सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार अर्ज क्र. 88/2012.
तक्रार दाखल दि.12-06-2012.
तक्रार निकाली दि.17-10-2015.
श्री. भगवान तात्याबा धायगुडे,
रा. मु. बोरी, पो. सुखेड,
ता.खंडाळा, जि.सातारा. ... तक्रारदार.
विरुध्द
1. आय.सी.आय.लोम्बार्ड जनरल इन्श्युरन्स कंपनी लि.,
तर्फे शाखा प्रमुख,
इंटरफेस बिल्डिंग नं.11,
401/402, 4 था मजला,
न्यु लिंक रोड, मालाड (वेस्ट),
मुंबई – 400 064
2. आय.सी.आय.लोम्बार्ड जनरल इन्श्युरन्स कंपनी लि.,
तर्फे फ्रेनचेशी शाखा,
हेम एक्झ्युक्युटीव हॉटेल इमारत,
पहिला मजला, पोवई नाका, सातारा.
3. टाटा मोटार्स लि.,
रजि. ऑफीस- हाऊस नं. 24,
होमी मोदी स्ट्रीट, हुतात्मा चौक,
मुंबई.
4. टाटा मोटार्स लि.,
कलेक्टर ऑफीस समोर,
ING वैश्य बँकेचे वर, सातारा. .... जाबदार.
तक्रारदारातर्फे –अँड.ए.पी.कदम.
जाबदार क्र. 1 व 2 तर्फे – अँड.के.आर.माने.
जाबदार क्र. 3 व 4 तर्फे – अँड.के.डी.धनवडे.
न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात मजकूर पुढीलप्रमाणे-
तक्रारदार हे मु.बोरी, पो.सुखेड, ता.खंडाळा, जि.सातारा येथील कायमस्वरुपी रहिवाशी आहेत. त्यांनी जाबदार नं. 2 व 3 कडून कर्ज घेऊन टाटा कंपनीचा ट्रक रजि. नं. एम.एच.11 ए 316 हा सन 2008 मध्ये खरेदी केला होता. सदर ट्रकचा चेसीस नं. 444026 एम.एस.झेड 752233 असून इंजिन नं.697 टी.सी. 57 एम.एस.झेड 156557 असा आहे. तक्रारदाराने प्रस्तुत ट्रक त्याचे कुटूंबाचे उदरनिर्वाहासाठी खरेदी केला होता. प्रस्तुत ट्रकवर ड्रायव्हर म्हणून समाधान सर्जेराव पवार तर क्लीनर म्हणून दीपक गायकवाड यांची नेमणूक मदतनीस म्हणून केली होती. जाबदार क्र. 1 कडे ट्रकचा विमा उतरविला होता. तर जाबदार नं. 2 कडे जाबदार क्र.1 ची एजन्सी फ्रेंचेसी होती व आहे. जाबदार क्र. 3 ही फायनान्स करणारी कंपनी असून जाबदार क्र. 4 ही सातारा येथे जाबदार क्र. 3 चा फायनान्स व्यवसाय करणारी शाखा आहेत. तक्रारदाराने जाबदार क्र. 3 व 4 कडून ट्रक खरेदीसाठी रक्कम रु.10,92,000/- कर्ज घेतले व सदरचा ट्रक रक्कम रु.11,37,516/- या किंमतीस खरेदी केला. जाबदार क्र. 3 व 4 यांचे वित्तीय सहाय्य करणार म्हणून नोंदणी पुस्तकात नोंद असलेने जाबदार क्र. 3 व 4 यांना आवश्यक पक्षकार केले आहे.
तक्रारदाराने सदरचा ट्रक आधुनिक ट्रान्स्पोर्ट कंपनी कळंबोली, नवी मुंबई यांचे ऑर्डरप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रात माल वाहतूक करणेसाठी वापरत होते. तक्रारदाराचे मालकीचा टाटा ट्रक एम.एच.-11-ए.एल. 313 हा दि. 17/8/2010 रोजी तक्रारदाराचे ट्रकचा चालक समाधान पवार याने सी वर्ल्ड कंपनी डोणगिरी येथील आऊट गेटचे समोर माल वाहतूकीची ऑर्डर नसलेने उभा केला होता. त्यावेळी ट्रकची देखभाल करणेसाठी ट्रकसोबत चालक श्री. समाधान पवार व क्लीनर दिपक गायकवाड हे होते. दि. 23/8/2010 रोजी रात्री 9.15 वाजता ट्रक चालक व क्लीनर यांनी ट्रक व्यवस्थीत लॉक करुन दोघेही जेवणासाठी कंपनीजवळ असलेल्या कॅन्टीनमध्ये गेले होते व जेवण करुन परत याठिकाणी आले असता प्रस्तुत ट्रक लावलेल्या ठिकाणी आढळून आला नसलेने आजूबाजूला शोध घेतला. तथापी ट्रक मिळून आला नाही. यावर ट्रक ड्रायव्हरने तक्रारदाराला ट्रक जागेवर नसलेचे फोनवरुन सांगीतलेवर तक्रारदार दि. 24/8/2010 रोजी प्रस्तुत ठिकाणी गेले व ट्रकची चोरी झालेबाबत उरण, नवीमुंबई पोलीस स्टेशनला ट्रक चोरीची तक्रार देणेसाठी गेले असता संबंधीत पोलीस स्टेशनची अधिकारी यांनी सांगीतले की, ट्रकचा जवळपासचे भागात/उपनगरात शोध घ्या व नंतर तक्रार नोंदवा. त्यामुळे तक्रारदाराने जवळपास, उपनगरात ट्रकचा भरपूर शोध घेतला. परंतू ट्रक मिळून आला नाही. अखेर दि.28/8/2010 रोजी उरण पोलीस स्टेशन, नवी मुंबई येथे तक्रारदाराचे मालकीचा ट्रक रजि.नं. एम.एच. 11 ए.एल. 316 हा चोरीस गेलेची तक्रार गु.र.नं.87/2010 दाखल केली व ताबडतोब सदर ट्रक चोरीची माहिती जाबदार विमा कंपनीस कळविली. पोलीस स्टेशनला तक्रारदाराने तक्रार नोंदवलेवर पोलीसांनी जागेवर जाऊन पंचनामा केला व तपास केला असता, ट्रक सापडला नाही त्यामुळे ‘अ’ समरी रिपोर्ट दाखल केला. त्यावर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारीसो यांनी दि.17/2/2011 रोजी ‘अ’ समरी अहवालावर सही करुन सदर गु.र.नं. 87/2010 चे तपासकामाचे अंतिम रिपोर्टवर सही केली. प्रस्तुत ट्रकचा विमा तक्रारदाराने जाबदार क्र. 1 कडे उतरविला होता व आहे. त्याचा कालावधी दि.8/7/2010 ते दि.7/7/2011 असा असून विमा पॉलीसी क्र.3003/30203391/बी 00 असा आहे. तर ट्रकची किंमत रु.11,05,230/- अशी नमूद केली आहे. त्याप्रमाणे तक्रारदाराने नमूद ट्रकचा विमा हप्ता जाबदार क्र. 1 विमा कंपनीकडे जमा केलेला आहे. ट्रक चोरीस गेले तारखेस प्रस्तुत विमा चालू होता व आहे. जाबदार क्र. 1 ने तक्रारदारास 2746 नंबरचे पत्र पाठवून दि.23/8/2010 रोजी चोरीस गेले. तक्रारदाराचे ट्रकची संबंधीत कागदपत्रे त्वरीत उपलब्ध करुन द्यावीत असे कळविले. प्रस्तुत माहीती तक्रारदाराने जाबदार विमा कंपनीस कळविली व कागदपत्रे उपलब्ध करुन दिली. त्यानंतर जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराचे चोरीस गेले ट्रक बाबत चौकशी केली त्यावेळी तक्रारदाराचे जबाब नोंदवून घेतला व तक्रारदाराकडून चोरीस गेले ट्रकचे सर्व कागदपत्रे मूळ स्वरुपात जाबदाराने घेतल्या आहेत. तसेच दि.27/10/2010 रोजी ट्रकची चावी, खरेदी इन्व्हाईस पावती ड्रायव्हींग लायसन्स, बँक स्टेटमेंट, तक्रारदाराचा रहिवाशी दाखला, आर.टी.ओ. इंटिमेशन, 220/- रुपयांचा स्टँम्प पेपर, इंडेमनिटी बॉण्ड, नॉनरिपझेशन लेटर, पोलीस स्टेशनचा फायनल रिपोर्ट याची पूर्तता करण्यास जाबदाराने तक्रारदाराला सांगितलेवरुन तक्रारदाराने दि.21/3/2011 रोजी सर्व कागदपत्रांची पूर्तता जाबदार क्र. 1 च्या तपास यंत्रणेकडे केली आहे. त्यानंतर दि. 9/6/2011 रोजी जाबदार क्र. 4 यांना ई-मेल करुन तक्रारदाराचे चोरी झाले ट्रकचे शेवटचे लोड चलन, सर्व्हीसींग हिस्ट्री व एफ.आय.आर. देणेस उशीर का झाला ? याचा खुलासा करणेबाबत रक्कक रु.100/- चे स्टॅम्पवर नोटरीमार्फत अँफीडेव्हीट करुन देणेस कळविले त्याची सर्व पूर्तता तक्रारदाराने केली व जाबदाराचे मागणीप्रमाणे सर्व कागदपत्रांची वेळेवर पूर्तता तक्रारदाराने करुन दिली. परंतू जाबदार क्र. 1 विमा कंपनीने विनाकारण जाणूनबुजून तब्बल एक वर्षानंतर तक्रारदाराचे ट्रकचा विमा क्लेम नाकारुन तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे. दि.27/7/2011 रोजी जाबदाराने तक्रारदाराला प्रस्तुत ट्रकचा विमा क्लेम नाकारलेचे कळविले व तक्रारदाराला द्यावयाच्या सेवेत कमतरता/त्रुटी केली आहे. त्यामुळे जाबदार विमा कंपनीकडून एकूण रक्कम रु.16,14,054/- नुकसानभरपाई मिळणेसाठी तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज मे मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने प्रस्तुत कामी जाबदार यांचेकडून ट्रकची किंमत, रक्कम रु.11,05,230/- (रुपये अकरा लाख पाच हजार दोनशे तीस मात्र) द.सा.द.शे. 18 टक्के व्याजाने जाबदाराकडून वसूल होवून मिळावेत, मानसिक त्रासापोटी रक्कम रु.10,00,000/- व अर्जाचा खर्च म्हणून रक्कम रु.25,000/- तक्रारदाराला जाबदारकडून मिळावेत, तक्रारदाराला जाबदाराने सेवा देणेत कमतरता केली व उशीर केला त्यासाठी रक्कम रु.1,50,000/-, नुकसानी जाबदारांकडून मिळावी अशी विनंती केली आहे.
3. प्रस्तुत कामी तक्रारदाराने नि. 2 कडे अँफीडेव्हीट, नि.5 चे कागदयादीसोबत नि. 5/1 ते नि.5/19 कडे अनुक्रमे वादातीत ट्रकचे आर.सी.टी.सी.बुक-झेरॉक्स प्रत, ट्रक चोरीस गेलेची पोलीस स्टेशनला दिले तक्रार/एफ.आय.आर.ची सही शिक्का नक्कल, ट्रक चोरीचा पंचनामा, ट्रकची विमा पॉलीसी, ट्रकचा आर.टी.ओ.ला नॉन यूज डिक्लरेशनचा दिलेला फॉर्म, फॅक्ट फाईंडर,नाशीक यांचे पत्र, कारटेल सर्व्हेअरचे पत्र, समरी रिपोर्टचे पत्र, ‘अ’ समरी हुकूम, ट्रक खरेदीचे टॅक्स इन्व्हाईस पत्र, इंडेमिनीटी बॉन्ड, गुडस् कॅरेज परमीट व फीटनेस दाखला, ट्रकचे शेवटचे सर्व्हीसींग केलेले बील, ट्रकचे शेवटचे लोडचलन, जाबदार क्र. 1 ला अँफीडेव्हीट, ट्रक रिपझेस न केलेचे पत्र, कर्ज खाते उतारा, ड्रायव्हींग लायसन्स, विमा क्लेम नाकारलेचे पत्र, नि. 30 कडे दुरुस्ती प्रत, नि.38 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि. 46 दुरुस्ती अर्ज, नि. 47 लेखी युकतीवाद, नि. 48 कडे वेगवेगळे केस लॉज, नि. 49 कडे दुरुस्ती अर्जाची प्रत वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने दाखल केली आहे.
4. प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1 व 2 यांनी नि. 16 कडे कैफीयत/म्हणणे, नि. 17 कडे म्हणण्याचे अँफीडेव्हीट, नि. 26 कडे जाबदार क्र. 1 ने दिलेले म्हणणे, कागदपत्रे हाच पुरावा समजणेत यावा म्हणून पुरसीस, नि. 35 कडे जाबदार क्र. 3 चे म्हणणे, नि. 36 कडे म्हणण्याचे अँफीडेव्हीट, नि. 37 कडे लेखी युक्तीवाद, नि. 40 कडे लेखी युक्तीवाद, नि.45 कडे जाबदार क्र. 3 कडे पुराव्याचे शपथपत्र वगैरे कागदपत्रे जाबदार क्र. 1 ते 4 यांनी दाखल केली आहेत. प्रस्तुत कामी जाबदार क्र. 1 व 2 यांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जातील सर्व कथने फेटाळलेली आहेत. त्यांनी पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदविलेले आहेत.
तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्यातील मजकूर खोटा असून मान्य व कबूल नाही. तक्रारदाराने उपजीवीकेचे साधन म्हणून ट्रक खरेदी केला हे खोटे असून जास्तीत जास्त नफा मिळविणेसाठी व्यापारी कारणासाठी खरेदी केला आहे. त्यामुळे तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ‘ग्राहक’ या संज्ञेत येत नसलेमुळे प्रस्तुत तक्रार अर्ज या मे मंचात चालणेस पात्र नाही. तक्रारदार यांना जाबदाराने विमा पॉलीसीतील सर्व अटी व शर्थी यांची माहिती देऊनच विमा पॉलीसी दिली होती. परंतू तक्रारदाराने विमा पॉलीसीतील अटी व शर्थींचा भंग केला आहे. तक्रारदार हे स्वतः सदर ट्रक चालवत नव्हते तर सदर ट्रक चालविण्यासाठी ड्रायव्हर व क्लीनरची नेमणूक केली होती. सदरचा ट्रक तक्रारदाराने व्यवसायाकरीता नवी मुंबई ट्रान्स्पोर्ट कंपनीकडे नेमलेला होता. सदर ट्रकवर तक्रारदाराचा प्रत्यक्ष ताबा नव्हता व त्यांचे देखरेखीखाली सदर ट्रक नव्हता. ट्रकची चोरी दि.23/8/2010 रोजी झाली. परंतू त्याबाबतची माहिती तक्रारदाराने जाबदार यांना पॉलीसीतील अटीप्रमाणे ताबडतोब कळविली नाही. तसेच संबंधीत पोलीस स्टेशनला दि.28/8/2010 रोजी तक्रारदाराने उशीरा दिली. सदर तक्रार पोलीस स्टेशन देणेस तक्रारदाराने फारच उशीर केलेला आहे. तसेच जाबदार विमा कंपनीसही वेळाने व उशीरा कळविली असल्याने जाबदार यांना वाहनाचा शोध घेण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे तक्रारदाराने विमा पॉलीसीतील अटी व शर्थींचा भंग केलेला आहे. त्यामुळे विमा कंपनीने प्रस्तुत विमा क्लेम नामंजूर केला आहे. जाबदाराने तक्रारदाराला कोणतीही सेवेतील कमतरता दिली नाही. तक्रारदार याना जाबदार विमा कंपनीच्या सदर निर्णयाविरुध्द तक्रार असल्यास विमा लोकपाल Insurance Ombudsman ची स्थापना केली असून त्यांचा पत्ता ऑफीस सांताक्रुज, मुंबई येथे असलेचे कळविले आहे. तक्रारदाराने प्रथम विमा लोकपाल/Insurance ombudsman कडे तक्रार दाखल करणे आवश्यक होते व आहे. परंतू तक्रारदाराने तसे न करता मे. मंचात तक्रार अर्ज दाखल केला आहे. तक्रारदाराने प्रस्तुत ट्रकची चोरी होईपर्यंत योग्य ती काळजी घेतलेली नव्हती व नाही. तक्रार अर्ज करण्यास कोणतेही कारण घडलेले नाही. तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा असे म्हणणे जाबदार क्र. 1 व 2 यांनी दिले आहे.
जाबदार क्र. 3 व 4 यांनी म्हटले आहे की, जाबदार क्र. 3 व 4 यांचेकडून तक्रारदाराला कोणतेही देणे घेणे नाही. जाबदार क्र. 3 व 4 यांचा कोणताही संबंध नसताना याकामी पक्षकार म्हणून सामील केले आहे. तक्रारदार यांना प्रस्तुत जाबदार क्र. 3 व 4 यांचेकडून कोणतीही मागणी करता येणार नाही. त्यामुळे तक्रारदाराचा तक्रार अर्ज फेटाळणेत यावा व कारण नसताना जाबदार क्र. 3 व 4 यांना पक्षकार केले असलेने तक्रारदाराकडून जाबदार क्र. 3 व 4 यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.25,000/- नुकसानभापाई मिळावी असे म्हणणे जाबदार क्र. 3 व 4 यांनी दाखल केले आहे.
5. वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी प्रस्तुत कामी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाच्या निराकरणार्थ पुढील मुद्दयांचा विचार केला.
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार व जाबदार हे नात्याने ग्राहक व
सेवापुरवठादार आहेत काय? होय.
2. जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा पुरविली आहे काय? होय.
3. तक्रारदार जाबदार क्र. 1 विमा कंपनीकडून विमाक्लेमची रक्कम
मिळणेस पात्र आहेत काय? होय.
4. अंतिम आदेश काय? खालील नमूद
आदेशाप्रमाणे.
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1,2 व 3 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण-तक्रारदार यांनी जाबदार क्र. 2 व 3 यांचेकडून कर्जाऊ रक्कम घेवून टाटा कंपनीचा ट्रक रजि. नं. एम.एच.-11-ए.एल.316 हा ट्रक सन 2008 मध्ये खरेदी केला. तसेच सदर ट्रकचा विमा जाबदार क्र. 1 विमा कंपनीकडे जाबदार क्र. 2 शाखेत उतरविला होता. प्रस्तुत विमा ट्रकची चोरी झाली त्यावेळी चालू होता. या सर्व बाबी जाबदार क्र. 1 ते 4 यांनी कबूल केल्या आहेत. तसे जाबदार क्र. 1 ते 4 यांनी तक्रारदाराने प्रस्तुतचा ट्रक हा व्यापारी कारणासाठी व जास्त फायदा/नफा मिळविणेसाठी खरेदी केला आहे ही बाब पुराव्यानिशी सिध्द केलेली नाही. त्यामुळे तक्रारदाराने प्रस्तुत ट्रक हा उपजीवीकेचे साधन म्हणून खरेदी केला आहे असे म्हणणे न्यायोचीत होणार असून तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायद्यानुसार ग्राहक या संज्ञेत येत असून तक्रारदार व जाबदार हे नात्याने ग्राहक व सेवापुरवठादार आहेत हे निर्विवादपणे सत्य आहे. त्यामुळे मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी दिलेले आहे. तसेच तक्रारदाराचा ट्रक दि.23/8/2010 रोजी रात्री 9.15 वाजता ट्रक चालक समाधान पवार व क्लीनर दिपक गायकवाड हे ट्रक व्यवस्थीत लॉक करुन जेवणासाठी जवळच्याच कँटींनमध्ये गेले असता व जेवण करुन रात्री 9.45 वाजता परत ट्रक लावले ठिकाणी आले असता त्या जागेवर ट्रक आढळून आला नाही. शोध घेतला असता ट्रक सापडला नाही. त्यावेळी ट्रक ड्रायव्हरने मोबाईलवरुन तक्रारदारास सदर बाब कळविली असता, तक्रारदार हे त्यांचे गावी बोरी, ता. खंडाळा येथून दि. 