तक्रारदार : स्वतः हजर.
सामनेवाले : एकतर्फा.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सा.वाले ही बँकिंगचा व्यवसाय करणारी कंपनी आहे. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे तक्रारदारांचे सा.वाले यांचेकडे बचत खाते मागील 10 वर्षापासून होते. व सा.वाले यांनी तक्रारदारांना क्रेडीट कार्ड ज्याचे शेवटचे चार अंक 5004 असे होते असे तक्रारदारांना त्यांचे वापराकामी दिले होते. तक्रारदार हे त्यांच्या क्रेडीट कार्डचा वापर करीत असत व क्रेडीट कार्डमध्ये देय रक्कम देयकाप्रमाणे सा.वाले यांना नियमीतपणे अदा करीत असत.
2. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे सप्टेंबर,2009 मध्ये सा.वाले यांनी तक्रारदारांना रु.62,066.66 रक्कम देय असल्या बद्दलचे देयक पाठविले. त्यामधील नमुद केलेला व्यवहार तक्रारदारांनी कधीही केलेला नव्हता. तसेच त्या देयकामधील व्यवहार हा इंटरनेट वरील काही संकेत स्थळाचे संबंधात होता. ज्यामध्ये त्या संकेत स्थळाचा वापर मोफत केला जाऊ शकतो. तक्रारदारांनी हया सर्व बाबी नमुद करुन सा.वाले यांचेकडे तक्रार नोंदविली. तथापी सा.वाले यांनी त्यास उत्तर दिले नाही. त्यानंतर ऑक्टोबर,2009 मध्ये तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून दुसरे देयक प्राप्त झाले. त्यामध्ये देय रक्कम रु.22,164.98 नमुद करण्यात आले होते. त्या देयकामध्ये असी नोंद होती की, ज्या वरुन पुर्वीच्या देय रक्कमेची नोंद सा.वाले यांनी रद्द केलेली होती. परंतु ऑक्टोबर,2009 च्या देयकामध्ये सा.वाले याचे कडून तक्रारदारांना 1200 पौंड येणे रक्कम आहे अशी नोंद आहे. ती रक्कम सा.वाले यांनी तक्रारदारांच्या बचत खात्यामध्ये जमा करणे आवश्यक होते. परंतु सा.वाले यांनी ती जमा केलेली नसल्याने तक्रारदारांचे नुकसान झाले.तक्रारदारांनी दिनांक 25.11.2009 रोजी सा.वाले यांचेकडे ई-मेल संदेश पाठविला परंतु सा.वाले यांनी काही कार्यवाही केली नाही. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले यांना वेळोवेळी बरीच स्मरणपत्रे पाठविली, परंतु सा.वाले यांनी ते देयक दुरुस्त करुन दिले नाही. तसेच 1200 पौंड तक्रारदारांच्या बचत खात्यामध्ये जमा केले नाहीत. तक्रारदारांनी त्यानंतर सा.वाले यांना एप्रिल,2011 मध्ये कायदेशीर नोटीस बजावली व क्रेडीट कार्डाचे संदर्भातील नोंदी रद्द करण्यात याव्यात अशी सूचना केली. सा.वाले यांनी त्या प्रमाणे कार्यवाही केलेली नसल्याने तक्रारदारांनी दिनांक 20.7.2011 रोजी प्रस्तुतची तक्रार दाखल केली. व त्यामध्ये सा.वाले यांनी तक्रारदारांना क्रेडीट कार्डचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर होऊन मिळावे व तक्रारदारांच्या देय रक्कमांचे संदर्भात क्रेडीट कार्डच्या खात्यातील नोंदी दुरुस्ती करण्यात याव्यात व सा.वाले यांनी तक्रारदारांच्या बचत खात्यामध्ये 1200 पौंड रक्कम जमा करावी. या व्यतिरिक्त सा.वाले यांनी तक्रारदारांना रु.5 लाख नुकसान भरपाई बद्दल अदा करावेत अशी दाद मागीतली.
3. तक्रारीमध्ये हजर होऊन कैफीयत दाखल करावी अशी नोटीस सा.वाले यांना मंचातर्फे पाठविण्यात आली होती. ती नोटीस मिळाल्याबद्दलची पोच पावती प्रस्तुत मंचाकडे पाप्त झाली. तरी देखील सा.वाले यांनी हजर होऊन आपली कैफीयत दाखल केलेली नाही. त्यानंतर सा.वाले यांचे वतीने इंडीया लॉ ऑफीसेस ही लॉ फर्म हजर झाली. परंतु त्या पूर्वीच सा.वाले यांचे विरुध्द दिनांक 8.11.2011 रोजी एकतर्फा आदेश करण्यात आला होता. त्या बद्दल तक्रारदारांनी दिनांक 8.11.2011 रोजी शपथपत्र दाखल केले होते. त्यानंतर सा.वाले यांनी एकतर्फा आदेश रद्द होणेकामी अथवा कैफीयत दाखल करणेकामी कुठलीही कार्यवाही केलेली नाही. या प्रकारे प्रकरणात सा.वाले यांचे विरुध्द एकतर्फा सुनावणी घेण्यात आली.
4. तक्रारदारांनी आपले पुराव्याचे शपथपत्र व त्या सोबत कागदपत्रे दाखल केली. तक्रारदारांनी आपला लेखी युक्तीवाद दाखल केला.
5. प्रस्तुत मंचाने तक्रार, तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्र, व तक्रारी सोबतची कागदपत्रे, इत्यादिंचे वाचन केले. तक्रारदारांचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले वाले यांनी तक्रारदारांना क्रेडीट कार्डच्या व्यवहाराचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. |
2 | तक्रारदार हे सा.वाले यांचेकडून 1200 पौंड येवढी रक्कम वसुल करण्यास पात्र आहेत काय ? | नाही. |
3 | तक्रारदार हे सा.वाले यांचेकडून तक्रारीचा खर्च व नुकसान भरपाई वसुल करण्यास पात्र आहेत काय ? | होय- रु.25,000/- |
4 | अंतीम आदेश | तक्रार अशतः मंजूर |
कारण मिमांसा
6. तक्रारदारांनी तक्रारीसोबत निशाणी 3 येथे कागदपत्राची यादी दाखल केलेली आहे. व त्या सोबत तक्रारीच्या पृष्टयर्थ काही कागदपत्रे दाखल केलेली आहेत. सा.वाले यांचेकडून तक्रारदारांना सप्टेंबर,2009 मध्ये जे क्रेडीट कार्डचे संबंधात देयक पाठविले होते
त्याची प्रत तक्रारदारांनी तक्रारीसोबत दाखल केलेली आहे. त्यामध्ये जोटेल डॉट कॉम या संकेत स्थळाचे वापराकामी रु.29,961/- देय असल्या बद्दलच्या दोन नोंदी आहेत. तक्रारदारांना ऑक्टोबर,2009 मध्ये सा.वाले यांचेकडून जे देयक प्राप्त झाले होते, त्याची प्रत दाखल केलेली आहे. त्यामधील नोंदी असे दर्शवितात की, सा.वाले यांनी रु.29,961/-ची नोंद रद्द करण्यात आली होती. परंतु एकूण देय रक्कम रु.22,164/- दाखविली होती. तक्रारदारांनी त्यानंतर सा.वाले यांना दिनांक 25.11.2009 रोजी ई-मेल संदेश पाठविला व क्रेडीट कार्डचे खाते बंद करण्याची सूचना केली. सा.वाले यांनी त्या ई-मेल संदेशाप्रमाणे कार्यवाही करण्याचे ऐवजी तक्रारदारांचे क्रेडीटकार्ड खाते चालुच ठेवले. हया सर्व बाबीचा तपशिल तक्रारदारांनी सा.वाले यांना वेळोवेळी ई-मेल संदेशाव्दारे पाठविला व जी नोटीस पाठविली त्यामध्ये करण्यात आलेला आहे.
7. सा.वाले यांनी तक्रारदारांना दिनांक 10.3.2011 रोजी एक पत्र पाठविले व त्यामध्ये क्रेडीट कार्डच्या देयकाप्रमाणे रक्कम देय असल्या बद्दलचे कथन केले. तक्रारदारांनी सा.वाले यांना दिनांक 25.11.2009 रोजी क्रेडीटकार्ड खाते बंद करण्याबद्दल सूचना देऊनही सा.वाले यांनी क्रेडीट कार्ड खाते बंद करण्या ऐवजी ते चालुच ठेवले असे दिसून येते. सा.वाले यांनी तक्रारदारांना दिनांक 10.3.2011 रोजी जे पत्र पाठविले त्यामध्ये केवळ 2009 येवढेच नव्हेतर वर्ष 2010 मधील व्यवहार नोंदीचा उल्लेख आहे. सा.वाले यांनी तक्रारदारांच्या दिनांक 25.11.2009 च्या ई-मेल संदेशाप्रमाणे तक्रारदारांचे क्रेडीट कार्ड खाते बंद केले असते तर इतर व्यवहार क्रेडीट कार्ड खात्यामध्ये करण्याचा प्रश्नच निर्माण झाला नसता. तक्रारदारांनी सूचना देऊनही सा.वाले यांनी तक्रारदारांचे खाते बंद करण्याचे ऐवजी ते का चालु ठेवले याचा अर्थबोध सा.वाले यांचे पत्र दिनांक 10.3.2011 मधून होत नाही. सा.वाले यांचेकडून दिनांक 10.3.2011 रोजीचे पत्र प्राप्त झाल्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले यांना दिनांक 26.4.2011 रोजी एक पत्र पाठविले. त्याची प्रत तक्रारदारांनी दाखल केलेली आहे. त्या पत्रास सा.वाले यांनी दिनांक 2.5.2011 रोजी उत्तर दिले त्याची प्रत देखील तक्रारदारांनी दाखल केलेली आहे. महत्वाची बाब म्हणजे सा.वाले यांचे पत्र दिनांक 10.3.2011 व दिनांक 2.5.2011 या दोन्ही पत्रातील मजकूर शब्दशः सारखाच आहे. वस्तुतः सा.वाले यांनी तक्रारदारांचे पत्र दिनांक 26.4.2011 च्या पत्राची नोंद घेऊन तक्रारदारांना सविस्तर उत्तर देणे आवश्यक होते. परंतु सा.वाले यांनी त्या प्रकारची कुठलीही कार्यवाही केलेली नाही.
8. त्यातही महत्वाची बाब म्हणजे सा.वाले यांनी तक्रारीमध्ये हजर होऊन आपली कैफीयत दाखल केलेली नाही. तसेच तक्रारदारांचे पुराव्याचे शपथपत्रास शपथपत्राव्दारे उत्तर दिले नाही. या प्रकारे तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने क्रेडीट कार्ड देयकाचे संदर्भात अबाधित रहातात. वर चर्चा केल्याप्रमाणे तक्रारदारांना सा.वाले यांनी क्रेडीट कार्ड खात्याचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे दिसून येते.
9. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून 1200 पौंड तक्रारदारांच्या बचत खात्यामध्ये जमा करावी या स्वरुपाची दाद मागीतली आहे. तक्रारदारांनी तक्रारीसोबत सप्टेंबर,2009 व ऑक्टोबर,2009 अशी दोन देयके दाखल केलेली आहेत. त्यातील नोंदीची अवलोकन केले असतांना असे दिसून येते की, सप्टेंबर,2009 च्या देयकामध्ये जोटेल डॉट कॉम या संकेत स्थळाचे वापराचे संदर्भात दाखविण्यात आलेले रु.29,961/- हया देय नोंदी सा.वाले यांनी पाठविलेल्या देयकामध्ये म्हणजे ऑक्टोबर,2009 च्या देयकामध्ये रद्द केलेल्या आहेत. तरी देखील तक्रारदार हे सा.वाले यांचेकडून 1200 पौंड रक्कम वसुल करु पहात आहेत. त्यातही महत्वाची बाब म्हणजे तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून 1200 पौंड रक्कम कशा प्रकारे येणे बाकी आहे याचा खुलासा केलेला नाही. व पुराव्याचे शपथपत्रामध्ये त्या बद्दल समर्थन नाही. त्यावरुन तक्रारदार हे 1200 पौंड येवढी रक्कम वसुलीचे संदर्भात दाद मिळण्यास पात्र नाहीत. तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून रु.5 लाख नुकसान भरपाई मागीतली आहे. सा.वाले यांनी तक्रारदारांचे क्रेडीट कार्डचे नोंदीचे संदर्भात योग्य तो खुलासा केलेला नसल्याने व तक्रारदारांना समाधानकारक उत्तर दिलेले नसल्याने तक्रारदारांना बराच पत्र व्यवहार करावा लागला. व दरम्यान त्यांना मनस्ताप सोसावा लागला. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले यांचे विरुध्द प्रस्तुत मंचाकडे तक्रार दाखल करावी लागली. त्यावरुन तक्रारदार हे सा.वाले यांचेकडून रु.25,000/- तक्रारीचा खर्च व नुकसान भरपाई असे एकत्रित वसुल करण्यास पात्र आहेत असा आदेश देणे योग्य राहील असे प्रस्तुत मंचाचे मत झाले आहे. त्या व्यतिरिक्त सा.वाले यांनी तक्रारदारांकडून तक्रारदारांच्या क्रेडीट कार्ड खात्यामधून येणे रक्कमेबद्दल वसुलीची कार्यवाही करु नये असाही आदेश दिल्यास तक्रारदारांना समाधानकारक व योग्य ती दाद मिळेल असे प्रस्तुत मंचाचे मत झाले आहे.
10. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 341/2011 अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना क्रेडीट कार्डच्या व्यवहाराचे संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदारांचे क्रेडीट कार्ड खाते क्रमांक 4477 4700 8074 5004 यामध्ये वसुलीच्या संदर्भात मागणी करु नये व वसुलीची कार्यवाही करु नये असा आदेश सामनेवाले यांना देण्यात येतो.
4. या व्यतिरिक्त सामनेवाले यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्चाबद्दल रु.25,000/- एकत्रितपणे अदा करावेत असाही आदेश देण्यात येतो.
5. सामनेवाले यांनी वरील आदेशाची पुर्तता आदेशाची प्रमाणित प्रत मिळाल्यापासून 8 आठवडयाचे आत करावी. अन्यथा मुदत संपल्यापासून सदरहू रक्कमेवर 9 टक्के दराने व्याज अदा करावे.
6. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्यपाठविण्यात
याव्यात.