तक्रारदार : वकील श्री.बी.एस.हिरानी यांचे मार्फत हजर.
सामनेवाले : वकील श्री.मन्नाडीया यांचेमार्फत हजर.
-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सा.वाले ही आय.सी.आय.सी.आय. बँकेची बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधील शाखा आहे. तर तक्रारदार हे सा.वाले बँकेचे खातेदार आहेत. तक्रारदार हे रिलायन्स एनर्जी लिमिटेड या विद्युत कंपनीकडून आपल्या निवासकामी विद्युत पुरवठा प्राप्त करीत होते. व विद्युत कंपनीने दिलेल्या देयकाप्रमाणे त्यांच्या खात्यामधून ई.सी.एस.सुविधाव्दारे सा.वाले बँकेमार्फत रिलायन्स विद्युत कंपनी यांना रक्कम अदा करीत होते. विद्युत कंपनीने सा.वाले बँकेकडे तक्रारदारांच्या देयका संबधात दिनांक 11.4.2008 रोजी रु.710/- ची मागणी पाठविली. परंतु सा.वाले यांनी तक्रारदारांच्या खात्यामध्ये पुरेशी रक्कम नाही या कारणास्तव ती मागणी फेटाळली. वस्तुतः तक्रारदारांच्या कथनाप्रमाणे तक्रारदारांच्या बचत खात्यामध्ये दिनांक 11.4.2008 रोजी पुरेशी रक्कम होती,त्याव्दारे रु.710/- अदा करणे शक्य होते. तथापी सा.वाले यांनी विद्युत कंपनीला रक्कम पाठविली नाही. येवढेच नव्हेतर तक्रारदारांच्या खात्यामधून दिनांक 12.4.2008 रोजी रु.225/- दंडाबद्दल रक्कम वजा केली.
2. तक्रारदारांच्या कथना प्रमाणे सा.वाले यांची वरील कृती तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात असुर असून, सा.वाले यांच्या या कृतीमुळे तक्रारदारांना मानसिक त्रास झाला व आर्थिक हानी झाली. तक्रारदारांची ईभ्रत खालावली. तक्रारदारांनी सा.वाले यांनीा दिनांक 7.10.2008 रोजी नोटीस पाठविली व नुकसान भरपाईबद्दल रु.25,000/- ची मागणी केली. सा.वाले यांनी त्या नोटीसीला उत्तर दिले नाही. अंतीमतः तक्रारदारांनी प्रस्तुतची तक्रार दाखल केली व सा.वाले याचेकडून
रुपये 25,000/- नुकसान भरपाई बद्दल मागणी केली.
3. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केली व त्यामध्ये तक्रारदार हे त्यांचे खातेदार आहेत ही बाब मान्य केली. तसेच त्यांच्या ई.सी.एस. सुविधेव्दारे रिलायन्स कंपनी यांना तक्रारदारांच्या खात्यामधून रक्कम अदा नाही केली ही बाब मान्य केली. तथापी सा.वाले यांनी असे कथन केले की, दिनांक 11.4.2008 रोजी म्हणजे विद्युत कंपनीने मागणी पाठविली त्या दिवशी तक्रारदारांचे बचत खात्यामध्ये पुरेशी रक्कम नसल्याने ती मागणी फेटाळण्यात आली. याप्रमाणे सा.वाले यांनी आपल्या कृतीचे समर्थन केले व तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली या आरोपास नकार दिला.
4. तक्रारदारांनी आपले पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. तसेच सा.वाले यांना दिलेल्या नेाटीसीची प्रत हजर केली. सा.वाले यांनी त्यांची कैफीयत हिच प्रमाणित करुन दाखल केली. दोन्ही बाजुंनी आपल्या कथनाचे पृष्टयर्थ कागदपत्रे दाखल केली.
5. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्र, कागदपत्रे यांचे वाचन केले. तसेच दोन्ही बाजुंच्या वकीलांचा तोंडी युक्तीवाद ऐकला. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदारांना रिलायन्स विद्युत कंपनी यांनी दिनांक 11.4.2008 रोजी केलेली देयकाची मागणी नाकारुन तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | होय. |
2. | तक्रारदार सा.वाले यांचेकडून नुकसान भरपाई वसुल करुन मिळण्यास पात्र आहेत काय ? | होय. |
3 | अंतीम आदेश ? | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. |
कारण मिमांसा
6. तक्रारदार हे सा.वाले यांचे खातेदार आहेत व तक्रारदारांचे बचत खाते सा.वाले यांचे बँकेत आहे ही बाब सा.वाले यांनी मान्य केली. त्याच प्रमाणे तक्रारदारांच्या बचत खात्यातून ई.सी.एस. सुविधेव्दारे रिलायन्स विद्युत कंपनीच्या विद्युत देयकाची रक्कम अदा करण्यात येत होती ही बाब देखील सा.वाले यांनी मान्य केलेली आहे. त्याच प्रमाणे दिनांक 11.4.2008 रोजी रिलायन्स विद्युत कंपनीने तक्रारदारांच्या विद्युत देयका संदर्भात केलेली मागणी रक्कम रु.750/- नाकारली ही बाब देखील सा.वाले यांनी मान्य केली. सा.वाले यांनी या त्यांचे कृतीचे समर्थनार्थ असे कथन केले आहे की, तक्रारदारांच्या बचत खात्यामध्ये दिनांक 11.4.2008 रोजी पुरेशी रक्कम नसल्याने ई.सी.एस. व्दारे रक्कम रिलायन्स विद्युत कंपनीला अदा करण्यात आलेली नाही.
7. या संबंधात तक्रारदारांनी तक्रारीसोबत निशाणी अ येथे तक्रारदारांच्या बचत खात्याचा उतारा दाखल केलेला आहे. त्यामध्ये दिनांक 1.3.2008 ते 14.5.2008 चे दरम्यान तक्रारदारांच्या बचत खात्यामध्ये झालेला व्यवहाराच्या नोंदी संम्मलीत आहेत. त्या नोंदीचे काळजीपूर्वक निरीक्षण केले असता असे दिसून येते की, तक्रारदारांच्या बचत खात्यामध्ये दिनांक 2.4.2008 रोजी रु.4,397/- शिल्लक होती व दिनांक 11.4.2008 रोजी रु.22,623/- जमा होऊन शिल्लक रु.27,040/- जमा झाले. बचत खात्यातील नोंदी असे दर्शवितात की, दिनांक 2.4.2008 ते 11.4.2008 चे दरम्यान तक्रारदारांच्या बचत खात्यामध्ये केव्हाही रु.2000/- पेक्षा कमी रक्कम नव्हती. वस्तुतः दिनांक 11.4.2008 रोजी रु.27,040/- बचत खात्यामध्ये शिल्लक होती. या नोंदीवरुन ही बाब स्पष्ट होते की, तक्रारदारांच्या बचत खात्यामध्ये पुरेशी रक्कम असतांना सा.वाले यांनी विद्युत देयकाच्या मागणीची रक्कम फेटाळली. येवढेच नव्हेतर दिनांक 12.4.2008 रोजी रु.225/- तक्रारदारांच्या बचत खात्यामध्ये नांवे टाकले. हे रु.225/- ही रक्कम रिलायन्स विद्युत कंपनी यांचे मागणीवरुन अदा करण्यात आली. येवढेच नव्हेतर रिलायन्स विद्युत कंपनीने दिनांक 14.4.2008 रोजी तक्रारदारांना नोटीस दिली व त्यामध्ये रु.250/- ई.सी.एस. नामंजूर झाल्याबद्दल त्यांचे नांवे दाखविण्यात येत आहेत असे कळविले. या प्रकारे तक्रारदारांना दुहेरी दुकसान झाले. त्यातही बचत खात्यामध्ये पुरेशी रक्कम असतांना ई.सी.एस.नामंजूर झाल्याने तक्रारदारांनी मानहानी झाली व रिलायन्स विद्युत कंपनीने त्यांचेवर नोटीस बजावली.
8. सा.वाले यांनी आपल्या कृतीचे जरी समर्थन केले असलेतरी तक्रारदारांच्या बचत खात्यातील नोंदी ही बाब स्पष्ट करते की, बचत खात्यामध्ये दिनांक 11.4.2008 रोजी पुरेशी रक्कम असतांना देखील सा.वाले यांनी रिजायन्स विद्युत कंपनी यांची ई.सी.एस.ची रु.750/- ची मागणी नाकारली. त्या कृती करीता कुठलेली समर्थनीय कारण दिसून येत नाही. या प्रकारे सा.वाले यांनी तक्रारदारांना त्यांच्या बचत खात्याच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा निष्कर्ष काढावा लागतो.
9. तक्रारदारांनी मागणी केलेली नुकसान भरपाईची रक्कम रुपये 25,000/- योग्य दिसते व ती कुठल्याही अर्थाने जास्तीची अथवा भरमसाठ आहे असे म्हणता येत नाही.
10. वरील चर्चेनुरुप व निष्कर्षावरुन पुढील आदेश करण्यात येतो
आदेश
1. तक्रार क्रमांक 743/2008 अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. सामनेवाले यांनी तक्रारदारांना त्यांच्या बचत खात्याच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असे जाहीर करण्यात येते.
3. सामनेवाले यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई बद्दल रुपये 25,000/- व तक्रारीच्या खर्चाबद्दल रु.5000/- असे एकत्रित रुपये 30,000/- न्याय निर्णयाची प्रत मिळाल्यापासून 6 आठवडयाचे आत अदा करावी असा आदेश देण्यात येतो.
4. सामनेवाले यांनी वरील रक्कम वरील मुदतीत अदा केली नाहीतर 6 आठवडयाची मुदत संपलेल्या दिवसापासून त्या रक्कमेवर रक्कम अदा करेपर्यत 9 टक्के दराने व्याज द्यावे.
5. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य
पाठविण्यात याव्यात.