श्री नरेश बनसोड, सदस्य यांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 28/11/2011)
1. तक्रारकर्त्यांनी सदर तक्रार या ग्रा.सं.का.1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केलेली आहे व मागण्या केल्या आहे की, गैरअर्जदार अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करीत आहे असे घोषित करावे, तक्रारकर्त्याचे नाव सीबील च्या यादीतून मागे घ्यावे, मानसिक व आर्थिक त्रासापोटी मोबदला रु.4,95,000/- मिळावा, तक्रारीचा खर्च मिळावा.
2. तक्रारकर्त्यांची तक्रार अशी आहे की, त्यांनी गैरअर्जदाराकडून सन 2007 मध्ये क्रेडीट कार्ड क्र.4477466619053001 हे रु.25,000/- मर्यादेकरीता घेतले होते. तसेच या व्यतिरिक्त कोणतीही सुविधा गैरअर्जदारांकडून घेतली नव्हती. परंतू दि.17.11.2007 रोजी तक्रारकर्त्याला गैरअर्जदारांनी पत्र पाठवून, सदर क्रेडीट कार्डसोबत हेल्थ पॉलिसी काढून क्रेडीट कार्ड खात्यातून रु.383.41 प्रमाणे 28 नोव्हेंबर 2007 पासून रक्कम वळती केले असे कळविले. तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधून सदर हेल्थ पॉलिसी नको असल्याचे कळवून ती बंद करण्यास सांगितले, परंतू त्यांनी प्रतिसाद दिला नाही व शेवटी पॉलिसीचे खाते विवरण पाठवून, गैरअर्जदाराने तक्रारकर्त्याचे नाव सीबील यादीमध्ये समाविष्ट केले. तक्रारकर्त्याला याची माहिती तो स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कर्ज संदर्भात विचारपूस करण्याकरीता गेला असता कळली. तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराचे क्रेडीट कार्ड हे परत केलेले आहे. तसेच गैरअर्जदाराने कधीही हेल्थ पॉलिसीची प्रत तक्रारकर्त्याला पाठविलेली नाही. तक्रारकर्त्याच्या मते गैरअर्जदारांची सदर कृती ही अनुचित व्यापार प्रथा असून पॉलिसीच्या नावाखाली त्यांनी त्याची रक्कम वळती करुन त्याची फसवणूक केलेली आहे.
3. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदारांना पाठविण्यात आली. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारीस लेखी उत्तर दाखल केले. गैरअर्जदार क्र. 3 यांनी मंचासमोर उपस्थित होऊन, लेखी उत्तर दाखल न केल्याने, त्यांचेविरुध्द तक्रार विना लेखी जवाब चालविण्याचा आदेश पारित करण्यात आला.
4. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारीला दिलेल्या लेखी उत्तरात, तक्रारकर्त्याची संपूर्ण तक्रारच नाकारलेली आहे. पुढे विशेष कथनात, त्यांच्या मार्केटींग एक्जीक्युटीवला टेलिफोनवर विवादित हेल्थ पॉलिसीकरीता होकार दिला होता. त्यानुसार पॉलिसी हप्ता रु.838/- होता आणि सदर बोलणे हे गैरअर्जदारांनी रेकॉर्ड करुन ठेवले आहे. त्यामुळे पॉलिसी, तिचे प्रीमीयम, पॉलिसीचा कालावधी याबाबत वाद नाही. तक्रारकर्त्याने हेल्थ पॉलिसीला होकार दिल्यानंतर त्यांचे हप्ते दिले नाही व क्रेडीट कार्डची रक्कमही दिली नाही, त्यामुळे आर.बी.आय.च्या गाईड लाईन्सनुसार सीबील यादीमध्ये नाव टाकण्यात आले असे नमूद करुन सदर तक्रार खारीज करण्याची मागणी केली.
5. सदर तक्रार युक्तीवादाकरीता आल्यानंतर, गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांचा युक्तीवाद त्यांच्या वकिलांमार्फत ऐकला. तक्रारकर्ते व गैरअर्जदार क्र. 3 गैरहजर. मंचाने सदर प्रकरणी दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता मंच खालील निष्कर्षाप्रत आले.
-निष्कर्ष-
6. तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे क्रेडीट कार्ड प्राप्त केल्यामुळे तक्रारकर्ता गैरअर्जदार क्र. 1 व 2 चा ग्राहक ठरतो. तसेच गैरअर्जदार क्र. 2 ने स्वतःहून आय.सी.आय.सी.आय. हेल्थ पॉलिसी काढल्यामुळे सुध्दा गैरअर्जदार क्र. 3 चा ग्राहक ठरतो. तक्रारकर्ता व गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने दाखल केलेली कागदपत्रे, विवरण व दस्तऐवजावरुन हे स्पष्ट होते की, गैरअर्जदार क्र. 1 व 2 मार्फत गैरअर्जदार क्र. 3 ची घेतलेली हेल्थ पॉलिसीचा हप्ता हा 383.41 होता. परंतू गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने शपथपत्रावर दाखल केलेली वस्तूस्थिती अनुचित, हेतूपूरस्पर व मंचाची दिशाभूल करण्याच्या एकमेव हेतूने हेल्थ पॉलिसीचा हप्ता हा 838/- होता असे खोटे व गैरजबाबदार विधान केले आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
7. गैरअर्जदाराने म्हटले की, बँकेच्या मार्केटींग एक्झीक्युटीव्हने दूरध्वनीवर आय.सी.आय.सी.आय. लोंबार्ड हेल्थ पॉलिसीवर अहवाल दिला होता व त्यानुसार बँकेने पॉलिसीच्या हप्त्याची रक्कम क्रेडीट कार्डमधून वळती केली. त्याबाबत गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने सी.डी. व ट्रांसस्क्रीप्ट दाखल केले. परंतू एकंदरीत वाचन केले असता गैरअर्जदार क्र. 1 व 2 च्या मार्केटींग एक्झीक्युटीव्हचा शब्द प्रयोग हा पूर्णतः संदीग्ध स्वरुपाचा व बनवाबनवीच्या एकमेव हेतूने होता असे स्पष्टपणे दिसते आणि गैरअर्जदार क्र. 1 व 2 ची कृती अनुचित व्यापार पध्दतीत मोडते, कारण गैरअर्जदार क्र. 1 व 2 बरोबरच गैरअर्जदार क्र. 3 ने सुध्दा आय सी आय सी आय हेल्थ पॉलिसीची प्रत, अटी व शर्ती या तक्रारकर्त्यास न पाठविताच हेल्थ पॉलिसीच्या हप्त्याची रक्कम मासिक 383.41 नंतर त्यावर विलंब शुल्क, सेवा कर, तसेच गैर वाजवी आकारणी केलेली आहे. परंतू गैरअर्जदार क्र. 1 व 3 ने हेल्थ पॉलिसी संबंधित कुठलाही दस्तऐवज मंचासमोर दाखल केलेला नाही. यावरुन गैरअर्जदार मंचापासून त्याची गैरकायदेशीर कृती लपवित असून त्याबाबत मा. राष्ट्रीय आयोग व सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रानुसार Adverse inference काढणे, तसेच गैरअर्जदार क्र. 3 ने मंचाचे कार्यवाहीत सहभागी न होणे त्याकरीता त्यांचेवर Adverse inference काढणे संयुक्तीक वाटते.
NCDRC 2009 II CPR 431 Eicher Motor Ltd. V/s Narendra Reddy
AIR 1994 SCC 854, S.P. Chenilvaraya Naidu V/s Jagnnath
8. गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने विशेष कथनाचे परिच्छेद क्र. 5 मध्ये स्पष्टपणे मान्य केले की, गैरअर्जदार क्र. 3 आय सी आय सी आय लोंबार्ड, 29.03.2010 च्या पत्राने पूर्ण हेल्थ पॉलिसीचे प्रीमीयम तक्रारकर्त्याच्या कार्डवर रीव्हर्स केले आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 3 बरोबर गैरअर्जदार क्र. 1 व 2 ची कृती ही अनुचित व्यापार प्रथेत मोडते हे त्यांचे स्वतःच्या कथनावरुनसुध्दा सिध्द झालेले आहे.
