तक्रारदार स्वत: हजर
जाबदेणारांतर्फे अॅड. श्री. जोशी हजर
********************************************************************
निकाल
पारीत दिनांकः- 30/05/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1] तक्रारदारांनी जाबदेणारांकडून त्यांच्या हॉंन्डा अॅक्टीव्हा या गाडीकरीता पॉलिसी घेतली होती, त्याचा कालावधी हा दि. 16/10/2008 ते 15/10/2009 असा होता. दि. 27/1/2009 रोजी त्यांच्या गाडीला अपघात झाला. तक्रारदारांनी लगेचच दि. 28/1/2009 रोजी जाबदेणारांना कळविले व क्लेम दाखल केला. त्यानंतर जाबदेणारांनी श्री राहूल गोसावी यांची सर्व्हेअर म्हणून नियुक्ती केली. सर्व्हे झाल्यानंतर तक्रारदारांची गाडी दुरुस्त करण्यात आली, त्यानंतर दि. 4/2/2009 रोजी तक्रारदारांची गाडी तयार ठेवण्यात आली म्हणून तक्रारदारांनी बील देऊन गाडी घरी घेऊन आले. त्यानंतर दि. 9/2/2009 रोजी जाबदेणारांकडून त्यांना फोन आला व पॉलिसीवर गोमती प्रभा ऐवजी त्यांचे नाव गोमती ग्यानेंद्र प्रसाद प्रभा असे लिहिले असल्याचे सांगितले. त्यानंतर सर्व्हेअर श्री राहूल गोसावी यांनी फोन करुन, प्रिमिअमची रक्कम भरली नसल्यामुळे पॉलिसी रद्द झाल्याचे सांगितले तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी श्री विजय कुमार अकेला यांना प्रिमिअमची रक्कम दिलेली होती व त्यांनी त्याची पावतीही दिली होती. तक्रारदारांना गाडीच्या दुरुस्तीचा एकुण रक्कम रु. 3994/- इतका आला. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार हा खर्च कमी असला तरी चुकीच्या कारणावरुन जाबदेणारांनी तक्रारदारांचा क्लेम नाकारला, म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणारांकडून नुकसान भरपाईपोटी रक्कम रु. 91,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु. 1500/- मागतात.
2] तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
3] जाबदेणारांना नोटीस पाठविली असता, ते मंचामध्ये उपस्थित झाले व त्यांच्या लेखी जबाबाद्वारे तक्रारदाराच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणारांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांची पॉलिसी ही वैध (Valid) नसल्यामुळे त्यांचा क्लेम नाकारण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरला नाही. तक्रारदाराची पॉलिसी ही काही तांत्रिक त्रुटींमुळे रद्द करावी लागली व ही तांत्रिक चुक जाबदेणारांकडून झालेली आहे. त्यामुळे जाबदेणारांनी तक्रारदारास दि. 4/11/2009 रोजी कव्हरींग लेटरसह दुसरी पॉलिसी दिलेली आहे. त्याचप्रमाणे तक्रारदारांचा क्लेम खरा असल्यामुळे त्यांनी लेखी जबाबाबरोबर रक्कम रु. 3394/- चा चेकही दाखल केला. तक्रारदारांच्या नावामध्ये बदल झाला इ. आरोप अमान्य करीत तक्रारदारांची तक्रार नामंजूर करण्यात यावी अशी मागणी जाबदेणार करतात.
4] जाबदेणारांनी त्यांच्या लेखी जबाबाच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे त्यामध्ये त्यांनी तक्रारदारास लिहिलेले दि. 4/11/2009 रोजीचे पत्र व नविन पॉलिसीची प्रत दाखल केली आहे.
5] दोन्ही बाजूंनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांच्या हॉन्डा अॅक्टीव्हा या दुचाकीचा अपघात झाला, म्हणून त्यांनी जाबदेणारांकडे क्लेम दाखल केला. जाबदेणारांनी तांत्रिक त्रुटींमुळे पॉलिसी वैध नाही, हे कारण सांगून तक्रारदारांचा क्लेम नाकारला. जाबदेणारांनी त्यांची चुक मान्य करुन दि. 4/11/2009 रोजीच तक्रारदारास नविन पॉलिसी दिली. तसेच तक्रारदाराचा क्लेम खरा आहे म्हणून लेखी जबाबाबरोबर रक्कम रु. 3994/- चा चेकही दिला, परंतु तक्रारदारांनी तो चेक घेण्यास नकार दिला. तक्रारदार त्यांना रक्कम रु. 91,000/- नुकसान भरपाई मागतात. तक्रारदारांनी रक्कम रु. 91,000/- बद्दल कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही किंवा त्याकरीता कोणताही पुरावा मंचामध्ये दाखल केलेला नाही, त्यामुळे मंच त्यांची ही मागणी मान्य करीत नाही.
जाबदेणारांनी तक्रारदारास वेळेत त्यांच्या क्लेमची रक्कम दिलेली नाही, म्हणून त्यांनी तक्रारदारास रक्कम रु. 3994/- दि. 9/2/2009 पासून ते 14/1/2010 पर्यंत द.सा.द.शे. 9% व्याजदराने द्यावेत. तसेच तक्रारदारांना त्यांच्या क्लेमची रक्कम मिळविण्याकरीता प्रस्तुतची तक्रार मंचामध्ये दाखल करावी लागली, म्हणून ते रक्कम रु. 3000/- तक्रारीच्या खर्चापोटी मिळण्यास पात्र ठरतात. तक्रारदारास रक्कम रु. 3994/- वर द.सा.द.शे. 9% व्याज देण्याचे आदेश दिल्यामुळे मंच नुकसान भरपाईचा विचार करीत नाही.
6] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते.
** आदेश **
1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणारांनी तक्रारदारास रक्कम रु. 3994/-
(रु. तीन हजार नऊशे चौर्याण्णव फक्त) दि.
9/2/2009 पासून ते 14/1/2010 पर्यंत
द.सा.द.शे. 9% व्याजदराने तसेच तक्रारीच्या
खर्चापोटी रक्कम रु. 3000/- (रु. तीन हजार
फक्त) या आदेशाची प्रत मिळाल्यापासून सहा
आठवड्यांच्या आंत द्यावेत.
3. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात याव्यात.