Maharashtra

Sangli

CC/09/1643

M/s Prathamesh World of Titan - Complainant(s)

Versus

ICICI Bank Ltd. - Opp.Party(s)

V.M.Mohite

19 Aug 2013

ORDER

 
Complaint Case No. CC/09/1643
 
1. M/s Prathamesh World of Titan
Through Partner Mr. Dipakrao Ganpatrao Jadhav, 6, Pranam Arcade, Near Ram Mandir, Sangli
...........Complainant(s)
Versus
1. ICICI Bank Ltd.
Branch Bagal Chowk, Kolhapur through the Manager
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
  A.V. Deshpande PRESIDENT
  Smt.V.N.Shinde MEMBER
 
PRESENT:
 
ORDER

 

                                         नि. 30


 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर


 

 


 

 


 

 


 

 


 

 


 

मा.अध्‍यक्ष श्री ए.व्‍ही.देशपांडे


 

मा.सदस्‍या - सौ वर्षा शिंदे


 

ग्राहक तक्रार अर्ज क्र. 1643/2009


 

तक्रार नोंद तारीख   : 06/03/2009


 

तक्रार दाखल तारीख  :  23/03/2009


 

प्रथम निकाल तारीख : 22/12/2009   


 

फेरचौकशीची तारीख : 10/06/2010


 

फेरनिकाल तारीख    : 19/08/2013


 

------------------------------------------------


 

 


 

प्रथमेश (वर्ल्‍ड ऑफ टायटन) तर्फे


 

भागीदार श्री दिपक गणपतराव जाधव


 

पत्‍ता - 6, प्रनाम आर्केड, राममंदीराजवळ, सांगली                ....... तक्रारदार


 

 


 

विरुध्‍द


 

 


 

आय.सी.आय.सी.आय. बॅंक लि.


 

मर्चंट ऑक्‍वारिंग युनिट


 

शाखा- बागल चौक, कोल्‍हापूर


 

तर्फे मॅनेजर                                             ...... जाबदार


 

 


 

तक्रारदार तर्फे : अॅड श्री व्‍ही.एम.मोहिते


 

                              जाबदारतर्फे  :  अॅड श्री जी.व्‍ही.माईणकर 


 

 


 

       


 

- नि का ल प त्र -


 

 


 

द्वारा: मा. अध्‍यक्ष: श्री. ए.व्‍ही.देशपांडे  


 

 


 

1.    प्रस्‍तुतची तक्रार, तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम 12 खाली जाबदार बँकेने दिलेल्‍या सदोष सेवेबद्दल दाखल करुन त्‍यास दूषित सेवेमुळे झालेल्‍या नुकसानीची एकूण नुकसान भरपाई रक्‍कम रु.1,16,800/- व त्‍यावर दि.18/10/09 पासून ती रक्‍कम हाती मिळेपर्यंत द.सा.द.शे. 15 टक्‍के दराने व्‍याज अधिक रु.10,000/- खर्च मागितला आहे.


 

 


 

2.  थोडक्‍यात हकीकत अशी की, तक्रारदार ही भागीदारी फर्म आहे. सदर भागीदारी फर्मचे खाते जाबदार बँकेकडे आहे. जाबदार बँकेने तक्रारदाराच्‍या दुकानामध्‍ये स्‍वॅपिंग मशिन बसविलेले आहे. त्‍या स्‍वॅपींग मशिनद्वारे तक्रारदार आपल्‍या ग्राहकांशी क्रेडीट कार्डद्वारे व्‍यवहार करु शकतो. ज्‍यावेळेला तक्रादाराच्‍या शोरुममध्‍ये येणारे ग्राहक वस्‍तू खरेदी करुन त्‍याची किंमत क्रेडीट कार्डने भरतो, त्‍यावेळेला त्‍याचे क्रेडीट कार्ड जाबदार बँकेने तक्रारदाराच्‍या शोरुममध्‍ये बसविलेल्‍या स्‍वॅपिंग मशिनमध्‍ये स्‍वाईप केले जाते. त्‍यानंतर स्‍वॅपिंग मशिनमधून दोन प्रकारच्‍या रिसीट्स वर येतात. त्‍यावेळेला सदरचे व्‍यवहार करण्‍याकरिता जाबदार बँक तक्रारदारांना संमती देते. त्‍यानंतरच तक्रारदार फर्म सदरचा विक्री व्‍यवहार पूर्ण करुन आपल्‍या ग्राहकांशी त्‍याने विकत घेतलेल्‍या वस्‍तू देते. जर स्‍वॅपिंग मशिनमधून रिसीट आली नाही तर सदर विक्रीचा व्‍यवहार तक्रारदार पूर्ण करीत नाही आणि वस्‍तू ग्राहकास देत नाही. सदर विक्री व्‍यवहाराची संबंधीत येणे असणारी रक्‍कम संबंधीत ग्राहकाच्‍या बँकेतील खात्‍यातून जाबदार बँकेत जमा होते व त्‍या रकमेतून 1.67 टक्‍के एवढी रक्‍कम प्रत्‍यक्ष व्‍यवहारापोटी जाबदार बँक सदर सेवेचे शुल्‍क (कमिशन) म्‍हणून वजा करुन उर्वरीत रक्‍कम तक्रारदार यांच्‍या खात्‍यावर जमा करते. अशा प्रकारची बँकींग सेवा जाबदार बँकेने तक्रारदारास दिलेली आहे व देत आहे. 


 

 


 

3.    तक्रारदाराचे असे कथन आहे की, दि.18/1/09 रोजी दोन अज्ञात ग्राहक श्री व सौ दर्शन शहा उर्फ हानिफ मोहूद कालशेखर व सौ समन हानिफ कालशेखर हे तक्रारदाराचे शोरुममध्‍ये घडयाळ खरेदी करण्‍याकरिता आले. त्‍यांनी एकूण रु.1,16,800/- ची घडयाळे तक्रारदाराच्‍या फर्ममधून विकत घेतली व त्‍यांचे किंमतीचे पेमेंट करण्‍याकरिता एच.डी.एफ.सी. बँकेचे क्रेडीट कार्ड तक्रारदारांना दिले. सदरचे कार्ड स्‍वॅपिंग मशिनमध्‍ये स्‍वाईप केल्‍यानंतर जाबदार बँकेने सदर व्‍यवहारास संमती दिली व स्‍वॅपिंग मशिनमधून नेहमीप्रमाणे ग्राहकाची प्रत आणि व्‍यापा-याची प्रत अशा दोन पावत्‍या बाहेर आल्‍या. त्‍यानंतर तक्रारदार यांनी सदर विक्रीचा व्‍यवहार पूर्ण केला. सदर ग्राहकाने एकूण 3 मनगटी घडयाळे त्‍यापैकी एक सोन्‍याचे व दोन रागा दिवा मॉटेलचे लेडीज वापराची घडयाळे व एक सोन्‍याच्‍या मनगटी घडयाळयाचा पट्टा विकत घेतला. त्‍याच दिवशी अन्‍य तीन क्रेडीट कार्ड धारकांनी तक्रारदाराच्‍या शोरुममधून घडयाळांची खरेदी केली व क्रेडीट कार्डमार्फत पेमेंट केले. असे एकूण 4 व्‍यवहार क्रेडीट कार्डद्वारे जाबदार यांचेमार्फत दि.18/1/09 रोजी करण्‍यात आले. तद्नंतर तक्रारदाराने सदरचे क्रेडीट कार्डद्वारे झालेल्‍या 4 विक्री व्‍यवहारांची रक्‍कम जमा झाली आहे का हे बघण्‍याकरिता जाबदार बँकेतून सेटलमेंट रिपोर्ट घेतला असता सर्व व्‍यवहारांची रक्‍कम तक्रारदार यांच्‍या खात्‍यावर जमा झालेली आहे असे तक्रारदारास सेटलमेंट रिपोर्टद्वारे कळविण्‍यात आले. परंतु दि.19/1/09 रोजी तक्रारदाराचे खात्‍यावर सदर चार व्‍यवहारांची रक्‍कम जमा झाली आहे का याबाबत जाबदार बँकेकडे चौकशी केली असता तक्रारदार यांनी सदर अज्ञात ग्राहकांनी खरेदी केलेल्‍या घडयाळांची एकूण किंमत रु.1,16,800/- तक्रारदाराचे खात्‍यावर जमा झाले नसल्‍याचे तक्रारदाराला समजून आले. मात्र सदर व्‍यवहाराबद्दलचे कमिशन रक्‍कम 1.67 टक्‍के मात्र दि.18/1/09 रोजी तक्रारदार यांच्‍या शोरुममधून झालेल्‍या इतर अन्‍य विक्री व्‍यवहारांच्‍या रकमेतून कपात करण्‍यात आल्‍याचे तक्रारदाराच्‍या निदर्शनास आले. तक्रारदार यांना जाबदार बँकेने सदरचा विक्री व्‍यवहार करण्‍याबाबत स्‍वॅपिंग मशिनमधील रिसीटने कळविल्‍याने तक्रारदार यांनी सदरचा विक्री व्‍यवहार पूर्ण करुन खरेदी केलेल्‍या वस्‍तू संबंधीत ग्राहकाच्‍या ताब्‍यात दिलेल्‍या आहेत. परंतु जाबदार बँकेने सदर विक्री व्‍यवहाराची रक्‍कम रु.1,16,800/- तक्रारदार यांना दिलेली नाही. अशा प्रकारे जाबदार यांनी तक्रारदारांना दूषित सेवा दिलेली असून अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केलेला आहे, त्‍यामुळे तक्रारदार यांचे रक्‍कम रु.1,16,800/- चे नुकसान झालेले आहे. तक्रारदार यांनी आपल्‍या वकीलामार्फत दि.23/1/09 रोजी रजि.पोस्‍टाने जाबदार बँकेस नोटीस पाठवून सदर सेवेतील त्रुटीने झालेल्‍या तक्रारदाराच्‍या नुकसानीपोटी रक्‍कम रु.1,16,800/- ची व्‍याजासह मागणी केली. सदर नोटीस जाबदार यांना मिळून देखील जाबदार बँकेने त्‍याची पूर्तता केली नाही व नोटीसीस उत्‍तर देखील दिलेले नाही. सबब तक्रारदारास ही तक्रार दाखल करणे भाग पडले आहे. अशा कथनांवरुन तक्रारदाराने वर नमूद केलेप्रमाणे तक्रारअर्जात मागणी केलेली आहे.


 

 


 

4.    सुरुवातीला प्रस्‍तुतची तक्रार जाबदारविरुध्‍द एकतर्फा चालवून दि.22/12/09 रोजी एकतर्फा निकाल झाला व तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात आली. त्‍या निकालाविरुध्‍द जाबदार बँकेने मा.राज्‍य आयोगाकडे प्रथम अपिल क्र.194/10 दाखल केले. त्‍या अपिलाचा निकाल दि.7/4/10 रोजी लागून या मंचाचा आदेश रद्दबातल करण्‍यात आला व प्रस्‍तुतची तक्रार जाबदार बँकेस आपली लेखी कैफीयत दाखल करुन, पुरावा देण्‍याची संधी देवून, पुन्‍हा निर्णीत करण्‍याकरिता या मंचाकडे परत पाठविण्‍यात आली. उभय पक्षकारांना या मंचासमोर दि.10/6/10 रोजी हजर राहण्‍यास फर्माविण्‍यात आले.  


 

 


 

5.    मा. राज्‍य आयोगाच्‍या आदेशाप्रमाणे उभय पक्षकार या मंचासमोर हजर झालेनंतर जाबदार बँकेने आपली लेखी कैफियत नि.16 वर दाखल केली व तक्रारदाराची संपूर्ण तक्रार अमान्‍य केली. जाबदार बँकेचे म्‍हणणेप्रमाणे तक्रारदाराने प्रस्‍तुत प्रकरणामध्‍ये वस्‍तुस्थिती मंचापासून लपवून ठेवून, खोटया बाबी मांडून, सदर तक्रार दाखल केलेली आहे, त्‍यामुळे ही तक्रार मंजूर होण्‍यास पात्र नाही. तक्रारदार ग्राहक होऊ शकत नाही. त्‍यामुळे प्रस्‍तुतची तक्रार या मंचासमोर चालू शकत नाही. जाबदार बँकेने तक्रारदाराच्‍या शोरुममध्‍ये सदरचे क्रेडीट कार्ड टर्मिनल हे व्‍यापारी उद्देशाकरिता बसविलेले आहे. तक्रारदार भागीदारी फर्म ही सदरचे शोरुम हे व्‍यापारी तत्‍वावर चालविते. ही भागीदारी फर्म आहे. त्‍यामुळे शोरुममध्‍ये चालत असणारा व्‍यवसाय हा स्‍वयंरोजगारासाठी चालविलेला व्‍यवसाय असू शकत नाही. जाबदार बँकेने बसविलेली सुविधा तक्रारदार आपल्‍या व्‍यापारी उद्देशाकरिता वापरीत होता. त्‍यामुळे प्रस्‍तुतची तक्रार या मंचासमोर चालू शकत नाही. तक्रारदारास जाबदारांनी कोणतीही चुकीची सेवा दिलेली नाही किंवा अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केलेला नाही. तक्रारदाराने आपल्‍या चुकीवर पांघरुण घालण्‍याकरिता जाबदारांवर ठपका ठेवण्‍याचा प्रयत्‍न केलेला आहे. जाबदार बँकेने तक्रारदाराच्‍या शोरुममध्‍ये क्रेडीट कार्ड स्‍वॅपिंग मशिन बसविलेले आहे ही बाब जाबदार बँकेने मान्‍य केली आहे. जाबदार बँकेने आपल्‍या लेखी कैफियतीमध्‍ये सदरचे स्‍वॅपिंग मशिन वापरण्‍याची कार्यपध्‍दती विशद केली आहे. ही कार्यपध्‍दती प्रस्‍तुत प्रकरणामध्‍ये महत्‍वाची असल्‍याने ती याचठिकाणी विस्‍तृतपणे नमूद करणे आवश्‍यक असल्‍याचे या मंचाचे मत आहे. त्‍या कार्यपध्‍दतीप्रमाणे तक्रारदार आणि जाबदार बँक यांचेमध्‍ये एक करार होवून त्‍या करारानुसार तक्रारदाराचे शोरुममध्‍ये स्‍वाईप मशिन बसविण्‍यात आलेले आहे. सदर करारास Merchant Establishment Agreement असे म्‍हणतात. सदरचे दि.1/3/2006 चे Merchant Establishment Agreement प्रस्‍तुत प्रकरणात जाबदार बँकेने दाखल केलेले आहे. अशी सुविधा ज्‍या ठिकाणी बँकेने दिलेली आहे, त्‍या ठिकाणी ग्राहकाने वस्‍तू विकत घेतल्‍यानंतर त्‍या वस्‍तूची किंमत प्रदान करण्‍याकरिता जर तक्रारदाराचे ग्राहकाने आपले क्रेडीट कार्ड हजर केले तर ते क्रेडीट कार्ड स्‍वाईप मशिनमधून स्‍वाईप केले जाते व स्‍वाईप केल्‍यानंतर संगणकाद्वारे त्‍या व्‍यवहाराची माहिती जाबदार बँकेच्‍या मुख्‍य सर्व्‍हरला मिळते. जर सदरचा व्‍यवहार हा फार थोडया रकमे‍करिता असेल तर संबंधीत व्‍यापा-याने बँकेकडून मान्‍यता (Authorisation) घेणे आवश्‍यक आहे. हे Authorisation/मान्‍यता सदरच्‍या क्रेडीट कार्डच्‍या वैधतेबद्दल, अशा क्रेडीट कार्डधारकाच्‍या क्रेडीट लिमिटचे माहितीबद्दल आणि सदर क्रेडीट कार्ड धारकाजवळ त्‍याच्‍या खात्‍यामध्‍ये पुरेशी रक्‍कम आहे किंवा नाही हे पड‍ताळून बघण्‍याकरिता जरुरी असते. मोठया रकमेच्‍या व्‍यवहाराकरिता आवश्‍यक असणारे Authorisation हे मानवी कृतीने (Manually) टेलिफोनवरुन विचारणा करुन घेतली जाते. अशी मान्‍यता देताना संबंधीत व्‍यापा-यास ऑथोरायझेशन नंबर दिला जातो आणि त्‍यानंतर संबंधीत व्‍यापारी आपला व्‍यवहार पूर्ण करतात. प्रत्‍येक दिवशी संबंधीत व्‍यापा-यास संबंधीत मशिनवरुन केलेल्‍या व्‍यवहाराची माहिती व विकल्‍या गेलेल्‍या मालाच्‍या किंमतीची माहिती Authorisation नंबरसह जाबदार बँकेकडे जमा करावी लागते. त्‍यानंतर जाबदार बँक मशिनवर नोंदणी झालेल्‍या व्‍यवहाराच्‍या रकमा व्‍यवहार पूर्ण झालेनंतर दोन दिवसांत संबंधीत व्‍यापा-याच्‍या खात्‍यावर जमा करतात. क्रेडीट कार्डशी संबंधीत असणारे व्‍यवहार हे “ Visaकिंवा  “Master Cardया क्रेडीट कार्ड संस्‍थांच्‍या मुख्‍य सर्व्‍हरमार्फत केले जातात. “ Visaकिंवा  “Master Card, हे झालेले व्‍यवहार संबंधीत बँकेमध्‍ये क्लिअरिंग हाऊस पध्‍दतीने पूर्ण करतात. त्‍यानंतर ज्‍या बँकेने ग्राहकास क्रेडीट कार्ड दिले आहे, ती बँक जाबदार बँकेला सदर व्‍यवहाराची रक्‍कम अदा करते आणि अशा अदा केलेल्‍या रकमा आपल्‍या ग्राहकाकडून म्‍हणजे क्रेडीट कार्ड धारकाकडून वसूल करते. मात्र अगोदरच जाबदार बँक ज्‍या व्‍यापा-याकडे स्‍वॅपिंग मशिन बसविलेले आहे, अशा व्‍यापा-यास आधीच त्‍या व्‍यवहाराची रक्‍कम प्रदान करीत असते. ज्‍या ज्‍या वेळेला एखादा ग्राहक एखाद्या व्‍यवहारासंबंधी काही आक्षेप नोंदवितो, त्‍या त्‍या वेळेला अशा कार्ड धारकाची बँक “ Visaकिंवा  “Master Card या कंपन्‍यांवर त्‍याचा बोजा ठेवतात आणि “ Visaकिंवा  “Master Card या क्रेडीट कार्ड कंपन्‍या त्‍या रकमेची मागणी जाबदार बँकेकडून करतात आणि त्‍यानंतर जाबदार बँक संबंधीत व्‍यापा-याकडून त्‍या व्‍यवहाराची रक्‍कम वसूल करते. ही सर्व प्रक्रिया संगणकाद्वारे (electronic) होते. स्‍वाईप कार्ड मशिन्‍स या, मेन सर्व्‍हरला इंटरनेटद्वारे जोडली जात असल्‍याने, ज्‍या ठिकाणी स्‍वाईप मशिन बसविलेली आहे, अशा व्‍यापारी प्रतिष्‍ठानाला त्‍या मशिनद्वारे दिवसभरात केलेल्‍या व्‍यवहारांची यादी तयार करण्‍याकरीता व हिशेब करण्‍याकरिता सदर मशिनमध्‍ये “Offline”  प्रकारची सुविधा देण्‍यात आलेली असते. या ऑफलाईन फॅसिलीटीमध्‍ये बिले छापण्‍याची देखील सुविधा दिलेली असते. व्‍यापारी प्रतिष्‍ठाण ही ऑफलाईन सुविधा त्‍यांच्‍या रेकॉर्डकरीता व्‍यवहारांच्‍या प्रती तयार करणे, बिलांची छपाई करणे इ. कामाकरिता करु शकते. ज्‍याप्रमाणे एखादी व्‍यक्‍ती आपला वैयक्तिक संगणक आपल्‍या वैयक्तिक कामाकरिता किंवा इंटरनेटवर काम करण्‍याकरिता वापरु शकतो आणि ज्‍यावेळेला तो इंटरनेट बंद करुन आपला संगणक आपल्‍या वैयक्तिक कामाकरिता वापरतो, त्‍या वेळेला त्‍यास ऑफलाईन वर्कींग असे म्‍हणतात. त्‍याचप्रमाणे स्‍वाईप मशिन ज्‍यावेळेला व्‍यापारी वर नमूद केल्‍याप्रमाणे इतर कामाकरिता वापरतो, त्‍यास Offline Transaction  असे म्‍हटले जाते. प्रत्‍येक दिवशीच्‍या शेवटाला असे व्‍यापारी प्रतिष्‍ठाण स्‍वॅपिंग मशिनच्‍या सहाय्याने झालेल्‍या सर्व व्‍यवहारांची यादी करते, त्‍या त्‍या व्‍यवहारांच्‍या स्‍लीपा देखील मशिनमधून घेवू शकते आणि त्‍यानंतर संपूर्ण व्‍यवहारांच्‍या रकमेची बेरीज करुन ती यादी बँकेत जमा करते. हे करीत असताना संबंधीत व्‍यापारी स्‍वॅपिंग मशिन ऑफलाईन मोडमध्‍ये ठेवतो आणि सदर काम पूर्ण झालेनंतर पुन्‍हा सदरचा व्‍यापारी हा ऑनलाईन मोडमध्‍ये मशिन सुरु करतो आणि या सर्व व्‍यवहारांची माहिती मेन सर्व्‍हरला त्‍या मशिनद्वारे पाठवितो. त्‍यामुळे ज्‍या ज्‍या वेळेला मशिन ऑफलाईन असताना एखाद्या व्‍यापा-याने त्‍या मशिनमध्‍ये कार्ड स्‍वाईप केले, त्‍यात नोंद घेतली किंवा व्‍यवहाराची स्‍लीपदेखील मशिनकडून प्राप्‍त केली आणि जरी त्‍या मशिनमधून चार्ज स्‍लीप दिली, तरीही अशा ऑफलाईन मोडच्‍या झालेल्‍या व्‍यवहाराची माहिती बँकेच्‍या मेन सर्व्‍हरला मिळत नाही आणि संबंधीत क्रेडीट कार्डवर सदर व्‍यवहाराची नोंद होत नाही. त्‍याचप्रमाणे ऑफलाईन झालेला व्‍यवहार जर अयोग्‍य आणि ऑथोरायझेशन घेतला नसेल किंवा त्‍यास योग्‍य तो ऑथोरायझेशन नंबर दिलेला नसेल तर त्‍या वेळेला अशा व्‍यवहाराबद्दलची रक्‍कम जाबदार बँकेकडून दिली जात नाही. प्रस्‍तुत प्रकरणात जानेवारी 18, 2009 रोजी रु.1,16,800/- रकमेच्‍या वस्‍तू एका ग्राहकाने तक्रारदाराकडून विकत घेतल्‍या व त्‍याची किंमत क्रेडीट कार्डने देण्‍याचा प्रयत्‍न केला. या व्‍यवहाराचे वेळेला सदरची स्‍वॅपिंग मशिन ऑफलाईन मोडमध्‍ये होती व त्‍यामुळे सदरच्‍या व्‍यवहाराची नोंद ही Offline transaction  अशी चार्ज स्‍लीपवर झाल्‍याचे स्‍पष्‍ट दिसते. जाबदार बँकेचे म्‍हणण्‍याप्रमाणे कदाचित तक्रारदाराच्‍या शोरुममध्‍ये काम करणारा कोणीतरी हा सदरचा व्‍यवहार करणा-या ग्राहकासोबत संगनमत करुन होता किंवा निष्‍काळजी होता. त्‍याचे कारण असे की, ज्‍या मशिनवर सदर व्‍यवहार नोंदविला गेला, त्‍या मशिनवर ऑथोरायझेशन नंबर नव्‍हता. सदरचा व्‍यवहार हा ऑफलाइन मोडमध्‍ये झालेला असल्‍याने, बँकेच्‍या सर्व्‍हरवर त्‍याची नोंद झालेली नसल्‍याने तसेच त्‍या व्‍यवहाराकरिता योग्‍य तो ऑथोरायझेशन नंबर जाबदार बँकेने दिलेला नसल्‍याने, जाबदार बँकेने त्‍या व्‍यवहाराबद्दलची रक्‍कम अडवून ठेवली आणि तक्रारदाराच्‍या खात्‍यात जमा केली नाही. जाबदार बँकेला एखाद्या क्रेडीट कार्ड किंवा डेबीट कार्डवर झालेल्‍या व्‍यवहाराची रक्‍कम जर त्‍या व्‍यवहाराबद्दल काही शंका उपस्थित होत असतील तर अशा वेळेला अडवून ठेवण्‍याचा अधिकार आहे. जाबदार बँकेचे आणि क्रेडीट कार्ड वापरणा-या धारकाचे हितसंबंध जोपासण्‍याकरिता अशा व्‍यवहारातील रक्‍कम बँकेकडून ठेवली जावू शकते. प्रस्‍तुत प्रकरणात चौकशी केल्‍यानंतर असे दिसून आले की, सदरचा व्‍यवहार हा ऑफलाईन मोडमध्‍ये होता आणि त्‍यामुळे तो व्‍यवहार बेकायदेशीर होता आणि त्‍यामुळे त्‍या व्‍यवहाराची रक्‍कम जाबदार बँक देवू शकत नव्‍हती. तक्रारदार व जाबदर बँक यांचेमध्‍ये झालेल्‍या कराराच्‍या अट क्र.7(A)(v) अन्‍वये एखाद्या व्‍यवहाराबद्दल काही शंका निर्माण होत असतील किंवा त्‍या व्‍यवहाराबद्दल जर काही आक्षेप घेण्‍यात आले असतील, तर अशा व्‍यवहाराची रक्‍कम देण्‍यास जाबदार बँक नकार देवू शकते. संबंधीत व्‍यवहार हा ऑफलाईन मोडमध्‍ये जाबदार बँकेकडून योग्‍य ते ऑथोरायझेशन न घेता केलेला आहे व त्‍यासंबंधीची कागदपत्रेदेखील जाबदार बँकेला सादर करण्‍यात आलेली नव्‍हती. चार्ज बॅकची पूर्तता न केल्‍याने जाबदार बँकेने तक्रारदाराच्‍या खात्‍यात काही रक्‍कम करारातील अट क्र.5/1 च्‍या शर्तीनुसार नावे टाकली. जाबदार बँकेने तक्रारदारास कोणतीही दूषित सेवा दिलेली नाही. त्‍यामुळे तक्रारदारास जाबदार बँक कोणतीही नुकसान भरपाई देणे लागत नाही. सबब तक्रार खर्चासह नामंजूर करावी अशी मागणी जाबदार बँकेने केली आहे.



 

6.    तक्रारदाराने आपल्‍या तक्रारअर्जाचे पुष्‍ठयर्थ नि.3 ला आपल्‍या भागीदाराचे शपथपत्र दाखल करुन नि.5 चे फेरिस्‍तसोबत एकूण 7 कागदपत्रे दाखल केली आहेत, तर जाबदार बँकेने नि.16 ला आपले सर्व्हिस मॅनेजर श्री सागर राजगुरु यांचे शपथपत्र दाखल करुन नि.20 चे फेरिस्‍तसोबत एकूण 2 कागदपत्रे दाखल केलेली आहे. तक्रारदाराने नि.22ए सोबत तक्रारदार व जाबदार यांचेमध्‍ये झालेला दि.1 मार्च 2006 च्‍या कराराची प्रत व तक्रारदार यांच्‍या शोरुमचे शॉप अॅक्‍ट लायसेन्‍स दाखल केले आहे. तक्रारदाराने सुरुवातीला आपले पुराव्‍याचे शपथपत्र नि.21 ला दाखल करुन त्‍यात तक्रारअर्जातील सर्व कथने शपथेवर नमूद केली आहेत. त्‍या पुराव्‍यावर आधारीत राहून प्रस्‍तुत तक्रार ही दि.22/12/09 रोजी मंजूर करण्‍यात आली होती. तथापि तो निकाल रद्दबातल झालेनंतर व तक्रार फेरचौकशीकरीता या मंचाकडे आल्‍यानंतर तक्रारदाराने कोणताही नवीन पुरावा दिलेला नाही. जाबदार बँकेने नि.23 व नि.28 ला श्री सागर पद्माकर राजगुरु यांचे शपथपत्र दाखल केले आहे.



 

7.    प्रस्‍तुत प्रकरणी आम्‍ही तक्रारदारांचे विद्वान वकील श्री व्‍ही.ए.मोहिते व जाबदार बँकेचे विद्वान वकील श्री जी.व्‍ही.माईणकर यांचा युक्तिवाद ऐकून घेतला.


 

 


 

8.    प्रस्‍तुत प्रकरणी खालील मुद्दे आमच्‍या निष्‍कर्षासाठी उपस्थित होतात.



 

              मुद्दे                                                   उत्‍तरे


 

 


 

1. तक्रारदार ग्राहक होतो काय ?                                         होय.


 

 


 

2. जाबदार बँकेने तक्रारदारास दूषित सेवा दिली हे तक्रारदाराने


 

  शाबीत केले आहे काय ?                                               नाही.


 

 


 

3. तक्रारदारास अर्जात मागणी केल्‍याप्रमाणे रकमा मिळणेस ते


 

   पात्र आहेत काय ?                                                      नाही.


 

 


 

4. अंतिम आदेश                                                   खालीलप्रमाणे.


 

 


 

 


 

9.    आमच्‍या वरील निष्‍कर्षांची कारणे खालीलप्रमाणे आहेत.



 

 


 

:- कारणे -:


 

मुद्दा क्र.1  


 

 


 

10.   वर नमूद केलेप्रमाणे जाबदार बँकेने तक्रारदार ही ग्राहक संज्ञेत येत नाही, सबब प्रस्‍तुत तक्रार कायद्याने चालू शकत नाही अशी केस मांडली आहे. तक्रारदार ही भागीदारी फर्म आहे ही बाब तक्रारदार मान्‍य करतात. जाबदार बँकेने हजर केलेल्‍या तक्रारदाराच्‍या दुकानाच्‍या शॉप अॅक्‍ट लायसेन्‍सवरुन हे स्‍पष्‍ट दिसते की, तक्रारदार ही एक भागीदारी फर्म आहे. सदरची भागीदारी फर्म ही टायटन या घडयाळयाचे अधिकृत शोरुम सांगली शहराकरिता आहे व तेथे त्‍या कंपनीची घडयाळे विकली जातात ही बाब देखील दोन्‍ही पक्षांना मान्‍य आहे. या बाबीवर विसंबून राहून जाबदार बँकेचे विद्वान वकील श्री माईणकर यांनी असे हिरीरीने प्रतिपादन केले की, तक्रारदार ही व्‍यापारी संस्‍था असून त्‍या व्‍यापारी उद्देशाच्‍या सुविधेकरिता जाबदार बँकेने त्‍या शोरुममध्‍ये बसविलेले स्‍वाईप मशिन सुविधेचा उपयोग तक्रारदार फर्म करते. त्‍यामुळे त्‍या सुविधेचा उपयोग हा व्‍यापारी कारणाकरिता केला जातो. सबब तक्रारदार ही ग्राहक संरक्षण कायद्याने विहित केलेल्‍या ग्राहक या संज्ञेत येत नाही, सबब प्रस्‍तुतची तक्रार चालणेस पात्र नाही. याउलट तक्ररदाराचे विद्वान वकील श्री व्‍ही.बी.मोहिते यांनी असे प्रतिपादन केले की, जरी तक्रारदार ही भागीदारी फर्म असली तरी ती कायद्याने प्रस्‍थापित झालेली एक व्‍यक्‍ती आहे (statutory person) आणि ती जाबदार बँकेकडून सेवा घेते. त्‍या सेवेचे स्‍वरुप हे व्‍यापारी स्‍वरुपाचे नाही. त्‍यामुळे तक्रारदार व जाबदार बँक यांचेमध्‍ये ग्राहक व सेवा देणारे असे नाते निर्माण होते. सबब प्रस्‍तुत प्रकरणाकरिता तक्रारदार हे ग्राहक या संज्ञेत मोडतात. त्‍यामुळे प्रस्‍तुतची तक्रार ही चालणेस पात्र आहे व ती खारीज करता येत नाही. तक्रारदाराचे विद्वान वकीलांनी मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या Standard Chartered Bank Ltd. Vs. B.N. Raman (2006) (Mh.L.J.) Page 19मध्‍ये प्रसिध्‍द झालेल्‍या न्‍यायनिर्णयाचा आधार घेतला. सदर न्‍यायनिर्णयामध्‍ये मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने असे नमूद केले आहे की,


 

The Consumer Protection Act, 1986 provides for formation of the National Commission, the State Commission and the District Forum. These are remedial agencies. Their functions are quasi-judicial. The purposes of these powers of statutory bodies are within the purview of the Act. The functions of such statutory bodies come under the term “service” under Section 2(1)(o) of the Act. Banking is a commercial function. “Banking” means acceptance, for the purposes of lending or investment of deposit of money from the public, repayable on demand or otherwise (see section 5(b) of the Banking Regulation Act, 1949). The intention of the 1986 Act is to protect consumers of such services rendered by the banks. Banks provide or render service/facility to its customers or even non-customers. They render facilities/services such as remittances, accepting deposits, providing for lockers, facility for discounting of cheques, collection of cheques, issue of bank drafts, etc. In Vimal Chandra Grover Vs. Bank of India, (2000) 5 SCC 122, this Court has held that banking is business transaction between the bank and the customers. Such customers are consumers within the meaning of Section 2(1)(d)(ii) of the Act.


 

 


 

11.   मा.सर्वोच्‍च न्‍यायालयाने वर नमूद केलेल्‍या Vimal Chandra Grover Vs. Bank of Indiaया न्‍यायनिर्णयात हे स्‍पष्‍टच केले आहे की, बॅंकींग हे बँक आणि तिचे ग्राहकांमधील एक व्‍यापारी व्‍यवहार आहेत आणि असे ग्राहक हे ग्राहक हे ग्राहक संरक्षण कायद्याच्‍या कलम   2(1)(d)(ii) या कलमाखाली ग्राहक होतात. त्‍यामुळे जरी तक्रारदार ही एक भागीदारी फर्म असली तरी ती जाबदार बँकेशी व्‍यवहार करते, त्‍यामुळे तक्रारदार ही ग्राहक आहे. सबब वर नमूद केलेल्‍या मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी द्यावे लागेल असे या मंचाचे मत आहे. करिता आम्‍ही वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्‍तर होकारार्थी दिले आहे.



 

मुद्दा क्र.2



 

12.   प्रस्‍तुत प्रकरणामध्‍ये बहुतांश Facts / बाबी या जाबदार बँकेने मान्‍य केलेल्‍या आहेत. संबंधीत व्‍यवहाराची रक्‍कम रु.1,16,800/- जाबदार बँकेने तक्रारदारास अदा केली नाही ही बाब जाबदार बँकेने मान्‍य केली आहे. त्‍याची कारणे देखील जाबदार बँकेने आपल्‍या लेखी कैफियतीमध्‍ये विस्‍तृतपणे मांडलेले आहे व ती कारणे जाबदार बँकेचे साक्षीदार श्री सागर राजगुरु यांनी शपथेवर नमूद केली आहेत. तक्रारदाराने जाबदारचे साक्षीदाराचा उलटतपास घेतलेला नाही. तक्रारदाराने जी फेरिस्‍त नि.5 सोबत कागदपत्रे दाखल केली आहेत, त्‍यात दि.18/1/09 च्‍या घडयाळे विक्रीच्‍या व्‍यवहारासंबंधीची चार्ज स्‍लीप फेरिस्‍त नि.5/3 ला दाखल केलेली आहे. त्‍या चार्ज स्‍लीपवर “Self sale offline” असे स्‍पष्‍टपणे नमूद केले आहे. Offline Transaction आणि Online Transaction म्‍हणजे काय याचे विस्‍तृत विवेचन जाबदार बँकेने आपल्‍या लेखी कैफियतीत केले आहे व ते जाबदार बँकेचे साक्षीदाराने आपल्‍या शपथपत्रामध्‍ये शपथेवर उध्‍दृत केले आहे. जाबदार बँकेने तक्रारदार व जाबदार बँक यांचेमध्‍ये स्‍वाईप मशिन बसविलेबद्दल दि.1/3/06 चे Merchant Establishment Agreement या कराराची प्रत प्रकरणात दाखल केलेली आहे. त्‍या कराराचे अवलोकन करता तक्रारदार संस्‍थेस या करारामध्‍ये मर्चंट असे संबोधले आहे तर जाबदार बँकेस Acquiring Bank असे संबोधले आहे. त्‍या करारामध्‍ये customer, customer charge slips, equipment, floor limit, sales commission fee, valid card  इत्‍यादींच्‍या व्‍याख्‍या दिलेल्‍या आहेत. चार्ज स्‍लीप्‍स म्‍हणजे जाबदार बँकेने तक्रारदारास दिलेल्‍या स्‍लीप्‍स, ज्‍यावर झालेल्‍या व्‍यवहाराच्‍या नोंदी करुन तक्रारदाराने बँकेकडून पैसे वसूल करावेत. सदर कराराच्‍या कलम 4.1 अन्‍वये तक्रारदारावर प्रत्‍येक व्‍यवहाराकरिता जाबदार बँकेकडून बँकेने बसविलेल्‍या मशिनमार्फत ऑथोरायझेशन घेण्‍याची जबाबदारी टाकली आहे. कलम 4.2 अन्‍वये, काही विशिष्‍ट परिस्थितीमध्‍ये अशी मान्‍यता मानवी कृतीने जाबदार बँकेकडून घेण्‍याची जबाबदारी ही तक्रारदारावर टाकण्‍यात आली आहे. ज्‍यावेळी एकाच दिवसामध्‍ये संबंधीत मशीनवर निर्माण करण्‍यात आलेला बोजा हा जाबदार बँकेने मान्‍य केलेल्‍या विहीत सीमेपेक्षा जास्‍त असेल तर किंवा तक्रारदारास रकमेचे भुगतान उशिरा करावयाचे असेल तर किंवा संबंधीत ग्राहक वैध क्रेडीट कार्ड हजर करु शकत नसेल तर किंवा तक्रारदारास ग्राहकाने हजर केलेले कार्ड हे बनावट, चोरलेले किंवा हरविले असल्‍याबद्दल शंका आली असेल तर किंवा असे कार्ड व्‍यापा-यासमोर हजर करताना काही संशयास्‍पद परिस्थिती निर्माण झाली असेल तर संबंधीत व्‍यापा-याने बँकेकडे मानवी कृतीने सदर व्‍यवहाराला मान्‍यता घेण्‍याचे सदर करारात नमूद केलेले आहे. संबंधीत कराराला बँकेकडून कशा पध्‍दतीने ऑथोरायझेशन घेतले जाते हे आम्‍ही वर विस्‍तृतपणे नमूद केलेले आहे. विस्‍तारभयापोटी त्‍याचा पुनरुच्‍चार याठिकाणी आम्‍ही टाळला आहे. अशा व्‍यवहाराला मान्‍यता देण्‍याचे काम जरी मुख्‍य सर्व्‍हरमार्फत म्‍हणजे ऑनलाईन पध्‍दतीने झाले तरी मान्‍यता देण्‍याची संपूर्ण प्रक्रिया ही क्षणभरच होती आणि त्‍यानंतर बँक संगणकाद्वारे मान्‍यता देते आणि मान्‍यता दिल्‍यानंतर संबंधीत मशिनमधून चार्ज स्‍लीपा येतात. त्‍यापैकी एकावर संबंधीत ग्राहकाची सही घेतली जाते आणि ती स्‍लीप व्‍यापारी आपल्‍या जवळ ठेवतो आणि दुसरी प्रत संबंधीत ग्राहकाला दिली जाते. कार्डच्‍या उपयोगाबाबत काही संशयास्‍पद स्थिती असेल तर संबंधीत ग्राहकाने बँकेस फोनवर किंवा इतर पध्‍दतीने संपर्क साधून संबंधीत व्‍यवहाराबद्दल मान्‍यता घ्‍यावी असे या करारावरुन दिसते. जर मान्‍यता देण्‍याची प्रक्रिया संगणकाद्वारे झाली तर त्‍यास ऑनलाईन व्‍यवहार म्‍हणतात असे जाबदार बँकेचे विद्वान वकीलांचे प्रतिपादन आहे. ज्‍यावेळेला संबंधीत व्‍यवहाराची मान्‍यता ही मानवी हस्‍तक्षेपाने घेतली जाते, त्‍या ठिकाणी बँकेकडून ऑथोरायझेशन नंबर दिला जातो आणि तो ऑथोरायझेशन नंबर सदर व्‍यवहाराच्‍या चार्ज स्‍लीपवर लिहिण्‍याचे बंधन हे तक्रारदारावर सदर कराराने टाकले आहे आणि असा ऑथोरायझेशन नंबर जर चार्ज स्‍लीपवर नसेल तर त्‍या व्‍यवहाराची रक्‍कम देण्‍याचे बंधन जाबदार बँकेवर नाही असे संबंधीत करारावरुन दिसते. वर नमूद केल्‍याप्रमाणे दि.18/1/09 च्‍या संबंधीत व्‍यवहाराच्‍या चार्जस्‍लीपवर Offline sale असे ठळक शब्‍दात नमूद केल्‍याचे दिसते. याचा अर्थ असा की, संबंधीत व्‍यवहाराला जाबदार बँकेकडून घ्‍यावयाची मान्‍यता ही संगणकाद्वारे घेतली गेली नव्‍हती. जाबदार बँकेने हे स्‍पष्‍ट केले आहे की, संबंधीत व्‍यापारी हा स्‍वॅपिंग मशिन ऑफलाईन ठेवून देखील सदर मशिनवर काही काम करु शकतो जसे की, चार्ज स्‍लीप काढणे, बिले तयार करणे इ. हे काम करीत असताना सदर व्‍यवहाराच्‍या नोंदी किंवा एखादे कार्ड जरी त्‍या मशिनमध्‍ये स्‍वाईप झाले तरीही त्‍या व्‍यवहाराची नोंद बँकेच्‍या संगणकावर होत नाही. त्‍यामुळे सदरचा व्‍यवहार ऑन लाईन झाला असल्‍याने त्‍या व्‍यवहाराची नोंद बँकेच्‍या सर्व्‍हरवर नाही म्‍हणून बँकेने इलेक्‍ट्रॉनिकरित्‍या सदर व्‍यवहाराला मान्‍यता दिलेली नाही आणि सदर व्‍यवहाराला तक्रारदाराने मानवी हस्‍तक्षेपाने मान्‍यता घेतली नाही आणि त्‍यामुळे सदर व्‍यवहाराची रक्‍कम जाबदार बँक वसूल करुन तक्रारदार बँकेमध्‍ये जमा करु शकले नाहीत. जाबदार बँकेच्‍या या कथनाला तक्रारदारतर्फे कोणतेही उत्‍तर देण्‍यात आलेले नाही. तथापि तक्रारदाराचे विद्वान वकील श्री व्‍ही.एम.मोहिते यांनी केवळ एकच गोष्‍ट या मंचाचे निदर्शनास आणली की, सदर व्‍यवहाराबद्दल जाबदार बँकेने करारात नमूद केल्‍याप्रमाणे कमिशनदाखल 1.67 टक्‍के इतकी रक्‍कम तक्रारदाराचे बँकेतून वसूल केलेली आहे. त्‍यांचे म्‍हणण्‍याप्रमाणे सदर रक्‍कम वसूल केलेमुळे जाबदार बँकेस तो व्‍यवहार झालाच नाही किंवा तो व्‍यवहार त्‍यांच्‍या संगणकावर नमूद केला गेला नाही इत्‍यादी गोष्‍टी मांडता येत नाही. सबब जाबदार बँकेस सदर व्‍यवहाराची रक्‍कम तक्रारदाराचे खात्‍यात जमा करण्‍याचे नाकारता येत नाही आणि तशी ती जमा करण्‍यास नकार दिल्‍याने जाबदार बँकेने तक्रारदारास दूषित सेवा दिलेली आहे.



 

13.   जाबदार बँकेने आपल्‍या लेखी कैफियातीमध्‍ये तक्रारदाराचे खात्‍यातून कमिशन फी दाखल काही रक्‍कम वसूल करुन घेण्‍यात आली आहे हे मान्‍य केले आहे. जाबदार बँकेचे म्‍हणण्‍याप्रमाणे संबंधीत व्‍यवहाराकरिता तो चार्ज बँक बँकेला दि.25/1/09 रोजी Reference No. V 231066 अन्‍वये मिळाला व त्‍यावर संबंधीत व्‍यवहार हा जाबदार बँकेकडून ऑथोरायझेशन न घेता ऑफलाईन करण्‍यात आला असल्‍याचे दिसले आणि त्‍याकरिता जाबदार बँकेला संबंधीत कागदपत्रे मिळाली नव्‍हती म्‍हणून जाबदार बँकेने तक्रारदाराचे MID 50115253 या खात्‍यातून वर नमूद केलेले दि.1/3/09 च्‍या करारातील क्‍लॉज 5.1, क्‍लॉज 7 सबक्‍लॉज 1 आणि क्‍लॉज 6 अन्‍वये सदरची रक्‍कम तक्रारदाराच्‍या खात्‍यात नावे टाकली. 


 

 


 

14.   सदर करारपत्राचे अवलोकन करता काही परिस्थितीमध्‍ये तक्रारदाराचे सदर खात्‍यातून काही रक्‍कम वसूल करण्‍याचे किंवा नावे टाकण्‍याचे अधिकार बँकेला दिसतात. सदर व्‍यवहारापोटी कमिशन फी जाबदार बँकेने वसूल केली म्‍हणजे सदरचे व्‍यवहाराला बँकेने मान्‍यता दिली असा अर्थ, जो तक्रारदार काढीत आहेत, तो योग्‍य दिसत नाही. सदरचा व्‍यवहार ऑफलाईन झाला आणि त्‍या व्‍यवहाराकरिता तक्रारदाराने जाबदार बँकेकडून मान्‍यता घेतलेली नाही आणि ऑथोरायझेशन नंबर टाकून चार्ज स्‍लीप बँकेजवळ जमा केली नाही ही बाब तक्रारदाराने अमान्‍य केली नाही. त्‍यामुळे केवळ कमिशन काढले म्‍हणून सदरचा व्‍यवहार हा सुरळित झाला किंवा त्‍यास बँकेने मान्‍यता दिली हा अर्थ काढण्‍याचे प्रस्‍तुत ठिकाणी प्रयोजन दिसत नाही. कराराप्रमाणे त्‍यावर घातलेल्‍या अटींचे पालन न करता जाबदार बँकेचे काही कृतीवर तक्रारदार विसंबून राहू शकत नाहीत. एक गोष्‍ट स्‍पष्‍टपणे लक्षात घेण्‍याजोगी आहे की, दि.18/1/09 रोजी तक्रारदाराचे शोरुममध्‍ये एकूण 4 व्‍यवहार क्रेडीट कार्डच्‍या सहाय्याने झाले. त्‍यापैकी 3 व्‍यवहारांची रक्‍कम जाबदार बँकेने तक्रारदारास दिली ही बाब तक्रारदाराने मान्‍य केली आहे व त्‍या व्‍यवहाराबद्दल तक्रारदाराचा कसलाही आक्षेप नाही. प्रस्‍तुत प्रकरणाशी संबंधीत असणारा व्‍यवहार हा चार्ज स्‍लीपमध्‍ये नमूद असलेल्‍या व्‍यवहारामध्‍ये तीन नंबरचा व्‍यवहार आहे. वरच्‍या दोन आणि खालच्‍या एका व्‍यवहारामध्‍ये ऑनलाईन व्‍यवहार झाल्‍याचे दिसते तथापि हा संबंधीत व्‍यवहार फक्‍त ऑफलाईन झाल्‍याचे दिसते. जरी वर नमूद दोन आणि खालचा एक व्‍यवहार, ऑनलाईन व्‍यवहार झाला असेल तर नेमका संबंधीत व्‍यवहार हा ऑफलाईन कसा झाला याचे कोणतेही स्‍पष्‍टीकरण तक्रारदाराने दिलेले नाही. जर ऑफलाईन व्‍यवहार करावयाचा होता तर कराराप्रमाणे सदर व्‍यवहाराकरिता जाबदार बँकेकडून ऑथोरायझेशन घेवून त्‍या ऑथोरायझेशनचा नंबर टाकून चार्ज स्‍लीप बँकेकडे जमा करण्‍याची जबाबदारी तक्रारदारावर होती व ती जबाबदारी तक्रारदाराने पार पाडली नाही. त्‍यामुळे जरी जाबदार बँकेने सदर व्‍यवहारासंबंधीच्‍या रकमा देण्‍यास नकार दिला असेल तर जाबदार बँकेने तक्रारदारास कोणतीही दूषित सेवा दिली असे म्‍हणता येत नाही. सदरचा करार हा दोन्‍ही पक्षांवर समान पध्‍दतीने बंधनकारक आहे. जर ऑफलाईन व्‍यवहार नोंदवायचा होता तर तक्रारदारास कराराप्रमाणे बँकेकडून ऑथोरायझेशन घेणे आवश्‍यक होते, ते जर घेतले नसेल तर आणि त्‍या व्‍यवहाराबद्दल जर बँकेला काही शंका आली असेल तर करारातील अटीप्रमाणे बँकेला सदर व्‍यवहारातील रक्‍कम थांबविण्‍याचा अधिकार होता व आहे. त्‍यामुळे तक्रारदारास जाबदार बँकेने कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही असे या मंचाचे ठाम मत आहे. करिता आम्‍ही वर नमूद केलेल्‍या मुद्दा क्र.2 चे उत्‍तर नकारार्थी दिलेले आहे.



 

मुद्दा क्र.3 व 4



 

15.   ज्‍याअर्थी तक्रारदारास जाबदार बँकेने कोणतीही दूषित सेवा दिलेली नाही, त्‍याअर्थी तक्रारदारास प्रस्‍तुत तक्रारअर्जामध्‍ये कसलीही मागणी मागण्‍याचा आणि त्‍याची मागणी मान्‍य करण्‍याचा त्‍यास अधिकार नाही. सदरची तक्रार त्‍याकरिता नामंजूर करावी लागेल. या ठिकाणी हे नमूद करणे अप्रस्‍तुत होणार नाही की, जाबदार बँकेचे विद्वान वकीलांनी आपल्‍या युक्तिवादाचे दरम्‍यान संबंधीत व्‍यवहार तक्रारदाराची अज्ञात इसमांनी फसवणूक करुन केलेला होता व त्‍या व्‍यवहाराबद्दल पोलिस तक्रार होवून, संबंधीतांस अटक होवून, तक्रारदाराने विकलेली घडयाळे त्‍याच्‍याकडून हस्‍तगत करण्‍यात आली आहेत व ती घडयाळे तक्रारदारास देण्‍यात आलेली असल्‍याने तक्रारदाराचे या प्रकरणी कसलेही नुकसान झाले नसल्‍याचे प्रतिपादन केले आहे. या विधानाला तक्रारदारतर्फे कोणताही आक्षेप घेण्‍यात आलेला नाही. ज्‍याअर्थी, तक्रारदारास कोणतीही दूषित सेवा मिळाली नाही, त्‍याअर्थी तक्रारदाराने त्‍याने मागणी केलेली रक्‍कम त्‍यास मिळण्‍यास तो पात्र नाही. करिता मुद्दा क्र.3 चे उत्‍तर आम्‍ही वर नमूद केल्‍याप्रमाणे दिलेले आहे. प्रस्‍तुत तक्रार त्‍यामुळे खारीज करावी लागेल. सबब मुद्दा क्र.4 चे उत्‍तर आम्‍ही त्‍याप्रमाणे देवून खालील आदेश पारीत करीत आहोत.


 

 


 

आदेश


 

 


 

1. तक्रारदाराची तक्रार खारीज करणेत येत आहेत.


 

 


 

2.  या प्रकरणातील परिस्थितीनुसार प्रस्‍तुत तक्रारीचा खर्च उभय पक्षकारांनी आपापला सोसणेचा


 

    आहे.



 

 


 

सांगली


 

दि. 19/08/2013                        


 

   


 

 


 

          ( सौ वर्षा शिंदे )                   ( ए.व्‍ही.देशपांडे )


 

              सदस्‍या                                  अध्‍यक्ष
 
 
[ A.V. Deshpande]
PRESIDENT
 
[ Smt.V.N.Shinde]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.