जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.
ग्राहक तक्रार क्रमांक – १९२/२०१०
तक्रार दाखल दिनांक – २८/०६/२०१०
तक्रार निकाली दिनांक – ३०/१०/२०१३
श्री. जगदिश बंसिलाल खुराणा
उ.व.६२ धंदा – व्यापार
रा.देसले नर्सिंग होम, वाडीभोकर रोड, धुळे. ------------- तक्रारदार
विरुध्द
१. आय.सी.आय.सी.आय. बॅंक लिमिटेड
रजि. ऑफिस लॅन्डमार्क, रेसकोर्स सर्कल,
वडोदरा (गुजरात), ३९०००७.
(नोटीसीची बजावणी जाबदेणार नं.२ वर व्हावी)
२. विदयमान व्यवस्थापक आय.सी.आय.सी.आय. बॅंक
लिमिटेड शाखा – धुळे.
नोटीसीची बजावणी श्री. गजानंद गोडसे
उ.व. वयस्क धंदा – नोकरी
रा. धुळे गल्ली नं.६ ता.जि. धुळे यांचेवर व्हावी ------------ सामनेवाला
न्यायासन
(मा.अध्यक्षा – सौ.व्ही.व्ही. दाणी)
(मा.सदस्या – सौ.एस.एस.जैन)
(मा.सदस्य – श्री.एस.एस.जोशी)
उपस्थिती
(तक्रारदारा तर्फे – वकील श्री.जी.व्ही. गुजराथी)
(सामनेवाला तर्फे – वकील श्री.एस.ए. पंडीत)
निकालपत्र
(दवाराः मा.सदस्य – श्री.एस.एस. जोशी)
सामनेवाला बॅंकेने अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आणि सेवा देण्यात त्रुटी केली अशा कारणावरून तक्रारदार यांनी कलम १२ अन्वये सदरची तक्रार दाखल केली आहे.
१. तक्रारदार यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, सामनेवाले बॅंकेत त्यांचे खुराणा रेन्ट अ कार नावाने करंट अकाऊंट आहे आहे. (क्रमांक ANWB 646305000200). दि.२३ एप्रिल २०१० रोजी या खात्यावर रू.२२,७२,७५०.२९/- शिल्लक होती. म्हणूनच त्यांनी चार जणांना निरनिराळया रकमेचे एकूण रू.८,३०,०००/- चे धनादेश दिले. मात्र खात्यात ‘खात्यात रक्कम अपूर्ण’,‘चेक देणाराशी संपर्क करा’,‘अपूर्ण शिल्लक’ असे शेरे मारून ते धनादेश परत आलेत. या संदर्भात तक्रारदार यांनी बॅंकेच्या निरनिराळया अधिका-यांकडे तक्रारी केल्या. तेव्हा खुराणा रेन्ट अ कार या खात्यातील रक्कम पूर्ति रेन्ट अ कार अॅण्ड लॉजिस्टीक्स प्रा.लि. या खात्याच्या कर्जापोटी ‘लीन’ (अग्रहक्क) करण्यात आल्याचे त्यांना सांगण्यात आले. कोणतीही सुचना न देता अशी कार्यवाही करणे अयोग्य आहे. ही अनुचित व्यापारी प्रथा आहे. खात्यात पुरेशी शिल्लक असतांनाही धनादेश न वटवणे ही सेवेतील त्रुटी आहे, असे तक्रारदारचे म्हणणे आहे.
२. विविध शेरे मारून सामनेवाले यांनी परत पाठविलेले धनादेश वटवावेत, मानसिक त्रासापोटी रू.१,५०,०००/- आणि तक्रारीचा खर्च रू.२०,०००/- देववावा अशी मागणी तक्रारदाराने केली आहे.
३. आपला खुलासा सादर करतांना सामनेवाला यांनी तक्रारदाराची तक्रार फेटाळून लावली आहे. तक्रार करतांना अनावश्यक पक्षकार करण्यात आले. आवश्यक पक्षकार करण्यात आले नाहीत. तक्रारदाराचे बॅंक खाते व्यावसायिक असल्याने त्यांना ग्राहक मंचात तक्रार करण्याचा अधिकार नाही. तक्रार खुराणा रेन्ट अ कार बाबत करण्यात आली आहे. ती कोणत्या अधिकारात करण्यात आली ? तक्रारदाराने अनेक महत्वपूर्ण बाबी लपवून ठेवल्या. तक्रारदार हे खुराणा रेन्ट अ कारचे प्रोपायटर आहेत. पूर्ती रेन्ट अ कार आणि लॉजिस्टीक प्रा.लि.चे ही तक्रारदार व त्यांची पत्नी संचालक आहेत. पूर्ती रेन्ट अ कारने घेतलेले कर्ज फेडण्याची जबाबदारी तक्रारदाराने स्विकारली आहे. त्यामुळे थकीत कर्ज वसुलीचा अधिकार आणि तक्रारदार यांच्या कोणत्याही खात्यावरील रक्कम वर्ग करण्याचा अधिकार बॅंकेला आहे, असे सामनेवाले यांनी खुलाशात म्हटले आहे.
४. आपल्या तक्रारीच्या पुराव्यासाठी तक्रारदार यांनी प्रतिज्ञापत्र, परत आलेल्या धनादेशाच्या झेरॉक्स, धनादेश न वटल्याचे दाखले, दि.०१/०४/२०१० ते दि.३०/०४/२०१० या कालावधीतील खाते उतारा, बॅंकेकडून आलेल्या एसएमएसची झेरॉक्स, बॅंकेचे अधिकारी राकेश साह यांचा दि.२६/०४/२०१० चा ई-मेल, राकेश साह यांचाच दि.३०/०६/२०१० चा ई-मेल, बॅंकेचे अधिकारी शिवकुमार ताडीकोंडा यांचा दि.२८/०४/२०१० चा ई-मेल, बॅंकेचे अधिकारी त्रिमूर्ती ए. यांचा दि.२८/०८/२०१० चा ई-मेल, त्रिमूर्ती ए. यांचा दि.०५/०५/२०१० चा ई-मेल दाखल केला आहे. तर सामनेवाले यांनी दि.१२/०४/२०१० रोजी पूर्ती रेन्ट अ कारला पाठविलेली नोटीस, दि.२६/०६/२०१० रोजी सुचेता खुराणा, जगदिश खुराणा, जगदिश आणि सुचेता खुराणा, पूर्ती रेन्ट अ कार, खुराणा रेन्ट अ कार यांना पाठविलेली पत्रे, पूर्ती रेन्ट अ कारने दि.१०/१२/२००५ रोजी करून दिलेले क्रेडीट अॅरेंजमेंट लेटर, दि.२७/०४/२०१० रोजी जगदिश व सुचेता खुराणा यांना बॅंकेने पाठविलेले पत्र, दि.१०/१२/२००५ रोजीचे पर्सनल गॅरेंटी करार, दि.२५/१२/२००७ रोजीचे कन्फर्मरी लेटर, पूर्ती रेन्ट अ कारच्या संचालकांची यादी दाखल केली आहे.
५. वरील सर्व कागदपत्रे आणि दोन्ही बाजूंच्या विद्वान वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आमच्या समोर खालील मुद्दे उपस्थित होतात. त्यांची उत्तरे आम्ही सकारण देत आहोत.
मुद्दे निष्कर्ष
अ. तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? होय
ब. सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा
अवलंब केला आहे काय ? नाही
क. सामनेवाला यांनी तक्रारदारांना द्यावयाच्या नाही
सेवेत कसूर केला आहे काय ?
ड. आदेशकाय ? अंतिम आदेशाप्रमाणे
विवेचन
६. मुद्दा ‘अ’- तक्रारदार हे कंपनीचे संचालक आहेत. त्यांची कंपनी कंपनी कायद्यानुसार नोंदणीकृत आहे. याच कंपनीचे सामनेवाला बॅंकेत खाते आहे. ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदीनुसार कोणतीही नोंदणीकृत संस्था, कंपनी ‘ग्राहक’ या संज्ञेत मोडते. त्यामुळे तक्रारदार हे सामनेवाला यांचे ग्राहक आहेत. म्हणूनच मुद्दा ‘अ’ चे उत्तर आम्ही होय देत आहोत.
७. मुद्दा ‘ब’- आपल्या खात्यातील रकमेवर कोणतीही पूर्व सूचना न देता परस्पर लीन अग्रहक्क स्थापित करून सामनेवाला यांनी अनुचित व्यापारी प्रथाअवलंबली. एवढेच नव्हे तर खात्यात पुरेशी शिल्लक असतांनाही धनादेश वटविले नाहीत आणि सेवेत त्रुटी निर्माण केली असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. तथापि, तक्रारदार यांच्या खात्यावर अग्रहक्क स्थापित करण्यापूर्वी सामनेवाले यांनी तक्रारदारांना दि.२६/०४/२०१० रोजी सुचना पत्र पाठविले होते. त्यापूर्वी दि.१२/०४/२०१० रोजी पूर्ती रेन्ट अ कार अॅण्ड लॉजिस्टीक या कंपनीला नोटीस पाठवून त्यांच्याकडील थकीत कर्ज भरण्याबाबतही कळविले होते. सामनेवाला आणि तक्रारदार यांच्यात दि.१०/१२/२००५ रोजी जो पर्सनल गॅरंटी करार झाला आहे त्यातही तक्रारदार आणि त्यांची पत्नी सुचेता यांनी पूर्ती रेन्ट अ कार कंपनीबाबत स्वतः हमी घेतल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. दि.१०/१२/२००५ रोजी सामनेवाला आणि तक्रारदार यांच्यात क्रेडीट अॅरेंजमेंट लेटर तयार झाले आहे. त्यावर जगदिश खुराणा आणि सुचेता खुराणा यांच्या स्वाक्ष-या आहेत. या दस्तावेजातील अॅनेक्शर-३ मधील कलम १२ मध्ये लीन, अग्रहक्काबाबत स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदार यांच्या खात्यावर अग्रहक्क सांगून अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला असे म्हणता येणार नाही. म्हणूनच मुद्दा ‘ब’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
८. मुद्दा ‘क’- तक्रारदार यांच्या खात्यावर रू.२२,७२,७५०.२९/- शिल्लक दिसत असली तरी त्यावर सामनेवाले यांनी दि.२१/०४/२०१० रोजीच अग्रहक्क स्थापित केला. त्यामुळे खात्यातून रक्कम निघू शकत नाही. याच कारणामुळे तक्रारदार यांनी दिलेले धनादेश वटू शकले नाही. तक्रारदार यांच्या खात्यावर अग्रहक्क ठेवण्याचे त्यांना सुचित करण्यात आले होते. या कारणामुळे सामनेवाले यांनी धनादेश न वटवून सेवेत त्रुटी केली हे सिध्द होत नाही, असे मंचाचे मत बनले आहे. म्हणूनच मुद्दा ‘क’ चे उत्तर आम्ही ‘नाही’ असे देत आहोत.
९. मुद्दा ‘ड’- तक्रारदार आणि त्यांची पत्नी खुराणा रेन्ट अ कार या कंपनीचे संचालक आहेत. तसेच ते पूर्ती रेन्ट अ कार आणि लॉजिस्टीक्स प्रा.लि. या कंपनीचेही संचालक आहेत. या दोन्ही स्वतंत्र कंपन्या असून पूर्ती कंपनीशी आमचा संबंध नाही असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात तक्रारदार आणि त्यांची पत्नी दोन्ही कंपन्याचे संचालक असल्याचे दाखल कागदपत्रांवरून दिसते.
सामनेवाला यांनी त्याच्या पुष्ट्यर्थ पूर्ती कंपनीच्या संचालकांची यादी दाखल केली आहे. तक्रादार आणि सामनेवाला यांच्यात दि.१०/१२/२००५ रोजी क्रेडीट अॅरेंजमेंट लेटर आणि पर्सनल गॅरेंटी करार करण्यात आला. त्यावरही तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीची स्वाक्षरी आहे. या दोन्ही कागदपत्रांमध्येही तक्रारदार यांनी पूर्ती कंपनीचे कर्ज थकल्यास त्याची जबाबदारी स्विकारली आहे.
आपल्या तक्रारीच्या पुष्ट्यर्थ तक्रारदार यांनी राष्ट्रीय ग्राहक वाद निवारण आयोगातील कोटक महिंद्रा बॅंक विरूध्द जुम्मा खान (२०१३ सीपीआर ३१४) या दाव्याचा दाखला दिला आहे. मात्र त्यातील घटना, परिस्थिती निराळी असल्याने तो दाखला येथे लागू होत नाही, असे मंचाचे मत बनले आहे.
वरील सर्व विवेचनाचा विचार करता सामनेवाले यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला आणि सेवा देण्यात कसूर केली हे सिध्द होत नाही. उलट काही महत्वाच्या बाबी तक्रारदार यांनी लपवून ठेवल्या, असे दिसते. उदा. पूर्ती रेन्ट अ कार आणि लॉजिस्टीक्स प्रा.लि. या कंपनीचे सुमारे २६ लाख रूपयांवरील कर्ज थकले होते. तक्रारदार या कंपनीचे संचालक आहेत आणि त्यांनी थकीत कर्जाबाबत पर्सनल गॅरंटी घेतली होती.
या सगळयांचा विचार करता न्यायमंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आ दे श
१. तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
२. खर्चाबाबत इतर कोणतेही आदेश नाही.
धुळे.
दि.३०/१०/२०१३.
(श्री.एस.एस. जोशी) (सौ.एस.एस. जैन) (सौ.व्ही.व्ही. दाणी)
सदस्य सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, धुळे.