तक्रारदार - स्वतः
सामनेवाले व त्यांचे वकील - श्री.मनाडीयार
आदेश - मा. श्री. ए. झेड. तेलगोटे, अध्यक्ष. ठिकाणः बांद्रा
निकालपत्र
(दिनांक 02/06/2015 रोजी घोषित)
1. सामनेवाले यांनी दोषपूर्ण सेवा दिल्याचा आरोप करून तक्रारदार गृहनिर्माण संस्थेने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रार थेाडक्यात खालीलप्रमाणे आहे.
3. तक्रारदार क्र 1 व 2 पती पत्नी असून ते जेष्ठ नागरीक आहेत. अमेरीका भेटीदरम्यान खरेदी करणे सुलभ व्हावे या उद्देशाने त्यांनी सामनेवाले बँकेचे तिचे एजंट मेसर्स जुआरी फोरेक्स लि. यांचेकडून ऑगस्ट 2009 मध्ये डेबीट कार्डस खरेदी केले. तक्रारदारांची तक्रार अशी आहे की, त्यांची संमती नसतांना सामनेवाले बँकेने त्यांच्या डेबीट कार्डवर अनधिकृत व्यवहार करून वेळावेळी रकमा काढल्या. त्यांनी त्याबाबत सामनेवाले बँककडे विचारणा केली असता त्यांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. व शेवटी त्यांनी सामनेवाले यांचेशी बराच पत्रव्यवहार केल्यानंतर तसेच टेलीफोन व ईमेलद्वारे संपर्क साधल्यानंतर सामनेवाले बँकेने त्यांना त्यांची रक्कम परत केली. तक्रारदारांनी असे कथन केले आहे की, सामनेवाले यांनी त्यांना दोषपूर्ण सेवा दिल्यामुळे त्यांना अमेरीका भेटीदरम्यान खरेदी करणे गैरसोयीचे झाले, त्यांचे आर्थीक नुकसान झाले व प्रचंड मनस्ताप झाला व त्यामुळे त्यांनी व्याजासह नुकसान भरपाई मिळावी यासाठी सामनेवाले बँकेकडे अर्ज केला. तथापि, सामनेवालेकडून त्यांना अत्यल्प नुकसान भरपाई देण्यात आली. त्यामुळे, त्यांना नाईलाजाने प्रस्तुतची तक्रार दाखल करणे भाग पडले. असे कथन करून सामनेवाले यांचेकडून रू.11,25,340.25/-एवढी नुकसान भरपाई 18 टक्के व्याजासह मिळावी. तसेच, तक्रारीचा खर्च मिळावा अशी विनंती तक्रारदारांनी आपल्या तक्रारीत केली.
4. तक्रार दाखल झाल्यानंतर मंचाने सामनेवाले यांना नोटीस पाठवून आपला लेखीजबाब दाखल करण्याचे निर्देश दिले. नोटीस प्राप्त झाल्यानंतर सामनेवाले यांनी मंचासमक्ष हजर होऊन आपला लेखीजबाब दाखल केला. तक्रारीत केलेले आरोप सामनेवाले यांनी फेटाळून लावत असे कथन केले आहे की, तक्रारदारांनी मेसर्स. जुआरी फोरेक्स लि. कडून डेबीट कार्डस खरेदी केले. व, सदर जुआरी फोरेक्स लि. हिच त्यांचे डेबीट कार्डसची ऑपरेटर होती व त्यांनीच तक्रारदारांच्या डेबीट कार्डवर अनधिकृत व्यवहार केल्याचे दिसते. सामनेवाले, बँकेचा सदर व्यवहारांशी काहीही संबध नाही. अशा परिस्थितीत तक्रारदारांनी मेसर्स. जुआरी फोरेक्स लि. या कंपनीला आवश्यक पक्षकार म्हणून तक्रारीत सामील करणे जरूरीचे होते. तथापी, तक्रारदारांनी तसे केले नाही. व या एकमेव कारणावरून तक्रार खारीज होण्यास पात्र आहे.
5. सामनेवाले यांनी असे कथन केले आहे की, त्यांनी तक्रारदारांच्या डेबीट कार्डवर कोणतेही अनधिकृत व्यवहार केले नसतांनाही केवळ सामनेवाले बँकेची प्रतिमा स्वच्छ राहावी या उद्देशाने तक्रारदारांच्या डेबीट कार्डमधून काढलेल्या रकमा पुन्हा त्यांच्या डेबीट कार्डखात्यात लोड केल्या. इतकेच, नव्हेतर त्यांनी तक्रारदाराला द.सा.द.शे. 8 टक्के व्याजासह नुकसान भरपाई सुध्दा दिली. असे असतांनाही तक्रारदारांनी खोटे आरोप करून सामनेवाले बँकेकडून ज्यादा रक्कम/वाढीव नुकसान भरपाई उकळण्याच्या उद्देशाने प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. सामनेवाले, यांनी तक्रारदारांना कोणतीही दोषपूर्ण सेवा दिली नाही. तक्रारदारांनी दाखल केलेली तक्रार खोटी आहे व या सर्व कारणास्तव ती फेटाळण्यात यावी अशी विनंती सामनेवाले यांनी केली आहे.
6. तक्रारदारांनी आपली तक्रार सिध्द करण्यासाठी पुराव्याचे शपथपत्र व काही कागदपत्र दाखल केली. तसेच, सामनेवाले यांचेतर्फे देखील पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्रे सादर करण्यात आली. याव्यतिरीक्त उभयपक्षांनी आपला लेखीयुक्तीवाद दाखल केला. मंचाने, या सर्वांचे अवलोकन केले तसेच उभयपक्षांचा तोंडीयुक्तीवाद ऐकला.
7. तक्रारदारांची तक्रार सामनेवाले यांचा लेखीजबाब उपलब्ध कागदपत्रे व उभयपक्षांतर्फे उपस्थित करण्यात आलेले मुद्दे विचारात घेता प्रस्तुत तक्रारीच्या निवारणार्थ मंचाने खालील मुद्दंयाचा विचार केला व त्यावर पुढीलप्रमाणे आपला निष्कर्ष नोंदविला.
मुद्दे | निष्कर्ष |
1. सामनेवाले यांनी दोषपूर्ण सेवा दिली हे तक्रारदाराने सिध्द केले आहे काय? | होकारार्थी |
2. मागीतलेली दाद मिळण्यास तक्रारदार पात्र आहेत काय? | अंशतः होकारार्थी |
3. काय आदेश? | अंतिम आदेशाप्रमाणे |
कारणमिमांसा
मुद्दा क्रमांक 1 व 2
8. तक्रारदारांनी सामनेवाले बँकेकडून ऑगस्ट 2009 मध्ये डेबीट कार्डस खरेदी केले हे सामनेवाले यांनी स्वतः मान्य केले आहे. तसेच, तक्रारदारांच्या डेबीट कार्डसवर काही अनधिकृत व्यवहार झाल्याचे देखील सामनेवाले यांनी मान्य केल्याचे त्यांच्या लेखीजबाबावरून दिसून येते. मात्र, त्यांच्या म्हणण्यानूसार सदरचे व्यवहार त्यांचे एजंट असलेली मेसर्स. जुआरी फोरेक्स लि. यांच्याकडून करण्यात आले. व त्यामुळे सामनेवाले बँकेला सदर व्यवहारासाठी जबाबदार धरता येणार नाही. तक्रारीमधील कथनांचा विचार करण्यापूर्वी सामनेवाले यांच्यातर्फे उपस्थित करण्यात आलेल्या काही कायदेशीर मुद्दयांचा विचार करणे आवश्यक आहे.
9. सामनेवाले यांचेतर्फे असा युक्तीवाद करण्यात आला की, तक्रारदारांनी सामनेवाले बँकेचे डेबीट कार्डस सामनेवाले बँकेचे एजंट असलेल्या मेसर्स. जुआरी फोरेक्स लि. कडून खरेदी केले. व त्यामुळे सदर कंपनीला तक्रारीत पक्षकार म्हणून सामील करणे आवश्यक होते. मात्र, तक्रारदारांनी सदर कंपनीला तक्रारीत सामील न केल्यामुळे प्रस्तुतची तक्रार फेटाळण्यास पात्र आहे. सामनेवाले यांचेतर्फे करण्यात आलेल्या युक्तीवादामध्ये काही तथ्य आढळून येत नाही. कारण, तक्रारदारांनी जरी मेसर्स. जुआरी फोरेक्स लि. कडून डेबीट कार्डस खरेदी केले असले तरी सदर कंपनी ही सामनेवाले बँकेची एजंट आहे. व एजंटनी केलेल्या व्यवहारास मालक जबाबदार ठरतात. या न्यायाने मेसर्स. जुआरी फोरेक्स लि. यांनी केलेल्या व्यवहारासाठी सामनेवाले बँक जबाबदार ठरते. शिवाय, कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे स्पष्टपणे दिसून येते की, मेसर्स. जुआरी फोरेक्स लि. ने तक्रारदारांच्या डेबीट कार्डसवर केलेल्या अनधिकृत व्यवहारांची जबाबदारी स्विकारून सामनेवाले बँकेने त्यांना रक्कम परत केली. तसेच, नुकसान भरपाई देखील दिली. दुस-या शब्दात सांगावयाचे झाले तर तक्रारदारांच्या डेबीट कार्डसवर झालेल्या अनधिकृत व्यवहारांची संपूर्ण जबाबदारी सामनेवाले बँकेने स्विकारली. अशा परिस्थितीत मेसर्स. जुआरी फोरेक्स लि. या कंपनीला तक्रारीमध्ये पक्षकार म्हणून सामील करण्याची आवश्यकता नाही असे मंचाचे मत आहे.
10. तक्रारदारांनी त्यांच्या डेबीट कार्डसचे तसेच डेबीट कार्डस खात्याचे उतारे व इतर कागदपत्रे अभिलेखावर दाखल केली. त्यावरून असे सिध्द होते की, तक्रारदारानी सामनेवाले बँकेचे तिच्या वर नमूद केलेल्या एजंटामार्फत डेबीट कार्डस खरेदी केले. त्यानंतर, सदर कार्डसवर वेळोवेळी व्यवहार करण्यात आले. तक्रारदारांनी आपल्या पुराव्यात असे प्रतिपादन केले की, सामनेवाले बँकेकडून त्यांच्या डेबीट कार्डसवर त्यांच्या संमतीविना अनधिकृत व्यवहार करण्यात आले. व, त्यांच्या कार्डवरून रकमा काढण्यात आल्या. याठिकाणी हे नमूद करणे महत्वाचे आहे की, तक्रारदारांच्या डेबीट कार्डसवर अनधिकृत व्यवहार झाल्याचे सामनेवाले बँकेने देखील मान्य केले आहे. मात्र, सामनेवाले यांचे म्हणण्यानूसार सदरचे व्यवहार मेसर्स. जुआरी फोरेक्स लि. कडून करण्यात आले. असे असले तरी सामनेवाले बँकेने सदर व्यवहारांची जबाबदारी स्विकारून तक्रारदारांना त्यांच्या रकमा परत केल्या. तसेच, नुकसान भरपाई देखील दिली. या सर्व बाबींवरून हेच सिध्द होते की, सामनेवाले यांनी तक्रारदारांना दोषपूर्ण सेवा दिली ज्यामुळे त्यांना मनस्ताप होणे साहजिकच आहे. तक्रारदारांनी, सामनेवाले बँकेकडून त्यांच्या अमेरीका भेटीदरम्यान खरेदी करणे सुलभ व्हावे या उद्देशाने डेबीट कार्डस खरेदी केले होते. मात्र, त्या दरम्यान सदर कार्डसवर अनधिकृत व्यवहार झाल्यामुळे तक्रारदारांना अमेरीका भेटी दरम्यान इच्छुक खरेदी करणे गैरसोयीचे झाले. व त्यासाठी सामनेवाले हे जबाबदार आहेत. सामनेवाले बँकेने तक्रारदारांच्या रकमा परत केल्या व अल्पशी नुकसान भरपाई दिली असली तरी तक्रारदारांना झालेल्या मनस्तापाबद्दल व गैरसोयीबद्दल सामनेवाले बँकेकडून त्यांना योग्य प्रमाणात नुकसान भरपाई मिळणे आवश्यक आहे. तक्रारदारांना किती नुकसान भरपाई दिली हे सामनेवाले बॅकेने कुठेही स्पष्ट केले नाही. हे याठिकाणी नमूद करणे महत्वाचे आहे. सामनेवाले, यांनी वर उल्लेख केल्याप्रमाणे तक्रारदारांना दोषपूर्ण सेवा दिल्यामुळे तक्रारदार हे सामनेवाले यांचेकडून योग्य प्रमाणात नुकसान भरपार्इ मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. सबब, मुद्दा क्रमांक 1 चा निष्कर्ष होकारार्थी व 2 चा अंशतः होकारार्थी नोंदविण्यात आला असून मंच पुढीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार क्रमांक 349/2011 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदाराला दोषपूर्ण सेवा दिली असे मंच जाहीर करीत आहे.
3. सामनेवाले यांनी तक्रारदारांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल व गैरसोयीबद्दल नुकसान भरपाई म्हणून प्रत्येकी रू.1,00,000/-,(एकुण रू.2,00,000/-)अदा करावे तसेच तक्रारीच्या खर्चापोटी प्रत्येकी रू. 10,000/-(एकुण रू. 20,000/-) दयावेत सामनेवाले यांनी वरील आदेशाचे पालन आदेशाचे दिनांकापासून 30 दिवसाच्या आत करावे.
4. सदर आदेशाची प्रत उभयपक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात यावी.
ठिकाणः बांद्रा (पू) मुंबई.
दिनांकः 02/06/2015.
npk/-