निकालपत्र :- (दि.29.12.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदार हे रेलिगेअर सिक्युरिटीज लि., कोल्हापूर यांचेकडे सिनियर ब्रँच हेड म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदारांचे सामनेवाला बँकेमध्ये बचत खात असून त्याचा खाते नं. एस्.बी.जी.ई.एन्. अकौंट नं. ए.एन्.डब्ल्यु.बी. 016601515802 असा आहे. सदर खात्यामध्ये तक्रारदारांचे रक्कम रुपये 1,22,285.44 पैसे इतकी रक्कम दि.03.03.2008 रोजी शिल्लक होती. तक्रारदारांना बँकेने चेकबुकची सुविधा दिली होती. तक्रारदारांने रक्कम रुपये 98,000/- चा चेक नं. 576833 दि.03.03.2008 रोजीचा श्री.सोमनाथ बेकनाळकर यांना दिला. सदरचा चेक तक्रारदारांच्या खात्यावर जमा झाला असता सामनेवाला बँकेने इनसफिशियन्ट फंड असा शेरा मारुन दि.08.03.2008 रोजीचा मेमो दिला. सदरची सामनेवाला यांची कृती ही बेकायदेशीर आहे. तसेच, सामनेवाला बँकेने सदर खात्यातून पैसे काढण्यात तक्रारदारांना प्रतिबंध केलेला आहे व मानसिक त्रास दिलेला आहे. तक्रारदार हे शेअर्स ट्रेडिंग करतात. सामनेवाला यांनी सदर खात्यातील पैसे काढण्यात प्रतिबंध केलेने त्यांना रुपये 5 लाखाचे आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच, सामेनवाला बँकेच्या कृतीमुळे तक्रारदारांची मानहानी झाली आहे. त्यामुळे सामनेवाला बँकेने मानसिक त्रासापोटी रक्कम रुपये 12 लाख द्यावेत. तसेच, बेकायदेशीरपणे चेक न वटविलेने रक्कम रुपये 1,60,125.34 पैसे तसेच, बेकायदेशीरपणे नांवे टाकलेली रक्कम रुपये 57,125/- तक्रारदारांच्या खात्यात द.सा.द.शे.18 टक्के व्याजासह जमा करणेचे आदेश व्हावेत. तसेच, तक्रारदारांच्या खात्यातून रक्कम काढणेस सामनेवाला बँकेने प्रतिबंध करु नये याबाबत आदेश व्हावेत. तसेच, तक्रारीचा खर्च रुपये 25,000/- देणेचे आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत खातेउतारा, चेक न वटलेने तक्रारदारांना बेकनाळर यांची आलेली नोटीस, सदर नोटीसीस तक्रारदाराचे उत्तर, सामनेवाला क्र.1 व 2 यांना पाठविलेली नोटीस इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला बँकेने त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे सामनेवाला बँके बचत खाते होते व तक्रारदारांना क्रेडिट कार्डची सुविधा दिली होती. तक्रारदार म्हणतात त्याप्रमाणे दि.03.03.2008 रोजी त्यांच्या सदर खात्यात रककम रुपये 1,22,285.44 पैसे इतकी रक्कम शिल्लक होती हे कथन खोटे आहे. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीमध्ये क्रेडिट कार्डची सुविधा दिली होती ही वस्तुस्थिती त्यांनी लपवून ठेवलेली आहे. तक्रारदारांनी क्रेडिट कार्डचा वापर केलेला आहे व तक्रारदारांकडून येणे रक्कम रुपये 54,474.84 पैसे इतकी रक्कम होती. याबाबतची मागणी केली असता सदर रक्कम जमा करणेबाबत तक्रारदारांनी टाळाटाळ केली आहे. तसेच, वकिलामार्फत नोटीसही पाठविलेली आहे. सदरचे क्रेडिट कार्ड हे अंतर्गत लिंक्ड् करुन बँकर्स लिनची नोंद सदर बचत खात्यावर केली होती व दि.03.03.2008 रोजी रक्कम रुपये 54,474.84 इतक्या रक्कमेचे सदर बचत खात्यावर लिन/चार्ज ठेवले होते. याबाबतची माहिती तक्रारदारांना असतानाही तक्रारदारांनी रक्कम रुपये 98,000/- चा चेक देवून रक्कम काढणेचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे ‘इनसफिशिएन्ट बॅलन्स’ असा शेरा मारुन चेक वटविणेत आलेला नाही. तसेच, तक्रारदारांनी दि.03.03.2008 नंतरही त्यांच्या खात्यातून रक्कमा काढलेल्या आहेत. सबब, सामनेवाला बँकेच्या सेवेत त्रुटी नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत यावी व कॉम्पेनसेटरी कॉस्ट रुपये 10,000/- देणेबाबत आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (5) सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्टर्थ तक्रारदारांचे क्रेडिट कार्डसाठीचा अर्ज, तक्रारदार देय असलेल्या रक्कमांचे क्रेडिट कार्डचे स्टेटमेंट, तक्रारदारांना पाठविलेली नोटीस, ट्रायल रिपोर्ट, तक्रारदारांचे खाते लिन केलेबाबतचा उतारा, तक्रारदारांना वकिलामार्फत पाठविलेली नोटीस इत्यादीच्या प्रती दाखल केलेल्या आहेत. (6) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकिलांना युक्तिवाद सविस्तर व विस्तुतपणे ऐकलेला आहे. तसेच, उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे सामनेवाला बँकेत बचत खाते होते. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीमध्ये त्यांनी सामनेवाला बँकेकडून क्रेडिट कार्डची सुविधा घेतलेली होती ही वस्तुस्थिती या मंचापासून लपवून ठेवलेली आहे. क्रेडिट कार्डवरील देय रक्कम तक्रारदार हे देय लागतात याबाबत खाते उतारा सामनेवाला बँकेने दाखल केलेला आहे. त्याचे अवलोकन केले असता एकूण बॅलन्स रुपये 54,474.84 पैसे इतका असल्याचे दिसून येते व सामनेवाला बँकेने तक्रारदारांच्या बचत खाते लिन मार्क करुन ठेवलेले आहे ही वस्तुस्थिती तक्रारदारांना माहित असलेचे दिसून येते. भारतीय करार कायदा, 1872 यातील कलम 171 यातील तरतुदीचा विचार करता सामनेवाला बँकेने केलेली कृती यामध्ये सामनेवाला बँकेची कोणतीही सेवात्रुटी दिसून येत नाही. सदर तरतुदीचा विचार करता तक्रारदारांच्या तक्रारीमध्ये कोणतीही गुणवत्ता या मंचास दिसून येत नाही. सबब आदेश. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत येते. 2. खर्चाबाबत आदेश नाही.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |