तक्रारदार : स्वतः वकील श्री.जयेश जैन सोबत हजर. सामनेवाले : श्रीमती रश्मी सेलियन या प्रतिनिधी वकीलामार्फत हजर.. -*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- न्यायनिर्णय 1. सा.वाली ही बँक आहे. व तक्रारदारांचे सा.वाले बँकेकडे चालु खाते होते व त्या खात्यामध्ये तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे शेअर्स जमा करुन कर्ज उचलले होते. तक्रारदारांनी कर्ज उचलणेकामी वेगवेगळया कंपन्यांचे एकूण रु.2,80,000/-किंमतीचे शेअर्स फेब्रुवारी 2006 मध्ये सा.वाले यांचेकडे जमा केले. व त्यानंतर सा.वाले यांनी तक्रारदारांना रु.1,40,000/- कर्ज अदा केले. 2. तक्रारदारांचे तक्रारीतील कथना प्रमाणे तक्रारदार 7 सप्टेंबर, 2006 रोजी सा.वाले बँकेकडे गेले असता त्यांना असे समजले की, सा.वाले बँकेने तक्रारदारांनी ठेवलेल्या शेअर्सपैकी काही शेअर्स विक्री करुन तक्रारदारांचे कर्ज खात्यामध्ये परस्पर रु.1,12,000/- जमा केले. वरील व्यवहार करणेपूर्वी सा.वाले यांनी तक्रारदारांना कुठलीही सूचना दिली नाही, किंवा तक्रारदारांची परवानगी घेतली नाही. त्यानंतर तक्रारदारांनी 7 सप्टेंबर, 2006 रोजी आपल्या आक्षेपाचे पत्र सा.वाले बँकेला दिले. व त्याचे स्मरणपत्र दिनांक 28.9.2006 रोजी दिले. व सा.वाले यांना विक्री केलेल्या शेअर्सची मुळ रक्कम तक्रारदारांना अदा करावी अशी विनंती केली. सा.वाले यांनी त्याबद्दल कार्यवाही केली नाही. त्यानंतर तक्रारदारांनी बँकेचे लोकपाल यांचेकडे तक्रार दाखल केली. तसेच पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तथापी सा.वाले यांनी तक्रारदारांच्या मागणी प्रमाणे कार्यवाही केली नसल्याने तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली व त्यामध्ये सा.वाले यांनी तक्रारदारांचे जे शेअर्स विक्री केले त्या शेअर्सची बाजारभावाप्रमाणे जास्तीत जास्त किंमत तक्रारदारांना अदा करावी अशी मागणी केली व त्या व्यतिरिक्त नुकसान भरपाई रक्कम रु.75,000/- तक्रारदारांना अदा करावी अशीही मागणी केली. 3. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केली. व त्यामध्ये असे कथन केले की, सा.वाले यांनी तक्रारदारांना चालु खात्यामध्ये शेअर्सचे तारणावर कर्ज दिले होते व त्याबद्दल करारनामा दि.8.2.2006 रोजी झाला. करारनाम्यातील तरतुदीप्रमाणे भविष्यामध्ये कर्जदारांनी कर्जाचे हप्ते चुकविले तर बँकेस तक्रारदारांना एक दिवसाची नोटीस देवून शेअर्स विक्री करण्याचा अधिकार होता. दरम्यान शेअर्सचे दर कमी झाल्याने तारण ठेवीची किंमतही कमी झाली होती. त्याप्रमाणे सा.वाले यांनी तक्रारदारांना 1 जुन, 2006 रोजी नोटीस दिली व दिनांक 9 जुन, 2006 रोजी येणे बाकी रक्कम रु.49,391/- वसुल करणेकामी तक्रारदारांचे शेअर्स विक्री केले. या प्रमाणे करारनाम्यातील तरतुदीप्रमाणे व तक्रारदार यांना नोटीस देवून शेअर विक्री करण्याची कार्यवाही करण्यात आलेली आहे असे कथन करुन सा.वाले यांनी आपल्या कार्यवाहीचे समर्थन केले. 4. तक्रारदारांनी सा.वाले यांचे कैफीयतीला प्रतिउत्तराचे शपथपत्र दाखल केले. व त्यामध्ये असे कथन केले की, करारनाम्याची प्रत तक्रारदारांना कधीही देण्यात आलेली नव्हती. 5. तक्रारदारांनी आपले पुराव्याचे शपथपत्र, दाखल केले तर सा.वाले यांनी त्यांचे प्राधिकृत अधिकारी श्री.जो अॅन्थॉनी डिसोझा, यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. सा.