तक्रारदार : गैर हजर.
सामनेवाले : वकील श्रीमती नानावटी यांचेमार्फत हजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
1. सा.वाले ही बँक असून सा.वाले यांनी तक्रारदारांना क्रेडीट कार्ड पुरविले होते. त्याचे शेवटचे चार अंक 9003 असे होते. तक्रारदार त्या क्रेडीट कार्डचा वापर करीत असत व क्रेडीट कार्डची बाकी सा.वाले यांना देय करीत असत.
2. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे तक्रारदारांनी फेब्रृवारी/मार्च 2006 मध्ये विमानाची तिकिटे खरेदी करण्याचा व्यवहार क्रेडीट कार्डवर केला व त्याबद्दल देय रक्कम रु.6100/- अशी होती. तक्रारदारांनी मागणी केली नसतांना देखील सा.वाले यांनी तक्रारदारांना ती रक्कम हप्त्याने देय करावी अशी सूचना दिनांक 17.3.2006 चे पत्राव्दारे केली. तक्रारदारांच्या तक्रारीतील कथना प्रमाणे हप्त्याने रक्कम जमा करण्याची सूविधा सा.वाले यांनी केवळ ज्यादा व्याज मिळावे या हेतुने केलेली होती. तरी देखील तक्रारदारांनी देयकाच्या नोंदीप्रमाणे रक्कम अदा केली असतांना सा.वाले यांनी तक्रारदारांकडून दिनांक 5.3.2008 चे नोटीसीने रु.22,960/- येवढया रक्कमेची मागणी केली. त्यानंतर सा.वाले यांनी तक्रारदारांच्या बचत खात्यातून परस्पर ती रक्कम वळती करुन घेतली.
3. तक्रारदारांच्या तक्रारीत असे कथन आहे की, सा.वाले यांनी अनाधिकाराने व तक्रारदारांच्या संमत्तीशिवाय बचत खात्यातून परस्पर रक्कम वळती करुन तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली आहे. या प्रकारे तक्रारदारांनी तसे जाहीर होऊन मिळावे व रु.22,960.73 ही रक्कम व्याजासह वसुल करुन मिळावी ही दाद मिळणेकामी प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे.
4. सा.वाले यांनी आपली कैफीयत दाखल केली व त्यामध्ये तक्रारदारांनी रु.6100/- क्रेडीट कार्डव्दारे विमान तिकिटे खरेदीचा व्यवहार फेब्रृवारी 2006 मध्ये केलेला आहे ही बाब मान्य केली. ती रक्कम मासीक हप्त्यामध्ये जमा करावी अशा सूचना त्यांना देण्यात आलेल्या होत्या हे देखील कबुल केले. तथापी सा.वाले यांचे असे कथन आहे की, तक्रारदारांच्या विनंतीवरुनच ही सुविधा तक्रारदारांना देण्यात आलेली होती. सा.वाले यांनी पुढे असे कथन केले की, तक्रारदार देयकाची रक्कम जमा न करता खूप कमी रक्कम जमा करत होते व रक्कम थकीत ठेवत होते. अंतीमतः कायद्याप्रमाणे बँक अधिकाराचा वापर करुन तक्रारदारांच्या बचत खात्यातून ती रक्कम वसुल केली. या प्रमाणे तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली या आरोपास सा.वाले यांनी नकार दिला.
5. सा.वाले यांनी त्यांचे व्यवस्थापक श्री.राकेश दिवाण यांचे शपथपत्र दाखल केलेले आहे. तक्रारदारांनी सा.वाले यांच्या कैफीयतीस आपले प्रती उत्तराचे शपथपत्र दाखल केले. दोन्ही बाजुंनी कागदपत्रे दाखल केली व लेखी युक्तीवादही दाखल केला.
6. प्रस्तुत मंचाने तक्रार, कैफीयत, शपथपत्रे, कागदपत्रे, व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. त्यावरुन तक्रारीचे निकालीकामी पुढील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी तक्रारदारदारांना क्रेडीट कार्डच्या संदर्भात सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही. |
2. | अंतीम आदेश | तक्रार रद्द करण्यात येते. |
कारण मिमांसा
7. सा.वाले यांनी तक्रारदारांना क्रेडीट कार्ड पुरविले होते व तक्रारदारांनी क्रेडीट कार्डव्दारे फेब्रृवारी-2006 मध्ये विमान तिकिटे खरेदी केली होती व त्याबद्दल देय असलेली रक्कम रु.6100/- होती या बद्दल वाद नाही. सा.वाले यांनी तक्रारदारांना ती रक्कम हप्त्याने अदा करण्याची सुविधा दिली होती व दिनांक 17.3.2006 च्या पत्राव्दारे तसे तक्रारदारांना कळविले होते या बद्दलही वाद नाही. सा.वाले यांनी आपल्या कैफीयतीमध्ये असे स्पष्ट कथन केलेले आहे की, तक्रारदारांनी दिनांक 16.3.2006 रोजीच्या पत्राव्दारे सा.वाले यांना अशी विनंती केली होती की, तक्रारदारांना ती रक्कम मासीक हप्त्याने अदा करण्याची परवानगी देण्यात यावी व त्या पत्राप्रमाणे सा.वाले यांनी तक्रारदारांना ती सुविधा दिली होती. तक्रारदारांनी आपल्या प्रति उत्तराचे शपथपत्रामध्ये सा.वाले यांच्या कथनास नकार दिलेला आहे.
8. क्षणभर असे गृहीत धरले की, तक्रारदारांच्या विनंती शिवाय व स्वतःहून सा.वाले यांनी तक्रारदारांना रु.6100/- मासीक हप्त्याने भरण्याची संधी दिली होती. तरी देखील तक्रारदार ती रक्कम एक रक्कमी भरु शकत होते. तक्रारदारांचे असे कोठेही कथन नाही की, त्यांनी ती एक रक्कमी अदा करण्याचा प्रयत्न केला व सा.वाले यांनी ती स्विकारली नाही. ए.टी.एम.कार्ड मशिनमध्ये क्रेडीट कार्डची रक्कम देय करण्याची सुविधा असून क्रेडीट कार्ड स्वाईप केल्यानंतर ग्राहकाचे विनंतीनुसार ती सुविधा उपलब्ध होते व आपल्या बचत खात्यातून ग्राहक क्रेडीट कार्डची देय रक्कम ए.टी.एम. मशिन मधून ती अदा करु शकतात. तक्रारदारांचे असे कथन नाही की, या प्रकारचे प्रयत्न केले असता सा.वाले यांच्या सगणक प्रणालीने ती विनंती स्विकारली नाही. तक्रारदार इंटरनेटव्दारेसुध्दा ती रक्कम आपल्या खात्यामधून परस्पर अदा करु शकले असते. तक्रारदार सा.वाले यांच्याकडे धनादेश पाठवून ती रक्कम एक रक्कमी अदा करु शकले असते. थोडक्यामध्ये तक्रारदारांना ती रक्कम एक रक्कमी अदा करण्यास काही प्रत्यव्याय नव्हता तरी देखील तक्रारदार असे कथन करतात की, सा.वाले यांच्या दिनांक 17.3.2007 च्या पत्रामुळे तक्रारदार ती रक्कम एक रक्कमी अदा करु शकले नाहीत. या मध्ये तक्रारदारांचा अप्रमाणिकपणा दिसून येतो.
9. तक्रारदारांचे पुढे असे कथन आहे की, सा.वाले यांना त्यांच्या बचत खात्यातून परस्पर रक्कम वळती करण्याचे अधिकार नाहीत. या संबंधात भारतीय कराराच्या कायद्याचे कलम 171 या बाबतीत सुस्पष्ट असून त्यामध्ये बँकेला या स्वरुपाचे अधिकार आहेत. या बाबतीत वेगवेगळया मा.उच्च न्यायालयाचे न्यायनिर्णय देखील आहेत. यावरुन सा.वाले यांनी तक्रारदारांच्या बचत खात्यामधून रक्कम वसुल करुन घेणेकामी काही चूक केली अथवा अनाधिकाराने कार्यवाही केली असा निष्कर्ष नोंदविता येत नाही.
10. वरील चर्चेवरुन व निष्कर्षावरुन सा.वाले यांनी तक्रारदारांना सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली असा निष्कर्ष नोंदविता येत नाही. सबब पुढील प्रमाणे आदेश करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 363/2008 रद्द करण्यात येते.
2. खर्चाबाबत आदेश नाही.
3. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य
पाठविण्यात याव्यात.