मंचाचे निर्णयान्वये - श्री. विजयसिंह राणे, अध्यक्ष. //- आदेश -// (पारित दिनांक – 17/02/2011) 1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.1986 कलम 12 अन्वये दाखल केलेली असून तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात अशी आहे की, त्याचेजवळ गैरअर्जदाराने दिलेले क्रेडीट कार्ड आहे. ते प्रवासास बँकाक येथे गेले असतांना दि.22.03.2009 रोजी रेल्वेतील प्रवास करीत असतांना पैसे व क्रेडीट कार्ड असलेले पॉकेट चोरीस गेले. त्यामुळे क्रेडीट कार्ड हरविल्याची तक्रार गैरअर्जदारांना दिली व क्रेडीट कार्डचा गैरवापर होऊ शकतो असे कळविले. तसेच बँकाक पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदवून क्रेडीट कार्ड व इतर वस्तू चोरीस गेल्याची माहिती दिली. तक्रारकर्त्याला क्रेडीट कार्डचा गैरवापर टाळण्यात येईल आणि नुकसान होणार नाही असे आश्वासन दिले. पुढे 13.04.2009 रोजी त्यांना प्राप्त झालेल्या स्टेटमेंटमध्ये रु.28756.72 एवढया रकमेचा व्यवहार टेंपररी फ्राड डेबीट या नावावर दर्शविल्याचे आढळून आले. तक्रारकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे हे अनुचित आहे. पुढे गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याचे खात्यातील याच कारणावरुन रु.8,370/- ची उचल केली. या संबंधात गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यास पुढे पत्र देऊन रकमेची मागणी केली. वसुलीबाबत वारंवार त्यांना फोनवरुन धमक्या देण्यात येत आहेत, म्हणून त्यांनी तक्रार दाखल केली व त्यांच्याजवळून वसुल करण्यात आलेली रक्कम रु.8,370/- 18% व्याजासह मिळावे, त्यांना कोणतेही देणे नसल्याबाबतचे प्रमाणपत्र मिळावे, झालेल्या त्रासापोटी रु.3,00,000/- नुकसान भरपाई मिळावी आणि तक्रारीचा खर्च म्हणून रु.20,000/- मिळावे अशा मागण्या केलेल्या आहेत. 2. गैरअर्जदाराने हजर होऊन लेखी उत्तर दाखल केले आणि सर्व विपरीत विधाने नाकारली आणि असा उजर घेतला की, तक्रारकर्त्याचे वडिल श्री. परमेश्वर सोनी यांनी क्रेडीट कार्ड हरविल्याची सुचना त्यांच्या भ्रमणध्वनीद्वारे भारतीय प्रमाण वेळेनुसार 17:18:29 यावेळेस दि.22.03.2009 रोजी दिली. त्यानंतर लगेच क्रेडीट कार्डचे व्यवहार बंद करण्यात आले. तक्रारकर्ता ज्या, क्रेडीट कार्डच्या, व्यवहारासंबंधी तक्रार करीत आहे, ते व्यवहार थायलंडच्या स्थानिक वेळेप्रमाणे 17:53 व 17:56 या वेळेवर 22.03.2009 रोजीचे आहे. थायलंडची स्थानिक वेळ ही भारतीय प्रमाण वेळेपेक्षा दीड तास (01:30:00) पुढे आहे. म्हणजेच तक्रारकर्त्याची सुचना प्राप्त होऊन क्रेडीट कार्डचा व्यवहार थांबविण्यापूर्वी वरील व्यवहार थायलंड येथे झालेले आहेत, अशा परिस्थितीत गैरअर्जदाराची त्याबाबत कोणतीही जबाबदारी यासंबंधीच्या कराराप्रमाणे आणि अटी व शर्तीप्रमाणे येत नाही.सबब तक्रार चुकीची असल्याने खारीज करण्यात यावी. 3. मंचाने उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकला. तसेच तक्रारीमध्ये उभय पक्षांनी दाखल केलेली शपथपत्रावरील कथने, दस्तऐवज व निवाडे यांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले. 4. तक्रारकर्त्याची तक्रार भारतीय वेळेनुसार 17:18:29 यावेळेस नोंदविण्यात आलेली आहे आणि त्यावेळेला क्रेडीट कार्डचा व्यवहार बंद करण्यात आला. यामध्ये दीड तास (01:30:00) मिळविल्यास ती वेळ थायलंडच्या वेळेप्रमाणे 18:48:29 अशी येते. ज्या व्यवहाराबद्दल तक्रारकर्ता तक्रार करीत आहे, ते व्यवहार 17:53 व 17:56 या थायलंडच्यावेळेनुसार घडलेले आहेत. थोडक्यात तक्रारकर्त्याची तक्रार, क्रेडीट कार्ड हरविल्याबाबतची, प्राप्त होऊन क्रेडीट कार्डवरील व्यवहार बंद करण्यापूर्वी, सदरचे व्यवहार झालेले आहेत आणि त्यामुळे ते व्यवहार हे घडण्यासाठी गैरअर्जदारांना जबाबदार धरता येत नाही. तक्रारकर्त्याचे असे म्हणणे आहे की, क्रेडीट कार्ड हरविल्यानंतर 24 तासाचे आत सुचना देण्याची अट या करारात आहे आणि त्यामुळे त्या 24 तासाकरीता तक्रारकर्त्याला जबाबदार धरता येत नाही. हा युक्तीवाद स्विकारता येण्यायोग्य नाही. यातील सर्वात महत्वाची बाब अशी आहे की, गैरअर्जदाराने आपल्या उत्तरात ज्या वेळा नमूद केले आहे त्या वेळेसंबंधी तक्रारकर्त्याने आपल्या प्रति उत्तरात कोणतेही स्पष्ट उत्तर दिलेले नाही व त्या नाकारल्या नाहीत. इतकेच नव्हे तर, आपल्या तक्रारीत सुध्दा या वेळेसंबंधी कोणताही स्पष्ट मजकूर नमूद केला नाही. यावरुन तक्रार ही दोन ठिकाणच्या वेळेतील फारकातील गैरसमजतीतून दाखल झाली आहे असे मंचाचे मत आहे. सबब खालीलप्रमाणे आदेश. -आदेश- 1) तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येत आहे. 2) उभय पक्षांनी आप-आपला खर्च सहन करावा.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |