तक्रारदार : वकील श्री. एन. के. दयानंदन
सामनेवाले : मन्नाडीयर अॅण्ड कंपनी
*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- मा. श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*--*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
न्यायनिर्णय
1. प्रस्तुत तक्रारीमध्ये सामनेवाले ही बँकींग व्यवसाय करणारी कंपनी आहे. सामनेवाले यांनी तक्रारदारांना त्यांच्या वापराकरीता क्रेडिटकार्ड दिले होते, व तक्रारदार त्या क्रेडिटकार्डवर व्यवहार करीत असत. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथनाप्रमाणे तक्रारदारांना दिनांक 22/12/2006 रोजीचे देयक दिनांक 28/12/2006 रोजी प्राप्त झाले, व त्या देयकामध्ये विमान तिकिट आरक्षणाबद्दल वेगवेगळया नोंदी होत्या व एकूण रक्कम रुपये 55,100/- तक्रारदारांच्या नांवे टाकण्यात आली होती. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे दूरध्वनीवर तक्रार केली, व त्याची नोंद सामनेवाले यांनी घेतली. त्यानंतर तक्रारदारांनी दिनांक 2/1/2007 रोजी सदरील देयकातील नोंदीबद्दल तक्रार करणारे पत्र सामनेवाले यांचेकडे पाठविले. दुस-या महिन्यात म्हणजेच दिनांक 20/1/2007 रोजीचे देयक सामनेवाले यांचेकडून तक्रारदारांना प्राप्त झाले व त्यामध्ये विमान तिकिट आरक्षणाबद्दलच्या पूर्वीच्या नोंदी कमी करण्यात आल्या होत्या, परंतु आयडीया सेल्युलर कंपनी यांच्या नांवे वेगवेगळया नोंदी करण्यात आल्या होत्या, व तक्रारदारांच्या नांवे रुपये 20,466/- चूकीने दाखविण्यात आले होते. तक्रारदारांनी दिनांक 1/2/2007 रोजी सामनेवाले यांना त्याबद्दल पत्र दिले, व आपला आक्षेप नोंदविला. तक्रारदारांनी त्यांना देय असलेली रक्कम रुपये 4,246/- सामनेवाले यांचेकडे जमा केली, परंतु सामनेवाले यांनी दिनांक 20/1/2007 रोजीच्या देयकामध्ये दाखविलेल्या नोंदीप्रमाणे रुपये 20,900/- जमा करण्याबद्दल तगादा लावला. त्यानंतर तक्रारदारांनी सामनेवाले यांना वकीलामार्फत नोटीस दिली व रकमेची मागणी करण्यात येऊ नये असे सुचविले. सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या पत्रास योग्य प्रतिसाद दिला नसल्याने तक्रारदारांनी सदरची तक्रार दाखल केली व त्यामध्ये सामनेवाले यांनी दिनांक 22/10/2007 रोजीच्या देयकाप्रमाणे म्हणजे शेवटच्या देयकाप्रमाणे रक्कम मागणी करु नये अशी दाद मागितली.
2. सामनेवाले यांनी हजर होऊन आपली कैफीयत दाखल केली, व त्यामध्ये असे कथन केले की, तक्रारदारांच्या क्रेडिटकार्डाच्या वापराप्रमाणे नोंदी घेण्यात आल्या असून आपल्या मागणीचे समर्थन केले. सामनेवाले यांनी मुदतीचा आक्षेप घेतला. विमान सेवेच्या तिकिटाची मागणी रद्द करण्यात आलेली आहे असेही कथन केले.
3. तक्रारदारांनी आपले पुराव्याचे शपथपत्र, दाखल केलेले आहे. तर सामनेवाले यांनी कैफीयतीसोबत पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले आहे. दोन्ही बाजूंनी लेखी युक्तीवाद दाखल केला. दोन्ही बाजूंच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला.
4. प्रस्तुत मंचाने तक्रारदारांची तक्रार, पुराव्याचे शपथपत्र, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद. तसेच सामनेवाले यांची कैफीयत, पुराव्याचे शपथपत्र, कागदपत्रे व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले त्यावरुन तक्रारीच्या न्यायनिर्णयाकामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सामनेवाले यांनी तक्रारदारांना त्यांच्या क्रेडिटकार्डच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. |
2 | तक्रारदार त्याबद्दल दाद मिळणेस पात्र आहेत काय ? | होय. |
3 | अंतीम आदेश? | तक्रार मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
5. तक्रारदारांनी तक्रारीसोबत विलंब माफीचा अर्ज दाखल केला होता, व त्याची नोटीस सामनेवाले यांना देण्यात आली होती. नोटीसची बजावणी होऊन देखील सामनेवाले हजर नसल्याने दिनांक 12/3/2010 रोजी तक्रारदारांचा विलंब माफीचा अर्ज मंजूर करण्यात आला, व तक्रार दाखल करुन घेण्यात आली. त्यानंतर सामनेवाले यांनी तक्रारीत हजर होऊन कैफीयत दाखल केली. याप्रकारची परिस्थिती असतांना देखील सामनेवाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये मुदतीबद्दल आक्षेप नोंदविला आहे, एवढेच नव्हे तर त्या मुद्दयाच्या पुष्टयर्थ्य काही न्यायनिर्णय देखील दाखल केलेले आहेत. तथापि तक्रारदारांचा विलंब माफीचा अर्ज तक्रार दाखल होण्यापूर्वीच मंजूर झाला असल्याने विलंबाचा मुद्दा शिल्लक रहात नाही, व त्या मुद्याची चर्चा करण्याची आवश्यकता नाही.
6. तक्रारदारांनी दिनांक 22/12/2006 रोजीच्या देयकाची प्रत तक्रारीसोबत पृष्ठ क्रमांक 11 येथे दाखल केलेली आहे. त्यामध्ये दिनांक 20/12/2006 रोजी शारजा, चेन्नई इत्यादी ठिकाणच्या विमान प्रवासाबद्दल विमान तिकिटाच्या आरक्षणाबद्दल 5 नोंदी आहेत, व एकूण देय रक्कम रुपये 55,100/- दाखविण्यात आली. तक्रारदारांनी त्या नोंदीबद्दल सामनेवाले यांचेकडे आपला आक्षेप नोंदविला, व दिनांक 2/1/2007 रोजी पत्रही दिले. व त्यामधे विमान तिकिटाच्या आरक्षणाबद्दलच्या पाचही नोंदी चूकीच्या आहेत असे कथन केले. त्याच पत्रामध्ये तक्रारदारांनी असे कथन केले की, त्यांचे क्रेडिट कार्ड नेहमीच त्यांच्या पैशांच्या पाकिटात ठेवलेले असते व क्रेडिट कार्ड इतर दुस-या व्यक्तीस दिले जात नाही.
7. तक्रारदारांनी दिनांक 20/1/2007 रोजीच्या देयकाची प्रत तक्रारीच्या पृष्ठ क्रमांक 14 वर दाखल केलेली आहे. त्या देयकाचे निरिक्षण केले असतांना असे दिसून येते की, त्या देयकामध्ये दिनांक 21/12/2006 रोजीच्या आयडीया मोबाईल कंपनीस प्रत्येकी रुपये 1000/- अदा केल्याबद्दलच्या पाच नोंदी आहेत. तक्रारदारांनी या नोंदीच्या संदर्भात आपला आक्षेप नोंदविला, व त्यानंतर दिनांक 1/2/2007 रोजी पत्र पाठवून आपला आक्षेप नोंदविला. त्या आक्षेपाच्याबद्दल सामनेवाले यांचेकडून कुठलेही उत्तर प्राप्त झाले नसल्याने तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे स्मरणपत्र पाठविले. त्यानंतर सामनेवाले यांनी तक्रारदारांकडे क्रेडिटकार्डच्या मागणीबद्दल दोन पत्रे दिनांक 24/7/2007 व 3/9/2007 पाठविली, व तक्रारदारांनी दिनांक 16/10/2007 रोजी त्या पत्राला उत्तर दिलेले आहे. त्यामध्ये पूर्वीच्या पत्रांचा देखील संदर्भ देण्यात आलेला आहे.
8. तक्रारदारांच्या पत्रव्यवहारामध्ये तसेच तक्रारीमध्ये असे कथन आहे की, त्यांनी वैध देय रक्कम रुपये 4,246/- सामनेवाले यांचेकडे धनादेशाद्वारे जमा केलेली आहे. तक्रारदारांनी दाखल केलेली देयकाची प्रत दिनांक 20/1/2007 पृष्ठ क्रमांक 15 यामध्ये ती नोंद दिसून येते.
9. न्यायनिर्णयाच्या वरील भागात नमूद केल्याप्रमाणे देयक दिनांक 22/12/2006 यामध्ये विमान तिकिट आरक्षणाबद्दल पाच नोंदी होत्या, व तक्रारदारांच्या आक्षेपावरुन देयक दिनांक 20/1/2007 यामध्ये त्या नोंदी कमी करण्यात आल्या. परंतु त्याबद्दल व्याजाची रक्कम पुढील देयकामध्ये तक्रारदारांच्या नांवे टाकण्यात आली. त्यातही दिनांक 20/1/2007 रोजी देयकामध्ये आयडीया मोबाईल कंपनीच्या नांवे 5 नोंदी घेण्यात आल्या त्याबद्दलही तक्रारदारांचा आक्षेप होता. त्या सर्व नोंदी एकाच दिवशी व सलग असल्याने निश्चितच संशयास्पद आहेत.
10. वरील नोंदींच्या संदर्भात सामनेवाले यांनी आपल्या कैफीयतीत असे कथन केले की, तक्रारदारांनी त्यांच्या क्रेडिटकार्ड नोंदीच्या संदर्भात संबंधित पोलीस स्टेशनकडे तक्रार देणे आवश्यक होते. तथापि तक्रारदारांचे क्रेडिट कार्ड चोरीला गेले नसल्याने अथवा गहाळ झाले नसल्याने तक्रारदारांनी पोलीस तक्रार करण्याचा प्रश्नच येत नाही. याउलट सामनेवाले यांनी तक्रारदारांच्या आक्षेपाप्रमाणे संबंधित व्यापा-याकडे अथवा कंपनीकडे क्रेडिटकार्ड वापराच्या संदर्भात चौकशी करणे आवश्यक होते. सामनेवाले यांनी क्रेडिटकार्ड वापराबद्दलच्या नियमाची प्रत यादीसोबत तक्रारीच्या पृष्ठ क्रमांक 70 वर दाखल केलेली आहे. त्या नियमामधील पृष्ठ क्रमांक 93 असे दर्शविते की, संबंधित व्यापा-याकडून अथवा कंपनीकडून प्राप्त झालेली चार्ज स्लिप ही क्रेडिटकार्ड वापरासंबंधी अंतिम पुरावा असेल. प्रस्तुतच्या प्रकरणात तक्रारदारांनी आयडीया सेल्युलर कंपनीच्या नांवे असलेल्या नोंदीबद्दल आक्षेप घेतल्यानंतर सामनेवाले यांनी त्याबद्दल कुठलीही चौकशी केल्याचे दिसून येत नाही. संबंधित कंपनीकडून अहवाल अथवा चार्ज स्लिप प्राप्त करुन घेण्याचा देखील प्रयत्न केल्याचे दिसून येत नाही. तक्रारदारांनी आपल्या लेखी युक्तीवादामध्ये असे स्पष्ट कथन केलेले आहे की, ते आयडीया कंपनीचे ग्राहक नाहीत. वरील परिस्थित सामनेवाले यांनी तक्रारदारांना पाठविलेले देयक दिनांक 20/1/2007 यामधील नोंदीच्या संदर्भात तक्रारदारांचा आक्षेप योग्य होता असा निष्कर्ष काढावा लागतो. त्यातही दिनांक 20/1/2007 च्या देयकामध्ये व्याजाबद्दल रुपये 15,248/- अशी नोंद आहे. तर दिनांक 20/1/2007 त्यातही क्रेडिटकार्डचे देयक दिनांक 20/1/2007 पृष्ठ क्रमांक 15 यामध्ये व्याजाबद्दल रुपये 10,400/- अशी नोंद आहे. यासर्व व्याजाच्या नोंदी वरील येणे बाकी रकमेवर आकारलेल्या व्याजाबद्दलच्या आहेत. सबब तक्रारदारांनी आपल्या तक्रारीमध्ये शेवटचे देयक दिनांक 20/10/2007 यामध्ये नोंद केलेली देय रक्कम रुपये 30,783/- सामनेवाले यांनी मागणी करु नये अशी दाद मागितलेली आहे. सामनेवाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये असे कथन केले की, तक्रारदारांनी त्या देयकाची प्रत दाखल केलेली नाही. परंतु तक्रारीच्या पृष्ठ क्रमांक 22 वर देयक दिनांक 22/10/2007 ची प्रत दाखल केलेली दिसून येते. त्या देयकामध्ये नोंदीचा तपशिल दिलेला नाही. परंतु उघडच आहे की वरील येणे बाकी रकमेच्या संदर्भातच ते देयक आहे, व त्यामध्ये वादग्रस्त रक्कम, तसेच त्यावरील व्याज हे देखील संमीलीत आहे.
11. आदेशाच्या वरील भागात नमूद केल्याप्रमाणे सामनेवाले यांनी वादग्रस्त नोंदीच्या संदर्भात आवश्यक ती चौकशी केली नाही, व संबंधित कंपनीकडून चार्जस्लिप देखील मागितली नाही. कंपनीकडून क्रेडिटकार्डच्या वापराच्या संदर्भात अहवाल देखील मागितला नाही. यावरुन सामनेवाले यांनी तक्रारदारांना क्रेडिटकार्डच्या देयकाच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली असा निष्कर्ष नोंदवावा लागतो. परिणामतः सामनेवाले यांनी तक्रारदारांना देयक दिनांक 20/12/2007 प्रमाणे रकमेची मागणी करु नये असे आदेश सामनेवाले यांना देणे योग्य व न्याय्य राहील असे प्रस्तुत मंचाचे मत आहे.
12. तक्रारदारांनी या व्यतिरिक्त नुकसानभरपाई रुपये 1,00,000/- ची मागणी केलेली आहे. परंतु तक्रारीतील कथने व तक्रारदारांना देण्यात येणारी दाद यांचा विचार करता नुकसानभरपाईबद्दल वेगळा आदेश करण्याची आवश्यकता नाही असे प्रस्तुत मंचाचे मत आहे.
13. वरील चर्चेनुरुन व निष्कर्षानुरुप पुढीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1) तक्रार क्रमांक 948/2009 अंशतः मंजूर करण्यात येते.
2) सामनेवाले यांनी तक्रारदारांना क्रेडिटकार्डच्या देयकाच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसूर केली असे जाहिर करण्यात येते.
3) सामनेवाले यांनी तक्रारदारांना क्रेडिटकार्डचे देयक दिनांक 20/12/2007 याप्रमाणे मागणी करु नये असा आदेश सामनेवाले यांना देण्यात येतो.
4) नुकसानभरपाई व तक्रारीच्या खर्चाबद्दल वेगळा आदेश करण्यात येत नाही.
5) न्यायनिर्णयाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामूल्य पाठविण्यात याव्यात.
ठिकाणः मुंबई.
दिनांकः 20/11/2013
( शां. रा. सानप ) (ज.ल.देशपांडे)
सदस्य अध्यक्ष
एम.एम.टी./-