तक्रारदारातर्फे वकील - श्री. चंद्रे
सामनेवाले क्र. 1 ते 3 एकतर्फा.
सामनेवाले क्र 4 तर्फे वकील - श्री. खान
आदेश - मा. शां. रा. सानप, सदस्य, ः - ठिकाणः बांद्रा
निकालपत्र
(दिनांक 29/09/2015 रोजी घोषित)
1. सामनेवाले यांनी दोषपूर्ण सेवा दिल्याचा आरोप करून तक्रारदारानी प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
3. तक्रारदार हे कामानिमीत्य न्यूझीलंड याठिकाणी राहतात. त्यांनी दि.10/10/2007 रोजी सामनेवाले क्र 2 बँकेमध्ये एनआरआय अकाऊंट उघडले ज्याचा नं. 020301004538 असा आहे. त्याच वेळेस त्यांनी सामनेवाले क्र 2 कडे डिमॅट अकाऊंट देखील उघडले आहे व त्यासाठी लागणा-या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे. त्यांचे डिमॅट अकाऊंट हे 21 दिवसात अॅक्टीव्हेट होईल असे आश्वासन सामनेवाले बँकेने त्यांना दिले. तक्रारदाराने असे कथन केले आहे की, सामनेवाले बँकेनी आश्वासन देउुनही त्यांचे डिमॅट अकाऊंट आजपर्यत अॅक्टीव्हेट झालेले नाही व त्यांना पासवर्ड व युजरआयडी अदयापही प्राप्त झाला नाही. त्यांनी सामनेवाले बँकेला दि.08/11/2007 रोजी व त्यानंतर दि. 23/11/2007 रोजी पत्र पाठवून त्याबाबत विचारणा केली. त्यानंतर सामनेवाले बँकेने त्यांना दि.12/12/2007 रोजी पॅनकार्ड नसल्यामूळे त्यांचा डिमॅट अकाऊंट उघडण्याबाबतचा अर्ज नामंजूर करण्यात आलेला आहे. वास्तविक, तक्रारदाराने डिमॅट अकाऊंट उघडतांना आयकर विभागाने दिलेले पॅनकार्ड संदर्भातील पत्र सादर केले होते जे खाते उघडण्यासाठी पुरेसे असल्याचे सामनेवाले बॅकेच्या अधिका-याने सांगीतले होते. असे असतांनाही सामनेवाले बँकेने त्यांचा डिमॅट अकाऊंट उघडण्याबाबतचा अर्ज नामंजूर केला ही सामनेवाले यांच्या सेवेतील त्रृटी आहे. त्यांनी पुढे असे कथन केले आहे की, दि. 16/03/2008 रोजी पुन्हा सामनेवाले यांच्याकडे पॅनकार्ड, पॅनसर्टिफिकेट व इतर आवश्यक ती कागदपत्रे सादर केली त्यावेळी त्यांच्या डिमॅट अकाऊंट उघडण्याबाबतच्या विनंतीची नोंद घेण्यात आली असे सामनेवाले बॅकेने त्यांना दि. 20/03/2008 रोजी कळविले. त्यानंतर सामनेवाले यांनी त्यांचे डिमॅट अकाऊंट थोडयाच कालावधीमध्ये अॅक्टीव्हेट होर्इल असे कळविले पण आश्चर्यकारकरित्या सामनेवाले यांनी तक्रारदाराला कागदपत्रांच्या पडताळणीसाठी व्यक्तीशः हजर राहावे लागेल असे दि.31/03/2008 रोजी कळविले. त्यानंतर, पॅनकार्ड अभावी त्यांचा अर्ज प्रलंबीत ठेवला असल्याचे सामनेवाले यांनी त्यांना पुन्हा दि.03/04/2008 रोजी ई-मेलद्वारे कळविले.
