(घोषित दिनांक 17/01/2011 द्वारा – श्रीमती ज्योती पत्की, सदस्य) या तक्रारीची महिती थोडक्यात खालीलप्रमाणे आहे. तक्रारदाराने गैरअर्जदार बँकेच्या ज्युबली पार्क, भडकल गेट औरंगाबाद येथील एटीएम केंद्रावर दिनांक 13/5/2010 रोजी सकाळी 9.49 वाजता पगाराचे पैसे काढण्यासाठी गेले असता प्रथम त्यांनी खात्यावरील शिल्लक रक्कम बघण्यासाठी मशीन हाताळले त्यावेळेस त्यांना रक्कम रु 6,425/- शिल्लक असल्याचे स्लीपद्वारे कळाले. त्यानंतर त्यांनी पुन्हा शिल्लक रक्कम काढण्यासाठी मशीन हाताळले असता मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे त्याचे खात्यावर शिल्लक असलेली रक्कम निघाली नाही व त्यास शिल्लक रकमेची पावती देखील मिळाली नाही. त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी 18.41 वाजता खात्यातील शिल्लक रक्कम काढण्यासाठी मशीन हाताळले असता त्याचे खात्यावर रक्कम रु 25/- शिल्लक असल्याचे स्लिपवरुन त्यास कळाले. तक्रारदाराने रक्कम मिळाली नाही म्हणून बँकेकडे तक्रार नोंदविली असता बँकेने पैसे ट्रान्सलेट करण्याचा फॉर्म दिला व तुमच्या पैशासाठी आय.डी.बी.आय. ब्रँच मुंबईला कळवू व तुमचे पैसे मिळण्यासाठी 15 ते 20 दिवस लागतील असे सांगितले. त्यानंतर तक्रारदार पुन्हा 15 दिवसानंतर बँकेत गेले असता तुमचे पैसे तुमच्या खात्यावरुन निघाले असे सांगितले. तक्रारदारास त्याचा पगार न मिळाल्यामुळे त्यास मानसिक व आर्थिक त्रास झाला म्हणून तक्रारदाराने त्याच्या खात्यावर शिल्लक असलेली रक्कम रु 6,425/-, मानसिक त्रासापोटी रु 1,000/- व तक्रारीचा खर्च रु 500/- गैरअर्जदार बँकेकडून मिळावेत अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार बँकेने लेखी निवेदन दाखल करुन तक्रारदाराची तक्रार अमान्य केली आहे. बँकेचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराचे एटीएम कार्ड त्याचे कडेच असून त्याचा गुप्त कोड नंबर फक्त त्यालाच माहित आहे व त्याचे शिवाय तो कोणालाही माहित नाही त्यामुळे त्याचेशिवाय कोणीही त्या एटीएम कार्डवर व्यवहार करु शकत नाही. तक्रारदाराने दिनांक 13/5/2010 रोजी सकाळी 9.49 वाजता शिल्लक विचारणा केली व त्याच दिवशी त्याने स्वत: दुपारी 13.33 वाजता सदर एटीएम कार्डचा वापर करुन रु 6,400/- काढल्याचे तपासात निषन्न झाले आहे. तक्रारदाराने एटीएम कार्डचा वापर करुन रक्कम रु 6,400/- काढल्यामुळे त्याला पुन्हा रक्कम देता येत नाही. तक्रारदाराने बँकेकडून पैसे उकळण्याच्या उद्देशाने ही खोटी तक्रार दाखल केली आहे. म्हणून तक्रारदाराची तक्रार खर्चासह रद्द करावी अशी मागणी बँकेने केली आहे. तक्रारदाराने दाखल केलेले स्वत:चे शपथपत्र व कागदपत्रे आणि गैरअर्जदार बँकेने दाखल केलेले प्रभाकर पाटील यांचे शपथपत्र व कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकण्यात आला. तक्रारदाराने गैरअर्जदार आयडीबीआय बँकेच्या एटीम केंद्रावरुन दिनांक 13/5/2010 रोजी सकाळी 9.49 वाजता त्याचे खात्यातील शिल्लक रक्कम पाहण्यासाठी एटीएम मशीन हाताळले त्यावेळेस त्याचे खात्यावर रक्कम रु 6,425/- शिल्लक होते ही बाब तक्रारदाराने दाखल केलेल्या एटीएमच्या स्लिपवरुन दिसून येते. परंतू तक्रारदाराने त्याच दिवशी दुपारी 13.33 वाजता एटीएम कार्डचा वापर करुन रक्कम रु 6,400/- काढल्याचे गैरअर्जदार बॅकेने दाखल केलेल्या जर्नल प्रिंट रोल वरुन दिसून येते. तसेच बँकेने दाखल केलेले दिनांक 13/5/2010 रोजीचे अकाऊंट लेजर पाहिले असता त्यामध्ये तक्रारदाराचे खात्यावरुन त्याच दिवशी दुपारी 13.33 वाजता रक्कम काढल्याचे दिसून येते. एटीएम कार्डचा कोड नंबर हा कार्डधारकालाच माहित असतो त्यामुळे कार्डधारकाशिवाय इतर कोणीही त्याचा कोड नंबर वापरुन रक्कम काएण्याचा प्रश्नच उदभवत नाही. तक्रारदाराने शिल्लक रक्कम काढण्यासाठी मशीन हाताळले असता मशीनमध्ये बिघाड होता व त्यास रक्कम मिळाली नाही आणि पावतीही मिळाली नाही यासंदर्भात तक्रारदाराने बँकेकडे तक्रार केल्याचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे तक्रारदाराचे या म्हणण्यावर विश्वास ठेवता येणार नाही. तक्रारदाराचे खात्यावरुन एटीएम कार्डचा वापर करुन दिनांक 13/5/2010 रोजी दुपारी 13.33 वाजता रककम रु 6,400/- काढल्याचे स्पष्ट दिसून येत असल्यामुळे गैरअर्जदार बँकेने सदर रक्कम देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. गैरअर्जदार बॅकेने तक्रारदारास सदर रक्कम न देऊन कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नाही असे मंचाचे मत आहे. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश - तक्रार फेटाळण्यात येते.
- दोन्ही पक्षांनी आपापला खर्च सोसावा.
(श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्री दिपक देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष UNK
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |