निकालपत्रः- श्री.ज.ल.देशपांडे, अध्यक्ष ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- निकालपत्र तक्रार अर्जाचे संक्षिप्त स्वरुप खालीलप्रमाणेः- तक्रारदार हे आयकर विभागात अधिकारी असून त्यांचे चैन्नई येथून ठाणे येथे नोव्हेंबर, 2002 मध्ये बदली झाली. तक्रारदारांचे सामनेवाला –बँकेकडे बचत खाते तसेच वाहन कर्ज खाते होते. तक्रारदारांनी चैन्नई येथून ठाणे येथे बदली झाल्यानंतर सामनेवाला यांना दि.12.11.2002 चे पत्राने बचत खाते व वाहन कर्ज खाते माटुंगा शाखा, मुंबई यांचेकडे हस्तांतरण करावे असे कळविले, कागदपत्रांची पूर्तताही केली. तथापि, सामनेवाला यांनी वाहन कर्ज खाते मांटुंगा, मुंबई शाखेकडे रवाना केले नाही. दरम्यान, तक्रारदारांनी सप्टेंबर, 2004 तसेच मे, 2005 रोजी वाहन कर्ज खात्यात काही रक्कम जमा केली. 2 तक्रारदारांच्या कथनाप्रमाणे, ऑगस्ट, 2007 मध्ये असे दिसून आले कि, सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या बचत खात्यावर टाच /(lieu) धारणाधिकारचा वापर केला आहे. सामनेवाला यांची वरील कृती अवैद्य व बेकायदेशीर असल्याने तक्रारदारांनी त्यांचे पत्र दि.30.08.2007 रोजी नुकसानभरपाईची मागणी केली परंतु त्या पत्रास सामनेवाला यांनी खोटया मजकुराचे उत्तर दिले. अंतिमतः तक्रारदारांनी सामनेवाला यांना त्यांचे वाहन कर्जाचे संदर्भात सोयी सुविधा पुरविण्यात कसुर केली असा आरोप करुन सामनेवाला यांचेकडून रक्कम रु.5,00,000/- नुकसानभरपाई मिळणे कामी प्रस्तुतची तक्रार दाखल केली. 3 सामनेवाला –बँकेने आपली कैफियत दाखल केली व त्यात असे कथन केले कि, तक्रारदारांच्या विनंतीनुसार त्यांचे बचत खाते मुंबईतील मुंलुंड शाखा येथे पाठविले परंतु वाहन कर्ज खाते अन्य शाखेकडे वर्ग होत नसल्याने ते मांटुंगा शाखेकडे पाठविण्यात आले नाही. सामनेवाला यांनी असे कथन केले कि, सामनेवाला यांच्या सर्व शाखांचे संगणीकरण झाले असल्याने तक्रारदार हे ठाणे अथवा मुंबई येथून वाहन कर्ज खात्यात रक्कम जमा करु शकत होते तथापि, तक्रारदारांनी वाहन कर्ज खात्यामध्ये रक्कम जमा करण्यास टाळाटाळ केली व वाहन कर्ज खाते थकीत ठेवले. अंतिमतः सामनेवाला यांनी धारणाधिकाराचा वापर करुन तक्रारदारांचे बचत खात्यावर तशी नोंदणी घेतली. त्याप्रमाणे, तक्रारदारांनी वाहन कर्ज खात्यामध्ये रक्कम भरण्यास टाळाटाळ केल्याने सामनेवाला –बँकेने त्यांना सोयी सुविधा पुराविण्यात कुठलीही कसुर केली नाही असे कथन केले. 4 तक्रारदारांनी आपले पुराव्याचे शपथपत्र तसेच पत्र व्यवहाराच्या प्रतीं हजर केल्या तर सामनेवाला यांनी त्यांचे अधिकारी- श्री.जतीन शिंदे यांचे शपथपत्र दाखल केले. तक्रारदारांनी सामनेवाला यांच्या कैफियतीस प्रतिउत्तराचे शपथपत्र दाखल केले. तक्रारदार व सामनेवाला यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला. प्रस्तुत मंचाने तक्रारीतील कथने, कैफियतीतील कथने, दोन्हीं बाजूंचे पुराव्याचे शपथपत्र, कागदपत्रें व लेखी युक्तीवाद यांचे वाचन केले. प्रस्तुतच्या दोन्हीं बाजूंच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकला. 5 वरील परिस्थितीत तक्रार निकाली काढणे कामी खालील मुद्दे उपस्थित होतात. क्र. | मुद्दे | उत्तरे | 1 | सामनेवाला यांनी तक्रारदारांचे वाहन कर्ज खात्याच्या संदर्भात सोयी सुविधा पुरविण्यात कसूर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय ? | नाही | 2 | तक्रारदार सामनेवाला यांचेकडून नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत काय ? | नाही | 3 | अंतिम आदेश ? | तक्रार अर्ज रद्द करण्यात येतो. |
कारणमिमांसाः- 6 तक्रारदार हे चैन्नई येथे असताना तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडून वाहन कर्ज रक्कम रु.2,35,000/- दि.07.10.2002 रोजी घेतले होते व त्या कर्जाची परतफेड 60 मासिक हप्त्यामध्ये करावयाची होती व प्रत्येक मासिक हप्ता रक्कम रु.4,955/- या रक्कमेचा होता. तक्रारदार जोपर्यंत चैन्नई येथे होते तोपर्यंत चैन्नई शाखेतील (auto debit system ) स्वयंचलित रक्कम नावे टाकण्याच्या पध्दतीने मासिक हप्ता सामनेवाला यांचेकडून पोहचत होता, तथापि, तक्रारदारांची बदली ठाणे येथे झाल्यानंतर प्रश्न निर्माण झाला. 7 तक्रारदारांच्या कथनाप्रमाणे, त्यांनी सामनेवाला यांना त्याची प्रत दि.12.11.2002 प्रमाणे वाहन कर्ज खाते माटुंगा, मुंबई येथे पाठविण्याबद्दल विनंती केली होती. तथापि, तक्रारदारांनी त्या पत्राची स्थळप्रत / छायांकित प्रत हजर केली नाही. तक्रारदारांनी दि.13.02.2003 च्या पत्राची छायांकित प्रत हजर केली, ज्यामध्ये तक्रारदारांनी दि.20.11.2002 च्या पत्राव्दारे सामनेवाला यांना तक्रारदाराचे वाहन कर्ज खाते माटुंगा, मुंबई येथे हस्तांतरण करण्यात यावे अशी विनंती केल्याचा उल्लेख आहे, तथापि, तक्रारदारांनी दि.20.02.2002 रोजी पत्रांच्या छायांकित प्रती हजर केल्या. 8 या संदर्भात, तक्रारदारांनी स्वतःहून सामनेवाला यांनी त्यांना दिलेल्या पत्राची छायांकित प्रती निशाणी-सी, पृष्ठ क्र.18 वर हजर केली आहे. त्या पत्रामध्ये सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या निवासाचा व कार्यालयाचा पत्ता व दुरध्वनी क्रमांक तसेच नऊ आगाऊ धनादेश तसेच स्वयंचलित रक्कम नावे टाकण्याबद्दलचे अधिकारपत्र, इत्यादी पुर्तता करुन मागितली होती. तक्रारदारांनी त्या पत्राप्रमाणे स्वतःच्या बचत खात्यातून मासिक हप्त्याची रक्कम परस्पर रक्कम वळती करून घेण्याचा अधिकार सामनेवाला यांना दिले असते तर पुढील प्रश्न निर्माण झालेच नसते तथापि, त्या स्वरुपाचे अधिकारपत्र तक्रारदारांनी सामनेवाला यांना दिले होते असे दिसून येत नाही. 9 तक्रारदारांनी सामनेवाला यांना दि.03.10.2004 रोजी रक्कम रु.1,09,010/- तसेच दि.21.05.2005 रोजी रक्कम रु.39,640/- या रक्कमेचा धनादेश दिल्याचे कथन केले आहे ज्याबद्दल वाद नाही. तथापि, तक्रारदारांचे वाहन कर्जावरचा मासिक हप्ता रक्कम रु.4,955/- हा असल्याने वरील धनादेशाची रक्कम कर्ज खात्यात जमा होऊनही वाहन कर्ज खाते नियमित होऊ शकले नाही व वाहन कर्ज खात्यामध्ये थकबाकी दिसून आली. 10 सामनेवाला यांच्या कथनाप्रमाणे, सामनेवाला यांच्या सर्वच शाखांचे संगणीकरण झाले असल्याने तक्रारदार हे आपल्या वाहन कर्जाची रक्कम मुंबई अथवा ठाणे येथूनही भरु शकत होते. या प्रकारची कार्यवाही करण्यास तक्रारदारांना कुठल्या स्वरुपाची अडचण होती याचा बोध तक्रारदारांची तक्रार अथवा लेखी युक्तीवाद यांचे वाचन केल्यावरही होऊ शकत नाही. बँकेचे संगणीकरण झाल्यानंतर वरील परिस्थितीची सुविधा सर्वच ग्राहकांना उपलब्ध आहे. त्यामुळे तक्रारदारांनी त्यांचे वाहन कर्ज खाते मुंबई येथे स्थलांतर करुन मिळावा या प्रकारचा हट्ट सामनेवाला यांचेकडे करणे अपेक्षित नव्हते व सामनेवाला यांनी वाहन कर्ज खाते स्थलांतर करण्यास नकार देऊनही काही अनुचित निर्णय घेतला असे म्हणता येणार नाही. 11 सामनेवाला यांनी त्यांचा लेखी युक्तीवादासोबत वाहन कर्ज कराराची प्रत हजर केली आहे व त्यातील कलम-14 प्रमाणे सामनेवाला –बँकेने तक्रारदारांचे बचत खाते किंवा अन्य खात्यातील रक्कमेवर टाच /धारणाधिकार आणू शकेल असा उल्लेख आहे. भारतीय कराराचे कायदयाचे कलम-171 प्रमाणे बँकेस असा अधिकार आहे. त्यामुळे सामनेवाला- बँकेने तक्रारदारांचे बचत खात्याचे संदर्भात काही रक्कम रोखून धरली किंवा टाच आणली असली तरी ती कार्यवाही बेकायदेशीर ठरत नाही तर याउलट, उभय पक्षी, कराराप्रमाणे ती वैधच ठरते. 12 वरील परिस्थितीत, सामनेवाला यांनी तक्रारदारांना त्यांचे वाहन कर्ज खात्याचे संदर्भात सोयीसुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करू शकत नाहीत. परिणामतः तक्रारदार प्रस्तुतच्या तक्रारीमध्ये कुठल्याही स्वरुपाची दाद मिळण्यास पात्र नाहीत. उक्त विवेचन लक्षात घेता, या प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश (1) तक्रार अर्ज रद्द करण्यात येतो, खर्चाबद्दल आदेश नाहीत. (2) आदेशाच्या प्रमाणिंत प्रती दोन्ही पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT[HONABLE MR. MR.V.G.JOSHI] Member | |