निकाल
पारीत दिनांकः- 30/05/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदाराची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे आहे.
1] तक्रारदारांनी वर्तमानपत्रातील जाबदेणारांची जाहिरात पाहून एम.बी.ए. साठी अॅडमिशन घेतले. या एम.बी.ए.च्या दोन वर्षांच्या कोर्सची फी रक्कम रु. 87,814/- होती, त्यानुसार तक्रारदारांनी सर्व रक्कम भरुन कोर्स जॉईन केला. तेथे त्यांना जाबदेणारांचे प्रतिनिधी श्री जयेश भेटले आणि तक्रारदारांचे सर्व कागदपत्रे त्यांनी घेतली व कोर्स सुरु केला. त्यानंतर जवळ-जवळ 4 महिने श्री जयेश कोर्ससाठी उपस्थित राहिले नाहीत, त्यामुळे तक्रारदार त्यांची पहिली सेमीस्टर पूर्ण करु शकले नाहीत. तक्रारदारांनी याविषयी जाबदेणारांना ई-मेल केला, तेव्हा जाबदेणारांनी तक्रारदारांचीच चुकी असल्याचे सांगितले. म्हणून तक्रारदारांनी फी परत मागितली, ती देण्यास जाबदेणारांनी नकार दिला आणि पहिल्या ग्रुपमध्ये हजर राहण्याची संधी दिली, परंतु तक्रारदार सर्व विषयांमध्ये चार वेळा नापास झाले, म्हणून त्यांनी रिव्हॅल्युएशनची मागणी केली, परंतु जाबदेणारांनी तक्रारदारांची ही मागणी नाकारली. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जाबदेणारांच्या निष्काळजीपणामुळे त्यांचे शैक्षणिक वर्ष व करिअर वाया गेले, त्यामुळे त्यांना मानसिक व शारीरिक त्रास झाला, म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणारांकडून फीची रक्कम द.सा.द.शे. 18% व्याजदराने, रक्कम रु. 2,00,000/- नुकसान भरपाई व इतर दिलासा मागतात.
2] तक्रारदारांनी तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ त्यांचे व त्यांच्या विद्यार्थी मित्राचे शपथपत्र आणि कागदपत्रे दाखल केली.
3] जाबदेणारांना नोटीस पाठविली असता, नोटीस मिळूनही ते गैरहजर राहिले म्हणून मंचाने त्यांच्याविरुद्ध एकतर्फा आदेश पारीत केला.
4] तक्रारदाराने दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी जाबदेणारांच्या इन्स्टीट्युटमध्ये एम.बी.ए.साठी अॅडमिशन घेतले होते व त्याकरीता त्यांनी पूर्ण फी भरली होती, हे तक्रारदारांनी दाखल केलेल्या स्टेटमेंटवरुन दिसून येते. तक्रारदारांनी त्यांचा मित्र विराट सोनार याच्या “Fee Remittance Form” ची प्रत दाखल केली आहे. त्यामध्ये संपूर्ण फीचे विवरण दिलेले आहे, बेसिक फीपोटी रक्कम रु. 56,000/-, ट्रेनिंग क्लासेससाठी रक्कम रु. 12,000/- आणि स्पेशल प्लेसमेंट स्कीमपोटी रक्कम रु. 4500/- असे नमुद केले आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जाबदेणारांनी पूर्ण फी घेऊनही सदरचा कोर्स पूर्ण केला नाही व वर नमुद केलेल्या विवरणापैकी कोणतीही गोष्ट पूर्ण केली नाही. जाबदेणारांनी दोन वर्षांच्या कोर्सची फी एकदाच घेतली व कोणतेही शिक्षण दिले नाही, तसेच तक्रारदारांनी रिव्हॅल्युएशनची मागणी केली असता, ती ही नाकारली, ही जाबदेणारांची सेवेतील त्रुटी ठरते, तसेच यावरुन जाबदेणारांनी अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केल्याचे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार फीची रक्कम परत मिळण्यास हक्कदार ठरतात, असे मंचाचे मत आहे.
5] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते.
** आदेश **
1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणारांनी तक्रारदारास रक्कम रु. 87,814/-
(रु. सत्त्याऐंशी हजार आठशे चौदा फक्त) द.सा.द.शे.
9% व्याजदराने, तक्रार दाखल करण्याच्या तारखेपासून
म्हणजे दि. 28/05/2010 पासून ते रक्कम अदा
करेपर्यंत आणि रक्कम रु. 1,000/- (रु. एक हजार
फक्त) तक्रारीच्या खर्चापोटी या आदेशाची प्रत मिळाल्या
पासून सहा आठवड्यांच्या आंत द्यावी.
3. निकालाच्या प्रती दोन्ही पक्षकारांना नि:शुल्क
पाठविण्यात याव्यात.