(आदेश पारीत व्दारा - श्री शेखर पी. मुळे, मा.अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 23 डिसेंबर 2016)
1. सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे अन्वये तक्रारकर्त्याने ही तक्रार विरुध्दपक्ष आय.सी.आय.सी.आय. लोम्बार्ड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, नागपूर येथील स्थानिय शाखा आणि त्याचे अधिकारी प्रतिनिधी यांचेविरुध्द त्याचे गाडीच्या विमा दाव्यात सेवेत कमतरता ठेवल्या संबंधी दाखल केली आहे.
2. तक्रारकर्त्याची तक्रार थोडक्यात अशाप्रकारे आहे की, तक्रारकर्ता हा फॉक्सवॅगन पोलो या गाडीचा मालक असून गाडीचा नोंदणी क्रमांक एम एच -31/ डी के – 4993 असा असून तिचा विमा विरुध्दपक्ष क्र.1 कडून काढण्यात आला होता. विरुध्दपक्ष क्र.3 हा विरुध्दपक्ष क्र.1 व 2 चा अधिकृत प्रतिनीधी आहे. विरुध्दपक्ष क्र.3 ने तक्रारकर्त्याला सांगण्यात आले होते की, गाडीचा अपघात किंवा चोरी झाल्यास संपूर्ण नुकसान भरपाई विमा कपंनी तर्फे देण्यात येईल. गाडीचा विमा दिनांक 13.1.2011 ते 12.1.2012 या कालावधी वैध होता. दिनांक 25.2.2011 ला त्याच्या गाडीला अपघात झाल्याने सदर गाडीचा खालील भाग संपूर्णतः क्षतीग्रस्त झाले होते. दुस-या दिवशी ती गाडी फॉक्सवॅगन कंपनी गाडीचे अधिकृत विक्रेता सादीक मोटर्स प्रा.लि., एम.आय.डी.सी., हिंगणा येथे नेण्यात आले व त्याची सुचना विरुध्दपक्ष क्र.2 ला देण्यात आली. त्यानंतर, विरुध्दपक्ष क्र.2 तर्फे सर्व्हेअर मार्फत गाडीला झालेल्या नुकसानीचे मुल्यांकन करण्यात आले. सादीक मोटर्स तर्फे गाडीच्या संपूर्ण दुरुस्तीचा अंदाजे खर्च रुपये 6,45,868/- सांगण्यात आले. विरुध्दपक्ष क्र.2 ने तक्रारकर्त्यास सांगितले की, तो खर्च जास्त असून त्यांनी दुस-या ऑटोमोबाईल वर्कशॉपमधून गाडी दुरुस्त करुन घ्यावी आणि गाडी दुरुस्ती झाल्यानंतर त्याचा खर्च तक्रारकर्त्याने दिल्यानंतर बिलाप्रमाणे त्याच्या खर्चाची परिपुर्तता करण्यात येईल. त्यानुसार त्याने त्याची गाडी असफा ऑटो मोबाईल, मानकापूर, नागपूर येथे दुरुस्तीकरीता टाकली. तेथे सदर गाडीचा दुरुस्तीचा अंदाजे खर्च रुपये 2,08,000/- सांगण्यात आला. त्याची माहिती विरुध्दपक्ष क्र.2 लजा देण्यात आली व त्यावर विरुध्दपक्ष क्र.2 ने सांगितले की, गाडी दुरुस्तीकरुन खर्चाची बिलासह क्लेम फार्म भरुन द्यावे व तो खर्च त्याला परत केल्या जाईल. त्यानुसार तक्रारकर्त्याने त्याची गाडी असफा ऑटो मोबाईल कडून दुरुस्त करुन घेतली, ज्यासाठी त्याला रुपये 25,000/- लेबर चार्जेस, रुपये 6000/- लेथ मशीनचे काम आणि राज ट्रेडर्स स्पेअर पार्टसचे रुपये 1,59,806/- याप्रमाणे एकूण रुपये 1,90,806/- चे बिल दिले. तक्रारकर्त्याने त्या बिलाची रक्कम क्लेम फार्म भरुन विरुध्दपक्ष क्र.2 कडे सादर केला. दिनांक 22.6.2011 ला त्याला विरुध्दपक्ष क्र.1 कडून रुपये 16,092/- चा धनादेश प्राप्त झाला. आलेल्या खर्चापेक्षा दिलेली रक्कम कमी असल्यामुळे यासंबंधी चौकशी केली, त्यावर त्याला चौकशी करुन माहिती सांगण्यात येईल असे सांगण्यात आले. परंतु, बरेच दिवस लोटल्यानंतरही विरुध्दपक्षाकडून काहीही न कळल्याने त्यांना एक नोटीस पाठविली. परंतु, त्याचे उत्तर देण्यात आले नाही, म्हणून या तक्रारीव्दारे त्याने उर्वरीत रक्कम 1,74,714/- रुपये 18 टक्के व्याजाने मागितले असून झालेल्या ञासाबद्दल नुकसान भरपाई व तक्रारीख खर्च मागितला आहे.
3. तक्रारकर्त्याचे तक्रारीला अनुसरुन विरुध्दपक्ष क्र.1 ते 3 यांना मंचाची नोटीस बजावण्यात आली. त्यानुसार विरुध्दपक्षाने लेखी जबाब सादर करुन तक्रारकर्त्याच्या गाडीची विमा पॉलिसी मान्य केली. पुढे हे सुध्दा मान्य केले की, गाडीचा अपघात झाल्यानंतर दुस-या दिवशी त्याची माहिती त्यांना देण्यात आली व त्याचदिवशी तक्रारकर्त्याने क्लेम फार्म भरुन दिला. परंतु, ही बाब नाकबूल केली की, सादीक मोटर्सने दिलेला अंदाजीत खर्च पाहून ते जास्त आहे म्हणून तक्रारकर्त्याला दुस-यांकडून गाडी दुरुस्ती करण्यास सांगण्यात आले. यासंबंधी विरुध्दपक्षाचे म्हणणे आहे की, ती गाडी सादीक मोटर्स येथे दिनांक 28.2.2011 ला दरुस्तीकरीता आले आणि त्याचे रुपये 20,000/- चे बिल त्याला देण्यात आले होते, जे त्याने सादीक मोटर्सला दिले. गाडी दुरुस्ती झाल्यावर त्याचा ताबा सुध्दा त्याला देण्यात आला होता. त्याचप्रमाणे विरुध्दपक्षाने हे नाकबूल केले आहे की, विरुध्दपक्ष क्र.2 चे सांगण्यावरुन ती गाडी असफा ऑटो मोबाईलकडे दुरुस्ती करण्यात आली. असफा ऑटो मोबाईलने रुपये 2,08,000/- अंदाजे खर्च सांगितला हे नाकबूल करुन विरुध्दपक्ष क्र.2 च्या सांगण्यावरुन ती गाडी असफा ऑटो मोबाईलकडे दुरुस्त करण्यात आली आणि त्यासाठी तक्रारकर्त्याला रुपये 1,90,806/- असा खर्च आला, हे सुध्दा नकबूल केले आहे. त्याची गाडी सादीक मोटर्सकडे दुरुस्त करुन तिचा ताबा त्यांना देण्यात आला होता व सर्व्हेअरच्या रिपोर्टप्रमाणे रुपये 16,092/- रकमेची परिपुर्तता तक्रारकर्त्याला करण्यात आली होती. सबब, या तक्रारीला कोणतेही कारण नसून ती खारीज करण्यात यावी.
4. दोन्ही पक्षाच्या वकीलांचा मौखीक युक्तीवाद ऐकण्यात आला व अभिलेखावर दाखल केलेल्या दस्ताऐवजांचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे निष्कर्ष देण्यात येते.
// निष्कर्ष //
5. याप्रकरणामध्ये अभिलेखावर दाखल असलेल्या दस्ताऐजावरुन असे म्हणता येईल की, ती गाडी अपघात झाल्यानंतर सादीक मोटर्सकडे दुरुस्तीकरीता आणण्यात आली होती व तेथे दुरुस्तीचा अंदाजे खर्च रुपये 6,45,806/- सांगण्यात आला होता, विरुध्दपक्षाने ही बाब नाकबूल केली नाही. तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार विरुध्दपक्षाचे मते तो अंदाजे खर्च जास्त असल्या कारणाने त्याने तक्रारकर्त्याला दुसरीकडून गाडी दुरुस्ती करण्याचा सल्ला दिला होता. परंतु, याबाबत केवळ तक्रारकर्त्याच्या शब्दाशिवाय इतर कुठलाही पुरावा नाही आणि ही बाब विरुध्दपक्षाने मान्य सुध्दा केली नाही. याठिकाणी हे लक्षात घ्यावे लागेल की, जरी सादीक मोटर्सने अंदाजीत खर्च रुपये 6,00,000/- पेक्षा जास्त दाखविला होता, तरी दुरुस्तीचा खर्च त्यापेक्षा फारच कमी आला होता. विरुध्दपक्षाने जे कथन केले आहे त्यावरुन हे पाहणे जरुरी राहील की, तक्रारकर्त्याने त्याची गाडी सादीक मोटर्सकडून केली की असफा ऑटो मोबाईलकडून दुरुस्त केली.
6. तक्रारकर्ता असे म्हणतो की, त्याने ती गाडी असफा ऑटो मोबाईलकडून दुरुस्तीकरुन घेतली. परंतु, विरुध्दपक्षाचे म्हणण्यानुसार ती गाडी सादीक मोटर्सकडे दुरुस्ती करण्यात आली ज्यासाठी फक्त रुपये 20,000/- खर्च आणि तो तक्रारकर्त्याने सादीक मोटर्सला दिला होता. हे दाखविण्यासाठी विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या काही दस्ताऐवजांकडे लक्ष वेधले. सादीक मोटर्सचे टॅक्स इनवाईस दिले होते तो असे दर्शवीतो की, दुरुस्तीचा एकूण खर्च रुपये 20,000/- होता आणि विरुध्दपक्षाचे वकीलाच्या म्हणण्यानुसार दुरुस्तीला तेवढाच खर्च आला होता. परंतु, तक्रारकर्त्याच्या वकीलांनी तो खर्चाचा दस्ताऐवज बिल आहे हे नाकारुन असे सांगितले की, ती रक्कम तक्रारकर्त्याने सादीक मोटर्सला दिली नव्हती, कारण तो फक्त अंदाजे खर्चाचा एक भाग होता. परंतु, क्लेम फार्म जर बघीतला तर असे दिसून येते की, तक्रारकर्त्याने फार्ममध्ये गॅरेज संबंधी माहिती दिली आहे, जेथे त्याची गाडी दुरुस्ती करण्यात आली होती त्या गॅरजचे नांव सादीक मोटर्स असे लिहिण्यात आले आहे. क्लेम फार्म दिनांक 25.2.2011 ला देण्यात आला. याठिकाणी हे लक्षात घ्यावे लागेल की, तक्रारीनुसार तक्रारकर्त्याने त्याची गाडी असफा ऑटो मोबाईलकडे दिनांक 15.4.2011 ला दुरुस्त केली व त्यानुसार रुपये 1,90,806/- चे बिल क्लेम फार्मसह विरुध्दपक्ष क्र.2 कडे सादर केले. परंतु, त्याने त्या क्लेम फार्मची प्रत अभिलेखावर दाखल केली नाही. ज्या क्लेमफार्मची प्रत दाखल केली आहे ती हे दर्शवीते की, त्याचे गाडीची दुरुस्ती सादीक मोटर्सकडे दुरुस्त करण्यात आली होती. तसेच, रुपये 6,000/- लेथ मशीनचे बिलाची प्रत दाखल केली नाही. त्याशिवाय असफा ऑटो मोबाईलने दिलेले बिल आणि राज ट्रेडर्सचे बिल यावर गाडीचा नोंदणी क्रमांक आणि गाडीच्या मालकाचे नाव लिहिले नाही. या दाखल सर्व बिलाची एकूण रक्कम फक्त रुपये 1,84,806/- इतकी होती.
7. विरुध्दपक्षाने लेखी बयाणात जे आक्षेप घेतले आहे आणि गाडी दुरुस्ती संबंधी जी विधाने केली आहे ती खोडून काढण्यासाठी तक्रारकर्त्याने प्रतीउत्तर दाखल केलेले नाही. त्यामुळे ती गाडी सादीक मोटर्सकडे दुरुस्त करण्यात आली, ज्यासाठी रुपये 20,000/- खर्च आला आणि त्याचे विरुध्दपक्ष क्र.2 कडून रुपये 16,092/- ची परिपुर्तता करण्यात आली. या विरुध्दपक्षाच्या विधानाला तक्रारकर्त्याकडून कुठल्याही प्रकारे प्रतीउत्तराव्दारे नकार आलेला नाही. विरुध्दपक्षाचे ह्या सर्व विधानाला तक्रारकर्त्याकडून कुठलेही आव्हान दिलेले नाही, त्यामुळे विरुध्दपक्ष म्हणतो त्याप्रमाणे तक्रारकर्त्याची गाडी सादीक मोटर्सकडे दुरुस्त करण्यात आली त्या खर्चाची परिपुर्तता विरुध्दपक्षाने केली, हे दस्ताऐवजावरुन सिध्द होते. तक्रारकर्त्याने एकदा विरुध्दपक्षाकडून क्लेम फार्म भरुन खर्चाची रक्कम कुठलीही हरकत किंवा आक्षेप न घेता प्राप्त केली असेल तर त्याला पुन्हा दुरुस्तीची रक्कम त्याच कारणास्तव मागण्याचा हक्क शिल्लक राहत नाही. या सर्व कारणास्तव या तक्रारीत कुठलीही गुणवत्ता दिसून येत नाही, करीता तक्रार खारीज होण्यास पाञ आहे असे मंचाचे मत आहे.
सबब, खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येते.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्यात येते.
(2) खर्चाबद्दल कोणतेही आदेश नाही.
(3) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 23/12/2016