नि.19 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 254/2010 नोंदणी तारीख - 2/11/2010 निकाल तारीख - 8/3/2011 निकाल कालावधी - 126 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्री सुनिल कापसे, सदस्य यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री भिकू भाऊ भोसले रा.217, रविवार पेठ, मार्केट यार्ड, सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री किशोर पवार) विरुध्द 1. मॅक्स मेंझेस, जनरल मॅनेजर, आय.सी.आय.सी.आय.सिक्युरिटीज लि. आय.सी.आय.सी.आय. सेंटर, एच.टी.पारेख मार्ग, चर्चगेट, मुंबई 400 020 2. निशांत कासलीवाल एजंट / माहितगार इसम आय.सी.आय.सी.आय. सिक्युरिटीज लि. आय.सी.आय.सी.आय. बँक शाखा छ.शाहू जिल्हा क्रिडा संकुल, रविवार पेठ, एस.टी.स्टँडजवळ, सातारा, ता.जि.सातारा ----- जाबदार (अभियोक्ता श्री राजीव अत्रे) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे - 1. अर्जदार हे सातारा येथील कायमचे रहिवासी आहेत. अर्जदारने स्वतःच्या चरितार्थासाठी उत्पन्नाचा मार्ग म्हणून जाबदार क्र.2 यांनी सुचविलेप्रमाणे, रु.5,00,000/- गुंतविल्यास दरमहा रु.10,000/- मिळवून देण्याची हमी दिल्याने अर्जदारने त्यांचेमार्फत विविध कंपन्यांचे समभाव व तत्सम माल खरेदी-विक्री करण्याचे ठरवले व त्यांचेकडे खाते उघडण्याचे ठरवले. त्यासाठी भांडवल म्हणून अर्जदारने रु.5,00,000/- जाबदारकडे जमा केले व त्यांचे सल्ल्यानुसर ट्रेडींग अकाऊंट व डिमटेरियलाईज्ड अकाऊंट उघडले. जाबदारतर्फे योगिता खुंटाळे ही व्यक्ती अर्जदारबरोबर व्यवहार पहात होती. परंतु तदनंतर ती कंपनी सोडून गेल्याचे अर्जदार यांना समजले. त्यानंतर अर्जदारने त्याचे खात्यावरील बॅलन्सबाबत व व्यवहाराबाबत अनेकवेळा चौकशी केली असता जाबदारतर्फे कोणीही समाधानकारक उत्तरे दिलेली नाहीत. अर्जदारने स्वतःचे डिमॅट खाते पाहिले असता त्यावर अत्यंत अल्प किंमतीचे समभाग जमा असलेचे दिसून आले. त्यामुळे अर्जदार यांचे रु.5 लाख बुडाले व त्याचा हिशोबही मिळत नाही. सबब सदरची रक्कम व त्यावर व्याज मिळावे, तसेच मानसिक त्रासापोटी, प्रवासखर्चापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम मिळावी यासाठी अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज दाखल केला आहे. 2. जाबदार यांनी प्रस्तुतचे कामी त्यांचे लेखी म्हणणे/कैफियत नि. 14 ला दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी अर्जदारचे तक्रारअर्जातील बहुतांश मजकूर नाकारलेला आहे. जाबदारने दरमहा रु.1,0,000/- चे उत्पन्नाची हमी दिली होती हे कथन खोटे आहे. खातेधारकाने फोनवरुन दिलेल्या माहितीवरुन जाबदार हे शेअर्सची खरेदी विक्री करतात व प्रत्येक व्यवहाराची माहिती खातेधारकाला कळवितात. अर्जदार हे त्यांचे डिमॅट अकाऊंट केव्हाही पाहू शकत होते. अर्जदारचे खात्यावरील व्यवहार हे अर्जदारचे सांगणेवरुन करण्यात आलेले आहेत. अर्जदार हा जाबदार यांचा ग्राहक होत नाही. अर्जदार यांनी जाबदार यांच्या सेवेचा उपयोग हा व्यावसायिक कारणासाठी केला आहे. अर्जदार व जाबदार यांचे मधील व्यवहार हे ग्राहक या संज्ञेत बसत नाहीत. अर्जदार व जाबदार यांचेमधील करारानुसार कोणत्याही प्रकारचा वाद दोन्ही पक्षांमध्ये उदभवल्यास सदर वाद हा केवळ आर्बिट्रेशनच्या माध्यमातूनच सोडवला जाईल अशी तरतूद आहे. परंतु अर्जदार यांनी आर्बिट्रेटरकडे दाद मागितलेली नाही.. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये कथन केले आहे. 3. अर्जदारतर्फे दाखल लेखी युक्तिवाद नि. 18 ला पाहिला. जाबदारतर्फे अभियोक्त्यांनी केलेला युक्तिवाद ऐकला. तसेच अर्जदार व जाबदारतर्फे दाखल कागदपत्रे पाहिली. 4. प्रस्तुतचे कामी प्रामुख्याने खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होत आहेत. हे मुद्दे व त्यांना दिलेली उत्तरे खालीलप्रमाणे आहेत. मुद्दे उत्तरे अ) अर्जदार व जाबदार यांचे दरम्यान ग्राहक व सेवा देणारे असे नाते आहे काय ? नाही. ब) अंतिम आदेश - खाली दिलेल्या कारणास्तव अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. कारणे 5. अर्जदार यांचे तक्रारअर्जातील कथन पाहता असे दिसून येते की, अर्जदार यांनी विविध कंपन्यांचे समभाव खरेदी-विक्री करण्यासाठी जाबदार यांचेकडे ट्रेडिंग अकाऊंट व डीमॅट खाते उघडले व त्यामध्ये व्यवहार करण्यासाठी रु.5 लाख भरले. सदरची बाब विचारात घेता एक महत्वाची बाब स्पष्ट होते ती अशी की, अर्जदार यांनी कंपन्याच्या समभावांचे विक्रीतून नफा कमाविण्यासाठी जाबदार यांचेकडे खाते उघडले आहे. सदरचे व्यवहारातून नफा मिळविणे हाच एकमेव हेतू अर्जदारचा दिसून येतो. सबब ग्राहक संरक्षण कायदा कलम 2 नुसार अर्जदार हा जाबदार यांचा ग्राहक होत नाही व अर्जदार यांची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींनुसार चालणेस पात्र नाही असे या मंचाचे मत आहे. 6. जाबदार यांनी त्यांचे कैफियतीमध्ये असे कथन केले आहे की अर्जदार व जाबदार यांचेमध्ये झालेल्या करारानुसार कोणत्याही प्रकारचा वाद दोन्ही पक्षांमध्ये उदभवल्यास सदर वाद हा केवळ आर्बिट्रेशनच्या माध्यमातूनच सोडवला जाईल. परंतु अर्जदारने आर्बिट्रेटरकडे दाद मागितल्याबाबत कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. सदरची बाब विचारात घेता अर्जदार यांनी योग्य त्या यंत्रणेकडे दाद न मागता प्रस्तुतचे मंचाकडे दाद मागितली आहे. सबब अर्जदार यांचा तक्रारअर्ज या मंचासमोर चालणेस पात्र नाही असे या मंचाचे मत आहे. 7. अर्जदारचे तक्रारअर्जातील कथन पाहता असे दिसून येते की अर्जदार यांची तक्रार ही त्यांचे डीमॅट अकाऊंटमधील व्यवहारांबाबतची व त्यामधील शिल्लक रकमेविषयी आहे. सदर व्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सेबी (S.E.B.I.) ही संस्था कार्यरत आहे. जरुर तर अर्जदार हे या संस्थेकडे दाद मागू शकतात. 8. या सर्व कारणास्तव व वर नमूद मुद्दयांच्या दिलेल्या उत्तरास अनुसरुन अर्जदार यांचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज फेटाळणेत येत आहे. 2. खर्चाबाबत काहीही आदेश करणेत येत नाहीत. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 8/3/2011 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |