द्वारा घोषित श्रीमती रेखा कापडिया, सदस्य -- अर्जदाराने गेरअर्जदार क्रमांक 2 या बँकेचे क्रेडीट कार्ड घेतले आहे. त्यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे काढलेली विमा पॉलिसी रद्द केल्यानंतरही त्यांच्या क्रेडीट कार्ड रकमेतून विमाहप्त्याची रक्कम कपात करण्यात आली. अर्जदाराने याबाबत केलेल्या तक्रारीची दखल घेण्यात न आल्यामुळे त्यांनी मंचात तक्रार दाखल केली आहे. अर्जदाराने दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या बँकेचे क्रेडीट कार्ड घेतले आहे. अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे आधी काढलेली हेल्थ इन्शुरन्स पॉलीसी दिनांक 8/3/2009 रोजी संपलेली होती. अर्जदाराच्या म्हणण्यानुसार गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी दिनांक 29/6/2009 रोजी सदरील विमा पॉलिसीचे नूतनीकरण दिनांक 8/3/2009 पासून करण्याचे आश्वासन दिल्यामुळे अर्जदाराने त्यास मान्यता दिली. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदारास पाठविण्यात आलेल्या विमा पॉलिसीमध्ये ते औरंगाबाद (महाराष्ट्र) ऐवजी औरंगाबाद बिहारचे रहिवासी असल्याचे नमूद केले होते. तसेच विमा पॉलिसीची तारीख दिनांक 30/6/2009 पासून दाखविण्यात आलेली होती. अर्जदाराने याबाबत गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे पत्राद्वारे तसेच इमेल द्वारे अनेकवेळेस तक्रार केली पण त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात न आल्यामुळे त्यांनी सदरील पॉलिसी रद्द करण्याबाबत गैरअर्जदार क्रमांक 1 यांना कळविले. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी गैरअर्जदार क्रमांक 2 यांना सदरील विमा पॉलिसीचा हप्ता अर्जदाराच्या क्रेडीट कार्डमधून कपात करण्यास सांगितले. अर्जदाराने सदरील पॉलिसी रद्द केल्याचे गैरअर्जदार क्रमांक 2 यांना कळवून क्रेडीट कार्डमधून विमा रक्कम वजा न करण्याचे कळविले. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी त्याची दखल न घेता अर्जदाराच्या क्रेडीट कार्डमधून विमा रक्कम वजा केली तसेच ही रक्कम न भरल्यामुळे अर्जदारास दंड आकारला. गैरअर्जदार क्रमांक 2 हे, विमा रक्कम क्रेडीट कार्ड मधून वळती करुन घेत असल्यामुळे अर्जदाराने अंतरिम अर्ज दाखल करुन सदरील रक्कम कपात करु नये अशी मागणी केली आहे. अर्जदाराने मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाईची मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत गैरअर्जदार यांच्या बरोबर ईमेल केलेल्या पत्रव्यवहाराच्या प्रति सोबत जोडलेल्या आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी दाखल केलेल्या जवाबानुसार त्यांच्यातर्फे अर्जदारास दिलेल्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये महाराष्ट्र राज्य, ऐवजी बिहार हे नांव चुकीने पडल्याचे मान्य केले आहे. अर्जदाराने केलेल्या मागणीनुसार ते पॉलिसी रद्द करण्यास तयार आहेत पण अर्जदारास सहकार्य करीत नसल्याचे म्हटले आहे. अर्जदाराने, क्रेडीट कार्डमधून रक्कम वळती केल्याची तक्रार गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडे केली असून ही रक्कम वळती केल्याबद्दल त्यांना दोषी धरता येत नाही. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी मंचात दाखल केलेल्या जवाबानुसार अर्जदाराने स्वखुषीने गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडून हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतली आहे. नियमाप्रमाणे त्यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 यांना विमा हप्त्याची रक्कम भरलेली आहे व त्याची सूचना अर्जदारास देण्यात आलेली आहे. अर्जदाराने ही रक्कम परत त्यांच्याकडे भरलेली नसल्यामुळे त्यांना नियमाप्रमाणे दंड आकारण्यात आला. अर्जदारास देण्यात येणा-या सेवेत त्रुटी नसल्याचे सांगून तक्रार खारीज करण्याची विनंती केली आहे. अर्जदार, गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी मंचात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन तसेच मंचासमोर झालेल्या सुनावणीवरुन असे आढळून येते की, अर्जदार यांनी गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्याकडे हेल्थ इन्शुरन्स विमासाठी दिनांक 29/6/2009 रोजी मागणी केली. अर्जदाराची जुनी पॉलिसी दिनांक 8/3/2009 रोजी संपल्यामुळे त्यांना दिनांक 8/3/2009 पासून पॉलिसीचे नूतनीकरण अपेक्षित होते. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी दिनांक 8/3/2009 ऐवजी दिनांक 30/6/2009 पासून विमा पॉलिसी मुदत दाखविली त्यास अर्जदाराने, आक्षेप नोंदवून दिनांक 8/3/2009 पासून विमा पॉलिसीचे नूतनीकरण करण्याची मागणी केली. अर्जदाराने यासाठी अनेक वेळेस ईमेलद्वारे गैरअर्जदार क्रमांक 1 यांना कळविले असल्याचे दिसून येते. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी त्याची दखल न घेतल्यामुळे अर्जदाराने शेवटी पॉलिसी रद्द करण्याबाबत दिनांक 26/8/2009 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 यांना कळविले. अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्याकडून क्रेडीटकार्ड घेतले असून दिनांक 29/8/2009 रोजी त्यांना देण्यात आलेल्या क्रेडीट कार्ड स्टेटमेंटमध्ये विमा रकमेपोटी 1204.60 रुपये तसेच सप्टेबर 2008 मध्ये व्याज व दंडासहीत विमा हप्ता गैरअर्जदार क्रमांक 1 यांना देण्यात आल्याचे दाखविण्यात आले. अर्जदाराच्या संमतीविना गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी ही रक्कम वजा करणे हे बँकींग नियमाविरुध्द असून ती सेवेतील त्रुटी असल्याचे मंचाचे स्पष्ट मत आहे. अर्जदाराने याप्रकरणी गैरअर्जदार क्रमांक 2 यांना कळवून देखील गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी पुढील महिन्यातही विमा हप्ता, व्याज व दंड आकारणी केली असल्याचे दिसून येते. गेरअर्जदार यांच्या या कृतीमुळे अर्जदार हे नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहेत. आदेश 1. गैरअर्जदार क्रमांक 1 यांनी अर्जदाराची पॉलिसी रद्द करावी व त्यांच्याकडे या पोटी जमा झालेली सर्व रक्कम अर्जदारास 30 दिवसात परत करावी. 2. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी पॉलिसीपोटी क्रेडीटद्वारे अर्जदारास कोणतीही रक्कम आकारु नये. 3. गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी अर्जदारास मानसिक त्रासाबद्दल रु 5000/- 30 दिवसात द्यावे
| [ Rekha Kapadiya] Member[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT | |