नि. 18 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 177/2010 नोंदणी तारीख – 28/7/2010 निकाल तारीख – 4/11/2010 निकाल कालावधी – 114 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री सुभाष भबुतमल संघवी रा.99, बुधवार पेठ, कराड जि.सातारा पिन 415 110 ----- अर्जदार (अभियोक्ता श्री आर.सी.शहा) विरुध्द वि भागीय व्यवस्थापक आय.सी.आय.सी.आय.लोंबार्ड जी.आय.सी.लि. ओंकार प्लाझा, बागल चौक, शाखा कोल्हापूर करिता शाखा सातारा ----- जाबदार (अभियोक्ता श्री कालिदास माने) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार यांनी दि.30/5/2007 रोजी महिंद्रा लोगन हे वाहन खरेदी केले. सदरचे वाहनाचा विमा त्यांनी जाबदार यांचेकडे उतरविला होता. सदरचे वाहनास विमा कालावधीत अपघात होवून वाहनाचे नुकसान झाले. सदरचे अपघाताची संपूर्ण नुकसान भरपाई देण्याची जबाबदार जाबदार यांची होती. परंतु जाबदार यांनी संपूर्ण नुकसान भरपाई दिली नाही. तसेच जाबदार यांचे सांगणेवरुन अर्जदर यांनी ज्याठिकाणी वाहन ठेवले त्या जागेचे भाडे रु.12,000/- जाबदार यांनी दिलेले नाही. अर्जदार यांना जाबदार यांचेकडून वाहनाचे नुकसानी पोटी अद्याप रु.58,200/- येणे आहेत. तसेच वाहनाचे नोंदणीपोटी रु.45,075/- व जागेच्या भाडयापोटी रु.12,000/- असे एकूण रु.1,15,275/- येणे आहेत. सदरची रक्कम मिळावी म्हणून अर्जदार यांनी जाबदार यांना नोटीस पाठविली परंतु जाबदार यांनी त्यास उत्तर दिलेले नाही. सबब वर नमूद रक्कम व्याजासह मिळावी, मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम मिळावी यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. 2. जाबदार यांनी प्रस्तुतचे कामी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि. 16 ला दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी अर्जदारचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. जाबदार यांनी पॉलिसीचे शर्ती व अटीप्रमाणे, वाहनाचे वय लक्षात घेवून व योग्य तो घसारा वजा करुन रु.4,57,000/- अर्जदार यांना अदा केलेली आहे. सदरची रक्कम अर्जदार यांनी जाबदारकडून पूर्ण व अंतिम क्लेम रक्कम म्हणून स्वीकारली आहे. सदरची रक्कम स्वीकारतेवेळी अर्जदार यांनी जाबदारकडे कोणतीही तक्रार केली नव्हती. नोंदणीखर्चापोटी व जागेच्या भाडयापोटी अर्जदार यांनी मागितलेली रक्कम कोणत्या आधारावर मागितली आहे याचा कोणताही खुलासा अर्जदार यांनी केलेला नाही. अर्जदार हे आता कोणतीही रक्कम जाबदारकडून मिळणेस पात्र नाहीत असे जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये कथन केले आहे. 3. जाबदारतर्फे वकील श्री माने यांनी केलेला युक्तिवाद ऐकला. तसेच अर्जदार व जाबदारतर्फे दाखल कागदपत्रे पाहिली. 4. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? होय ब) जाबदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केली आहे काय ? नाही क) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. कारणे 5. अर्जदार यांची तक्रार अशी आहे की, त्यांचे वाहनास झालेल्या अपघाताचे नुकसान भरपाईची संपूर्ण रक्कम जाबदार यांनी दिली नाही. वाहनाचे रु.5,15,200/- चे नुकसान झाले परंतु जाबदार यांनी फक्त रु.4,57,000/- अर्जदारास दिले तसेच वाहनाचे नोंदणीचा खर्च व जागेच्या भाडयाचा खर्च जाबदार यांनी दिलेला नाही, सबब सदरची रक्कम मिळावी अशी अर्जदार यांची मागणी आहे. परंतु वाहनाचे झालेल्या एकूण नुकसानीबाबत अर्जदार यांनी कोणताही सविस्तर तपशील व त्याचे पृष्ठयर्थ कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. त्यामुळे वाहनाचे निश्चित किती नुकसान झाले याबाबत काहीही निष्कर्ष काढता येणार नाही. सबब वाहनाचे रु.5,15,200/- चे नुकसान झाले या अर्जदारचे कथनावर पुराव्याअभावी विश्वास ठेवता येणार नाही. तसेच जाबदार यांनी मंजूर केलेली रक्कम रु.4,57,000/- अर्जदार यांनी स्वीकारली आहे. परंतु सदरची रक्कम त्यांनी अंडर प्रोटेस्ट स्वीकारली किंवा पूर्ण व अंतिम देय रक्कम स्वीकारली याबाबत कोणताही पुरावा याकामी दाखल नाही. त्यामुळे ठोस पुराव्याअभावी अर्जदारचे कथनावर विश्वास ठेवता येणार नाही. 6. अर्जदार यांनी त्यांचे तक्रारअर्जामध्ये वाहनाचे नोंदणी खर्चापोटी रु.45,075/- व वाहन पार्कींगचे जागेचे भाडयाचे पोटी रु.12,000/- ची मागणी केली आहे. परंतु सदरच्या रकमांची मागणी अर्जदार यांनी कोणत्या नियमाच्या वा अटीच्या आधारे केली आहे, सदरच्या रकमा जाबदार हे विमा पॉलिसीचे अटीप्रमाणे कशा देय लागतात याबाबत अर्जदार यांनी कोणताही सविस्तर तपशील दिलेला नाही अगर कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. तसेच सदरच्या खर्चाच्या पावत्याही अर्जदार यांनी याकामी दाखल केलेली नाही. अर्जदार यांनी सदरचे दोन्ही मागण्यांबाबत केवळ मोघम कथने केली आहेत. त्यामुळे सदरची कथने विश्वासार्ह मानता येणार नाहीत. सबब अर्जदार हे त्यांची तक्रार शाबीत करु शकलेले नाहीत असे या मंचाचे मत आहे. 7. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत येत आहे. 2. खर्चाबाबत काहीही आदेश करणेत येत नाहीत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 4/11/2010 (सुनिल कापसे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |