श्री नरेश बनसोड, सदस्य यांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 22/02/2012)
1. तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्रा.सं.का.चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदार क्र. 1 व 2 विरुध्द दाखल करुन मागणी केली की, गैरअर्जदाराची सेवा दोषपूर्ण असल्याचे घोषित करावे व गैरअर्जदार क्र. 2 ला आदेश द्यावे की, तक्रारकर्त्याची नौकरी गेल्यापासून गृहकर्जाचे हप्ते गैरअर्जदार क्र. 1 ला परस्पर द्यावे, गैरअर्जदार क्र. 2 ने तक्रारकर्त्याकडून विमा हप्त्याची जास्त घेतलेली रक्कम रु.10,290.73 द.सा.द.शे. 12 टक्याने परत करावी, मानसिक व शारिरीक त्रासाची भरपाई व तक्रारीच्या खर्चाची मागणी केली.
2. तक्रारकर्ता सुभिक्षा ट्रेडिंग कंपनीच्या मुख्य शाखेमध्ये नोकरीला होते. तक्रारकर्त्याने फेब्रुवारी 2008 मध्ये प्लॉट क्र. 286, राठोड लेआऊट, अनंतनगर, नागपूर करीता रु.9,75,000/- घर कर्ज 15 वर्षाकरीता गैरअर्जदार क्र. 1 कडून घेतले. त्याचा दर महिना ईएमआय रु.11,205/- होता. गैरअर्जदाराने तक्रारकर्त्यास मिळणारे पगाराच्या हिशोबाप्रमाणे कर्ज मंजूर केले होते व कर्जा व्यतिरिक्त असलेले फायदेसुध्दा सांगितले. त्या अंतर्गत गैरअर्जदार क्र. 1 यांनी गैरअर्जदार क्र. 2 मार्फत होम सेफ प्लस सीक्युर माईंड पॉलिसी होम लोन संरक्षीत करण्याकरीता 5 वर्षाकरीता घेंण्यास सांगितले व त्याकरीता तक्रारकर्त्यावर दबाव आणला. कारण तक्रारकर्ता पॉलिसी घेण्यास तयार नव्हता. गैरअर्जदार क्र. 2 ने होम सेफ प्लस सीक्युर माईंड पॉलिसी क्र. 4065/आयसीआयसीआय-एचएसपी/1320445/00/000 दि.14.02.2008 ला 5 वर्षाची प्रीमीयम राशी रु.38,600/- घेऊन तक्रारकर्त्यास दिली व त्याचा अवधी 15.02.2013 पर्यंत होता. तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र. 1 च्या बँकेचा चेक क्र. 188823 दि.14.02.2008 नुसार हप्ता भरला. परंतू भरलेल्या रकमेची (रु.38,600/-) पावती तक्रारकर्त्यास देण्यात आली नाही व गैरअर्जदार क्र. 2 तर्फे देण्यात आलेल्या पॉलिसी पत्रामध्ये रु.28,309.37 विमा प्रीमीयम मिळालेले दर्शविले व उर्वरित रु.10,290.73 दर्शविण्यात आले नाही व त्याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली. सदर पॉलिसीचा सरळ संबंध हा गृहकर्ज घेणा-या व्यक्तीच्या नौकरीशी व गृहकर्जाशी होता व या बाबी संलग्नीत आहे. तक्रारकर्त्यानुसार पुरविलेली पॉलिसी कॉलम क्र. 1 मध्ये रु.9,55,000/- चे आहे व कॉलम 3 मध्ये स्पष्टपणे नमूद आहे की, जर विमा धारकाची नौकरी गेली तर नौकरी गेल्यापासून उर्वरित गृहकर्जाचे हप्ते गैरअर्जदार क्र. 2 देण्यास बाध्य राहील. तक्रारकर्ता दरमहा नियमितपणे गृहकर्जाचे व विमा राशी रु.11,205/- देत आहे. तक्रारकर्त्यानुसार जागतिक आर्थिक मंदीमुळे तक्रारकर्त्यास नौकरी गमवावी लागली व विमा पॉलिसीच्या अटी व शर्तीनुसार गैरअर्जदार क्र. 2 यांनी भरणे अनिवार्य आहे विमा पॉलिसीच्या कॉलम 7 सेक्शन 3 मध्ये स्पष्टपणे नमूद आहे की, जर विमा धारकाची नौकरी गेली तर नौकरी गेल्याच्या तारखेपासून उर्वरित गृहकर्जाचे हप्ते गैरअर्जदार क्र. 2 देण्यास बाध्य राहील. तक्रारकर्त्याने म्हटले की, गैरअर्जदार क्र. 2 ने पॉलिसीच्या कॉलम 7 सेक्शन 3 नुसार प्रीमीयम रकमेची परतफेड केली नाही व सप्टेंबर 2008 मध्ये नौकरी गेल्यानंतर, गृहकर्जाचे उर्वरित हप्ते गैरअर्जदार क्र. 1 ला किंवा तक्रारकर्त्याला न दिल्याने, गैरअर्जदार क्र. 2 ने अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केल्याचे म्हटले आहे. तक्रारीसोबत 8 दस्तऐवज दाखल. अनुक्रमे पृष्ठ क्र. 10 ते 23 वर आहे.
3. गैरअर्जदार क्र. 1 ने तक्रारीस दिलेल्या उत्तरात प्राथमिक आक्षेप घेऊन, तक्रारकर्त्याने गृहकर्ज करारनाम्यानुसार परतफेड केली नाही, गृहकर्ज घेण्याकरीता तक्रारकर्त्याने संयुक्त अर्ज क्र. 7777456292 नुसार त्याने स्वतः व त्याची पत्नी नाजिया शहा मोह. खान ही सह अर्जदार आहे. गैरअर्जदार क्र. 1 ने 07.02.2008 ला 10,13,000/- चे कर्ज दोन्ही अर्जदारास संयुक्तपणे मंजूर केले व गृहकर्ज करारनामा एलबीएनएजी 00001705017 असा आहे. तक्रारकर्त्याने त्याची पत्नी नजिया शहा यांना तक्रारीत सहतक्रारकर्ता म्हणून न जोडल्याने तक्रार खारीज होण्यास पात्र आहे. गैरअर्जदारानुसार दोन्ही तक्रारकर्ते त्यांचे नावे 08.12.2010 पर्यंत रु.35,754/- करारनाम्यानुसार थकीत आहे. त्या कारणासाठी तक्रार खारीज करण्याची मागणी केली. गैरअर्जदार क्र. 1 ने म्हटले की, तक्रारकर्ता स्वतः गैरअर्जदार क्र. 2 सोबत सल्ला मसलत केल्यानंतर उपरोक्त पॉलिसी घेण्याचे ठरविले व गृहकर्ज खात्यामधून रु.38,600/- चा प्रीमीयम गैरअर्जदाराला दिला. त्यामुळे गैरअर्जदाराचा विमा पॉलिसी हप्त्याशी काही संबंध नाही. 08.10.2010 ला थकीत रक्कम रु.35,754/- तक्रारकर्ता देणे आहे व तक्रारकर्ता चांगल्या हेतूने मंचासमोर न आल्याने तक्रार खारीज करावी. गैरअर्जदाराने तक्रारीसोबत अनुक्रमे 45 ते 52 वर गृहकर्जासंबंधी दस्तऐवज व लेखा विवरण दाखल केले. गैरअर्जदाराने 12.01.2011 च्या वेगळया अर्जाद्वारे 10.01.2011 पर्यंत गृहकर्जाची थकबाकी रक्कम रु.38,966/- भरण्याबाबत तक्रारकर्त्यांना निर्देशित करण्याकरीता अर्ज दाखल केला (पृष्ठ क्र. 78).
4. गैरअर्जदार क्र. 2 ने म्हटले की, तक्रारकर्त्याने घर घेण्यासाठी रु.9,75,000/- घेतले असून कर्जाचा ईएमआय रु.11,205/- आहे. तक्रारकर्त्याचे चालू वेतन व मंजूर झालेले कर्ज याबाबत गैरअर्जदार क्र. 1 च्या निकषाविषयी ते अनभिज्ञ आहे व गैरअर्जदार क्र. 1 ने तक्रारकर्त्यावर बळजबरीने पॉलिसी घेण्यास भाग पाडल्याचे नाकारले. पॉलिसीचा अवधी व पॉलिसी प्रीमीयमपोटी रु.38,600/- प्राप्त झाल्याचे कळविले. गैरअर्जदाराने, गैरअर्जदार क्र. 1 यांनी धनादेश क्र. 188823 दि.14.02.2008 रु.38,600/- निर्गमित केले व पॉलिसी प्रीमीयम रु.29,309.37 आहे.गैरअर्जदार क्र. 2 ने पॉलिसी निर्गमित केल्यानंतर दोन वर्षानंतर तक्रारकर्त्यातर्फे प्रीमीयमपोटी ज्यादा रक्कम अदा केल्याची शंका व्यक्त केली. पॉलिसी कलम 1, स्तंभ 1 मध्ये विमाकृत रक्कम रु.9,55,000/- आहे व त्याचमध्ये कलम 3 मध्ये नौकरीच्या नुकसानीसंबंधी वर्णन नमूद आहे ते कर्ज खात्याचे तीन इएमआय आहे व इतर तक्रारकर्त्याचे म्हणणे नाकारले व त्यांच्या सेवेत त्रुटी असल्याचे नाकारले.
5. मंचाने दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकला. दाखल दस्तऐवजांचे सुक्ष्म अवलोकन केले.
-निष्कर्ष-
6. गैरअर्जदार क्र. 1 ने अनुक्रमे पृष्ठ क्र. 45 वर दाखल केलेल्या दस्तऐवजावरुन हे स्पष्ट होते की, तक्रारकर्ता व त्याचे पत्नीस गृहकर्ज र.10,15,000/- मंजूर केले होते. तक्रारकर्त्यास 15 वर्षात गृहकर्जाची परत फेड करावयाची होती. तक्रारकर्त्याने तक्रारीत गृहकर्ज रु.9,75,000/- घेतल्याचे म्हटले. परंतू गैरअर्जदार क्र. 1 ने दाखल दस्तऐवजावरुन गृहकर्ज मंजूर रक्कम रु.10,13,600/- मध्ये रु.9,75,000/- व विमा प्रीमीयम राशी रु.38,600/- संमिलीत आहे व गैरअर्जदार क्र. 1 ने रु.38,600/- चेक क्र.188823 दि.14.02.2008 ला गैरअर्जदार क्र. 2 ला निर्गमित केले. तक्रारकर्त्याने गैरअर्जदार क्र.1 कडून गृहकर्ज व गैरअर्जदार क्र. 2 कडून उपरोक्त पॉलिसी घेतल्याने तक्रारकर्ता त्यांचा ग्राहक ठरतो.
7. तक्रारकर्त्याने म्हटले की, गैरअर्जदार क्र. 1 ने पॉलिसीकरीता रु.38,600/- गैरअर्जदार क्र. 2 ला पाठविल्यानंतर, दस्तऐवज क्र.13 रु.29,309.27 पैसे नमूद आहे, त्यामुळे गैरअर्जदार क्र. 2 ला प्राप्त झालेले अतिरिक्त विमा पॉलिसी हप्त्याची रक्कम रु.9,270.73/- 12 टक्के व्याजासह परत मिळण्याची मागणी केली. हे स्पष्ट झाले की, गैरअर्जदार क्र. 2 ने पॉलिसी प्रीमीयम पोटी अतिरिक्त रक्कम रु.9,290.73 प्राप्त केले, हे त्यांचे कृत्य अनुचित व्यापार पध्दतीत मोडते व ती रक्कम त्यांनी परत न केल्याने ग्राहक सेवेत त्रुटी आहे असे मंचाचे मत आहे व अतिरिक्त रक्कम 12 टक्के व्याजासह गैरअर्जदार क्र. 2 तक्रारकर्त्यास परत करण्यास बाध्य आहे असे मंचाचे स्पष्ट मत आहे.
8. तक्रारकर्त्याने पॉलिसीच्या कॉलम क्र. 1 सेक्शन 1, कॉलम क्र. 1 सेक्शन 3 कडे तसेच पॉलिसी पाईंट 7.3 कडे मंचाचे लक्ष आकर्षीत केले व म्हटले आर्थिक मंदीमुळे ऑक्टोबर 2008 पासून, तक्रारकर्त्यास नोकरी गमवावी लागल्यामुळे गृहकर्जाचे उर्वरित हप्ते गैरअर्जदार क्र. 2 गैरअर्जदार क्र. 1 ला देण्यास बाध्य आहे. मंचाने पॉलिसीच्या कॉलम क्र. 1 सेक्शन 3 मध्ये खालीलप्रमाणे नमूद आहे.
7. Details of the insured event alongwith the benefit (as per table below)
No. | Coverage | | Sum insured |
Loss of job | Loss of employment of insured | EMI | 3 EMI’s |
यावरुन हे स्पष्ट झाले की, विमाधारकाची नौकरी संपुष्टात आल्यावर इएमआयचे तीन हप्ते गैरअर्जदार क्र. 2 गैरअर्जदार क्र. 1 ला देणे बाध्य आहे. तक्रारकर्त्याने वरील रकान्याचा चुकीचा अर्थ काढून तक्रारकर्त्याची नौकरी संपुष्टात आल्यावर गैरअर्जदार क्र. 2 ने गैरअर्जदार क्र. 1 ने उर्वरित कर्ज हप्ते द्यावे हे तक्रारकर्त्याचे म्हणणे मंचाने तथ्यहीन असल्याने नाकारले. विमा पॉलिसीमध्ये ही स्पष्ट तरतूद असतांना 3 इएमआयची रक्कम गैरअर्जदार क्र. 2 देण्यास बाध्य असतांना गैरअर्जदार क्र. 1 ला पाठविली किंवा नाही हे भाष्य गैरअर्जदार क्र. 2 ने केले नाही. त्यामुळे मंचाचे स्पष्ट मत आहे की, 3 इएमआयची रक्कम 1 ऑक्टोबर 2008 पासून 12 टक्के व्याजासह गैरअर्जदार क्र. 2 ने गैरअर्जदार क्र. 1 ला पाठवावी. गैरअर्जदारांच्या त्रुटीमुळे तक्रारकर्त्याला शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- भरपाई व तक्रारीच्या खर्चापोटी रु.3,000/- देणे संयुक्तीक होईल असे मंचाचे स्पष्ट मत आहे. गैरअर्जदार क्र. 1 च्या सेवेत त्रुटी आढळून न आल्यामुळे, त्यांच्याविरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते. म्हणून खालील आदेश.
-आदेश-
1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) गैरअर्जदार क्र. 2 ला आदेश देण्यात येतो की, विमा हप्त्याची रक्कम रु.9,290.73 (रु.38,600/- - रु.29,309.27) दि.14.02.2008 पासून तक्रारकर्त्याचे हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 12 टक्केप्रमाणे द्यावे.
3) गैरअर्जदार क्र. 2 ला आदेश देण्यात येतो की, पॉलिसीच्या अट क्र. 7.3 नुसार 3 ईएमआयची रक्कम 01.10.2008 पासून द.सा.द.शे.12% व्याजासह गैरअर्जदार क्र. 1 च्या गृहकर्ज खात्यात पाठवावे व तशी सूचना तक्रारकर्त्यास द्यावी.
4) गैरअर्जदार क्र. 2 ला आदेश देण्यात येतो की, त्यांच्या ग्राहक सेवेतील त्रुटीमुळे व अनुचित व्यापार पध्दतीच्या अवलंबाने शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु.10,000/- भरपाई व तक्रारीच्या खर्चापोटी रु.3,000/- तक्रारकर्त्याला द्यावे.
5) गैरअर्जदार क्र. 1 च्या सेवेत त्रुटी आढळून न आल्यामुळे, त्यांच्याविरुध्दची तक्रार खारीज करण्यात येते.
6) सदर आदेशाची अंमलबजावणी गैरअर्जदार क्र. 2 ने आदेशाची प्रत मिळाल्यापासून 30 दिवसाचे आत करावी.