::: आ दे श :::
( पारित दिनांक : 28/06/2017 )
मा. अध्यक्षा, सौ. एस.एम.उंटवाले, यांचे अनुसार : -
1) तक्रारकर्ता यांनी सदरहू तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम 12 अन्वये, विरुध्द पक्षाने द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला, म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे. तक्रारकर्ते यांची तक्रार, विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 चा स्वतंत्र लेखी जबाब, उभय पक्षाने दाखल केलेले सर्व दस्तऐवज व उभय पक्षांचा लेखी युक्तिवाद, यांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन, खालील निर्णय पारीत केला.
तक्रारकर्ते व विरुध्द पक्ष क्र. 1 / विमा कंपनी यांच्यामध्ये हया बाबतीत वाद नाही की, तक्रारकर्त्याचे वाहन टाटा सुपर ACE क्र. एम.एच. 37 जे 0420 चा विमा दिनांक 25/12/2012 ते 24/12/2013 पर्यंत हा विरुध्द पक्ष क्र. 1 कडे काढण्यात आला होता. उभय पक्षात हा देखील वाद दाखल कागदपत्रांनुसार दिसत नाही की, तक्रारकर्त्याच्या सदर वाहनाचा दिनांक 30/07/ 2013 रोजी अपघात झाला होता. विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी त्यांच्या जबाबात हे कबूल केले आहे की, तक्रारकर्त्याने सदर अपघातानंतर विमाकृत वाहन दिनांक 23/08/2013 दुरुस्तीकरिता त्यांच्या वर्कशॉप मध्ये आणले होते व विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी दुरुस्तीचे अंदाजीत अंदाजपत्रक रक्कम रुपये 8,20,222/- ईतक्या रकमेचे तक्रारकर्त्यास दिले होते. यावरुन, तक्रारकर्ते हे विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 चे ग्राहक आहे, या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे.
2) तक्रारकर्ते यांचा असा युक्तिवाद आहे की, सदर अपघातात गाडीचे खुप नुकसान झाले व तक्रारकर्त्याचे दोन्ही पाय फॅक्चर झाले. सदर अपघात झाल्यानंतर पोलीस स्टेशन, मालेगांव येथे एफ.आय.आर. देण्यात आला. तक्रारकर्ते यांची परिस्थिती गरीबीची व हलाखीची आहे. अपघात झाल्यापासून ते बेडवरच आहे, त्यामुळे उत्पन्न पूर्णतः बंद आहे. तक्रारकर्त्याने सदर गाडी दिनांक 23/08/2013 रोजी विरुध्द पक्ष क्र. 2 च्या वर्कशॉपमध्ये दुरुस्तीकरिता दिली, त्यांनी एस्टीमेट चार्जेस रुपये 50,000/- व पार्कींग चार्जेस रुपये 400/- एवढी मागणी पत्राव्दारे केली. विरुध्द पक्ष क्र. 1 कडे अर्ज करुन गाडीची नुकसान भरपाई रक्कम मागीतली, परंतु त्यांनी दिली नाही. म्हणून प्रार्थनेनुसार तक्रार मंजूर करावी, अशी विनंती तक्रारकर्ते यांनी केली आहे.
3) यावर विरुध्द पक्ष क्र. 1 चा युक्तिवाद असा आहे की, तक्रारकर्ते यांनी अपघात दिनांक 30/07/2013 रोजी झाल्यानंतर त्याबद्दलचा पोलीस रिपोर्ट दिनांक 02/08/2013 रोजी दिला, हे संशयास्पद आहे. तक्रारकर्ते यांच्या म्हणण्यानुसार वाहन ते स्वतः चालवित होते, त्यामधून अचानक धूर निघाला त्यामुळे वाहनावरील नियंत्रण सुटले व त्यावेळी पाऊस चालु होता. परंतु तक्रारकर्त्याने त्यावेळी वाहन रस्त्याच्या कडेला थांबवायला पाहिजे होते, परंतु तसे न करता, वाहन भरधाव चालविले हे दाखल एफ.आय.आर. प्रतीवरुन दिसते. म्हणजे सदर अपघात तक्रारकर्त्याच्या स्वतःच्या चुकीमुळे घडला, म्हणून यात विमा पॉलिसीच्या अटी, शर्तीचे ऊल्लंघन आहे. सदर अपघाताची सुचना तक्रारकर्त्याने अपघात झाल्याबरोबर विरुध्द पक्ष क्र. 1 ला दयावयास पाहिजे होती, म्हणजे विरुध्द पक्ष क्र. 1 हे स्पॉट पंचनामा करु शकले असते व वाहनाचे निरीक्षण करु शकले असते. तक्रारकर्त्याने सदर वाहन स्वतःच्या संमतीने दुरुस्तीकरिता विरुध्द पक्ष क्र. 2 च्या वर्कशॉपमध्ये जवळपास 25 दिवसांनी टाकले त्यामुळे यास विरुध्द पक्ष क्र. 1 जबाबदार नाही. विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी तक्रारदाराला पत्र देवून, दुरुस्तीकरिता रक्कम जमा करण्यास सांगितले पण तक्रारकर्त्याने त्याची पुर्तता केली नाही. विरुध्द पक्ष क्र. 1 कडून दाव्याची रक्कम घेण्याकरिता प्रथम विमाकृत अपघातग्रस्त वाहन दुरुस्त करणे भाग आहे व विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी मागणी केलेले कागदपत्र पुरविणे भाग आहे, तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी मागणी केलेले कागदपत्र पुरविले नाही म्हणून यात विरुध्द पक्ष क्र. 1 ची सेवा न्युनता नाही.
4) विरुध्द पक्ष क्र. 2 चे कथन असे आहे की, तक्रारकर्त्याने सदर वाहन दुरुस्तीकरिता विरुध्द पक्ष क्र. 2 च्या वर्कशॉपमध्ये टाकल्यानंतर त्यांना दुरुस्तीचे एस्टीमेट रुपये 8,20,222/- ईतक्या रकमेचे दिले परंतु तक्रारकर्त्याने त्यापैकी अग्रीम रक्कमही जमा केली नाही. त्याबाबत पत्राव्दारे विचारणा केली असता, तक्रारकर्त्याने 2-3 महिणे, विमा रक्कम येईपर्यंत थांबण्याचे सुचविले होते. परंतु तक्रारकर्त्याने कोणतीही रक्कम वाहन दुरुस्तीपोटी जमा केली नाही. त्यामुळे वाहन संरक्षणावर विरुध्द पक्ष क्र. 2 ला खर्च करावा लागत आहे. आजही तक्रारकर्त्याने बाजारभावाप्रमाणे वाहन दुरुस्तीचा खर्च दिल्यास विरुध्द पक्ष क्र. 2 वाहन दुरुस्त करण्यास तयार आहे.
5) अशाप्रकारे उभय पक्षांचा युक्तिवाद एैकल्यानंतर, दाखल दस्त तपासले असता असे दिसते की, तक्रारकर्त्याचे वाहन हे विमाकृत होते व त्याचा अपघात झाला ही बाब विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना कबुल आहे. सदर वाहन हे दुरुस्ती करिता विरुध्द पक्ष क्र. 2 कडे जमा आहे म्हणजे वाहनाची निश्चीतच तुटफुट होवून नुकसान झाले आहे. विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी सदर वाहनाचा सर्वे करुन नुकसान भरपाईबद्दल अहवाल तयार केलेला नाही व अपघातात तक्रारकर्त्याची चूक आहे, असे नमूद करुन, सदर पॉलिसीच्या अटी, शर्तीचा तक्रारकर्त्याने भंग केला, असे कथन केले. परंतु कोणत्या अटी, शर्तीचा भंग केला, हे कागदोपत्री पुराव्यानिशी सिध्द केले नाही. तसेच विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी जे दस्तऐवज तक्रारकर्त्यास मागीतले आहेत, त्याशिवाय विमा दावा मंजूर करता येणार नाही, हे देखील सिध्द केले नाही. विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी लेखी युक्तिवादात जे ईतर मुद्दे मांडले ते त्यांच्या लेखी जबाबात नसल्यामुळे मंचाने त्याचा विचार केला नाही. विरुध्द पक्ष क्र. 2 च्या पत्रान्वये सदर वाहनाच्या दुरुस्तीचे ईस्टीमेट नुसार अग्रीम रक्कम रुपये 50,000/- ची मागणी केलेली दिसते, म्हणून विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी सदर अग्रीम रक्कम सव्याज तक्रारकर्त्यास दयावी व त्यानंतर विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी वाहनाचे निरीक्षण करुन, सर्वेअर मार्फत पूर्ण दुरुस्तीची किंमत निश्चीत करावी तसेच तक्रारकर्त्यास शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान भरपाई पोटी, प्रकरण खर्चासह रक्कम रुपये 8,000/- द्यावी, असे आदेश पारित केल्यास ते न्यायोचित होईल, असे मंचाचे मत आहे.
म्हणून, खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित केला.
- तक्रारकर्ते यांची तक्रार विरुध्द पक्ष क्र. 1 विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्याच्या वाहन दुरुस्तीपोटी अग्रीम रक्कम रुपये 50,000/- ( रुपये पन्नास हजार फक्त ) दरसाल, दरशेकडा 9 टक्के व्याजदराने दिनांक 1/06/2015 ( प्रकरण दाखल तारीख ) पासुन तर प्रत्यक्ष रक्कम अदायगी पर्यंत व्याजासहीत द्यावी तसेच वाहन दुरुस्तीनंतर, सर्वेअर तर्फे पूर्ण वाहन दुरुस्तीची किंमत निश्चीत करावी.
- विरुध्द पक्ष क्र. 1 यांनी तक्रारकर्त्यास शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान भरपाई पोटी, प्रकरण खर्चासह रक्कम रुपये 8,000/- ( रुपये आठ हजार फक्त ) अदा करावी.
- विरुध्द पक्ष यांनी सदर आदेशाची पुर्तता, आदेश प्रत प्राप्त झाल्यापासून 45 दिवसांत करावी. 5 उभय पक्षकारांना आदेशाची प्रत नि:शुल्क दयावी.
(श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,वाशिम,(महाराष्ट्र).
svGiri