जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे समोर
ग्राहक तक्रार क्रमांक –13/2011 तक्रार दाखल तारीख –15/01/2011
तुळशीराम गोपिनाथ नांदे
वय 60 वर्षे,धंदा शेती/व्यापार
रा.सासुरा ता.केज जि.बीड
विरुध्द
आय.सी.आय.सी.आय.लोंबार्ड
जनरल इन्शुरन्स कंपनी लि. ...सामनेवाला
द्वारा मॅनेजर, औरंगाबाद.
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.एस.ए. चव्हाण
सामनेवाले तर्फे :- अँड.आर.व्ही.देशपांडे.
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदाराच्या मालकीचा टेम्पो 407 नंबर एम.एच.44/6838 आहे. सदरचा टेम्पो तक्रारदारांनी जानेवारी 2010 मध्ये घेतलेला आहे. सदर टेम्पोचा तक्रादारांनी सामनेवाला यांचेकडे विमा उतरविलेला आहे. त्यांचा कालावधी दि.05.01.2010 ते 01.01.2011, त्यासाठी विमा हप्ता रक्कम रु.14,100/- सामनेवाला यांचेकडे अदा केलेला आहे. वाहनाची किंमत रु.5,83,870/- इतक्या रक्कमेची सामनेवाला यांनी जोखीम स्विकारली.
सदर वाहनावर तक्रारीचा बाळासाहेब हा चालक म्हणून काम पाहत होता व भाडयापोटी आलेली रक्कम तक्रारदार यांचेकडे जमा करीत होते. सर्व खर्च वजा जाता तक्रारदार यांनी दरमहा रु.25,000/- चे उत्पन्न वाहनापासून मिळत होते.
दि.13.05.2010 रोजी टेम्पो ड्रायव्हर बाळासाहेब यांनी गावांतूर ज्वारीचे पोते व कडबा टेपोमध्ये टाकून कळंबकडे घेऊन जात असताना दुपारी अंदाजे 1 वाजणेच्या समोर कळंब येथील तहसील कार्यालयाच्या मागे टेंपो आला असता अचानक वाहनाच्या कॅबीनमध्ये स्पार्कीग झाले व वायर जळाल्याचा वास आला म्हणून ड्रायव्हरने टेंपो बंद केला व टेंपोला आग लागल्याचे लक्षात आले. टेंम्पो ड्रायव्हर व इतर लोकांनी माती टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतु टेम्पोमध्ये कडबा असल्यामुळे तो जळाला आणि कॅबीनचा भडका होऊन आग विझेपर्यत आतील माल व कॅबीन पूर्णपणे जळाली. अग्नीशमन दलामार्फत आग विझवण्यांचा प्रयत्न केला परंतु तोपर्यत वाहनाचे आतील मालाचे पुर्ण नुकसान झाले. टेम्पो ड्रायव्हरने सदर घटनेची फिर्याद पोलिस स्टेशन कळंब येथे दिली. त्यावर पोलिसांनी आकस्मात जळीतची नोंद घेऊन घटनास्थळ पंचनामा केला.
तक्रारदारांनी सदर घटनेची माहीती कळाल्यानंतर सामनेवाला यांनी फोनवर घटनेची माहीती दिली. सामनेवाला यांनी वाहनाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी सर्व्हे पाठविला. श्री. नलावले यांनी गाडीची पाहणी करुन नुकसानीचा अंदाज व वाहन दूरुस्तीसाठी गर्जे अँटोमोटीव्ह सर्व्हीसेस एमआयडीसी लातूर (अधिकृत टाटा सर्व्हीस सेंटर) यांचेकडे दूरुस्तीला घेऊन जाण्यास सांगितले. त्यांचबरोबर सर्व्हेअरने तक्रारदाराकडुन वाहनाची सर्व कागदपत्रे विमा पत्र, ड्रायव्हरचा परवाना, पोलिस पेपर्स घेऊन विमा कंपनीकडे पाठवून दिला.
तक्रारदारांनी जळीत वाहन गर्जे सर्व्हीस सेंटर येथे टोचण करुन नेले. गाडीचे झालेले नुकसान त्यासाठी लागणारी मजूरी व इतर सर्व खर्च मिळून रु.2,41,521/- इस्टीमेट तयार केले. सदरची खर्चाची अंदाजीत रक्कम तक्रारदाराने सामनेवाला यांना सांगितले. सामनेवाला यांनी वाहन तेथेच दुरुस्त करण्यास सांगितले. तक्रारदारांने त्यांचेकडे वाहन दुरुस्त करुन घेतले. वाहन दुरुस्त झाल्यानंतर तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे रक्कमेची मागणी केली असता,सामनेवाला यांनी रक्कम देण्याचे टाळले, शेवटी तक्रारदारास सामनेवाला यांनी तुम्ही पैसे दया आम्ही तुम्हास नंतर देऊ असे सांगितले.आर्थिक परिस्थिती नसताना सुध्दा तक्रारदाराने गर्जे सर्व्हीस सेंटर कडे रु.1,34,005/- एवढी रक्कम देऊन रितसर पावती घेतली.सामनेवाला यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई देण्यास कसुर केला आणि शेवटी दि.29.10.2010 रोजी वाहन चालकाकडे वैध परवाना नसल्याने क्लेम पुर्णपणे नाकारला याबाबतचे पत्र पाठविले. त्यामुळे तक्रारदाराचे नुकसान झाले त्यांची मागणी तक्रारदार खालीलप्रमाणे करीत आहेत.
1. वाहन दुरुस्तीसाठी गर्जे सर्व्हीस सेंटर येथे अदा केलेली रक्कम रु.1,34,005
2. कळंब ते लातूर येथे वाहन टोचन करुन देण्यांचा खर्च रु. 10,000
3. दि.10.05.2010 पासुन पूढे दोन महिने वाहन पैशाअभावी रु. 40,000
एका जागी उभे राहिल्यामुळे झालेले आर्थिक नुकसान
4. मानसिक त्रासापोटी रु. 10,000
5. तक्रारीच्या खर्चापोटी रु. 6,000
------------------
एकुण रु.2,00,005
---------------------
विनंती की, तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडून नुकसान भरपाई रक्कम रु.2,00,000/- 12 टक्के व्याजासह देण्याबाबत आदेश व्हावेत.
सामनेवाला हे सदर प्रकरण दि.11.02.2011 रोजी अँड.आर.व्ही.देंशपांडे व अँड. अजय व्यास हे वकीलपत्रासह हजर झाले. सामनेवाला यांनी त्यांचा खुलासा ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार मूदतीत दाखल केले नाही म्हणून न्यायमंचानेदि.02.04.2011 रोजी त्यांचे खुलाशाशिवाय तक्रार चालविण्याचा निर्णय घेतला.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, यांचा सखोल वाचन केले. तक्रारदाराचे विद्ववान अँड.ए.पी.कूलकर्णी यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदाराच्या मालकीचा टेंम्पो 407 एम.एच.-44-6838 असल्या बाबत तक्रारदाराने सदर वाहनाचे नोंदणी पुस्तक दाखल केले आहे.
सदर वाहनास दि.13.05.2010 रोजी कँबीनमध्ये स्पार्कीग होऊन आग लागली व त्यावर संपूर्ण टेम्पो कडब्याच्या मालासह जळालेला आहे. या बाबत तक्रारदारांनी कळंब पोलिस स्टेशनकडे फिर्याद दिलेली आहे. पोलिसांनी आकस्मीक अपघात या सदराखाली तक्रारीत नमुद केलेल्या कलमानुसार घटनेची नोंद घेतली आहे.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे. घटनेच्यानंतर सदरची घटना ही तक्रारदारांनी सामनेवाला विमा कंपनी यांना कळवलि. सामनेवाला विमा कंपनीकडून
श्री. नलावले सर्व्हेअर नेमण्यात आले व त्यांनी घटनास्थळी अपघातग्रस्त वाहनाची पाहणी केली आहे व त्यानंतर सदरचे वाहन त्यांनी दुरुस्तीसाठी गर्जे सर्व्हीस सेंटर लातूर येथे पाठविण्यास सांगितले,त्यानंतर सदरचे वाहन गर्जे सर्व्हीस सेंटरला दूरुस्तीसाठी नेण्यात आले. गर्जे सर्व्हीस सेंटर येथे तक्रारदारांना सदर वाहनाच्या दुरुस्तीबाबत रक्कम रु.,2,41,521/-चे इस्टीमेंट देण्यात आले. त्या बाबत तक्रारदारांनी सामनेवाला यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी वाहन दूरुस्त करण्यास परवानगी दिली. त्याप्रमाणे तक्रारदाराने वाहन दुरुस्त केलेले आहे.
यासर्व विधानाला सामनेवाला यांनी कोणताही आक्षेप घेतलेला नाही, सामनेवाला यांचा खुलासा दाखल नाही. त्यामुळे सदर विधानाला सामनेवाला याचा आक्षेप नसल्याने सदरची विधाने ग्राहय धरल्यापलीकडे न्यायमंचास दूसरा पर्याय नाही.
अपघातानंतर तकारदारांनी नूकसान भरपाई मिळण्यासाठी सामनेवाला यांचेकडे सर्व कागदपत्रासह दावा अकर्ज भरुन दिलेला आहे व सदरचा दावा सामनेवाला यांनी दि.29.10.2010 रोजीचे पत्रामुळे वाहनाचालक श्री.बाळासाहेब यांचेकडे वैध वाहन चालक परवाना अपघाताचे दिवशी नव्हता आणि त्याबाबतचे कोणताही पुरावा संबंधीत आर.टी.ओ. कार्यालयात आढळून आला नाही या कारणवरुन दावा नाकारलेला आहे.
दरम्यानच्या काळात सदरचे वाहन दुरुस्त झाल्यानंतर तक्रारदारांनी गर्जे सर्व्हीस सेंटर यांना रु.1,34,005/- रक्कम दिलेली आहे व त्यांचे बिल विमा कंपनीला दिलेले आहे.
या संदर्भात सामनेवाला यांना अंतिम अहवाल व बिल चेक रिपोर्ट बाबत कारवाई केल्याचे तक्रारदाराचे म्हणणे नाही. सामनेवाला यांनी तक्रारीस कोणताही आक्षेप घेतलेला नसल्याने व तसेच सामनेवाला यांचा खुलासा नसल्याने सामनेवाला यांनी सदर अपघाताचे संदर्भात काय कारवाई केली यांचा कोणताही बोध होत नाही परंतु सामनेवाला यांनी दावा नाकारला असल्याने तक्रारदारांनी परिपूर्ण कागदपत्रासह सामनेवाला यांचेकडे प्रस्ताव अर्ज दिला होता ही बाब स्पष्ट होते व सदरचा दावा हा वाहन चालक परवानाच्या संदर्भात नाकारलेला आहे.
या संदर्भात तक्रारदाराने सदर वाहन चालक बाळासाहेब यांचे आर.टी.ओ कार्यालय बीड यांचेकडे दि.02.12.2010 रोजीचे वाहन चालक परवान्याचा उतारा दाखल केलेला आहे. सदरचा उतारा पाहता त्यात बाळासाहेब यांचेकडे अपघाताचे वेळी मोटार सायकल विथ गिअर डब्ल्यू.ई.एफ. 17/03/2006, एलएमव्हीह ट्रान्सपोर्ट गूडस डब्ल्यू.ई.एफ. 17/03/2006, ट्रान्सपोर्ट व्हेईकल एम/एचएमव्ही रिजीड चेसिस गूडस डब्ल्यू.ई.एफ. 02/01/2008. असे तिन प्रकारचे वाहन चालकाचा परवाना आहे. टेंम्पो 407 हा एलएमव्हीह ट्रान्सपोर्ट गूडस या सदरी येतो. सदर वाहन चालक परवाना दि.17.03.2006 ते16.03.2026 याकालावधीपर्यत वैध आहे व तसेच ट्रान्सपोर्ट व्हेईकल चा वाहन चालक परवाना दि.02.01.2008 पासून ते 01.01.2011 पर्यत वैध व अंमलातील असल्याचे दिसते. सदरचा परवाना उतारा हा आर.टी.ओ. बीड कार्यालयाने दिलेला आहे. यावरुन सामनेवाला यांनी तक्रारदाराचा दावा नाकारल्याचे कारण संयूक्तीक असल्याचे दिसत नाही.त्यामुळे सामनेवाला यांनी तक्रारदाराचा दावा नाकारुन तक्रारदारास दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट होते. यां संदर्भात तक्रारदारांनी किंवा सामनेवाला यांनी अंतिम अहवाल किंवा बिल चेक रिपोर्ट दाखल केलेले नाही. तक्रारदारांना वाहन दूरुस्तीसाठी रु.1,34,000/-खर्च आलेला आहे. सदरचा खर्च सामनेवाला यांनी देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे.
तसेच या संदर्भात तक्रारदारांनी रक्कम रु.10,000/- सदरचे वाहन टोचन करुन कळंब ते लातूर येथे नेल्याच्या खर्चाची मागणी केलेली आहे परंतु त्या बाबत कोणताही पुरावा दाखल नाही. तसेच दि.10.05.2010 पासून पूढे दोन महिने वाहन पैसेअभावी एकाच जागील उभे राहिले त्यामुळे झालेले आर्थिक नुकसान रु.40,000/- ची मागणी तक्रारदाराने केली आहे. परंतु विमा करारातील शर्ती व अटीनुसार सदरचे कारण हे संयूक्तीक नसल्याने सदरची रक्कम तक्रारदारास देणे हे उचित होणार नाही असे या न्यायमंचाचे मत आहे.
योग्य व सबळ कारणाने सामनेवाला यांनी दावा न नाकारल्याने निश्चितच तक्रारदार यांना मानसिक त्रास झालेला आहे त्यामूळे मानसिक त्रासाबददल रु.5,000/- व दाव्याच्या खर्चाबददल रक्कम रु.5,000/- देणे उचित होईल असे या न्यायमंचाचे मत आहे.
सबब, न्यायमंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आदेश
1. तक्रारदाराची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येते.
2. सामनेवाला यांनी तक्रारदार यांना वाहन दूरुस्तीचा खर्च रु.1,34,000/- आदेश प्राप्ती पासून एक महिन्याचे आंत अदा करावेत.
3. सामनेवाला यांना आदेश देण्यात येतो की,मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व दाव्याच्या खर्चापोटी रु.5,000/- आदेश प्राप्ती पासून एक महिन्याचे आंत अदा करावेत.
4. वरील रक्कमा विहीत मूदतीत सामनेवाला यांनी अदा न केल्यास त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के व्याज देण्यास सामनेवाले जबाबदार राहतील.
5. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम- 20(3) प्रमाणे
तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड