निकालपत्र :- (दि.06.10.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1 यांनी म्हणणे दाखल केले. उर्वरित सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाला गैरहजर आहेत. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, यातील तक्रारदारांनी सामनेवाला बँकेकडे ठेव पावती नं.992 प्रमाणे रक्कम रुपये 30,000/- ठेव ठेवली होती. सदर पावतीच्या तारणावर तक्रारदारांनी दि.13.05.2002 रोजी सामनेवाला बॅंकेकडून रुपये 12,000/- चे कर्ज घेतले. सदर कर्जाची व्याजासह सदर ठेवीमधून परतफेड करुन घेवून उर्वरित रक्कम रुपये 43,981/- सामनेवाला यांनी अनामत ठेवीपोटी बेकायदेशीररित्या जमा करुन घेंतलेली असून त्याबाबत तक्रारदारांना पत्र दिले आहे. सदर रक्कमेची व्याजासह मागणी केली असता सामनेवाला यांनी रक्कम देणेचे मान्य केले, मात्र प्रत्यक्षात रक्कम देणेस जाणीपूर्वक टाळाटाळ करु लागले. त्यामुळे तक्रारदारांनी सामनेवाला यांना दि.05.09.2009 रोजी नोटीस पाठविली. तक्रारदारांना सदर रक्कमेची कौटुंबिक कारणाकरिता आवश्यकता आहे. तथापि, वारंवार मागणी करुनही सामनेवाला यांनी रक्कमा देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे तक्रारदारांनी व्याजासह अनामत रक्कम रुपये 43,181/-, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई रुपये 10,000/- व तक्रारीचा खर्च रुपये 5,000/- मिळणेकरिता प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत सामनेवाला यांचे दि.29.11.2004 रोजीचे पत्र, कर्ज खाते उतारा इत्यादींच्या सत्यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला क्र.1 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, तक्रारदारांनी त्यांच्या ठेवीवर रुपये 12,000/- ठेव तारण कर्ज दि.13.05.2002 रोजी घेतले होते. सदर कर्जाची व्याजासहीत परतफेड करुन देण्याची यातील तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 यांना विनंती केलेवरुन दि.02.09.2004 रोजी कर्जाची रक्कम परतफेड करुन उर्वरित रक्कम रुपये 43,181/- अनामत म्हणून बँकेत ठेवली आहे. त्याबाबत तक्रारदारांना दि.29.11.2004 रोजी पत्रही दिले आहे. दि.14.05.2003 रोजीचे दरम्यान आरबीआय बँकेने सामनेवाला क्र.1 यांचेवर निर्बंध घातल्याने तक्रारदारांची अनामत रक्कम देणेस जाणुनबुजून कसूर केलेला नाही. (5) सामनेवाला क्र.1 हे त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, दि.26.09.2003 रोजी सामनेवाला क्र.1 बँकेवर प्रशासक नियुक्ती करण्यात आली. तदनंतर दि.02.06.2006 रोजी अवसायक कोकरे यांची तर दि.07.04.2008 रोजी श्री.कोकरे यांचेऐवजी श्री.ए.पी.काकडे यांची नियुक्ती करणेत आली. दि.27.10.2008 रोजी डिपॉझिट इन्शुरन्स अॅन्ड क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशन यांचेकडून रक्कम रुपये 98,21,327.75 पैसे इतकी रक्कम ठेवदारांना अदा करणेकरिता चेकने मंजूर झाली. सामनेवाला यांनी दि.20.11.2008 रोजी दैनिक महासत्तामध्ये ज्या ठेवीदारांची मुदत संपलेली आहे, त्यांनी रक्कम घेवून जाणेबाबत जाहीर निवेदन प्रसिध्द केले. त्याप्रमाणे मॅच्युअर व रुपये 1 लाख रक्कमेच्या आंती ठेवीदारांनी रक्कमा नेलेल्या आहेत व अन्य शिल्लक ठेवदारांशी वैयक्तिक संपर्क साधून त्यांच्या ठेवीची रक्कम प्रामाणिकपणे परत मिळाव्यात याकरिता यातील सामनेवाला यांनी आपले चोख कर्तव्य बजावले आहे. सामनेवाला बँकेने आर.बी.आय.कडून अनामत रक्कमेबाबत कोणताही हुकूम न झाल्याने व बँकेवर अवसायक असल्याने तक्रारदारांना सामनेवाला यांचेविरुध्द तक्रार दाखल करणेचा कायदेशीर अधिकान नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी व कॉम्पेनसेटरी कॉस्ट रुपये 5,000/- देणेचे आदेश व्हावेत. (6) ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता प्रस्तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे. तसेच, सामनेवाला यांनी तक्रारीत नमूद ठेवीची रक्कम अद्याप मागणी करुनही तक्रारदारांना दिलेली नाही. त्यामुळे तक्रारीस अद्यापि सातत्याने कारण घडत आहे. सबब, प्रस्तुतची तक्रार मुदतीत आहे. (7) या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. तक्रारदारांनी सामनेवाला बँकेकडे ठेव पावती क्र.992 द्वारे रुपये 30,000/- ठेव ठेवली होती. सदर पावतीच्या तारणावर तक्रारदारांनी दि.13.05.2002 रोजी सामनेवाला बॅंकेकडून रुपये 12,000/- चे कर्ज घेतले. सदर कर्जाची व्याजासह सदर ठेवीमधून परतफेड करुन घेवून दि.02.09.2004 रोजी उर्वरित रक्कम रुपये 43,981/- सामनेवाला यांनी अनामत ठेवीपोटी जमा करुन घेंतलेली असून त्याबाबत तक्रारदारांना पत्र दिले आहे. सदर कथनांचे पुष्टी प्रित्यर्थ तक्रारदारांनी तक्रारीसोबत सामनेवाला यांचे दि.29.11.2004 रोजीचे पत्र व तक्रारदारांचा कर्ज खाते उता-याची प्रती दाखल केली आहे. सदरच्या बाबी सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यात मान्य केलेल्या आहेत. सदर अनामत रक्कम रुपये 43,981/- ची तक्रारदारांनी सामनेवाला बँकेकडे व्याजासह मागणी केली आहे. परंतु, सामनेवाला यांनी तक्रारदारांची सदरची अनामत रक्कम व्याजासह अदा केलेली नाही. याबाबत सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्याच्या पुष्टीप्रित्यर्थ कोणताही समाधानकारक पुरावा या मंचासमोर आणलेला नाही. तसेच, त्यांच्या म्हणण्यातील कथनांचा तक्रारदारांच्या तक्रारींशी कोणताही दुरान्वयेदेखील संबंध नसल्याचे स्पष्ट होते. (8) सामनेवाला क्र.12-जगन्नाथ काशिनाथ कोळेकर व सामनेवाला क्र.18-मारुती भाऊ चव्हाण हे मयत झाल्याने तक्रारदारांनी दि.29.07.2010 रोजी या मंचाने पारीत केलेल्या आदेशान्वये सदर सामनेवाला यांची नांवे प्रस्तुत प्रकरणातून कमी करणेत आली आहेत. सबब, तक्रारदारांची व्याजासह अनामत ठेव रक्कम रुपये 43,981/- सामनेवाला यांनी न देवून त्यांच्या सेवेत त्रुटी केली आहे. सबब, तक्रारदारांची सदर अनामत रक्कम देण्याची सामनेवाला क्र. 1 ते 11 व 13 ते 17 यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी तर सामनेवाला क्र.19 हे शासकिय अधिकारी असल्याने त्यांची केवळ संयुक्तिक जबाबदारी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (9) तक्रारदार यांनी प्रस्तुत कामी सामनेवाला यांचे दि.29.11.2004 रोजीच्या पत्रा सत्यप्रतींचे अवलोकन केले असता सदर ठेव ही दि.02.09.2004 रोजी अनामत म्हणून जमा करुन घेतल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे त्यांची सदर अनामत रक्कम रुपये 43,981/- द.सा.द.शे. 6 टक्के व्याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (10) तक्रारदारांनी अनामत रक्कमेची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्याजासह रक्कम परत न दिल्याने सदर रक्कम मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते. (2) सामनेवाला क्र. 1 ते 11 व 13 ते 17 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.19 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना अनामत रक्कम रुपये 43,981/- (रुपये त्रेचाळीस हजार नऊशे एक्क्याऐंशी फक्त) द्यावी. सदर रक्कमेवर दि.02.09.2004 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्कमा मिळपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के व्याज द्यावे. (3) सामनेवाला क्र. 1 ते 11 व 13 ते 17 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.19 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |