश्वास ठेवता येणार नाही. कलम 5 मध्ये मजकूर सर्वसाधारण नाकारलेला आहे. कलम 8 मध्ये नमुद केलेले तक्रार उदभवण्याचे कारण चुकीचे आहे. तक्रारदाराने नोटीस पाठविलेची बाब सामनेवाला यांनी नाकारली आहे. तक्रार अर्जातील कलम 9 मधील मजकूर नाकारलेला आहे. सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी व सामनेवाला यांना तक्रारदाराकडूनरक्कम रु.10,000/- कॉम्पेसेंटरी कॉस्ट देणेबाबत हुकूम व्हावा अशी विनंती सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (05) सामनेवाला यांनी आपल्या म्हणणेच्या पुष्टयर्थ रिसीट, पेईंग स्लिप, अॅसेट पझेशन कीट, खातेउतारा, टर्मिनेशन स्टेटमेंट, अंडरटेकींग, इंटरनल डिलीव्हरी नोट, सध्याचा खातेउतारा इत्यादी कागदपत्रांच्या सत्यप्रती दाखल केल्या आहेत. (06) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्रे तसेच उभय पक्षांच्या वकीलांचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- होय अंशत: 2. काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे मुद्दा क्र.1 व 2 :- सामनेवाला बँकेकडून तक्रारदाराने ट्रॅक्टर क्र.MH-09-AL-6038 खरेदीकरिता रक्कम रु.3,44,000/- इतके कर्ज घेतले होते. उभय पक्षामध्ये दि.01/11/2003 रोजी कर्ज करार क्र.LFKPR0000164410 झालेला आहे. तसेच नमुद कर्जासाठी प्रति सहामाही रक्कम रु.49,450/-ची एकूण 10 हप्तेमध्ये प्रस्तुत कर्ज फेडणेचे होते व प्रस्तुत हप्ते हे वेळापत्रका प्रमाणे मे व नोव्हेंबर च्या एक तारखेस भरणेचे होते ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. सदर वेळापत्रकाप्रमाणे तक्रारदाराने 1 मे-2004 व 1 नोव्हें-2004 चे हप्ते वेळापत्रकाप्रमाणे न भरलेने सामनेवाला यांनी योग्य ती कायदेशीर प्रक्रिया राबवून तक्रारदाराचा ट्रॅक्टर ताब्यात घेतलेला होता हे सामनेवाला यांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन निर्विवाद आहे. तक्रारदाराने दाखल केलेल्या हप्ता भरणा पावती क्र.2634738 दि.22/11/2004 चे पावतीचे अवलोकन केले असता तक्रारदाराने रक्कम रु.1,20,000/- चा भरणा केलेला आहे. सदर पावतीवर इतर चार्जेस रु.14,100/- मे व नोव्हेंबर प्रमिसहामाही हप्ता रु..49,450/- प्रत्येकी तसेच रक्कम रु.7,000/- रेपो चार्जेस असा एकूण रक्कम रु.1,20,000/- चा तपशील नोंदवलेला आहे व सदर रु.14,100/- व रु.7,000/- असे एकूण रक्कम रु.21,100/- चा वाद तक्रारदाराने केलेला आहे. याचा विचार करता तक्रारदार हा नमुद वेळापत्रकाप्रमाणे हपते भरणेस असमर्थ ठरला आहे. त्याप्रमाणे सामनेवालांनी कायदेशीर कारवाई करुन ट्रॅक्टर ताब्यात घेतलेला आहे. सामनेवाला यांनी आपल्या म्हणणेमध्ये रेपो चार्जेस हे सामनेवालांनी वसुलीसाठी नेमणूक केलेली एजन्सी तसेच गोडावून चार्जेस पोटी आकारलेले आहेत. तर रक्कम रु.14,100/- हे ओव्हरडयु चार्जेस म्हणून आकारले असलेचे नमुद केले आहे. सामनेवाला यांनी दाखल केलेल्या खातेउता-याचे अवलोकन केले असता प्रस्तुत 1 मे-2004 चा हप्ता हा दि.22/11/2004 रोजी भरलेला आहे. त्यामुळे नमुद मधील कालावधीमध्ये हप्ता थकीत गेलेमुळे त्याप्रमाणे सदर कालावधीसाठी एकूण रक्कम रु.5,934/- इतर चार्जेस मध्ये आकारणी केलेले आहे. तसेच तक्रारदाराने दाखल केलेल्या खातेउता-यामध्ये मात्र रु.692/- जादाची नमुद केलेली आहे. तसेच 1 नोव्हेबर-2004 चा हपता हा दि.22/11/2004 रोजी जमा झालेमुळे विलंब कालावधीसाठी रु.692/- आकारलेचे दिसून येते. वस्तुत: सामनेवालांनी दाखल केलेल्या कागदपत्रानुसार 1 मे-2004 च्या हप्त्यापोटी रक्कम रु.5,934/- तर 1 नोव्हें-2004 चा हप्ता दि.22/11/2004 रोजी भरलेमुळे रक्कम रु.692/- असे एकूण रक्कम रु.6,626/- सदर थकीत हप्त्या भरणा करेपर्यंत देय होते. असे असतानाही सामनेवालांनी रक्कम रु.14,100/- इतकी आकारणी केलेली आहे. सबब सदर कालावधीपर्यंत सामनेवाला यांनी रु.7,474/- इतकी जादा रक्कमेची आकारणी केली असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. तसेच एजन्सी व गोडावून चार्जेससाठी म्हणून रु.7,000/- रेपो चार्जेस म्हणून आकारणी केलेली आहे. याचा विचार करता तक्रारदाराचे हप्ते थकीत गेलेमुळे सामनेवाला बँकेने कायदेशीर प्रक्रिया राबवून तक्रारदाराचा ट्रॅक्टर ताब्यात घेतला. दि.15/10/2004 च्या सामनेवाला यांनी केलेल्या आदेशानुसार ट्रॅक्टर ताब्यात घेतला व त्याप्रमाणे दि.19/10/2004 रोजी तक्रारदारचा ट्रॅक्टर कर्ज थकीत गेलेमुळे ताब्यात घेतलेबाबत शाहूवाडी पोलीस स्टेशन शाहूवाडी यांना त्याबाबत कल्पना दिलेली आहे व सदरचा ट्रॅक्टर हा दि.20/10/2004 रोजी सदर श्रीराम एजन्सीने सामनेवाला बँकेच्या ताब्यात दिलेला आहे. त्याबाबत दि.23/10/2004 ला तक्रारदारास नोटीसही काढलेली आहे. तदनंतर तक्रारदाराने दि.22/11/2004 रोजी रक्कम रु.1,20,000/- चा भरणा केलेला आहे. दि.03/12/2004 रोजी रक्कम रु.1,20,000/- ईएमआय, ओव्हरडयु, चेक बाऊन्स चार्ज, पझेशन चार्ज,पेनल चार्ज इत्यादीपोटी भरणा केलेचे सदर हमीपत्रात मान्य केले आहे. तसेच हप्ते थकीत गेलेसे स्वत:हून वाहन सामनेवालांच्या ताब्यात देणेचेही मान्य केले आहे. तसेच सदरचा ट्रॅक्टर हा सन2004 साली बेकायदेशीरपणे जप्त केलेला आहे हे तक्रारदार दि.03/03/2009 साली तक्रार दाखल करुन सांगतात हे वस्तुसिथतीस धरुन नाही. तसेच प्रस्तुतचा ट्रॅक्टर हा कायदेशीर प्रक्रिया राबवूनच जप्त केलेला आहे असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. सबब तक्रारदाराचे बेकायदेशीर ट्रॅक्टर ताब्यात घेतलेची तक्रार मान्य करता येणार नाही. याचा विचार करता तक्रारदारचा ट्रॅक्टर ताब्यात घेतलेपासून ते सदर थकीत हप्त्याची रक्कम भरणा करेपर्यत म्हणजे दि.19/10/2004 ते 22/11/2004 अखेर जवळजवळ 1 महिन्याचा कालावधी सामनेवाला यांचेकडे होता. त्यासाठी सामनेवाला यांना सदर श्रीराम एजन्सीज तसेच सदर वाहन पार्कींग करणेसाठी खर्च आलेला आहे. सदर ट्रॅक्टर हा महिनाभर त्यांना पार्क करावा लागलातसेच त्यांची देखभालही करावी लागली त्यामुळे पार्कींग चार्जेस व सदर वसुलीसाठी करावा लागलेला कायदेशीर खर्च इत्यादीचा विचार करता रक्कम रु.7,000/- चे रेपो चार्जेस हे बेकायदेशीर आहे असे म्हणता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. कर्जाच्या वेळापत्रकाचा तसेच तक्रारदाराने भरणा केलेल्या रक्कमांचा विचार करता तक्रारदार मे-2004 नोव्हें-2004 चे हप्ते पूर्णत: थकीत गेलेला होता. मे-2005 चा हप्ता फक्त दोन दिवस आधी भरलेला आहे. नोव्हें-2005, मे-06, नोवहें-06, मे-07, नोव्हें-07, अनुक्रमे 8, 14, 3, 44 व 63 इतक्या दिवस उशिरा भरलेला आहे. तसेच मे-08 व नोवहें-08 चे दोन हप्ते तक्रारदाराने भरलेले नाहीत. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारीमध्ये सदर हप्ते आगाऊ भरणेसाठी गेलो असता सदर हप्ते भरुन घेणेस नकार दिलेचे प्रतिपादन केले आहे. नमुद वेळापत्रकाप्रमाणे दि.01/05/2008 रोजी हप्ता देय होता. तर तक्रारदार त्यांचे मताप्रमाणे दि.20/05/2008 रोजी चौकशीसाठी सामनेवाला बँकेत गेले होते हे दाखल पावतीवरुन दिसून येते. मात्र यावरुन असे दिसून येत नाही की तक्रारदार हे हप्ता रक्कम आगाऊ भरणा करणेसाठी विचारणा करणेसाठी गेले होते व तसा हप्ता भरुन घेणेस सामनेवाला यांनी नकार दिला हे सिध्द होत नाही. त्याबाबत कोणताही लेखी पुरावा नाही. सबब तक्रारदाराचे प्रस्तुत कथन विचारात घेता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला यांनी इतर चार्जेसपोटी रक्कम रु. 7,474/- जादा घेतलेले आहेत. तसेच सदरची रक्कम ही दि.22/11/2004 रोजी सामनेवालांकडे जमा आहे. तसेच तक्रारदाराने मे-05 मध्ये हप्त्यापेक्षा रु.50/- जादा जमा केलेले आहेत. तसेच नोव्हें-06 चा हप्ता मात्र रक्कम रु.36,350/- इतका भरलेला असलेने रु.13,100/- कमी हप्ता भरलेला आहे. तसेच सामनेवाला यांनी तक्रारदारास थकीत हप्ता रक्कम भरुन घेऊन सदर कर्ज भरणेची संधी तक्रारदारास दिलेली आहे. त्यामुळे फोरक्लोजर चार्जेस आकारता येणार नाहीत. तसेच तक्रारदाराने ट्रॅक्टर जप्तच करता येणार नाही हा आक्षेप हे मंच फेटाळत आहे. कारण कर्ज घेतलेनंतर त्याचे हप्ते वेळेवर भरणे ही कर्जदाराची कायदेशीर जबाबदारी आहे. सबब सलग प्रतीसहामाही प्रत्येकी रु.49,450/- रक्कमेचे सलग दोन हप्ते थकीत गेलेमुळे सामनेवालांनी कराराप्रमाणे कायदेशीर कारवाई केलेली आहे. तसेच तक्रारदाराने तसे हमीपत्रही दिलेले आहे. सबब तक्रारदाराने दाखल केलेला केस लॉ हा प्रतिमाह मासिक हपत्यासाठी आहे सबब तो तंतोतंत येथे लागू होणार नाही असे या मंचाचे स्पष्ट मत आहे. वरील विस्तृत विवेचनाचा विचार करता सामनेवाला यांनीच दाखल केलेल्या हिशोबापेक्षा जादा रक्कम आकारणी करुन सेवेत अंशत: त्रुटी ठेवली असलेचे निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तक्रारदाराकडून सामनेवाला यांनी जादा रक्कम वसुल करुन घेतल्यामुळे झालेल्या मानसिक त्रासापोटी व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते. 2) सामनेवाला यांनी तक्रारदारास जादा आकारणी केलेली रक्कम रु.7,474/-( रु.सात हजार चारशे चौ-याहत्तर फक्त) अदा करावेत. 3) सामनेवाला यांनी तक्रारदारस मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |