नि.14
मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्य - श्री के.डी.कुबल
मा.सदस्या - श्रीमती वर्षा शिंदे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 235/2011
तक्रार नोंद तारीख : 09/08/2011
तक्रार दाखल तारीख : 08/09/2011
निकाल तारीख : 24/06/2013
----------------------------------------------
धनंजय अनिल मद्वाण्णा
रा.395, पवार तालीमजवळ,
सांभारे गणपती रोड, गांवभाग, सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
आय.सी.आय.सी.आय.सी.आय.बँक लि.
शाखा मार्केट यार्ड, सांगली तर्फे शाखाधिकारी ........ जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड व्ही.एम. केळकर
जाबदारतर्फे : अॅड श्री एस.पी.ताम्हणकर
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. अध्यक्ष: श्री. ए.व्ही.देशपांडे
1. प्रस्तुतची तक्रार वर नमूद तक्रारदारांनी ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 खाली, जाबदार बँकेने त्यास दूषित सेवा दिल्याचे कथन करुन, त्यांनी दिलेल्या दूषित सेवेबाबत शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,000/-, तसेच रक्कम रु.200/- व त्यावर द.सा.द.शे.18 टक्के दराने दि.25/8/2009 पासून रक्कम अदा करेपर्यंत व्याज व तक्रारीचा खर्च रु.2,000/- मिळावा या मागणीकरिता दाखल केली आहे.
2. थोडक्यात हकीकत अशी की, दि.25/8/2009 रोजी तक्रारदाराने त्यांचे वकील श्री आनंद एस.पाटील, रा.मुंबई यांचे जाबदार बँकेत असणा-या सेव्हिंग्ज खाते क्र. 016601510763 या खात्यामध्ये सदर वकीलांचे सूचनेवरुन रक्कम रु.800/-, कोर्ट खर्चाकरिता जमा करण्याकरिता म्हणून, बॅंकेत प्रत्यक्ष जाऊन जमा चलन घेवून, त्यावर रक्कम रु.800/- ही अंकी व अक्षरी लिहून व त्या चलनावर रु.500/- च्या दोन नोटांचा तपशील लिहून, सदर रु.500/- च्या 2 नोटा कॅश काऊंटरवरती वर नमूद खात्यात रु.800/- जमा करण्याकरिता दिले. तथापि कॅश काऊंटरला कॅशियरने सदर खात्यात रु.800/- जमा करण्याऐवजी रु.1,000/- जमा करुन टाकले. सदरची बाब तक्रारदाराने कॅशियरच्या निदर्शनास त्वरीत आणून दिली. तथापि कॅशियर व त्यानंतर बँकेचे शाखाधिकारी यांनी सदरचा व्यवहार थांबविणे किंवा माघारी घेणे शक्य नाही असे सांगितले. तक्रारदाराने रु.200/- ची मागणी सदर अधिका-यांकडे केली, परंतु बँकेच्या अधिका-यांनी तक्रारदाराच्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही व त्यास उडवाउडवीची उत्तरे दिली व त्यायोगे तक्रारदारास दूषित सेवा दिली व अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केला. सदर प्रकाराबाबत तक्रारदाराने दि.28/10/09 रोजी जाबदार बँकेस नोटीस पाठविली व नुकसान भरपाई व रकमेची मागणी केली. सदर नोटीशीस जाबदार बँकेने दि.20/11/09 रोजी उत्तर पाठवून त्यामध्ये आपली चूक झाली असल्याचे कबूल केले. तथापि अद्यापही जाबदार बँकेने तक्रारदारास रु.200/- परत केलेले नाहीत किंवा तत्कालिन कॅशियरवर कोणती कारवाई केली किंवा केली अथवा नाही याबाबत कोणताही खुलासा जाबदार बँकेने केलेला नाही. सबब प्रस्तुतची तक्रार दाखल करणे तक्रारदारास भाग पडले आहे. तक्रारीस कारण दि.25/8/2009 रोजी घडलेचे कथन तक्रारदाराने केले आहे. अशा कथनांवरुन तक्रारदाराने वर नमूद मागणी सदर प्रकरणात केली आहे.
3. आपल्या तक्रारअर्जाच्या पुष्ठयर्थ तक्रारदाराने नि.2 ला आपले शपथपत्र दाखल केले असून नि.4 च्या फेरिस्तसोबत 2 कागदपत्रे, ज्यात दि.28/10/09 ची नोटीसची प्रत व जाबदार बँकेच्या दि.20/11/09 चे पत्राची प्रत यांचा समावेश आहे, दाखल केलेली आहेत.
4. सदरकामी जाबदार बँकेने हजर होवून आपली लेखी कैफियत नि.9 ला दाखल करुन तक्रारदारास कोणतीही दूषित सेवा दिल्याचे नाकारले आहे. तथापि दि.25/8/2009 रोजी तक्रारदार, मुंबई येथील खातेदार अॅड आनंद एस.पाटील यांचे सेव्हिंग्ज बँक खाते क्र. 016601510763 मध्ये रक्कम जमा करण्यास आल्याचे कबूल केले आहे. तक्रारदाराने रु.800/- रक्कम लिहून त्यासोबत रु.500/- च्या दोन नोटांचे तपशील लिहून सदरची रु.1000/- ची रक्कम कॅशियरकडे सदर खात्यात रक्कम रु.800/- जमा करण्याकरता दिली ही बाब जाबदार बँकेने नाकबूल केलेली नाही. तसेच कॅशियरने सदर खात्यात रु.800/- जमा करुन घेण्याऐवजी रक्कम रु.1,000/- जमा करुन घेतल्याचेदेखील बँकेने कबूल केले आहे. तथापि जाबदार बँकेने असे कथन केले आहे की, जाबदार बँकेचे संगणक प्रणालीमध्ये रक्कम जमा केल्यानंतर चूक झाल्यास पुन्हा खातेदाराचे नावे रक्कम टाकण्याकरिता वरिष्ठ कार्यालयाचे अधिका-यांकडून मंजूरी घ्यावी लागते, ती ताबडतोबीने परत करता येत नाही. अशा परिस्थितीत संबंधीत रोखपालाने आपली चूक मान्य करुन रक्कम रु.200/- अर्जदारांना परत देण्याची विशेष तयारीदेखील दर्शविली होती तथापि ती रक्कम घेण्यास तक्रारदाराने नकार दिला. जाबदारच्या म्हणण्याप्रमाणे तक्रारदार हा रक्कम रु.200/- स्वीकारीत नव्हता, त्यामुळे सदर रक्कम तक्रारदारास अद्यापही परत केलेली नाही. तक्रारदाराचे तक्रारीची दखल घेतलेली नाही हे तक्रारदाराचे कथन चुकीचे आहे. सदर कॅशियरवर कारवाई करणे वा न करणे ही जाबदार बँकेच्या अखत्यारीतील बाब आहे. जाबदार बँकेने तक्रारदाराला दि.30/11/09 रोजी पत्र लिहून सदरची रक्कम सदर खात्यामध्ये अनावधानाने जमा झालेबद्दल कळविलेले आहे व संबंधीत कर्मचा-यास त्याबाबत ताकीद दिल्याचे देखील कळविलेले आहे. त्याचप्रमाणे सदरची घटना ही अपवादात्मक असून बँकेच्या सेवेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करु नये अशी विनंती जाबदार बँकेने तक्रारदारास केलेली आहे. या घटनेसंबंधीत बँकेचा हेतू प्रामाणिक आणि पारदर्शी दिसून येतो. त्यांचे पत्रात, तक्रारदारांना बँकेने योग्य तो खुलासा करण्याची, आवश्यकता असल्यास, आश्वासन दिले आहे. त्या पत्रानंतर बँकेचे शाखाधिका-यांनी तक्रारदारांची समक्ष भेट घेवून दिलगिरी व्यक्त केली व वाद रक्कम रु.200/- देवू केली व या प्रकरणावर पडदा पाडावा अशी विनंती केली, तथापि तक्रारदाराने त्यास नकार दिला. आजही जाबदार बँक सदरची रक्कम तक्रारदारास देण्यास तयार आहेत तथापि तक्रारदाराचे जाबदार बँकेत खाते नसल्याने जाबदार बँकेला प्रस्तुत रक्कम तक्रारदार याचे खात्यात इच्छा असूनही जमा करता येत नाही. अशा कथनांवरुन जाबदारांनी तक्रारदारास रक्कम रु.200/- स्वीकारावी असा आदेश करावा आणि सदरचे तक्रार निकाली काढावी अशी विनंती केली आहे.
5. जाबदारांनी आपल्या लेखी कैफियतीचे पुष्ठयर्थ नि.10 ला शपथपत्र दाखल केले आहे. तथापि जाबदार बँकेतर्फे कोणतीही कागदपत्रे प्रस्तुत प्रकरणी दाखल करण्यात आलेली नाहीत.
6. तक्रारदारतर्फे नि.11 ला त्यांचे पुराव्याचे शपथपत्र दाखल करण्यात आले असून त्यांनी नि.12 ला पुरसिस दाखल करुन अधिक पुरावा द्यावयाचा नाही असे कथन केलेले आहे. तसेच नि.13 सोबत दि.25/8/2009 च्या जमा चलनाची दुय्यम प्रत (counterfoil) ची झेरॉक्स प्रत याकामी दाखल केलेली आहे. जाबदार बँकेतर्फे कोणताही पुरावा देण्यात आलेला नाही किंवा संपल्याची पुरसिस देखील देण्यात आलेली नाही. तथापि जाबदार बँकेचे विद्वान वकील श्री ताम्हणकर यांनी प्रस्तुत प्रकरणी आपला युक्तिवाद सादर केलेला आहे.
7. तक्रारदाराचे विद्वान वकील श्री व्ही.एन.केळकर आणि जाबदारांचे विद्वान वकील श्री एस.पी.ताम्हणकर यांचा युक्तिवाद आम्ही ऐकून घेतला आहे.
8. सदर प्रकरणात खालील मुद्दे आमच्या निष्कर्षासाठी उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. तक्रारदारास जाबदार बँकेने दूषित सेवा दिली हे
तक्रारदाराने शाबीत केले आहे काय ? होय.
2. तक्रारदारास अर्जात मागणी केल्याप्रमाणे रक्कम मिळणेस ते
पात्र आहेत काय ? अंशतः होय.
3. अंतिम आदेश खालीलप्रमाणे.
9. आमच्या वरील निष्कर्षांची कारणे खालीलप्रमाणे आहेत.
:- कारणे -:
मुद्दा क्र.1
10. प्रस्तुत प्रकरणामध्ये सर्वच बाबी जाबदारांनी मान्य केल्या आहेत. त्यामुळे पुराव्याचा ऊहापोह करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आम्ही हे वर नमूद केले आहे की, प्रस्तुत प्रकरणामध्ये तक्रारदारतर्फे फक्त पुराव्याचे शपथपत्र दाखल करण्यात आले आहे. त्या शपथपत्रात तक्रारदाराने आपल्या तक्रारीतील कथने शपथेवर पुनरुच्चारीत केली आहेत. तसेच तक्रारदाराने नि.4 च्या फेरिस्तसोबत जाबदार बँकेचे दि.20/11/09 चे त्याला आलेले पत्र दाखल केलेले आहे. त्या पत्राचे अवलोकन करता असे दिसते की, जाबदार बँकेने त्या पत्रात दि.25/08/09 रोजी सेव्हिंग्ज बँक अकाऊंट नंबर 016601510763 या बचत खात्यामध्ये एकूण रु.1,000/-, रु.500/- च्या दोन नोटांच्या स्वरुपात, कॅश काऊंटरला रक्कम रु.800/- त्या बचत खात्यात जमा करण्याच्या उद्देशाने, दाखल केली होती. तथापि, अनावधानाने कॅशियरने ती सर्व रु.1,000/- ची रक्कम सदरचे बचत खात्यात भरली ही बाब जाबदार बँकेने मान्य केली आहे. त्याच पत्रामध्ये जाबदार बॅंकेने तक्रारदारास असेही कळविले आहे की, त्याने संबंधीत कॅशियरला त्याच्या चुकीबद्दल अवगत केले असून जाबदार बँकेने तक्रारदारास सदरची घटना ही अपवादात्मक घटना समजावी आणि जाबदार बँकेच्या एकूणच सेवेबद्दल विपरित अर्थ काढून नये अशी विनंती केल्याचे दिसते. हे पत्र जाबदार बँकेने नाकारलेले नाही. त्यामुळे या पत्रावरुन प्रस्तुत प्रकरणातील सर्व बाबी या आपोआप सिध्द होतात कारण जाबदार बँकने त्या मान्य केल्या आहेत.
11. प्रश्न असा उद्भवतो की सदरची घटना ही दूषित सेवा होते की नाही ? ही बाब दोन्ही पक्षकारांना मान्य आहे की, जाबदार बँकेचे काम हे संगणकीकृत झालेले असून त्यातील सर्व खाते पुस्तके इ. संगणकाद्वारे ठेवली जातात. ज्याठिकाणी संगणकाचा वापर होत नाही, त्याठिकाणी खाते पुस्तक, रोजकीर्द, पासबुक इत्यादी कामे कर्मचा-यांद्वारे केली जातात. ज्याठिकाणी कर्मचारीवृंद सदरचे व्यवहार लिखित स्वरुपात ठेवीत असतात, त्याठिकाणी बँकेत जमा होणारी रक्कम ही कॅशियरकडे जमा केल्यानंतर प्रथम ती रोजकीर्दमध्ये नोंदली जाते व रक्कम जमा करुन घेतली जाते. अशा वेळेला जादा भुगतान किंवा जादा पैसे जमा होणे इत्यादी चूका समायोजन करताना आढळून येऊ शकतात आणि त्या त्या चुका त्याक्षणी दुरुस्त करता येतात. तथापि, संगणकीकृत व्यवहार ज्याठिकाणी असतात, त्याठिकाणी ज्या खात्यामध्ये पैसे जमा करावयाचे आहेत, त्या खात्यात पैसे जमा केल्याक्षणी संगणकाद्वारे जमा रकमेची नोंद होते आणि ती नोंद दुरुस्त करता येत नाही. ही बाब जाबदारतर्फे मंचासमोर युक्तिवादावेळी उपस्थित असणारे त्यांचे विधी अधिका-यांनी मान्य केली. अशी झालेली चूक दुरुस्त करण्याकरिता क्लिष्ट पध्दतीचा पाठपुरावा करुन चुकीने प्राप्त झालेल्या जादा रकमेचे भुगतान बँकेस करता येतो, परंतु त्यात बराच कालावधी जाण्याची शक्यता असते. हीच बाब जाबदार बँकेने आपल्या कैफियतीमध्ये स्पष्टपणे मांडलेली आहे. या गोष्टीचा विचार करता हे स्पष्ट होते की, तक्रारदाराला जर संबंधीत खात्यामध्ये केवळ रक्कम रु.800/- जमा करावयाची होती आणि तशा पध्दतीचे जमा करण्याचे चलन (pay-in-slip) त्याने बरोबर रक्कम भरुन कॅशियरजवळ दाखल केली, तर त्यावेळी कॅशियरचे हे कर्तव्य होते की, pay-in-slip मध्ये नमूद केलेल्या जमा करावयाची रक्कमच संबंधीत बचत खात्यात जमा करावी. तथापि संबंधीत कॅशियरने तसे न करता pay-in-slip वरती नमूद केलेल्या रु.500/- च्या दोन नोटांची एकूण रक्कम रु.1,000/- सदरच्या बचत खात्यात जमा दाखविली. ही बँकेच्या संबंधीत कॅशियरची चूक आहे. त्या चुकीबद्दल संबंधीत कॅशियरविरुध्द काय कारवाई करावी किंवा करावी की न करावी हा जाबदार बँकेचा प्रश्न आहे. परंतु ही तक्रारदाराच्या दृष्टीने अत्यंत सदोष सेवा आहे. बँकेचे ग्राहक बँकेचे व्यवहार करीत असताना बँकेवर अतीव विश्वास ठेवून आपल्या पैशाचा व्यवहार करीत असतात आणि बँकेवर त्या विश्वासास तडा न जाऊ देण्याची जबाबदारी असते आणि जर अनावधानाने का होईना बँकेकडून अशा स्वरुपाची चूक झाली तर ती बँक आपल्या ग्राहकाला दोषविरहित सेवा देण्यास कमी पडली आणि तिने आपल्या ग्राहकास सदोष सेवा दिली असा अर्थ होतो. त्या दृष्टीकोनातून जाबदार बँकेच्या संबंधीत कॅशियरने अनावधानाने केलेल्या चूकीद्वारे तीने तक्रारदारास सदोष सेवा दिली आहे असे म्हणावे लागेल आणि म्हणून तक्रारदाराचे कथन की, जाबदार बँकेने त्यास सदोष सेवा दिली आहे ही बाब स्पष्टपणे शाबीत होते आणि म्हणून आम्ही मुदृा क्र.1 चे उत्तर होकारार्थी दिले आहे.
मुद्दा क्र.2 व 3
12. तक्रारदाराने सदर जादा भरलेली रक्कम रु.200/- आणि त्यावर द.सा.द.शे.18 टक्के दि.25/8/2009 पासून व्याज तसेच त्यास झालेल्या शारिरिक, आर्थिक आणि मानसिक नुकसानीपोटी रु.10,000/-, अधिक कोर्ट खर्च रु.2,000/- इत्यादींची मागणी केली आहे. जाबदार बँकेने देखील तक्रारदाराकडून जादा रक्कम रु.200/- जमा करुन घेण्यात आली ही बाब मान्य केली आहे. तसेच तक्रारदारास ही रक्कम परत करण्याची तयारी देखील दर्शविली आहे. जाबदार बँकेस सदर जादा रक्कम आपल्याजवळ ठेवण्याचा कोणताही अधिकार नाही आणि तक्रारदारास ती रक्कम मिळणे क्रमप्राप्त आहे. सबब तक्रारदारास सदरची रु.200/- ची रक्कम परत करण्याचा आदेश जाबदार बँकेविरुध्द करावा लागेल. तसे या मंचाचे मत झाले आहे.
13. तक्रारदाराने वर नमूद केलेप्रमाणे सदर रकमेवर द.सा.द.शे. 18 टक्के दराने व्याज मागितले आहे. हे व्याज कोणत्या स्वरुपात तक्रारदाराने मागितले आहे याचा खुलासा तक्रारदारतर्फे करण्यात आलेला नाही. ही बाब दिसून येते की, दि.25/8/2009 रोजी जेव्हा तक्रारदाराने जादा रकमेबाबत जाबदार बँकेच्या अधिका-यांजवळ उजर केला, त्यावेळेला बँकेतील अधिका-यांनी त्यास सदर रक्कम रु.200/- परत देण्याची तयारी दर्शविलेली होती तथापि तक्रारदाराने ती रक्कम स्वीकारण्याचे नाकारले. जाबदार बँकेची मुख्य अडचण अशी की, ज्या बचत खात्यामध्ये सदरची जादा रक्कम जमा करण्यात आली, ते बचत खाते तक्रारदाराचे नव्हते. सदरचे खातेदारास त्याचे खात्यात जमा करण्यात आलेल्या रकमेसबंधी काही प्रकार घडला याची माहिती आहे हे दाखविणारा कोणताही पुरावा तक्रारदार किंवा जाबदार बँकेने आणलेला नाही. त्यामुळे जादाची भरलेली रक्कम समायोजित करण्याकरिता सदर बचत खात्यातून ती रक्कम जाबदार बँकेला सदर खातेदाराचे संमतीविना काढून घेता येणार नाही. सदर खातेदार अशी संमती देतील याची खात्री जाबदार बँकेला देता येत नाही. म्हणूनच जाबदार बँकेच्या अधिका-यांनी तक्रारदारास सदरची जादा रक्कम स्वतःमार्फत देण्याची दर्शविल्याची परिस्थती प्रकरणात दिसते. तक्रारदाराने जर त्याच दिवशी बँकेच्या अधिका-यांनी देऊ केलेली रक्कम रु.200/- स्वीकारली असती तरी ती रक्कम बँकेत जमा करण्यामुळे तक्रारदाराचे जे काही तथाकथित नुकसान झाले असते, ते त्यास सहन करावे लागले नसते. त्यामुळे सदरची जादा रक्कम बॅंकेत जमा असल्यामुळे जे काही तक्रारदाराचे नुकसान झाले असेल त्या नुकसानीस तक्रारदार स्वतःच जबाबदार आहे. त्याने जर बँकेच्या अधिका-यांनी त्याच दिवशी देऊ केलेली रक्कम स्वीकारली असती तर त्याचे कोणतेही नुकसान झाले नसते. त्यामुळे तक्रारदारास नुकसान भरपाई दाखल व्याज मागण्याचे अधिकार नाहीत. ज्याठिकाणी जादा रकमेचा भरणा होतो किंवा होईल, त्या वेळेला त्या ठिकाणी जाबदार बँक त्या रकमेवर व्याज देईल असा कोणताही करार तक्रारदार व जाबदार बँकेमध्ये नाही. त्यामुळे तक्रारदाराची सदरची रक्कम रु.200/- या रकमेवर व्याज मागण्याकरिता कोणत्याही करारान्वये अधिकार नाही किंवा जाबदार बँकेवर कोणत्याही कराराने जबाबदारी दिलेली नाही. त्या कलमाखाली देखील तक्रारदारास सदर रकमेवर व्याज मागण्याचा अधिकार दिसत नाही. सबब तक्रारदारास रक्कम रु.200/- वर कोणतेही व्याज मिळण्याचा अधिकार नाही या निष्कर्षास हे मंच आलेले आहे.
14. तक्रारदाराने त्यास झालेल्या मानसिक, शारिरिक व आर्थिक त्रासापोटी जाबदार बॅंकेकडून रु.10,000/- ची मागणी केली आहे. तक्रारदाराने जी जाबदार बँकेस दि.28/10/09 रोजीची (नि.4/1) नोटीस पाठविली, त्या नोटीशीमध्ये तक्रारदाराने मानसिक त्रासापोटी अधिक नोटीस खर्चापोटी रक्कम रु.1,000/- मात्र एवढे मागितल्याचे दिसते. तथापि तक्रारअर्जात त्याने सदर कलमाखाली रु.10,000/- ची मागणी केलेली आहे. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार ही त्याने पाठविलेल्या नोटीशीशी विसंगत आहे, सुसंगत नाही. तथापि तक्रारदारास या संपूर्ण प्रकरणामध्ये काहीतरी त्रास होणे संयुक्तिक आहे. तक्रारदाराने त्यास झालेल्या नुकसानीबद्दल किंवा आर्थिक व शारिरिक त्रासाबद्दल विशिष्ट असा पुरावा या मंचासमोर आणलेला नाही. त्यामुळे त्यास झालेल्या शारिरिक, आर्थिक व मानसिक त्रासापोटी त्यास रक्कम रु.1,000/- इतकीच देणे योग्य राहील असे या मंचाचे मत आहे. तसेच तक्रारदारास प्रस्तुत तक्रारअर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.1,000/- देणे संयुक्तिक राहील असे या मंचाचे मत आहे. सबब आम्ही वर नमूद केलेल्या मुद्दा क्र.2 चे उत्तर अंशतः होकारार्थी दिलेले आहे आणि आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार रक्कम रु.1,000/- चे खर्चासह मंजूर करणेत येत आहेत.
2. जाबदार बँकेने तक्रारदार यांना जादा जमा करण्यात आलेली रक्कम रु.200/- परत करावेत.
3. जाबदार बँकेने तक्रारदारास शारिरिक, मानसिक व आर्थिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/- द्यावेत.
4. सदरच्या रकमा या निकाल तारखेपासून 45 दिवसांचे आत तक्रारदारांना देण्यात याव्यात अन्यथा तक्रारदार जाबदारांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदयातील कलम 25 वा 27 खाली प्रकरण दाखल करु शकतील.
सांगली
दि. 24/06/2013
( वर्षा शिंदे ) ( के.डी.कुबल ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या सदस्य अध्यक्ष