निकाल (घोषित द्वारा – श्री डी.एस.देशमुख, अध्यक्ष) विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी असल्याच्या आरोपावरुन ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी आहे की, त्याने त्याचे वाहन क्रमांक एमएच 20-एजी-7784 चा गैरअर्जदार आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी (यापुढे “विमा कंपनी” असा उललेख करण्यात येईल) कडे दिनांक 2/8/2009 ते 1/8/2010 या कालावधीसाठी विमा उतरविलेला होता. विमा कालावधीमध्येच दिनांक 21/12/2009 रोजी तो त्याच्या मित्रांसह देवदर्शनासाठी त्याच्या वाहनातून जात असताना त्याच्या वाहनाचे टायर फुटल्याने अपघात झाला. अपघातामध्ये त्याच्या वाहनाचे प्रचंड नुकसान झाले. त्याच्या वाहनाचा विमा कालावधीमध्ये अपघात झाल्यामुळे त्याने अपघाताची माहिती गैरअर्जदार विमा कंपनीला दिली आणि त्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह विमा दावा दाखल केला. परंतु गैरअर्जदार विमा कंपनीने दिनांक 11/1/2010 रोजी त्याचा विमा त्याने वाहनाचा वापर व्यापारी कारणासाठी केल्याच्या कारणावरुन फेटाळला. विमा कंपनीने दिलेले सदर कारण चुकीचे असून त्याने त्याच्या वाहनाचा व्यापारी कारणासाठी वापर केलेला नाही. विमा कंपनीने चुकीच्या कारणावरुन विमा दावा फेटाळून त्रुटीची सेवा दिली. म्हणून तक्रारदाराने अशी मागणी केली आहे की, त्यास विमा कंपनीकडून वाहनाच्या नुकसानीबद्दल रु 3,00,000/- देण्यात यावेत. गैरअर्जदार विमा कंपनीने लेखी निवेदन दाखल केले. विमा कंपनीचे म्हणणे असे आहे की, तक्रारदाराने त्याच्या वाहनाचा विमा उतरविलेला आहे. परंतु तक्रारदाराने पॉलिसीतील अटींचे उल्लंघन केले आहे. तक्रारदाराने त्याच्या वाहनाचा केवळ खाजगी वापर करणे आवश्यक असताना त्याने त्याच्या वाहनाचा व्यापारी कारणासाठी वापर केल्याचे चौकशीमध्ये निष्पन्न झाले. म्हणून त्याने दाखल केलेला विमा दावा फेटाळण्यात आला. तक्रारदाराचा विमा दावा योग्य कारणावरुन फेटाळलेला असून त्यास त्रुटीची सेवा दिलेली नाही. म्हणून ही तक्रार फेटाळावी अशी मागणी विमा कंपनीने केली आहे. दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे उत्तरे 1. गैरअर्जदार विमा कंपनीच्या सेवेत त्रुटी आहे काय ? होय 2. आदेश काय ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मुद्दा क्र 1 :- दोन्ही पक्षातर्फे युक्तीवाद करण्यात आला. तक्रारदाराने त्याचे वाहन क्रमांक एमएच 20-एजी-7784 चा गैरअर्जदार विमा कंपनीकडे विमा उतरविला होता व विमा कालावधीमध्येच त्याच्या वाहनाचा अपघात झाला व अपघातामध्ये वाहनाचे नुकसान झाले. म्हणून तक्रारदाराने विमा कंपनीकडे विमा दावा दाखल केला. परंतु विमा कंपनीने त्याचा विमा दावा फेटाळला, याविषयी वाद नाही. विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा दावा फेटाळताना दिलेले कारण चुकीचे असल्याचे दिसते. तक्रारदाराने त्याच्या वाहनाचा वापर व्यापारी कारणासाठी करुन पॉलिसीतील अटींचे उल्लंघन केले असे कारण विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा दावा फेटाळताना दिलेले आहे. वास्तविक अपघात झाला त्यावेळी तक्रारदाराने त्याच्या वाहनाचा कोणत्याही प्रकारे व्यापारी कारणासाठी वापर केला नव्हता. अपघात झाला त्यावेळी तक्रारदार स्वत: त्याच्या मित्रांसह देवदर्शनासाठी जात होता. तक्रारदाराने त्याच्या वाहनाचा वापर व्यापारी कारणासाठी केल्याचा निष्कर्ष विमा कंपनीने त्यांच्या चौकशी अधिका-याने तक्रारदाराचा जो जवाब नोंदविला होता त्यावरुन काढलेला आहे. चौकशी अधिका-याला जवाब देताना तक्रारदाराने तो त्याची गाडी कधी कधी भाडयाने देतो असे सांगितले. केवळ त्यावरुन तक्रारदाराने त्याची गाडी व्यापारी कारणासाठी वापरल्याचा निष्कर्ष काढून त्यास विमा रक्कम देण्यास नकार देणे योग्य ठरत नाही. प्रत्यक्षात अपघात झाला त्यावेळी तक्रारदाराने त्याची गाडी कोणालाही भाडेतत्वावर दिलेली नव्हती. तो स्वत: त्याच्या वाहनातून प्रवास करीत होता. त्यामुळे त्याने पॉलिसीतील अटीचे उल्लंघन केल्याचे दिसत नाही. म्हणून विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा दावा चुकीच्या कारणावरुन फेटाळून त्यास त्रुटीची सेवा दिल्याचे स्पष्ट दिसते. म्हणून मुद्दा क्र 1 चे उत्तर वरीलप्रमाणे देण्यात आले. तक्रारदाराने त्यास विमा कंपनीकडून रु 3,00,000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. परंतु विमा कंपनीने नेमलेल्या सर्वेअर व लॉस असेसरने तक्रारदाराचे रु 74,203/- चे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे. सर्वेअरने वाहनाची प्रत्यक्ष पाहणी करुन निश्चित केलेले मुल्य चुकीचे आहे असे म्हणता येणार नाही. म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो. आदेश 1. तक्रारदाराची तक्रार अशंत: मंजूर करण्यात येते. 2. गैरअर्जदार आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी लि., ने तक्रारदाराला रक्कम रु 74,203/- दिनांक 11/1/2010 पासून पुर्ण रक्कम देईपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजदराने निकाल कळाल्यापासून 1 महिन्याच्या आत द्यावेत. 3. गैरअर्जदार आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीने तक्रारदाराला मानसिक त्रासापोटी रु 2,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु 1,000/- निकाल कळाल्यापासून 1 महिन्याच्या आत द्यावेत. 4. संबंधितांना आदेश कळविण्यात यावा. (श्रीमती ज्योती पत्की) (श्रीमती रेखा कापडिया) (श्री दिपक देशमुख) सदस्य सदस्य अध्यक्ष UNK
| [ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Shri.D.S.Deshmukh] PRESIDENT[ Smt.Jyoti H.Patki] MEMBER | |