24/8/2010 रोजी सकाळी ऊरण येथे ट्रक उभा केले ठिकाणी आले. त्यानंतर लगेच ऊरण येथे मुंबई पोलीस स्टेशनला ट्रक चोरीस गेलेबाबत तक्रार देणेस गेले असता संबंधीत पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी जवळपास उपनगरात ट्रकचा शोध घ्या व नंतर तक्रार नोंदवू असे सांगीतलेने मुंबई शहर, उपनगरे, पुणे –नाशीक याठिकाणी ट्रकचा शोध घेतला. परंतू ट्रक मिळून आला नाही. त्यामुळे दि. 28/8/2010 रोजी उरुण पोलीस स्टेशनला रितसर तक्रार गु.र.नं.87/2010 नोंदवली. परंतू तत्पूर्वी दि. 25/8/2010 रोजी मुंबई पोलीस/ऊरण पोलीस स्टेशन यांनी ट्रक चोरी झाले ठिकाणचा पंचानामा केला आहे. नंतर ऊरण पोलीसांनी सदर गुन्हा र.नं. 87/2010 मधील चोरीस गेले ट्रकचा शोध घेतला. योग्य तो तपास केला असता ट्रक सापडला नाही व तपास लागला नाही. म्हणून पोलीसांनी ‘अ’ समरी दाखल केला. त्यावर ऊरण येथील मे. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दि. 17/7/2911 रोजी ‘अ’ समरी अहवालावर सही करुन सदर गु.र.नं. 87/2010 चे अंतीम रिपोर्टवर सही केली. त्यानंतर तक्रारदाराने जाबदार क्र. 1 विमा कंपनीकडे चोरीस गेले ट्रकचा विमा असलेने विमा क्लेम मिळणेसाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन विमा क्लेमफॉर्म जाबदार क्र. 1 विमा कंपनीकडे पाठवला व जाबदार विमा कंपनीचे मागणीप्रमाणे वेळोवेळी सर्व कागदपत्रांची पूर्तता तक्रारदाराने केली व नोटराईज्ड अँफीडेव्हीट सुध्दा तयार करुन दिले. पण तक्रारदाराने जाबदाराचे मागणीप्रमाणे योग्य ती सर्व पूर्तता करुनही ट्रकचा विमा, ट्रक चोरी झाला त्या तारखेस चालू असतानाही जाबदार क्र. 1 विमा कंपनीने तक्रारदाराचे ट्रकचा विमा क्लेम विनाकारण म्हणजेच ट्रक चोरी झालेनंतर पोलीस स्टेशनला एफ.आय.आर. उशीराने का दाखल केले? असे कारण दाखवून/ट्रक चोरीस गेलेची फिर्याद पोलीस स्टेशनला ताबडतोब दिली नाही. हे कारण दाखवून विमा क्लेम दि.27/7/2011 रोजी नाकारला. वास्तविक तक्रारदाराने जाबदार विमा कंपनीस व पोलीस स्टेशनला वेळेवर कळविले होते व आहे. परंतू पोलीसांनीच आधी शोध घ्या नंतर फिर्यादी नोंदवू असे म्हटलेने आधी शोध घेतला. त्यामुळे फक्त 6 दिवसांचा उशीर फिर्याद द्यायला झाला आहे. परंतू प्रस्तुत पोलीस स्टेशनला एफ.आय.आर. उशीरा दाखल करण्यामुळे तक्रारदाराचा ट्रकचा विमा क्लेम नाकारणे म्हणजे सेवेतील कमतरता व त्रुटी आहे असे आम्हास वाटते. प्रस्तुत कामी आम्ही तक्रारदाराने दाखल केले पुढील नमूद मे. वरिष्ठ न्यायालयांच्या न्यायनिवाडयांचा व त्यातील दंडकांचा विचार केला आहे.
1. 2005 (1) CPR 442 ORISSA STATE CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION Gajendra Prasad Panda V/s. Oriental Insurance Co.
IMP Point- Where insured vehicle was stolen, claim cannot be defeated by insurance company on a technicality of some delay in reporting matter to the police & to Insurance company.
प्रस्तुत कामी जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराने वाहन चोरीची फिर्याद उशिराने पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली हे कारण देऊन तक्रारदाराचे ट्रकचा विमा क्लेम फेटाळलेला आहे. इतर कोणतेही कारण त्यांनी या पत्रामध्ये नमूद केलेले नाही. वरील नमूद केस-लॉ चा विचार करता कोणत्याही तांत्रिक बाबीसाठी विमा कंपनीने ग्राहकांचे विमा क्लेम फेटाळणे योग्य नाही असे म्हटले आहे. सबब जाबदार विमा कंपनीने तक्रारदार यांचा विमा क्लेम तांत्रीक कारणासाठी नामंजूर करुन तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे हे स्पष्ट झाले आहे. सबब आम्ही मुद्दा क्र. 2 चे उत्तर होकारार्थी दिले आहे. तक्रारदार यांनी त्यांचा ट्रक दि.23/8/2010 रोजी रात्री चोरीस गेलेनंतर सर्वत्र शोधाशोध करुन दि. 28/8/2010 रोजी उरण पोलीस स्टेशनला ट्रक नं. एम.एच.-11-ए.एल. 316 हा चोरीस गेलेबाबत एफ.आय.आर. दाखल केली. त्याचा गु.र.नं.87/2010 असा होता. तक्रारदाराने चोरीची घटना घडलेनंतर 4 दिवसांनी उशीरा पोलीस स्टेशनमध्ये एफ.आय.आर. दाखल करणे ही बाब तांत्रीक स्वरुपाची असलेने फक्त एवढयाच कारणावरुन जाबदार विमा कंपनीने तक्रारदाराचा विमा क्लेम नामंजूर करणे ही सेवेतीस त्रुटी असून प्रस्तुत तक्रारदार हे जाबदार विमा कंपनीकडून विमा क्लेम मिळणेस पात्र आहेत असे आमचे स्पष्ट मत आहे.
8. सबब प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. जाबदार क्र. 1 व 2 विमा कंपनीने तक्रारदार यांना ट्रकचे नुकसानभरपाई
रक्कम रु. 11,05,230/- (रुपये अकरा लाख पाच हजार दोनशे तीस मात्र)
अदा करावी. प्रस्तुत रकमेवर विमाक्लेम नामंजूर केले तारखेपासून रक्कम
प्रत्यक्ष तक्रारदाराचे हातीपडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याज जाबदार क्र. 1 व
2 ने अदा करावे.
3. तक्रारदार यांना झाले मानसीक त्रासापोटी जाबदार क्र. 1 व 2 यांनी रक्कम
रु.25000/- (रुपये पंचवीस हजार मात्र) तसेच अर्जाचा खर्च म्हणून रक्कम
रु.5,000/- (रुपये पाच हजार मात्र) तक्रारदार यांना अदा करावेत.
4. वरील सर्व आदेशांची पूर्तता/पालन जाबदार यांनी आदेश पारीत तारखेपासून 45
दिवसात करावी.
5. जाबदार क्र. 3 व 4 यांना प्रस्तुत जबाबदारीतून वगळणेत येते.
6. विहीत मुदतीत आदेशाचे पालन जाबदार क्र. 1 व 2 यांनी न केल्यास
तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 नुसार जाबदारांविरुध्द
कारवाई करणेची मुभा राहील.
7. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
8. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि. 17-10-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (सौ.सविता भोसले)
सदस्या अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.