निकालपत्र :- (दि.27.09.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1 यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या व सामनेवाला क्र.1 यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाला क्र.2 व 3 गैरहजर आहेत. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, सामनेवाला यांचा विमा उतरविणे, कर्ज पुरवठा करणे इत्यादी व्यवसाय आहे. तक्रारदारांचा क्रेडिट कार्ड नं.4477 4780 1671 3004 असा आहे. सदर क्रेडिट कार्ड वर सामनेवाला यांनी बेकायदेशीरपणे इन्श्युरन्स खर्च रुपये 10,393.49 टाकून त्यातील व्याज, सरचार्ज, लेट पेमेंट फी, सर्व्हिस टॅक्स इत्यादी खर्च आकारले आहेत. सदरचा खर्च क्रेडिट कार्ड वर टाकलेला आहे. उपरोक्त संपूर्ण खर्च हा तक्रारदारांना विचारात न घेता बेकायदेशीरपणे व मनमानीपणे क्रेडिट कार्डवर टाकलेला आहे. सामनेवाला यांनी दि.07.02.2009 रोजी सदर रक्कमेची मागणी केली आहे व वारंवार मोबाईलद्वारे संपर्क साधून त्रास देत आहेत. याबाबत तक्रारदारांनी सामनेवाला यांना वेळोवेळी दि.07.06.2009, दि.10.07.2007 व दि.05.07.2007 रोजी रितसर पत्रे पाठवून कळविले आहे. तरीसुध्दा सामनेवाला यांनी त्यास खोडसाळपणे मागणी पत्र पाठवून सदर रक्कमेची मागणी केलेली आहे. सबब, तक्रारदारांना मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रुपये 1 लाख वसूल होवून मिळावेत, तक्रारदारांचे क्रेडिट कार्डवर सामनेवाला यांनी टाकलेला इन्श्युरन्स खर्च त्यावरील व्याज, सरचार्ज, लेट पेमेंट फी, सर्व्हिस टॅक्स इत्यादी कमी करणेचे आदेश व्हावेत अशी तक्रारदारांनी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारी सोबत सामनेवाला क्र.1 यांनी दिलेली नोटीस, तक्रारदारांनी सदर नोटीसीस दिलेले उत्तर इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला क्र.1 विमा कंपनीने त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदाराची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, सामनेवाला यांचा विमा व्यवसाय असून तक्रारदारांनी घेतलेले क्रेडिट कार्ड हे आय.सी.आय.सी.आय. बँक यांचे आहे. सदर सामनेवाला व आय.सी.आय.सी.आय.बँक या दोन्ही वेगवेगळया कंपन्या आहेत. सदर सामनेवाला यांनी बेकायदेशीरपणे विमा हप्ता व त्या अनुषंगाने खर्च क्रेडिट कार्डवर टाकलेले नाहीत. तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 यांचेशी टेलि-सेल्स कम्युनिकेशन द्वारे संपर्क साधून हेल्थ पॉलीसी खरेदी केलेली आहे. त्यावेळेस तक्रारदारांनी क्रेडिट कार्ड नंबर दिलेला असून त्यावर विमा हप्त्याची रक्कम खर्ची टाकणेची संम्मती दिली आहे. तसेच, सदर टेलि-सेल्स कम्युनिकेशनचे दरम्यान झालेल्या संभाषणामध्ये तक्रारदारांनी त्यांच्या वैयक्तिक माहिती सामनेवाला विमा कंपनीला दिलेली आहे. सदर संभाषणाची शपथपत्र व कॉम्पॅक्ट डिस्क प्रस्तुत प्रकरणी दाखल केले आहे. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीत सामनेवाला हे त्यांचेशी संपर्क साधून त्रास देतात याबाबतचे कथन खोटे आहे. सदरचे कथन हे आय.सी.आय.सी.आय.बँक यांचेबाबत असून प्रस्तुत सामनेवाला यांचेबाबत नाही. तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीत मागणी केलेली नुकसान भरपाई ही चुकीची आहे व बेकायदेशीर आहे. तक्रारदारांनी आय.सी.आय.सी.आय.बँक लि. या कंपनीला पक्षकार केलेले नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत यावी अशी विनंती केली आहे. (5) सामनेवाला क्र.1 यांनी त्यांच्या म्हणण्यासोबत तक्रारदार व सामनेवाला क्र.1 यांचे प्रतिनिधी यांचे दरम्यान झालेल्या संभाषणाची कॉम्पॅक्ट डिस्क, सदर संभाषणाबाबत सामनेवाला यांचे प्रतिनिधींचे शपथपत्र दाखल केले आहे. (6) या मंचाने दोन्ही बाजूंच्या वकिलांचे युक्तिवाद, दाखल कागदपत्रे यांचे अवलोकन केले आहे. तसेच, तक्रारदार व सामनेवाला क्र.1 यांचे प्रतिनिधी यांचेमध्ये टेलि-सेल्स कम्युनिकेशनद्वारे झालेल्या संभाषणाची कॉम्पॅक्ट डिस्क दाखल केली आहे. सदर संभाषण शपथेवर दाखल केले आहे. सामनेवाला ही विमा कंपनी आहे. सामनेवाला कंपनीचे अधिकारी व तक्रारदारांचे टेलि-सेल्स कम्युनिकेशनद्वारे झालेल्या संभाषणाचे शपथपत्राचे अवलोकन केले असता तक्रारदारांनी त्यांची वैयक्तिक माहिती दिलेली आहे, तसेच, क्रेडिट कार्ड नंबर दिलेला आहे, सदर क्रेडिट कार्डवर विमा हप्ता व त्या अनुषंगाने येणारे खर्च नांवे टाकणेची संम्मती दिलेची दिसून येते. तक्रारदारांनी हेल्थ पॉलीसी खरेदी केल्यानंतर सदर पॉलीसी त्यांना 15 दिवसांत नाकारणे आवश्यक होते. परंतु, पॉलीसी खरेदी केल्यानंतर 15 दिवसांत तक्रारदारांनी ती स्विकृत केलेबाबत किंवा अस्विकृत केलेबाबतचा पर्याय त्यांनी निवडलेला नाही. सामनेवाला क्र.1 यांचा क्रेडिट कार्डबाबतचा व्यवसाय नाही. तक्रारदारांनी आय.सी.आय.सी.आय.बँकेला पक्षकार न करता त्यांच्या कर्मचारी/अधिकारी यांना पक्षकार केल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रस्तुत तक्रारीस नॉन जॉईंडर ऑफ पार्टीज ची बाध येते. इत्यादी विवेचनाचा विचार करता तक्रारदारांच्या तक्रारीत कोणतीही गुणवत्ता नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब आदेश. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत येते. 2. खर्चाबाबत आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |