तक्रारदारातर्फे वकील - श्री. प्रेमसागर बी. बिन्द
सामनेवालेतर्फे वकील – श्री. मनाडीयार
आदेश - मा. श्री. ए. झेड. तेलगोटे, अध्यक्ष. ठिकाणः बांद्रा
निकालपत्र
(दिनांक 12/08/2015 रोजी घोषित)
1. सामनेवाले यांनी दोषपूर्ण सेवा दिली असा आरोप करून तक्रारदारानी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीप्रमाणे आहे.
3. तक्रारदार यांनी ट्रॉन्सफोर्टच्या व्यववसायाकरीता ट्रक ज्याचा रजिस्टेशन नंबर एम.एच 4 डी.एस 2067 असा आहे, रू.14,26,678/-एवढया किंमतीत खरेदी केला त्यासाठी त्यांनी सामनेवाले बँकेकडून रू.11,40,000/-,एवढे अर्थसहाय्य घेतले. उभयतामध्ये त्याबाबत हायपोथीकेशन करार करण्यात आला. कर्जाची परतफेड प्रतिमाह रू.32,240/-,प्रमाणे एकुण 47 हप्त्यामध्ये करावयाची होती त्यापैकी सामनेवाले यांनी पहिल्या हप्त्याची रक्कम कर्जाच्या रकमेतुनच वसुल केली व त्यानंतर तक्रारदाराकडून सामनेवाले यांना रू.11,07,760/-,एवढी रककम घेणे बाकी होते.
4. तक्रारदाराने असे कथन केले आहे की, दि.17/04/2009 रोजी त्यांच्या ट्रकला अपघात झाला व त्याचे फार मोठे नुकसान झाले. ट्रकच्या दुरूस्तीसाठी त्यांना रू.2,39,000/-,खर्च करावे लागले. ट्रकचा अपघात झाल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले व त्या आर्थिक अडचणीमध्ये सापडल्या परिणामतः ते कर्जाचे हप्ते अदा करू शकले नाहीत. त्यांच्याकडून कर्जाचे केवळ 4 हप्ते थकीत झाले त्यांचा ट्रक दि.11/07/2009 रेाजी दुरूस्त झाल्यानंतर सामनेवाले यांनी तो दि.17/07/2009 रोजी तक्रारदाराला कोणतीही नोटीस न देता ताब्यात घेतला एवढेच नव्हे तर सामनेवाले यांनी सदरचा ट्रक दुस-या इसमास विक्री केला त्यांनतर तक्रारदार यांनी सामनेवाले यांचेकडे जाऊन थकबाकीची रक्कम स्विकारण्याची व ट्रक ताब्यात देण्याची विनंती केली. तथापी, सामनेवाले यांनी रक्कम स्विकारली नाही व तक्रारदाराच्या ताब्यात ट्रक दिला नाही. अशाप्रकारे सामनेवाले यांनी तक्रारदाराला दोषपूर्ण सेवा दिली म्हणून तक्रारदाराला प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले. सामनेवाले यांनी ट्रक परत करावा, झालेल्या नुकसानीबद्दल तक्रारदाराला रू.14,96,678/-,एवढी नुकसान भरपाई दयावी, मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई दयावी व सदरचा ट्रक त्रयस्थ इसमास विक्री करू नये असे निर्देश सामनेवाले यांना देण्यात यावेत अशी विनंती तक्रारदाराने आपल्या तक्रारीत केली आहे.
5. तक्रार दाखल करून घेतल्यानंतर मंचाने सामनेवाले यांना नोटीस पाठवून लेखीजबाब दाखल करण्याचे निर्देश दिले. नोटीस, प्राप्त झाल्यानंतर सामनेवाले यांच्यातर्फे श्री. सिन्हा यांनी मंचासमक्ष हजर होऊन सामनेवाले यांचा लेखीजबाब दाखल केला. तक्रारदारानी आपल्या तक्रारीत केलेले आरोप सामनेवाले यांनी फेटाळून लावले. सामनेवाले यांनी असे कथन केले आहे की, तक्रारदाराने ट्रान्सफोर्ट व्यवसायाकरीता सामनेवाले यांच्याकडून अर्थसहाय्य घेऊन वादातील ट्रक खरेदी केला. तक्रारदाराने नफा कमविण्याच्या उद्देशाने सदरचा ट्रक खरेदी केला हे तक्रारदाराने स्वतः तक्रारीत नमूद केले आहे. त्यामुळे तक्रारदार हे ग्रा.सं.कायदयातील ‘ग्राहक’ या संज्ञेत मोडत नाहीत व या कारणास्तव तक्रार फेटाळण्यास पात्र आहे.
6. सामनेवाले यांनी लेखीजबाबात पुढे असे कथन केले आहे की, ट्रक खरेदी करण्यासाठी तक्रारदाराने सामनेवाले यांच्याकडून रू.11.40,000/-एवढे अर्थसहाय्य घेतले व सदरचा ट्रक कर्जाला सिक्युरीटी (तारण) म्हणून सामनेवाले यांच्या नावे रेकार्डला ठेवला उभयताममध्ये यासंदर्भात हायपोथीकेशन करार नोंदविण्यात आला. कर्जाची रक्कम दरमहा रू.32,240/-,प्रमाणे एकुण 47 हप्तयामध्ये परतफेड करण्याचे तक्रारदाराने कबुल केले होते व त्यामध्ये कसूर झाल्यास सदरचा ट्रक विक्री करण्याचे अधिकार सामनेवाले यांना तक्रारदाराने करारानाम्याद्वारे दिले होते सामनेवाले यांनी असे कथन केले आहे की, तक्रारदाराने कर्जाचे हप्ते भरण्यामध्ये कसुर केली. त्यांच्याकडून 4 हप्त्याची रक्कम येणे बाकी होते. सदरची रककम अदा करण्याबाबत सामनेवाले यांनी तक्रारदाराला वेळोवेळी पत्राद्वारे कळविले व थकीत हप्त्याची रक्कम भरण्याची संधी दिली होती तथापी तक्रारदारानी कर्जाच्या हप्त्याची रक्कम न भरता सदरचा ट्रक दि.17/07/2009 रोजी सामनेवाले यांच्याकडे सरेंडर (सुपूर्द) केला त्यानंतर देखील सामनेवाले यांनी तक्रारदाराला थकीत हप्त्यांची रक्कम भरण्याची संधी दिली व कर्जाची रक्कम अदा केल्यानंतर ट्रक परत घेऊन जाण्याबाबत कळविले होते असे असतांनाही तक्रारदाराने थकीत हप्त्यांची रक्कम अदा केली नाही व ट्रकचा ताबा घेतला नाही व शेवटी सामनेवाले यांनी दि.19/07/2009 रोजी सदरचा ट्रक रू. 3,52,000/- एवढया किंमतीत विक्री केला व सदरची रक्कम तक्रारदाराच्या कर्जखात्यामध्ये जमा केली. सामनेवाले यांनी करारनाम्यातील अटी व शर्तीनुसारच कृर्ती केली आहे. तक्रारदाराने कर्जाचे हप्ते भरण्यामध्ये निष्काळजीपणा दाखवला व कसुर केली वेळोवेळी संधी देऊनही त्यांनी सामनेवाले यांना रक्कम अदा केली नाही अशा परिस्थितीत मागीतलेली दाद मिळण्यास तक्रारदार पात्र ठरत नाही. सामनेवाले यांनी तक्रारदाराला कधीही दोषपूर्ण सेवा दिली नाही. तक्रार दाखल करण्यास कोणतेच कारण घडले नाही व यासर्व कारणास्तव ती फेटाळण्यात यावी अशी विनंती सामनेवाले यांनी केली.
7 तक्रारदाराने आपली तक्रार सिध्द करण्यासाठी स्वतःचे पुराव्याचे शपथपत्र व काही कागदपत्र दाखल केली. सामनेवाले यांच्यातर्फे श्री. अभिषेक सिन्हा यांनी पुराव्याचे शपथपत्र व काही कागदपत्रे दाखल केली. उभयपक्षांनी आपला लेखीयुक्तीवाद दाखल केला.
8. तक्रारदारांची तक्रार, सामनेवाले यांचा लेखीजबाब, उभयपक्षांनी सादर केलेला पुरावा, लेखी व तोंडीयुक्तीवाद विचारात घेतल्यानंतर प्रस्तुत तक्रारीच्या निवारणार्थ खालील मुद्दयांचा विचार करण्यात आला. त्यावर, मंचाने आपला निष्कर्श पुढीलप्रमाणे नोंदविला आहे.
मुद्दे | निष्कर्ष |
1. सामनेवाले यांनी दोषपूर्ण सेवा दिली हे तक्रारदाराने सिध्द केले आहे काय? | नकारार्थी |
2. मागीतलेली दाद मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत काय? | नकारार्थी |
3. काय आदेश? | अंतिम आदेशाप्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्रमांक 1 व 2
9. उभयपक्षांनी दाखल केलेल्या तोंडी तसेच लेखी पुराव्याचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारदाराने सामनेवाले यांच्याकडून रू.11,40,000/-,एवढे अर्थसहाय्य घेऊन ट्रक (रजिस्टेशन नं एम.एच 4 डी.एस 2067) खरेदी केला त्याबाबत उभयतामध्ये हायपोथीकेशन करार करण्यात आला त्याची प्रत सामनेवाले यांनी अभिलेखावर दाखल केली. कर्जाची परतफेड तक्रारदाराने दरमहा रू.32,240/-,प्रमाणे एकुण 47 हप्त्यामध्ये करावयाची होती. तक्रारदाराने त्यापैकी केवळ एका हप्त्याची रक्कम अदा केल्याचे तक्रारदाराच्याच कथनावरून स्पष्ट होते व त्यांच्याकडून एकुण 4 हप्त्यांची रक्कम येणे बाकी होते हे देखील तक्रारदाराने मान्य केले आहे. यावरून, तक्रारदार हे स्वतः थकबाकीदार हेाते हे निर्वीवादपणे सिध्द होते
10. तक्रारदाराने कर्जाच्या थकबाकीबाबत खुलासा करतांना पुराव्यात असे कथन केले आहे की, त्यांच्या ट्रकला दि.17/04/2008 रेाजी अपघात होऊन ट्रकचे मोठे नुकसान झाले व त्याच्या दुरूस्तीसाठी त्यांना रू.2,39,000/-खर्च करावे लागले. ट्रकला झालेल्या अपघातामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला व त्या आर्थीक संकटात सापडल्या म्हणून त्या कर्जाचे हप्ते अदा करू शकले नाहीत. तक्रारदाराच्या ट्रकला अपघात झाला हे सिध्द करण्यासाठी त्यानी अभिलेखावर काही कागदपत्रे दाखल केली ज्यामध्ये अपघाताबाबत पोलीस स्टेशनला दिलेल्या खबरीची प्रत व पोलीसांनी केलेल्या घटनास्थळ पंचनाम्याची प्रत यांचा समावेश आहे. यावरून तक्रारदाराच्या वरील कथनास पुष्टी मिळते. तक्रारदाराच्या ट्रकला अपघात झाला हे जरी खरे असले तरी त्यांच्याकडून सामनेवाले यांना एकुण 4 हप्त्यांची रक्कम घेणे बाकी होते हे नमूद करणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. तक्रारदारातर्फे असा युक्तीवाद करण्यात आला की, तक्रारदाराच्या ट्रकला अपघात झाल्यामुळे तक्रारदार हे कर्जाचे हप्ते अदा करू शकले नाहीत. ट्रक अपघातामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला. मात्र, सामनेवाले यांनी ही बाब लक्षात घेतली नाही व सदरचा ट्रक तक्रारदाराच्या ताब्यातुन काढून नेला व त्याची विक्री केली ही सामनेवाले यांच्या सेवेतील त्रृटी आहे. दुस-या बाजुला सामनेवाले यांच्यातर्फे असा युक्तीवाद करण्यात आला की, तक्रारदाराने कर्जाचे हप्ते भरण्यात कसुर केल्यामुळे सामनेवाले यांनी करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार कृती केली व त्यामुळे सामनेवाले यांनी दोषपूर्ण सेवा दिली असे म्हणता येणार नाही.
11. वर नमुद केल्याप्रमाणे कर्जाचे 4 हप्ते थकीत राहीले होते हे तक्रारदाराने स्वतः मान्य केले आहे. उभयतामध्ये झालेल्या हायपोथीकेशन कराराचे अवलोकन करण्यात आले. त्यामध्ये, कर्जाचे हप्ते भरण्यात कर्जदाराने कसुर केल्यास बँकेला तारण ठेवलेल्या वाहनाची विक्री करण्याचे अधिकार बँकेला राहतील असे नमूद करण्यात आले आहे. सदर करारनाम्यातील अटी व शर्ती विचारात घेता सामनेवाले यांची कृती समर्थनीय वाटते कारण तक्रारदार हे थकबाकीदार आहेत व त्यांनी कर्जाचे एकुण 4 हप्ते भरण्यात कसुर केली असे असतांनाही सामनेवाले यांनी तक्रारदाराला थकीत रक्कम अदा करण्याची वेळावेळी संधी दिली व थकीत कर्जाची रक्कम अदा न केल्यास काय परिणाम होतील याची जाणीव करून दिली होती असे सामनेवाले यांनी दाखल केलेल्या विविध पत्रावरून दिसून येते. थकीत कर्जाची रक्कम अदा करून ट्रक ताब्यात घेण्याबाबत देखील सामनेवाले यांनी तक्रारदाराला पत्राद्वारे कळविले होते. असे असतांनाही तक्रारदाराने थकीत कर्जाची रक्कम अदा केली नाही व वाहन सामनेवालेकडून ताब्यात घेतले नाही. शेवटी, सामनेवाले यांनी थकीत रकमेची वसुली करण्यासाठी सदर ट्रकची दि.17/08/2009 रोजी विक्री केली. वरील वस्तुस्थिती लक्षात घेता व करारनाम्यातील अटी व शर्तीचा विचार करता सामनेवाले यांनी तक्रारदाराला दोषपूर्ण सेवा दिली असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही.
12. सामनेवाले यांच्यातर्फे असाही युक्तीवाद करण्यात आला की, तक्रारदाराने त्यांच्या व्यवसायासाठी लागणारा ट्रक खरेदी करण्यासाठी सामनेवाले यांच्याकडून अर्थसहाय्य घेतले होते म्हणजेच तक्रारदाराने व्यावसायीक उद्देशासाठी सामनेवाले यांच्याकडून कर्जाच्या स्वरूपात सेवा घेतली अशा परिस्थितीत तक्रारदार हे ग्रा.सं.कायद्यामध्ये नमूद केलेल्या ‘ग्राहक’ या संज्ञेत मोडत नाहीत या कारणास्तव तक्रार फेटाळण्यास पात्र आहे. तसेच, कर्जाची रक्कम परतफेड करण्यामध्ये तक्रारदाराने कसुर केली. याही, कारणास्तव कोणतीही दाद मिळण्यास तक्रारदार पात्र ठरत नाहीत. त्यांनी आपल्या युक्तीवादाच्या पृष्ठर्थ खालील केसेसचा संदर्भ दिला.
1. III (2010) CPJ 33 (SC)
2. I (2011) CPJ 55
3. II (2011) CPJ 128
4. AIR 1994 SC 853
5. AIR 1989 SC 1866 (1871)
6. 2001 (1) CPR 118 (NC)
13. मंचाकडून उपरोक्त न्यायनिवाडयांचे वाचन करण्यात आले.
III (2010)CPJ 33(SC) हया केसमध्ये मा. सर्वोच्च न्यायालयाने नोंदविलेल्या निरीक्षणाचा याठिकाणी संदर्भ देणे उपयुक्त ठरेल. मा. सर्वोच्च न्यायालयाने सदर प्रकरणात पुढील प्रमाणे निरीक्षण नोंदविले आहे.- Maharashtra State
‘The Complainant being himself right from inception of his dealing with the corporation with persistent defaults in discharging his liability to the corporation towards interest despite repeated demands cannot be permitted to plead at a later stage that he suffered on account of deficiency in service by the corporation ………
Fairness cannot be a one way street, Where the borrower has no intention to repay and adopts pretexts and ploys to avoid payments…..he cannot make the grievance that the corporation was not acting fairly, even if requisite procedures are followed’.
14. मा.सर्वोच्च न्यायालयाने नोंदविेलेले निरीक्षण प्रस्तुत प्रकरणात तंतोतंत लागु होते. कारण, प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदाराने सामनेवाले यांच्याकडून घेतेलेल्या कर्जाची परतफेड करण्यास कसुर केली. सामनेवाले यांना तक्रारदाराकडून एकुण 4 हप्त्यांची रककम घेणे बाकी होते अशाप्रकारे तक्रारदार हे स्वतः थकबाकीदार आहेत व त्यामुळे त्यांनी प्रस्तुत तक्रारीत सामनेवालेकडून मागीतलेली दाद मिळण्यास ते पात्र ठरत नाही.
15. तक्रारदार हे ट्रॉन्सफोर्टचा व्यवसाय करतात असे त्यांनीच आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. त्यांनी सामनेवाले यांच्याकडून कर्ज घेऊन सदर व्यवसायासाठी ट्रक खरेदी केला. दुस-या शब्दात सांगायचे झाल्यास तक्रारदाराने सदरचा ट्रक हा व्यवसायामध्ये नफा कमविण्याच्या उद्देशाने खरेदी केला व तो खरेदी करण्यासाठी त्यांनी सामनेवालेकडून कर्जाच्या स्वरूपात सेवा घेतली आहे. हया बाबी विचारात घेता तक्रारदार हे ग्रा.सं.कायदयामध्ये दिलेल्या ‘ग्राहक’ या संज्ञेत मोडत नाही असे मंचाचे मत आहे.
16. सामनेवाले यांनी दोषपूर्ण सेवा दिली हे सिध्द करण्यामध्ये तक्रारदार अपयशी ठरले या कारणावरून तसेच तक्रारदार हे ग्रा.सं. कायदयामधील ‘ग्राहक’ या संज्ञेत मोडत नाहीत या कारणावरून तक्रार फेटाळण्यास पात्र आहे. सामनेवालेकडून कोणतीही दाद मिळण्यास ते पात्र ठरत नाहीत. सबब मुद्द क्र 1 व 2 चा निष्कर्ष नकारार्थी नोंदविण्यात आला असून मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. ग्राहक तक्रार क्रमांक 694/2009 फेटाळण्यात येते.
2. उभयपक्षांनी आपआपला खर्च स्वतः सोसावा.
3 सदर आदेशाची प्रत उभयपक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात यावी.
npk/-