निकालपत्रः- श्रीमती दिपा बिदनुरकर, सदस्या ठिकाणः बांद्रा *-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*- आदेश तक्रार अर्जाचे संक्षिप्त स्वरुप खालीलप्रमाणेः- तक्रारदारांचे पती व्यवसायाने शेतकरी होते व संपूर्ण कुंटुंब त्यांचे मिळकतीवरुन अवलंबून होते. त्यांचे नावाची नोंद सात-बारा उता-यात नमुद आहे. तक्रारदारांचे पतीचे निधन दि.06.03.2006 रोजी रस्त्यावरील वहान अपघातात झाले. त्यांचे पती दि.06.03.2006 रोजी पंढरपुरहून घरी रात्री उशीरा मोटरसायकल वरुन परतत असताना पंढरपुर-सांगोला या मार्गावर दुस-या एका अज्ञात वाहनाने विरुध्द बाजूने धडक दिल्याने त्यांचे जागीच निधन झाले. 2 पोलीस चौकीशी अंती पोलीसांनी अज्ञात वाहनचालका विरुध्द बेजबाबदार व निष्काळजीपणाने वाहन चालविल्याने गुन्हा नोंदीविला, त्याची प्रत सोबत निशाणी-ब वर जोडली आहे. 3 तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, तक्रारदाराचे संपूर्ण कुंटुंब त्याचेवर अवलंबून होते. तक्रारदारांचे बरोबर त्यांच्या दोन मुली व एक मुलगा असा परिवार आहे. तक्रारदारांच्या पतीच्या निधनानंतर त्या संपूर्णपणे असाहय झाल्या. 4 तक्रारदारांना शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजन्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह तहसीलदार कचेरीमध्ये क्लेम फॉर्म भरुन दिला. परंतु सामनेवाला यांनी तक्रारदारांचा मागणी अर्जाप्रमाणे (क्लेम फॉर्म) तक्रारदारांची मागणी दि.26.08.2008 पर्यंत पूर्ण केली नाही. त्यामुळे तक्रारदारांनी चौकशी केली असता, सामनेवाला यांचेकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, म्हणून त्यांनी वकीलामार्फत नोटीस पाठविली तरीही त्यांच्या मागणीची पूर्तता केली नाही, म्हणून तक्रारदारांनी या मंचासमोर सदर तक्रार अर्ज दाखल करुन खालीलप्रमाणे विनंत्या केलेल्या आहेत. अ सामनेवाला यांनी तक्रारदारांना या शेतकरी वैयक्तिक अपघात विमा योजने खाली मिळत असलेले रक्कम रु.1,00,000/- दयावेत. ब वरील रक्कमेवर 12% दराने व्याज तक्रारदारंना अपघात झालेल्या तारखेपासून म्हणजे दि.06.03.2006 पासून ते पैसे देईपर्यंत व्याज दयावे. क सानेवाला यांनी तक्रारदारांना रु.20,000/- दंडात्मक रक्कम दयावी. ड तक्रारीचा अर्ज खर्च रु.5,000/- दयावेत. 5 तक्रार अर्जासोबत शपथपत्र, पुरक कागदपत्रे दाखल केली आहेत. 6 सामनेवाला यांनी हजर राहून त्याची कैफियत दाखल केलीत. 7 सामनेवाला यांचे म्हणण्यानुसार तक्ररदारांनी दाखल केलेला अर्ज बेकायदेशीर असून खोटया पध्दतीने पैसे लुबाडण्यासाठी केलेला आहे व या मंचाचा व्यवस्थापनेचा गैरवापर करीत आहे. 8 सामनेवाला यांच्या म्हणण्यानुसार, तक्रारदारांनी त्यांच्या शेतकरी पतीचा रस्त्यावरील वाहन अपघातात निधन झाल्यामुळे त्यांनी शेतकरी व्यक्तिगत विमा योजनेखाली अर्ज करुन रक्कम रु.1,00,000/- ची मागणी केली आहे. परंतु तक्रारदारांनी अर्जासोबत आवश्यक असलेले वयाचादाखला, वैद्य वाहनचालक परवाना, पोलीस तपासाचे अंतीम अहवाल, 6-k चा उतारा व फेर फाराचा उतारा, इत्यादी महत्वाच्या कागदपत्रांच्या प्रतीं मागणी अर्जासोबत जोडलेल्या नव्हत्या. तक्रारदारांनी महत्वाच्या कागदपत्रांच्या प्रतीं जोडण्यामध्ये कसुर केलेली आहे. आवश्यक त्या कागदपत्रांची जोडणी केलीली नसल्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदारांची मागणी फेटाळली तसेच सामनेवाला यांचे म्हणण्यानुसार त्यांनी नेमलेल्या चौकशी अधिका-यांनी चौकशी अहवाल दाखल केलेला आहे. त्या अहवालानुसार वर नमुद केलेले कागदपत्रे दाखल केलेले नसल्यामुळे तक्रारदारांची मागणी कागदपत्रांची पडताळणी करेपर्यंत तहकुब करावी. 9 तक्रार अर्ज, कैफियत, शपथपत्र व दोन्हीं पक्षांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची पाहणी व पडताळणी केली असता निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. क्र. | मुद्दे | निष्कर्ष | 1 | तक्रारदार सामनेवाला यांचे सेवेतील कमतरता सिध्द करतात काय ? | होय | 2 | तक्रारदार सामनेवाला यांचेकडून रक्कम रु.1,00,000/- ची मागणी करु शकतात काय ? | होय | 3 | तक्रारदार सामनेवाला यांचेकडून रक्कम रु.1,00,000/- वर 12% दराने व्याज मागू शकतात काय ? | होय, रक्कम रु.1,00,000/- वर 9% दराने दि.06.03.2006 पासून ते पैसे देईपर्यंत व्याज मागू शकतात. | 4 | तक्रारदार सामनेवाला यांचेकडून रु.20,000/- दंडात्मक रक्कम मागू शकतात काय ? | नाही | 5 | तक्रारदार सामनेवाला यांचेकडून या अर्जाचा खर्च रक्कम रु.20,000/- मागू शकतात काय ? | होय, रु.2,000/- | 6 | अंतीम आदेश ? | तक्रार अंशतः मंजूर करण्यात येतो |
कारणमिमांसाः- 10 तक्रारदारांचे म्हणण्यानुसार, त्यांचे पती व्यवसायाने शेतकरी होते, त्यांच्या नावाची नोंद सात-बारा या उता-यात आहे, त्याची प्रत निशाणी-क वर जोडली आहे. त्यांचे पतीचे दि.06.03.2006 रोजी अपघाती मृत्यु झाला. त्यांचे पती दि.06.03.2006 रोजी पंढरपुरहून घरी रात्री उशीरा मोटरसायकल वरुन परतत असताना पंढरपुर-सांगोला या मार्गावर दुस-या एका अज्ञात वाहनाने विरुध्द बाजूने धडक दिल्याने त्यांचे जागीच निधन झाले. तक्रार अर्जासोबत एफआयआर व पोस्ट मार्टन रिपोर्ट निशाणी-ब वर जोडली आहे. 11 तक्रारदारांना शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेची माहिती मिळाल्यावर तक्रारदारांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह तहसीलदार कचेरीमध्ये क्लेम फॉर्म भरुन दिला. तक्रारदारांचे म्हणण्यानुसार, दि.26.08.2008 पर्यंत सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या मागणीची पूर्तता केलेली नव्हती, म्हणून तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे चौकशी केली असता काहीही उत्तर मिळाले नाही, म्हणून वकीलांमार्फत नोटीस पाठविली पण तरीही मागणीचा निर्णय झाला नाही. – सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या या म्हणण्यावर त्यांचे कैफियतीत काहीही भाष्य केलेले नाही. त्याच्या मागणीवर काय निर्णय झाला हे तक्रारदारांना कळविले नाही यात सामनेवाला यांचा निष्काळजीपणा दिसून येतो. 12 परंतु सामनेवाला यांनी त्यांची कैफियत दाखल करुन त्यांची बाजू मांडली. सामनेवाला यांचे म्हणण्यानुसार, तक्रारदारांनी असलेले वयाचा दाखला, वैद्य वाहनचालक परवाना, पोलीस तपासाचे अंतीम अहवाल, 6-k चा उतारा व फेर फाराचा उतारा, इत्यादी महत्वाच्या कागदपत्रांच्या प्रतीं मागणी अर्जासोबत जोडलेल्या नव्हत्या, म्हणून त्यांनी अर्जदाराची मागणी नाकारली. 13 तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत शासन निर्णय, कृषि व पदुम विभाग क्र.एनएआयएस-1204/सीआर-166/11-ऐ, दि.5 जानेवारी, 2005 चे सहपत्र तसेच शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना, महाराष्ट्र शासन, कृषि, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकास व मत्सव्यवसाय विभागाने निर्गमित केलेला शासन निर्णय क्र.पीएआयएस 1205/प्र.क्र.310/11ऐ चा दि.7 जुलै, 2006 चा जोडलेला आहे. या निर्णयानुसार परिच्छेद क्र.7 प्रमाणे, या शासन निर्णयासोबत विहीत केलेली प्रपत्रे / कागदपत्रे वगळता अन्य कोणतीही कागदपत्रे शेतक-यांनी वेगळयाने सादर करण्याची आवश्यकता नाही किंवा योजनाअंतर्गत लाभासाठी विमा कंपनीकडे स्वतंत्रपणे अर्ज / कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही. अनावधनामुळे काही कागदपत्र मिळविण्याचे राहिल्यास व मृत शेतक-यांवर अंतिम संस्कार झालेमुळे ती मिळू शकत नसल्यास पर्यायी कागदपत्रे / चौकशीच्या आधारे प्रस्तावाचा निर्णय घेण्यांत यावा यासाठी शासन, नोकर कंपनी व विमा कंपनी यांनी संयुक्तपणे निर्णय घ्यावा. तसेच प्रपत्र-ई मधील परिच्छेद-2 प्रमाणे, शेतक-याकडून विमा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर पुढील एक आवठवडयामध्ये सदर तलाठी शेतक-याने दावा प्रस्तावात आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता केलेली नसल्यास स्वतः शासन निर्णयासोबत विहित केलेल्या सर्व कागदपत्रांची आवश्यकतेनुसार पूर्तता करुन पुन्हा 7-12, 8-अ नुसार तो खातेदार असल्याच्या प्रमाणपत्रांसह विमा दाव्याचा प्रस्ताव तहसीलदारास सादर करील. 14 सामनेवाला यांनी चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चौकशी अधिका-याने चौकशी अहवाल सादर केला, त्यात असे म्हटले आहे कि, श्री. रामदास दर्मा रोंगे यांचे दि.06.03.2006 रोजी अपघाती निधन झाले. तपासात विमा धारकाकडे अवैद्य शिकाऊ वाहन चालक परवाना होता. फेरफार उतारा, 16-k उतारा, विमाधारकाच्या वयाचा दाखला यां कागदपत्रांची पडताळणी करणे गरजेचे आहे 15 दुर्घटना घडल्यानंतर तक्रारदारांनी तातडीने तलाठी यांचेकडे विहीत कागदपत्रांसह विमा प्रस्ताव करावयाचा असतो. जर अर्जदाराने आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केली नसेल तर प्रपत्र-ई-2 प्रमाणे, शासनाने स्वतः निर्णयासोबत विहीत कागदपत्रांची आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करुन प्रस्ताव संबंधीत तहसीलदारास सादर करावयाचा असतो. शेतकरी वर्ग अशिक्षित गटातील असल्यामुळे तक्रारदारांस शासनाने प्रस्तावासोबत कोणती कागदपत्रे जोडली किंवा कोणती जोडणे आवश्यक होते हे माहित असण्याची शक्यता नसते. जर प्रस्ताव विहीत कागदपत्रांसोबत महसूल खात्याकडून पाठविला गेला नसेल तर त्यात तक्रारदाराची चूक आहे असे म्हणता येणार नाही. या तांत्रिक त्रुटी नसलेल्या कागदपत्रांची मागणी करुन काढून टाकता येतील. तांत्रिक त्रुटीसाठी शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजनेखाली असलेल्या लाभार्थींना त्यांची मागणी नाकारल्याने या योजनेचे उद्दिष्ठ साध्य होत नाही. 16 शेती व्यवसाय करताना होणारे रस्त्यावरील अपघात तसेच वीज पडणे, वीजेचा शॉक बसणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश व वाहन अपघात तसेच कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अन्य कोणतेही अपघात यामुळे ब-याच शेतक-यांचा मृत्यु ओढावतो किंवा काहींना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीस झालेल्या अपघातामुळे कुंटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणींची परिस्थिती निर्माण होत असल्याने असा अपघातग्रस्त शेतक-यांस / त्याच्या कुंटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता शासनाने शेतक-यांसाठी एक योजना काढली. या योजने अंतर्गत शासनाने शेतकरी व्यक्तीगत अपघात विमा पॉलीसी उतरविली. तांत्रिक त्रुटीमुळे अर्जदाराची मागणी नाकारल्याने अर्जदार हा या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असूनही त्यास त्याचा फायदा घेता येत नाही, म्हणून तांत्रिक त्रुटीमुळे त्यांची मागणी नाकरणे योग्य नाही. 17 सामनेवाला यांचे म्हणण्यानुसार, तक्रारदारांकडे अपघाताच्या वेळी वैध वाहन चालक परवाना नव्हता म्हणूनही तक्रारदारांची मागणी नाकारली – तक्रारदाराचे पती काम संपवून रात्री उशिरा पंढरपूर-सांगोला रस्त्यावरून त्यांचे मोटार सायकलवरुन येत असताना अज्ञात वाहनाने विरुध्द बाजूने धडक दिल्याने अपघात झाला व तक्रारदाराचे पतीचे जागीच निधन झाले. पोलीसांनी श्री. रघुनाथ दाद रोंगे, श्री. संजय रोंगे, श्री. सत्यवान रोंगे, श्री. रावसाहेब पांडूरंग रोंगे यांची जबानी घेऊन अज्ञात वाहन चालकाविरुध्द निष्काळजीपणे व भरधाव वाहन चालविल्याबद्दल व विमा धारकाच्या मृत्युस कारणीभूत व जबाबदार असल्याबद्दल गुन्हा नोंदविला. – अपघाताचे स्वरुप पाहता, अपघातास तक्रारदाराचे पती जबाबदार नाहीत हे स्पष्ट होते. अपघातास विमा धारक कारणीभूत नसल्यामुळे विमाधारकाकडे वैध वाहन चालक परवाना होता अथवा नाही हा मुद्दाच उपस्थित होत नाही. अपघातास विमा धारक कारणीभूत नसताना त्याच्याकडे वैद्य वाहन चालक परवाना नव्हता या कारणावरून मागणी नाकारली यात सामनेवाला यांच्या सेवेतील कमतरता स्पष्ट होते. 18 म्हणून सामनेवाला हे तक्रारदारांना शेतकरी व्यक्तिगत विमा योजनेखाली तक्रारदारांना रक्कम रु.1,00,000/-, 9% व्याज दराने दि.06.03.2006 पासून ते पैसे देईपर्यंत व्याजासह देण्यास जबाबदार राहतील. तसेच तक्रारदारांनी रु.20,000/- दंडात्मक रक्कमेची मागणी केली आहे परंतु व्याजाची रक्कम देण्याचा आदेश दिल्यामुळे तक्रारदारांना दंडात्मक रक्कम देता येणार नाही. सामनेवालो हे तक्रारदारांचा तक्रार अर्जाचा खर्च रु.2,000/- देण्यास जबाबदार राहतील. वरील निष्कर्षावरुन या प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो. आदेश 1 तक्रार अर्ज अंशतः मान्य करण्यात येतो. 2 सामनेवाला यांनी तक्रारदारांना रु.1,00,000/-, दयावेत. 3 सामनेवाला यांनी तक्रारदारांना रु.1,00,000/- या रक्कमेवर दि.06.03.2006 पासून ती रक्कम देई पर्यंत 9% व्याज दयावे. 4 सामनेवाला यांनी तक्रारदारांना या अर्जाचा खर्च रु.2,000/- दयावा. 5 वरील आदेशाची पूर्तता सहा आठवडयाच्या आत करावी अन्यथा विलंबापोटी सामनेवाला यांनी तक्रारदारांना रु.500/- प्रति महिना दंडात्मक रक्कम दयावी. 6 आदेशाच्या प्रमाणित प्रती दोंन्ही पक्षकारांना विनामुल्य देण्यात याव्यात.
| [HONABLE MRS. Mrs.DEEPA BIDNURKAR] Member[HONABLE MR. Mr. J. L. Deshpande] PRESIDENT[HONABLE MR. MR.V.G.JOSHI] Member | |