निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-* न्यायनिर्णय 1. सा.वाली ही बँक आहे. व तक्रारदाराने सा.वाले बँकेकडून वाहन कर्ज रु.2,78,150/- दिनांक 2005 मध्ये घेतले होते. तक्रारदारांचे तक्रारीतील कथनाप्रमाणे तक्रारदारांनी वाहन कर्जाचा मासीक हप्ते रु.5,850/- सा.वाले यांचेकडे भरले होते. व फक्त दोन हप्ते थकीत राहीले होते. त्याबद्दल सा.वाले यांनी तक्रारदारांना दिनांक 12 सप्टेंबर, 2006 रोजी नोटीस दिली व तक्रारदार सा.वाले यांचेकडे दिनांक 25 सप्टेंबर, 2006 रोजी थकीत रक्कम भरणेकामी घेवून गेले असता सा.वाले यांनी थकीत हप्त्याची रक्कम स्विकारण्यास नकार दिला. त्यानंतर सा.वाले यांनी दिनांक 22.9.2006 रोजी तक्रारदारांचे वाहन जबरदस्तीने ताब्यात घेतले. 2. तक्रारदारांचे तक्रारीतील कथनाप्रमाणे त्यांनी वकीलामार्फत दिनांक 11.10.2006 रोजी सा.वाले यांना पत्र पाठविले व त्यासोबत रु.29,250/- येवढया रक्कमेचा डिमांड ड्राप्ट जोडला होता.तथापी सा.वाले यांनी त्यांचे पत्र 6 फेब्रुवारी, 2007 प्रमाणे तक्रारदार यांना असे कळविले की, तक्रारदारांचे वाहन दिनांक 6 फेब्रुवारी 2007 रोजी विक्री करण्यात आले आहे. 3. तक्रारदारांच्या कथना प्रमाणे सा.वाले यांना तक्रारदारांचे वाहन जबरदस्तीने ताब्यात घेण्याचा व विक्री करण्याचा कुठलाही अधिकार नव्हता. या प्रमाणे सा.वाले यांनी सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा आरोप करुन तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून रु.4 लाखाची नुकसान भरपाईची मागणी केली. 4. सा.वाले बँकेने आपली कैफीयत दाखल केली. व त्यामध्ये असे कथन केले की, तक्रारदारांनी वाहन कर्जाचे हप्ते थकीत ठेवले होते व तक्रारदारांना नोटीस दिल्यावरही त्यांनी थकीत हप्त्याचा भरणा केला नाही. अंतीमतः तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडे वाहन सुपुर्द केले. याप्रमाणे सा.वाले यांनी असे कथन केले की, तक्रारदारांनी स्वेच्छेने वाहन सा.वाले यांच्या ताब्यात दिल्याने सा.वाले यांनी तक्रारदारांना त्यांचे वाहन जबरदस्तीने ताब्यात घेवून सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली हा प्रश्नच निर्माण होत नाही. सा.वाले यांनी असेही कथन केले की, तक्रारदारांनी प्रस्तुतचे वाहन वाणीज्य व्यवसायाकामी खरेदी केलेले असल्याने प्रस्तुत मंचाला तक्रार चालविण्याचा अधिकार नाही. 5. दोन्ही बाजुंनी पुराव्याचे शपथपत्र व कागदपत्र दाखल केले. तसेच लेखी युक्तीवाद दाखल केला. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यानुसार तक्रारीचे निकाली कामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात. क्र. | मुद्दे | उत्तर | 1 | तक्रारदारांनी त्यांचे वाहन वाणीज्य व्यवसायाकामी खरेदी केलेले असल्याने प्रस्तुत मंचाला सदरील तक्रार चालविण्याचा अधिकार नाही व तक्रारदार ग्राहक या संज्ञेत बसत नाही ही बाब सा.वाले सिध्द करतात काय ? | होय. | 2 | सा.वाले यांनी तक्रारदारांचे वाहन जबरदस्तीने ताब्यात घेवून परस्पर विक्री केले व तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही | 3. | अंतीम आदेश | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा 6. तक्रारदारांनी तक्रारीचे परिच्छेद क्रमांक 1 मध्ये असे कथन केलेले आहे की, तक्रारदार हे पर्यटनाचा(Tourist)व्यवसाय करीत होते व त्याकामी तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून कर्ज घेवून वाहन खरेदी केले होते. या प्रमाणे तक्रारदारांनी तक्रारीतच ही बाब मान्य केली आहे की, तक्रारदारांनी खरेदी केलेले वाहन हे वाणीज्य व्यवसायाकामी वापरले जात होते. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतमध्ये प्रस्तुत मंचाचे कार्यक्षेत्राबद्दल आक्षेप घेतल्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले यांच्या कैफीयतीला प्रतिउत्तराचे शपथपत्र दाखल केले. व त्या शपथपत्राचे परिच्छेद क्र.5 मध्ये असे कथन केले की, सदरचे वाहन हे वाणीज्य व्यवसायाकामी वापरले जात होते व मंदीमुळे उत्पन्न कमी झाल्याने तक्रारदारांनी सा.वाले यांना दंड व्याज दिलेले आहे. या प्रमाणे तक्रारीमध्ये तसेच प्रतिउत्तराचे शपथपत्रामध्ये तकारदारांनी हे मान्य केले आहे की, तक्रारदारांनी खरेदी केलेले वाहन वाणीज्य व्यवसायाकामी वापरले जात होते. 7. ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2(1) (ड) प्रमाणे एखाद्या व्यक्तीने वाणीज्य व्यवसायाकामी वस्तु खरेदी केली असेल तर त्या वस्तुच्या तक्रारीच्या संदर्भात ती व्यक्ती ग्राहक या संज्ञेमध्ये बसत नाही. त्यास अपवाद म्हणजे स्वतःचे उपजिवीकेसाठी व स्वतः ती व्यक्ती त्या वस्तुचा वापर करीत असेल तरच ती ग्राहक होऊ शकते. प्रस्तुतचे प्रकरणात तक्रारदारांनी स्वतःहूनच मान्य केले आहे की, पर्यटन (टुरीस्ट) व्यवसायाकामी तक्रारदारांनी ते वाहन खरेदी केले होते. या प्रमाणे तक्रारदार ग्राहक संरक्षण कायद्याचे कलम 2(1) (ड) प्रमाणे सा.वाले यांचे ग्राहक होत नाहीत. तक्रारदार हे ग्राहक या संज्ञेत बसत नसल्याने सदरील ग्राहक मंचास प्रस्तुतची तक्रार चालविण्याचा अधिकार प्राप्त होत नाही. याप्रमाणे मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे. 8. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतमध्ये असे कथन केले आहे की, तक्रारदारांनी कर्जाचे हप्ते थकीत ठेवल्याने तक्रारदारांना नोटीसा देण्यात आल्या होत्या. व त्यानंतर तक्रारदारांनी स्वतःहून दिनांक 22.9.2006 रोजी वाहन सा.वाले यांच्या ताब्यात दिले. वरील कथनाचे पृष्टयर्थ सा.वाले यांनी आपले लेखी युक्तीवादासोबत तक्रारदारांच्या वाहन कर्जाचा खात्याचा उतारा हजर केलेला आहे. त्यामध्ये तक्रारदारांनी वाहन कर्जाचे हप्त्याबद्दल दिलेले धनादेश न वटल्याबद्दलच्या ब-याच नोंदी आहेत. यावरुन तक्रारदारांचे वाहन कर्जाचे बरेच हप्ते थकले होते. व धनादेश वटले जात नव्हते असे दिसून येते. 9. या व्यतिरिक्त सा.वाले यांनी आपले युक्तीवादासोबत संचिकेचे पृष्ट क्र.32 वर तक्रारदारांनी लिहून दिलेल्या प्रत्यार्पण पत्राची प्रत हजर केलेली आहे. ते पत्र दिनांक 22.9.2006 चे अवलोकन केले असताना असे दिसून येते की, तक्रारदारांनी स्वतःहून सा.वाले बँकेकडे आपले वाहन पत्यार्पित( Surrender ) केले होते. तक्रारदारांनी सा.वाले यांचे कैफीयतला जे प्रतिउत्तराचे जे शपथपत्र दाखल केलेले आहे त्यामध्ये कुठेही तक्रारदारांनी त्या पत्रावरील सही नाकारली नाही. तसेच ते पत्र खोटे व बनावट आहे असे आरोप केले नाहीत. 10. सा.वाले यांच्या कैफीयतीमधील कथनास त्यांचे पत्र दिनांक 22.9.2006 यामधील मजकुराने पुष्टी मिळते. त्यामध्ये सा.वाले यांनी असे स्पष्टपणे कथन केले होते की, तक्रारदारांचे वाहन ताब्यात घेतल्याने करार संपुष्टात आला आहे व 7 दिवसामध्ये बाकी रक्कम भरली नाहीतर वाहन विक्री करण्यात येईल. 11. वरील सर्व पुराव्यावरुन असा निष्कर्ष नोंदवावा लागतो की, सा.वाले यांनी तक्रारदारांचे वाहन जबरदस्तीने ताब्यात घेतले व त्यानंतर कमी किंमतीला विकले गेले ही बाब तक्रारदार सिध्द करु शकले नाहीत. एकंदरीत पुराव्याचा साकंल्याने विचार करता सा.वाले यांचे विरुध्द कुठलेही आरोप तक्रारदार सिध्द करु शकले नाहीत. 12. वरील निष्कर्षानुरुप मंच पुढील प्रमाणे आदेश करीत आहे. आदेश 1. तक्रार क्रमांक 509/2007 रद्द करण्यात येते. 2. खर्चाबाबत काही आदेश नाहीत. <!--[if !supportLists]-->4. <!--[endif]-->आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MR. MR.V.G.JOSHI] Member[HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] PRESIDING MEMBER | |