वाले यांनी तसेच तक्रारदारांनी लेखी युक्तीवाद दाखल केला. दोन्ही बाजुंचा तोंडी युक्तीवाद ऐकण्यात आला. 6. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्र, कागदपत्र व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यानुसार तक्रारीच्या निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात. क्र. | मुद्दे | उत्तर | 1 | सा.वाले यांनी तक्रारदारांचे कर्जाचे वसुलीपोटी तक्रारदारांना सूचना न देता परस्पर शेअर्स विक्री करुन तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तकारदार सिध्द करतात काय ? | नाही. | 2 | तक्रारदार सा.वाले यांचेकडून त्याबद्दल नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? | नाही | 3 | अंतीम आदेश | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा 7. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत सा.वाले यांनी तक्रारदारांना कर्ज खात्यावर रु.10 लाख कर्ज मंजूर केल्याबद्दल पत्र दिनांक 14.2.2006 ची प्रत हजर केली आहे. त्यामध्ये शेअर्सच्या ठेवीवर कर्ज देण्यात आल्याची नोंद आहे. तक्रारदारांनी आपल्या तक्रारीमध्ये असे कथन केलेले आहे की, सा.वाले बँकेने तक्रारदारांना करारनाम्याची प्रत दिली नाही. तथापी तक्रारदारांनी आपल्या तक्रारी सोबतच करारनाम्याची प्रत तक्रारीचे पृष्ट क्र.93 वर निशाणी 18 वर दाखल केलेली आहे. त्यातील कलम 6 ड, यामध्ये अशी तरतूद आहे की, कर्जदारांनी ठेवलेल्या ठेवीची किंमत कमी झाल्यास कर्जदार ज्यादा ठेव रक्कमेने किंवा अन्य स्वरुपात बँकेकडे जमा करेल. कलम 6 एच, प्रमाणे कर्जदारांनी कर्जफेडीच्या रक्कमेमध्ये थकबाकी ठेवल्यास कर्जदारास एक दिवसाची नोटीस देवून तारणठेव बँक विकू शकेल अशी तरतुद आहे. 8. या संदर्भात सा.वाले यांचे असे कथन आहे की, तक्रारदारांचे कर्ज खात्यामध्ये थकबाकी असल्यासने सा.वाले यांनी तक्रारदाराशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. व त्यानंतर 1 जुन, 2006 रोजी नोटीस दिल्यानंतर तारण असलेले शेअर्स 9 जुन, 2006 रोजी विक्री करण्याची कार्यवाही केली. तक्रारदारांनी स्वतःच सा.वाले यांनी तक्रारदारांना दिनांक 23 एप्रिल, 2007 रोजी दिलेल्या पत्राची प्रत निशाणी 12 वर दाखल केलेली आहे. त्यामध्ये थकबाकी रु.28,390/- होती असा उल्लेख आहे. त्याच पत्रामध्ये सा.वाले यांनी तक्रारदारांना त्यांचे भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंत संपर्क होऊ शकला नाही. व तक्रारदारांच्या निवासी दूरध्वनी क्रमांकावर संपर्क प्रस्तापित करण्याचा प्रयत्न केला असता तो बदललेला आहे असा संदेश मिळत होता. या पत्रातील मजकूरावरुन सा.वाले यांनी तक्रारदारांना भ्रमणध्वनी तसेच निवासी दूरध्वनीवर संपर्क स्थापित करण्याचा प्रयत्न केला. या सा.वाले यांच्या कथनास पुष्टी मिळते. 9. सा.वाले यांनी तक्रारदारांना 5 जुलै, 2007 रोजी दिलेल्या पत्राची प्रत तक्रारदारांनी आपल्या तक्रारीसोबत निशाणी 17 वर दाखल केलेली आहे. त्यातील मजकुरावरुन असे दिसते की, कर्ज खात्याची मर्यादा रु.1,40,000/- होती. त्याच पत्रामध्ये असे नमुद केलेले आहे की, 18 मे, 2006 ते 8 जुन, 2006 या दरम्यान तारण ठेवीची किंमत कमी होत गेली व थकबाकीची रक्कम वाढत गेली व दिनांक 8 जून, 2006 रोजी तारण ठेवीची मर्यादा व किंमत कमी होऊन ती रु.90,000/- झाली तर थकबाकीची रक्कम रु.49,390/- झाली. या प्रमाणे कर्ज मर्यादेपेक्षा जादा उचल तक्रारदारांकडून करण्यात आली आहे. या दोन्ही पत्रातील मजकूर सा.वाले यांच्या कथनास पुष्टी देतो की, मे, जून 2006मध्ये शेअर्सचे किंमती कमी झाल्याने तारण ठेवीची किंमत कमी होत गेली. तर थकबाकीची रक्कम वाढत गेली. 10. सा.वाले यांचे असेही कथन आहे की, सा.वाले यांनी तक्रारदारांना 1 जून, 2006 रोजी नोटीस देवून थकबाकीची रक्कम जमा करण्याची सूचना दिली. तथापी नोटीस दिल्यानंतरही तक्रारदारांनी कार्यवाही केली नाही. व अंतीमतः 9 जून, 2006 रोजी सा.वाले यांनी तारण ठेवपैकी काही शेअर्स विक्री केले. व शेअर्सची किंमत रु.1,11,811/- कर्ज खात्यात जमा केले. या संदर्भात तक्रारदार तसेच सा.वाले यांनी 1 जुन 2006 च्या पत्राची प्रत हजर केलेली आहे. त्यामध्ये शेअर्सचे किंमतीमध्ये प्रचंड घट झाल्याने तक्रारदारांकडून येणे बाकी रक्कमेमध्ये वाढ होऊन ती 41,000/- झाली आहे अशी नोंद आहे. त्याचप्रमाणे येणे बाकी रक्कम 7 जुन, 2006 पर्यत जमा केली नाहीतर तारण ठेवीचे शेअर्स विक्री करण्यात येतील अशीही सूचना त्या पत्रात देण्यात आलेली होती. 11. या मुद्याचे स्पष्टीकरण देण्याचे उद्देशाने तक्रारदारांनी आपल्या तोंडी युक्तीवादात असे कथन केले की, 1 जुन, 2006 च्या पत्रामधील पत्ता चुकीचा असून तक्रारदारांचा फ्लॅट क्रमांक ए/1001 असा नसून ए/1004 असा आहे. तक्रारदारांचा तक्रारीतील पत्ता व 1 जुन, 2006 नोटीस मधील पत्ता पुढील प्रमाणे दिला आहे. तक्रारदारांचा तक्रारीतील पत्ता | 1 जुन, 2006 चे नोटीसीमधील पत्ता | करीम रावजी बुधवानी ए/1004, अॅटलांटीक, सागर सिटी, ऑफ व्ही.पी.रोड, अंधेरी (पश्चिम) मुंबई 400 058 | करीम रावजी बुधवानी ए/1001, अॅटलांटीक, सागर सिटी, ऑफ व्ही.पी.रोड, अंधेरी (पश्चिम) मुंबई 400 058 |
याप्रमाणे तक्रारदारांचो तक्रारीतील पत्ता व नोटीसमधील पत्ता या मध्ये तक्रारदारांचे नांव, इमारतीची विंग, इमारतीचे नांव, प्रकल्पाचे नांव, रस्त्याचे नांव, उप नगराचे नांव, व दिशा तसेच पिनकोड यामध्ये कुठलाही फरक नाही. तकारदारांची सदनिका तक्रारदारांचे म्हणण्याप्रमाणे 1004 अशी होती. तर 1 जुन, 2006 चे नोटीसमध्ये सदनिकेचा उल्लेख 1001 असा करण्यात आला होता. केवळ सदनिका क्रमांकातील फरकामुळे 1 जुन, 2006 च्या नोटीस तकारदारांना मिळाली नाही असा निष्कर्ष काढता येत नाही. तक्रारदारांनी दाखल केलेल्या प्रतिउत्तराचे शपथपत्रामध्ये त्या स्वरुपाचे कथन नाही. तक्रारदारांचे तक्रारीमध्ये तक्रारीचे परिच्छेद क्र.9 पृष्ट क्र.10 यामध्ये केवळ असे कथन आहे की, सा.वाले यांनी 1 जुन 2006 ची नोटीस चुकीच्या पंत्यावर पाठविली. तक्रारदारांचे तिथे असे कथन नाही की, 1 जुन, 2006 ची नोटीस तक्रारदारांना मिळाली नाही. 12. वरील परिस्थितीमध्ये सा.वाले यांनी तक्रारदारांचे शेअर्स विक्री करण्याची कार्यवाही तक्रारदारांना कराराप्रमाणे नोटीस देवून 8 दिवसानंतर केली असे दिसून येते. ती कार्यवाही कराराप्रमाणे होती. सा.वाले यांनी तक्रारदारांचे शेअर्स परस्पर व नोटीस न देता विक्री केले असे दिसून येत नाही. सबब सा.वाले यांनी तक्रारदारांना या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करु शकले नाहीत. 13. वरील चर्चेवरुन व निष्कर्षानुरुप पुढील आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रार क्रमांक 336/2008 रद्द करण्यात येते. 2. खर्चाबाबत काही आदेश नाही. 3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT | |