निकाल
पारीत दिनांकः- 30/06/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1] तक्रारदार या होमिओपथीच्या डॉक्टर आहेत दि. 19/7/2008 रोजी मुंबई येथे महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपथीच्या कॉन्फरन्ससाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांची पर्स चोरीला गेली, पर्समध्ये मौल्यवान वस्तुंबरोबर जाबदेणार कंपनीचे क्रेडीट कार्ड होते, त्यामुळे त्यांनी लगेचच बँकेला फोन करुन पिन कोड लॉक करण्याच्या सुचना दिल्या. जाबदेणारांच्या प्रतिनिधीने लगेचच कारवाई करुन पिन कोड लॉक केला जाईल असे आश्वासन तक्रारदारांना दिले, त्यामुळे त्या निर्धास्त राहिल्या. त्यानंतर तक्रारदारांना त्यांच्या आय.सी.आय.सी.आय. बँकेच्या क्रेडीट कार्डच्या खात्यामधून काही रक्कम काढल्याचे समजले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जाबदेणारांच्या प्रतिनिधींनी आश्वासन देऊनही त्यांच्या खात्यामधून रक्कम काढली गेली, म्हणून तक्रारदारांनी आझाद मैदान पोलिस स्टेशन, मुंबई येथे एफ.आय.आर. दाखल केली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जाबदेणारांच्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या खात्यामधून रक्कम रु. 27,000/- काढले, म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणारांकडून रक्कम रु. 27,316/- दि. 19/7/2008 पासून ते रक्कम अदा करेपर्यंत द.सा.द.शे. 24% व्याजदराने, रक्कम रु. 25,000/- नुकसान भरपाईपोटी मागतात. तसेच जाबदेणारांनी ऑगस्ट 2008 ते जुलै 2009 या कालावधीमधील रक्कम रु. 30,890.39 मागणारे स्टेटमेंट मागे घ्यावे आणि इतर दिलासा मागतात.
2] तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
3] जाबदेणारांना नोटीस पाठविली असता, ते मंचामध्ये गैरहजर राहिले म्हणून मंचाने त्यांच्याविरुद्ध एकतर्फा आदेश पारीत केला.
4] तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदार या होमिओपथीच्या डॉक्टर आहेत दि. 19/7/2008 रोजी मुंबई येथे महाराष्ट्र कौन्सिल ऑफ होमिओपथीच्या कॉन्फरन्ससाठी गेल्या होत्या, त्यावेळी त्यांची पर्स चोरीला गेली, त्यामध्ये इतर मौल्यवान वस्तुं आणि क्रेडीट व डेबीट कार्डांबरोबर जाबदेणार कंपनीचे क्रेडीट कार्डही चोरीला गेले. म्हणून तक्रारदारांनी जाबदेणारांना फोन करुन पिन कोड लॉक करण्याच्या सुचना दिल्या व जाबदेणारांनी ताबडतोब कारवाई करतो, असे आश्वासन देऊनही त्यांच्या खात्यामधून रक्कम रु. 27,000/- काढली गेली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जाबदेणारांच्या निष्काळजीपणामुळे त्यांच्या खात्यामधून रक्कम काढली गेली व त्यांचे नुकसान झाले. तक्रारदारांनी आझाद मैदान पोलिस स्टेशन, मुंबई येथे एफ.आय.आर. दाखल केली. त्यातील जबाबामध्ये, साधारणपणे 3.00 पर्यंत कॉन्फरन्स चालू होती, त्यानंतर तक्रारदार या त्यांच्या कारने क्रॉफर्ड मार्केट येथे आल्या. 3.30 च्या सुमारास त्यांनी क्रॉफर्ड मार्केट येथे कार उभी केली व सकाळी दिलेल्या ऑर्डरचे सामान आणण्यास कारचा ड्रायव्हर श्री संजय हागवणे यांना पाठविले व त्या स्वत: ड्रायव्हर सिटवर बसल्या. त्यावेळी ट्रॅफिक पोलिसांनी तेथे पार्किंग नाही असे तक्रारदारांना सांगितले, त्यामुळे त्या गाडी पुढे घेत असताना त्यांना मागील दरवाजा उघडून बंद केल्याचा आवाज आला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले असता त्यांची पर्स आढळून आली नाही, असे नमुद केले आहे. तक्रारदारांनी किती वाजता बँकेला फोन केला, रक्कम किती वाजता चोरीला गेली, याबद्दल काहीही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे तक्रारदारांनी सुचना देण्याच्या आधी चोराने/अज्ञात इसमाने कार्डचा वापर करुन रक्कम काढून घेतली असेल, असे मंचाचे मत आहे. तक्रारदारांनी कार्डचा पिन कोड लॉक करण्यासाठी जाबदेणारांना नेमक्या केव्हा सुचना दिल्या व नेमकी केव्हा चोरी झाली, याबद्दल कोणताही पुरावा तक्रारदारांनी दाखल केलेला नाही, त्यामुळे मंच प्रस्तुतची तक्रार नामंजूर करते.
5] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते.
** आदेश **
1. तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात येते.
2. तक्रारीच्या खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाहीत.
3. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात याव्यात.