4. सामनेवाले यांच्याकडून अशी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी भारतीय दुतावासाने प्रमाणीत केलेली पॅनकार्डची प्रत दि.13/04/2008 रोजी बँकेकडे पाठवून व त्यानंतर तक्रारदाराचे डिमॅट अकाऊंट थोडयाच दिवसात अॅक्टीव्हेट होईल असे सामनेवाले बँकेने त्यांना कळविले. तथापी, हे सर्व झाल्यानंतरही त्यांचे डिमॅट अकाऊंट आजपर्यंत अॅक्टीव्हेट करण्यात आले नाही. उलट, अकाऊंट उघडण्यासाठी मूळ कागदपत्रांची आवश्यकता असल्याचे सामनेवाले बॅकेने त्यांना कळविले की, सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात आलेली आहे व सर्व कागदपत्रे व्यवस्थीत आहेत असे सामनेवाले बँकेच्या अधिका-याने तक्रारदाराला कळविले होते. असे असतांनाही सामनेवाले यांनी तक्रारदाराला पुन्हा कागदपत्रे सादर करण्यास सांगीतले व त्या कारणावरून त्यांचे डिमॅट अकाऊंट अदयापही अॅक्टीव्हेट करण्यात आले नाही ही सामनेवाले यांच्या सेवेतील त्रृटी आहे. ज्यामुळे तक्रारदाराला आर्थिक नुकसान सहन करावे लागले. त्यांना डिमॅट अकाऊंट अॅक्टीव्हेट न झाल्यामूळे व्यवहार करता आले नाही व त्यांचे रू.8,50,000/-एवढे आर्थिक नुकसान झाले. सामनेवाले यांना वारंवार विनंती करूनही त्यांनी तक्रारदाराचे डिमॅट खाते अॅक्टीव्हेट केले नाही. म्हणून तक्रारदाराला प्रस्तुतची तक्रार दाखल करावी लागली असे कथन करून सामनेवाले यांनी तक्रारदाराला रू.8,50,000/-,एवढी नुकसान भरपाई दयावी अशी विनंती तक्रारदाराने आपल्या तक्रारीत केली आहे.
5. तक्रार दाखल करून घेतल्यानंतर मंचाने सामनेवाले यांना नोटीस पाठवून लेखीजबाब दाखल करण्याचे निर्देश दिले. नोटीस प्राप्त होऊनही सामनेवाले क्र 1 ते 3 मंचासमक्ष हजर झाले नाहीत. परिणामतः त्यांचेविरूध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात आला.
6. नोटीस, प्राप्त झाल्यानंतर सामनेवाले क्र 4 तर्फे प्रतिनीधी श्रीमती. प्रिती भारद्वाज मंचासमक्ष हजर होऊन सामनेवाले क्र 4 तर्फे कैफियत दाखल केली. सामनेवाले क्र 4 यांनी तक्रारीमधील आरोप फेटाळून लावत असे कथन केले आहे की, प्रस्तुतची तक्रार खोटी असून ती फेटाळण्यास पात्र आहे. सामनेवाले क्र 4 यांनी असे कथन केले आहे की, तक्रारदाराने सामनेवाले यांच्याकडून वाणिज्यीक उद्देशासाठी म्हणजे नफा कमविण्याच्या उद्देशाने सेवा घेतली आहे. त्यामुळे तक्रारदार हे ‘ग्राहक’ या संज्ञेत मोडत नाहीत व हया एकमेव कारणावरून तक्रार फेटाळण्यास पात्र आहे. त्यांनी पुढे असे कथन केले आहे की, तक्रारदाराने त्यांच्या वडिलांना केवळ सामनेवाले क्र 1 ते 3 यांच्याविरूध्द तक्रार दाखल करण्यासाठी मुख्यत्यारपत्र दिले आहे. तक्रारदाराने सामनेवाले क्र 4 विरूध्द तक्रार दाखल करण्यासाठी त्यांच्या वडिलांना मुख्यत्यारपत्र दिले नाही. असे असतांनाही सामनेवाले क्र 4 विरूध्द प्रस्तुतची तक्रार दाखल करण्यात आली आहे जी फेटाळण्यास पात्र आहे. सामनेवाले क्र 4 यांनी असे कथन केले आहे की, ते केवळ सामनेवाले बँकेचे एजंट म्हणून काम करतात त्यामूळे तक्रारदार व सामनेवाले बँक यांच्यामध्ये असलेल्या वादाशी त्यांचा प्रत्यक्षपणे संबध येत नाही. सामनेवाले क्र 4 विरूध्द तक्रार दाखल करण्यास कोणतेही कारण घडले नाही व म्हणून तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती सामनेवाले क्र 4 यांनी केली.
7. तक्रार सिध्द करण्यासाठी तक्रारदाराचे मुख्यत्यार श्री. भाष्कर सोनावणे यांनी पुराव्याचे शपथपत्र व बरीच कागदपत्रे दाखल केली आहेत. ज्यामध्ये बहूतांशी उभयतांमध्ये झालेल्या पत्रव्यवहारांचा समावेश आहे. वर नमूद केल्याप्रमाणे सामनेवाले क्र 1 ते 3 हे नोटीस प्राप्त होऊनही मंचासमक्ष हजर न झाल्यामूळे त्यांचेविरूध्द तक्रारीची एकतर्फा सुनावणी घेण्याचा आदेश पारीत करण्यात आला. सामनेवाले क्र 4 यांच्यातर्फे मात्र पुराव्याचे शपथपत्र व काही कागदपत्र दाखल करण्यात आली. तक्रारदार व सामनेवाले क्र 4 यांनी आपआपला लेखीयुक्तीवाद दाखल केला. मंचाकडून यासर्वांचे अवलोकन करण्यात आले. तसेच, तक्रारदार व सामनेवाले क्र 4 यांच्या विधिज्ञांचा तोंडीयुक्तीवाद ऐकण्यात आला.
8. तक्रारदारांची तक्रार, सामनेवाले यांचा लेखीजबाब उभयपक्षांचा लेखीयुक्तीवाद लक्षात घेता प्रस्तुत तक्रारीच्या निवारणार्थ पुढील मुद्दे उपस्थित होतात. मंचाने, त्यावर आपला निष्कर्श खालीलप्रमाणे नोंदविला आहे.
मुद्दे | निष्कर्ष |
1. सामनेवाले यांनी दोषपूर्ण सेवा दिली हे तक्रारदाराने सिध्द केले आहे काय ? | नकारार्थी |
2. मागीतलेली दाद मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत काय ? | नकारार्थी |
3. काय आदेश ? | अंतिम आदेशाप्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्रमांक 1 व 2
9. सामनेवाले क्र 1 आयसीआयसी बँक असून सामनेवाले क्र 2 ही सदर बँकेची कल्याण (प.), येथील शाखा आहे. तक्रारदाराने सामनेवाले क्र 2 बँकेमध्ये दि.10/10/2007 रोजी एनआरआय अकाऊंट उघडले असे तक्रारदाराने पुराव्यात कथन केले आहे व त्याच्या पृष्ठर्थ कागदपत्रे अभिलेखावर दाखल केली आहेत. तक्रारदाराने असे कथन केले आहे की, एनआरआय अकाऊंट उघडतांनाच त्यांनी सामनेवाले क्र 2 बॅकेकडे डिमॅट अकाऊंट देखील उघडले आहेत व त्यासाठी सर्व कागदपत्राची पूर्तता केली आहे. तक्रारदाराने पुराव्यात कथन करून हे सिध्द करण्याचा प्रयत्न केला आहे की, त्यांनी आवश्यक ती कागदपत्रे जसे- पॅनकार्ड, पॅनसर्टिफिकेट व इतर कागदपत्रे सामनेवाले क्र 2 यांना सादर करूनही त्यांनी तक्रारदाराचे डिमॅट अकाऊंट अदयापही अॅक्टीव्हेट केले नाही. उभयपक्षांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन केल्यानंतर असे निदर्शनास येते की, डिमॅट अकाऊंट उघडण्याकरीता संबधीत अर्जदाराने पॅनकार्ड सादर करणे आवश्यक असते. तथापी, तक्रारदाराच्या तक्रारीमधील कथनानवरूनच हे स्पष्ट होते की, त्यांनी सामनेवाले क्र 2 बँकेकडे त्यांचे मूळ पॅनकार्ड पडताळणीसाठी सादर केले नाही. त्यांनी केवळ पॅनकार्डच्या प्रमाणीत प्रतीच सामनेवाले बँकेकडे सादर केल्या. सामनेवाले बँकेने तक्रारदाराला मूळ कागदपत्रे सादर करण्याबाबत सांगुनही त्यांनी ती सादर केली नसल्याचे सामनेवाले यांनी तक्रारदाराला केलेल्या पत्रव्यवहारावरून दिसून येते. अशाप्रकारे, तक्रारदाराने डिमॅट अकाऊंट उघडण्यासाठी लागणा-या सर्व कागदपत्राची पूर्तता केली हे तक्रारदाराचे कथन मान्य करणे शक्य नाही. तक्रारदारानेच आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे त्यांचे डिमॅट अकाऊंट अॅक्टीव्हेट करण्यात आले नाही व त्यासाठी तक्रारदार हे स्वतः जबाबदार आहेत. सामनेवाले यांनी दोषपूर्ण सेवा दिली असे म्हणता येणार नाही.
10. सामनेवाले क्र 4 यांच्या विधिज्ञांनी तक्रारीच्या गुण-दोषा व्यतिरीक्त काही कायदेशीर मुद्दंयाचा संदर्भात काही युक्तीवाद केला. त्यांनी असा युक्तीवाद केला की, तक्रारदाराने नफा कमविण्याच्या उद्देशाने तसेच वाणिज्यीक उद्देशासाठी सामनेवाले यांच्याकडे डिमॅट अकाऊंट उघडून सेवा घेतली आहे. त्यामुळे तक्रारदार हे ‘ग्राहक’ या संज्ञेत मोडत नाही व हया एकमेव कारणावरून तक्रार फेटाळण्यास पात्र आहे. आपल्या युक्तीवादाच्या पृष्ठर्थ त्यांनी मा. राष्ट्र्रीय आयोग नवी दिल्ली यांनी मूळ पिटीशन नं. 158/1999 (में. एनएलपी ऑरगॅनीक्स प्रा.लि. विरूध्द चेअरमन कम मॅनेजींग डॉयरेक्टर व इतर) मध्ये दि.14/07/2014 रोजी दिलेल्या न्यायनिवाडयाचा संदर्भ दिला. मंचाकडून त्याचे वाचन करण्यात आले. त्यामध्ये मा.राष्ट्रीय आयोगाने पुढीलप्रमाणे निरीक्षण नोंदविले आहे.
It is thus clear that since the complainant is transacting business, therefore, he cannot be said to be a ‘Consumer’ The complaint is liable to be dismissed on this score.
11. प्रस्तुत प्रकरणात तक्रारदाराने डिमॅट खाते उघडण्याच्या संदर्भात सामनेवाले विरूध्द तक्रार दाखल केली आहे. तक्रारदाराने सामनेवाले क्र 2 बँकेकडे डिमॅट खाते उघडले आहे. जे तक्रारदाराच्या म्हणण्यानूसार आजपर्यत अॅक्टीव्हेट करण्यात आले नाही. डिमॅट अकाऊंट उघडून त्याद्वारे शेअर्सच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार केले जातात व त्यामार्फत नफा कमविला जातो हे वेगळे सांगायचे गरज नाही. तक्रारदाराने, सामनेवाले क्र 2 बॅकेकडे शेअर्सच्या खरेदी विक्रीचे व्यवहार करून त्यामधून नफा कमविता यावा या उद्देशाने डिमॅट अकाऊंट उघडले आहे. थोडक्यात, तक्रारदाराने वाणिज्यीक उद्देशासाठी सामनेवाले क्र 2 बँकेकडे डिमॅट अकाऊंट उघडून त्यांची सेवा घेतली आहे. तक्रारदाराने स्वयंमरोजगार म्हणून व स्वतःच्या चरितार्थासाठी डिमॅट अकाऊंट उघडले असे कथन तक्रारीमध्ये कुठेही केलेले नाही. अशा परिस्थितीत तक्रारदार हे ग्रा.सं.कायदयातील कलम 2(ड), मध्ये दिलेल्या ‘ग्राहक’ या संज्ञेत मोडत नाहीत व याही कारणास्तव प्रस्तुतची तक्रार फेटाळण्यास पात्र आहे.
12. उपलब्ध पुरावा व कागदपत्रे विचारात घेतल्यानंतर, तक्रारदार हे ‘ग्राहक’ या संज्ञेत मोडत नाहीत तसेच सामनेवाले यांनी दोषपूर्ण सेवा दिली हे तक्रारदार सिध्द करू शकले नाहीत या कारणास्तव तक्रार फेटाळण्यास पात्र आहे. सामनेवाले यांच्याकडून मागीतलेली दाद मिळण्यास तक्रारदार पात्र ठरत नाही. सबब, मुद्दा क्र 1 व 2 चा निष्कर्श नकारार्थी नोंदविण्यात आला असून मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. ग्राहक तक्रार क्रमांक 486/2009 फेटाळण्यात येते
2. उभयपक्षकारांनी आपआपला खर्च स्वतः सोसावा.
9. सदर आदेशाची प्रत उभयपक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात यावी.
npk/-