9. तक्रारकर्ता ज्यावेळी स्टेट बँक ऑफ इंडिया येथे कर्ज घेण्यास गेला असता त्या बँकेच्या अधिका-याने तक्रारकर्त्यांचे निदर्शनास आणून दिले की, त्याचे नाव हे बदनामी करण्याच्या दृष्टीने गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने जाणून-बुजून CIBIL यादीत समाविष्ट केले आहे, त्यामुळे त्याला स्टेट बँक ऑफ इंडिया मधून कर्ज घेता आले नाही व गैरअर्जदार क्र. 1 व 2 च्या गैरकायदेशीर कृतीमुळे तक्रारकर्त्यास कर्ज प्राप्त होण्यापासून वंचित राहावे लागले आणि कारण नसतांना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिका-याकडून अपमानास्पद वागणूकीस सामोरे जावे लागले ही गैरअर्जदार यांचे सेवेतील गंभीर स्वरुपाची त्रुटी असून याबाबत गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यास CIBIL यादीत नाव टाकण्याबाबत कुठलीही सुचना न देता CIBIL यादीत नाव टाकणे ही अनुचित व्यापार प्रथेत मोडते. वरील विवेचनावरुन गैरअर्जदार क्र. 1 व 2 बरोबरच गैरअर्जदार क्र. 3 ची कृतीसुध्दा पूर्णतः गैरकायदेशीर असून गंभीर स्वरुपाची ग्राहक त्रुटी व अनुचित व्यापार पध्दत असून गैरअर्जदाराने विम्याचे खोटे हप्ते शपथपत्रावर नमूद केल्याचे सुध्दा सिध्द झालेले आहे. त्यामुळे गैरअर्जदार क्र. 1 ते 3 वर Punitive Damages रु.25,000/- लावणे संयुक्तीक होईल असे मंचाचे मत आहे.
NCDRC 2006 CTJ 631 (CP), Reliance India V/s Harichand Gupta
For filing false affidavit or making misleading statement in pending proceeding, the deponent are to be dealt appropriately by imposing punitive damages & then, in future they may not indulge in such practice.
गैरअर्जदाच्या वर सिध्द झालेल्या कृतीमुळे तक्रारकर्त्यास निश्चितच मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रास सहन करावा लागला व अपमानास्पद वागणूकीस सामोरे जावे लागले. त्यामुळे तक्रारकर्त्यास रु.25,000/- नुकसान भरपाई व तक्रारीच्या खर्चाबाबत रु.3,000/- देणे संयुक्तीक होईल असे मंचाचे स्पष्ट मत आहे. वरील विवेचानावरुन मंच खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदार क्र. 1 ते 3 ला आदेश देण्यात येतो की, त्यांच्या सेवेत असलेली गंभीर स्वरुपाची त्रुटी, तसेच अवलंबिलेली अनुचित व्यापार पध्दती आणि शपथपत्रावर खोटे विधान केल्यामुळे, त्यांचेवर Punitive Damages दाखल रु.25,000/- आकारण्यात येत आहे. त्यापैकी रु.15,000/- मंचाचे लिगल एडमध्ये जमा करावे व रु.10,000/- तक्रारकर्त्यास द्यावे.
3) गैरअर्जदारांमुळे तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासामुळे झालेल्या नुकसानीबाबत क्षतिपूर्ती म्हणून रु.25,000/- गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यास द्यावे.
4) तक्रारीच्या खर्चादाखल रु.3,000/- गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यास द्यावे.
5) वरील आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदार क्र. 1 ते 3 यांनी संयुक्तपणे किंवा पृथ्थकपणे आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावी.