::: निकालपञ:::
(आयोगाचे निर्णयान्वये, मा. सौ. किर्ती वैदय (गाडगीळ) मा.सदस्या)
(पारीत दिनांक :- 20/01/2022)
1. अर्जदाराची प्रस्तुत तक्रार ग्राहक सरंक्षण कायद्याचे कलम 12 अंन्वये दाखल केलेली आहे. सदर तक्रारीचा आशय थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
2. तक्रारकर्त्याने दिनांक 12/3/2019रोजी मेहेर म्युझिक, मेन रोड, चंद्रपूर या मोबाईलचे दुकानातून विवो कंपनी निर्मित v15 प्रो मोडेल चा मोबाईल रु.28,990/- किमतीत बजाज फायनान्स कंपनी कडून कर्ज घेऊन खरेदी केला. विरुद्ध पक्ष क्रमांक 1 ही सुप्रसिद्ध खाजगी विमा कंपनी असून विरुद्ध पक्ष क्रमांक 2 विरुद्ध पक्ष क्रमांक 1 करिता विमा दावे प्रोसेसिंग चे काम करतात. सदर मोबाईलबाबत विविध सुविधा मिळविण्याकरीता तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष क्र.2 यांचे सीपीपी योजनेअंतर्गत रु.2574/- मेंबर फी भरुन सदस्यत्व घेतले. सदर सदस्यत्व धारण करणा-याला ॲड ऑन सेवांतर्गत सदर मोबाईल वि.प.क्र.1 कडून विमाकृत करुन मिळतो. त्यानुसार विरुद्ध पक्ष क्रमांक 2 ने दिनांक 29/3/2019 रोजी तक्रारकर्त्याला ईमेल द्वारे त्याचा मोबाईल दिनांक 12/3/2019ते दिनांक 11/3/2020 पर्यंत विमाकृत करण्यात आल्याचे कळविले.
3. तक्रारकर्ता दिनांक 29/1/2020 रोजी सकाळी 9. 25 वाजता वरोरा नाका ओव्हरब्रीज ने जात असताना त्याचे दुचाकी वाहन स्पीड ब्रेकर वर उसळून खिशातील मोबाईल रस्त्यावर पडला व मागून येणाऱ्या महेंद्र पिकप गाडी खाली येऊन त्याची पूर्णपणे तुटफूट झाली. तक्रारकर्त्याने सदर घटनेची माहिती मेहेर म्युझिक यांना दिली असता त्यांनी विवो कंपनीचे सर्विस सेंटर मधून मोबाईलचे किती नुकसान झाले याबाबत माहिती आणण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारकर्त्याने चौकशी केली असता मोबाईलचे रु.22,485/-चे अनुमानित नुकसान झाले असे लेखी पत्र तक्रारकर्त्याला दिले. सदर पत्र दस्त क्रमांक ३ वर दाखल आहे. यानंतर तक्रारकर्त्यानेविरुद्ध पक्ष क्रमांक 2 यांनी पुरविलेला वि.प.क्र.1 चा क्लेमफॉर्म भरुन त्यांच्याच सूचनेनुसार आवश्यक दस्तावेज जोडून विमा दावा आणि पॅक केलेला क्षतीग्रस्त मोबाईल डीटीडीसी कुरिअर ने विरुद्ध पक्ष क्रमांक 2 कडे पाठवले. सदर कुरियर ची पावती दस्त क्रमांक 1० वर दाखल करण्यात आली आहे. मात्र सदर कुरियर प्राप्त होऊनही आणि वारंवार फोनद्वारे तसेच मेल द्वारे विनंती करूनही विरुद्ध पक्ष क्रमांक 2 ने दिनांक 4/7/2020 पर्यंत तक्रारकर्त्याला विमा रक्कम दिली नाही. सबब प्रस्तुत तक्रार दाखल करण्यात आली असून तक्रारकर्त्याची मागणी आहे की विरुद्ध पक्ष यांनी अवलंबिलेली कृती न्यूनता पूर्ण सेवा व अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब ठरविण्यात यावी तसेच तक्रारकर्त्याच्या मोबाईलची किंमत रु.28,990/-व्याजासह परत करण्याचे तसेच शारीरिक मानसिक त्रास व आर्थिक नुकसानापोटी नुकसानभरपाई देण्याचे विरुद्ध पक्ष यांना आदेश देण्यात यावेत.
4. तक्रारकर्त्याची तक्रार स्वीकृत करून विरुद्ध पक्ष क्रमांक 1 व 2 यांना नोटीस बजावण्यात आले. मात्र विरुद्ध पक्ष क्रमांक 1 यांना आयोगाचा नोटीस प्राप्त होऊनही ते आयोगा समक्ष उपस्थित न झाल्यामुळे तसेच त्यांनी कोणताही बचाव उपस्थित न केल्यामुळे दिनांक 3/9/2019 रोजी विरुद्ध पक्ष क्रमांक 1 विरुद्ध प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश परित करण्यात आला.
5. विरुध्द पक्ष क्रमांक 2 यांनी प्रकरणात उपस्थित राहून तक्रारीला उत्तर दाखल करीत प्राथमिक आक्षेप घेत नमूद केले की विरुद्ध पक्ष क्रमांक 2 ही इन्शुरन्स कंपनी नसून तक्रारकर्त्यानी सदर मोबाइलचा इन्शुरन्स विरुद्ध पक्ष क्रमांक 1 यांचेकडे काढलेला आहे. विरुद्ध पक्ष क्रमांक 2 हे केवळ सुविधा देणारे माध्यम आहेत. त्यांनी पुढे नमूद केले की तक्रारकर्त्याने विरुद्ध पक्ष क्रमांक 2 यांचेकडून मोनोसेफ क्लासिक टी थ्री प्लॅन अंतर्गत सदस्यत्व घेतले असल्यामुळे त्यांना सिक्युअर डिव्हाईस सिक्युरिटी सह अनेक फायदे प्राप्त झाले तसेच अॅड ऑन ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत नोंदणी होऊन तक्रार करण्याचा मोबाईल अपघातामुळे होणारे नुकसान तसेच द्रव नुकसान यासह विमाकृत करण्यात आला, मात्र त्यात चोरी किंवा इतर नुकसान यांचा अंतर्भाव होत नाही. याबाबत अटी व शर्ती नमुद असलेले तक्रारकर्त्याला पूर्वीच पाठविण्यात आलेले वेलकम लेटर तक्रारकर्त्याने प्रकरणात जाणीवपूर्वक दाखल केलेले नाही. विरुद्ध पक्ष क्रमांक 2 ने पुढे नमूद केले की तक्रारकर्त्याने ५-६ महिन्याहून अधिक काळ मोबाईल वापरल्यानंतर दिनांक 29/1/2020 रोजी कथित नुकसानाची तक्रार केल्यानं वि प.क्र.2 ने मध्यस्थ या नात्याने तक्रारकर्त्याला आवश्यक सूचना देऊन त्याचेकडून आवश्यक दस्तावेज प्राप्त करून ते विरुद्ध पक्ष क्रमांक 1 विमा कंपनी यांचेकडे पाठविले आहेत. त्यानंतर विमा दावा मंजूर करण्याची कारवाई विरुद्ध पक्ष क्रमांक 1 यांनी करावयाची असून त्यावर विरुद्ध पक्ष क्रमांक 2चे नियंत्रण नाही. तक्रारकर्त्याने रु.28,990/-किमतीचा मोबाईल चार महिने पेक्षा जास्त कालावधीकरीता वापरल्यानंतर त्याच्या नुकसानीपोटी विरुद्ध पक्षांविरुद्ध रु.43,990/- चादावा दाखल केलेला आहे. यातून त्याचा पैसे उकळण्याचा बेकायदेशीर हेतू दिसून येत असून कायद्याच्या तरतुदींचा दुरुपयोग केल्यामुळे प्रस्तुत तक्रार खारीज करण्यात यावी अशी त्यांनी आयोगास विनंती केली आहे
6. तक्रारीकर्त्याची तक्रार, दस्तावेज, वि.प. क्र.2 यांचेलेखी कथन,तसेच उभय बाजूंचे लेखी युक्तीवादतसेच परस्परविरोधी कथन यांचा आयोगाने सखोल विचार केला असताखालील मुद्दे आयोगाचे विचारार्थ घेण्यात आले. त्याबाबतची कारणमिमांसा आणी निष्कर्ष पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
1) तक्रारकर्ता हा वि.प.क्र.1 व 2 यांचा ग्राहक आहे काय ? होय
2) विरूध्द पक्ष क्र.1 व 2 ने अर्जदाराप्रति न्युनता पूर्ण सेवा दिली आहे
काय ? : होय
3) आदेश काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे.
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1बाबतः-
7. तक्रारकर्त्याने विकत घेतलेल्या सदर मोबाईलबाबत विविध सुविधा मिळविण्याकरीता विरुध्द पक्ष क्र.2 यांचे सीपीपी योजनेअंतर्गत रु. 2574/- मेंबर फी भरुन सदस्यत्व घेतले असून सदर सदस्यत्व धारण करणा-याला ॲड ऑन सेवांतर्गत सदर मोबाईल वि.प.क्र.1 कडून विमाकृत करुन मिळतो ही बाब वि.प.क्र.2 ने मान्य केलेली आहे.शिवाय तक्रारकर्त्याचे ग्राहकत्वाबाबत विरुध्द पक्षांनी विवाद उत्पन्न केलेला नाही. त्यामुळे तक्रारकर्ता रहा वि.प.क्र.1 व 2चा ग्राहक आहे हे सिध्द होते.सबब मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी दर्शविण्यांत येत आहे.
मुद्दा क्रं. 2बाबतः-
8. तक्रारकर्ता दिनांक 29/1/2020 रोजी सकाळी 9. 25 वाजता वरोरा नाका ओव्हरब्रीज ने जात असताना त्याचे दुचाकी वाहन स्पीड ब्रेकर वर उसळून खिशातील मोबाईल रस्त्यावर पडला व मागून येणाऱ्या महेंद्र पिकप गाडी खाली येऊन त्याची पूर्णपणे तुटफूट झाली असे तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. विवो कंपनीचे सर्विस सेंटरने सदर मोबाईलचे रु.22,485/-चे अनुमानित नुकसान झाले असे लेखी पत्र तक्रारकर्त्याला दिले असून सदर पत्र दस्त क्रमांक ३ वर दाखलआहे. सदर पत्राचे अवलोकन केले असता त्यात सदर मोबाईल अन्य कारणाने क्षतीग्रस्त झाला असा अभिप्राय नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याचा मोबाईल अपघातात क्षतीग्रस्त झाला ही बाब सिदध होते.
9. विरुद्ध पक्ष क्रमांक 2 त्यांचे उत्तरात मान्य केले आहे की, तक्रारकर्त्याने सदर मोबाईल संदर्भात विरुद्ध पक्ष क्रमांक 2 यांचेकडून फोनोसेफ क्लासिक टी थ्री प्लॅन अंतर्गत सदस्यत्व घेतले असल्यामुळे त्यांना सिक्युअर डिव्हाईस सिक्युरिटी सह अनेक फायदे प्राप्त झाले तसेच अॅड ऑन ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत वि प.क्र.1 चे विमा कव्हर अंतर्गत नोंदणी होऊन तक्रारकर्त्याचा मोबाईल, अपघातामुळे होणारे नुकसान तसेच द्रव नुकसान यासह विमाकृत करण्यात आला, मात्र त्यात चोरी किंवा इतर नुकसान यांचा अंतर्भाव होत नाही असे वि प.क्र.2 ने त्यांचे लेखी उत्तरात नमूद केलेले आहे.वि प. क्र.2 ने कबूल केल्याप्रमाणे अपघातात मोबाईलचे होणारे नुकसान हे सदर विम्यांतर्गत कव्हर केले असल्याकारणाने तक्रारकर्ता विमासंरक्षणांतर्गत नुकसान भरपाई तसेच त्याला प्रस्तूत प्रकरणी झालेल्या शारिरीक व मानसीक त्रासापोटी नुकसान भरपाई मिळण्यांस पात्र ठरतो या निष्कर्षाप्रत आयोग आलेले आहे.
10. वि.प.क्र.2ही इन्शुरन्स कंपनी नसून तक्रारकर्त्यानी सदर मोबाइलचा इन्शुरन्स विरुद्ध पक्ष क्रमांक 1 यांचेकडे काढलेला आहे. त्या कामी विरुद्ध पक्ष क्रमांक 2 हे केवळ सुविधा देणारे माध्यम आहेत.मोबाईल क्षतीग्रस्त झाल्याबाबत तक्रारकर्त्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर वि प.क्र.2 ने केवळ सुविधा देणारे मध्यस्थ या नात्याने तक्रारकर्त्याला आवश्यक सूचना देऊन त्याचेकडून आवश्यक दस्तावेज प्राप्त करून ते विरुद्ध पक्ष क्रमांक 1 विमा कंपनीकडे पाठविले आहेत. त्यानंतर विमा दावा मंजूर करण्याची कारवाई विरुद्ध पक्ष क्रमांक 1 यांनी करावयाची असून त्यावर विरुद्ध पक्ष क्रमांक 2चे नियंत्रण नाही असे नमूद करुन विरुध्द पक्ष क्र.2 ने प्रस्तूत प्रकरणी त्यांची जबाबदारी नाकारलेली आहे.
11. असे असले तरीही प्रकर्षाने नमूद करणे आवश्यक आहे की, विरुद्ध पक्ष क्रमांक 2 यांनी त्यांचे उत्तरात मान्य केल्यानुसार, तक्रारकर्त्याने सदर मोबाईल संदर्भात विरुद्ध पक्ष क्रमांक 2 यांचेकडून फोनोसेफ क्लासिक टी थ्री प्लॅन अंतर्गत सदस्यत्व घेतले असून त्या सदस्यत्वाच्या अनुषंगाने त्यांना सिक्युअर डिव्हाईस सिक्युरिटी सह अनेक फायदे प्राप्त झाले तसेच अॅड ऑन ग्रुप इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत वि प.क्र.1 चे विमा कव्हर अंतर्गत नोंदणी होऊन तक्रारकर्त्याचा मोबाईल, अपघातामुळे होणारे नुकसान तसेच द्रव नुकसान यासह वि.प.क्र.1 विमाकृत करण्यात आला. या बाबतची विरुद्ध पक्ष क्र.1 ह्यांनी सदर योजनेअंतमर्गत लाभार्थ्यांची काढलेली गृप विमा पोलिसी विरुद्ध पक्ष क्र.2 ह्यांनी प्रकरणात दाखल केलेली आहे. वि प.क्र.1 ने पुरेशी संधी देवूनही कोणताही बचाव प्रकरणात दाखल केलेला नसल्याने त्यांची बाजू आयोगासमक्ष आलेली नाही. मात्र सदर योजनेचे स्वरुप बघता सदर विमा हा वि प.क्र.2 यांच्या सीपीपी योजनेचे मेंबरशीप फी भरुन सदस्यत्व घेतलेल्या लाभार्थ्यांनाच “ॲड ऑन स्वरुपात मिळतो” हे स्पष्ट होते. सदर व्यवहारासंबंधीचा संपूर्ण व्यवहार वि.प.क्र. 2 चे माध्यमातून झालेला आहे. विरुद्ध पक्ष क्रमांक 2 यांनीच तक्रारकर्त्याला वि.प.क्र.1 चा क्लेमफॉर्म पुरविला व तो तक्रारकर्त्याने भरुन विरुद्ध पक्ष क्रमांक 2 चे सूचनेनुसार आवश्यक दस्तावेजांसह आणि पॅक केलेला क्षतीग्रस्त मोबाईलसह डीटीडीसी कुरिअर ने विरुद्ध पक्ष क्रमांक 2 कडेच पाठवला आहे. सदर विमा हा वि प.क्र.2 यांच्या योजनेतील सदस्यत्वाशी निगडीत असल्यामूळे तसेच त्याबाबतची सदस्यता रक्कम रु.2,574/- देखील वि प क्र.2 नेच वसूल केलेली असल्यामुळे क्षतीग्रस्त मोबाईलसंदर्भात वि.प.क्र.1 विमा कंपनीला तक्रारकर्त्याचा विमादावा पाठविणे तसेच त्याचा योग्य तो पाठपूरावा करणे हे वि.प.क्र.2 ची जबाबदारी आहे. मात्र तक्रारकर्त्याकडून प्राप्त दाव्याचे दस्तावेज व क्षतीग्रस्त मोबाईल वि.प.क्र.1 कडे पाठविल्याबाबत कोणताही पुरावा वि.प.क्र.2 ने तक्रारीत दाखल केलेला नाही. वि.प.क्र.1 ने तक्रारकर्त्याचा दावा नाकारल्याची त्यांची माहिती आहे असे मोघम विधान वि.प.क्र.2 ने लेखी उत्तरात केलेले आहे. मात्र याबाबत त्यांनी तक्रारकर्त्यांस कळविले असल्याबाबतदेखील कोणताही पुरावा वि.प.क्र.2 ने प्रकरणात दाखल केलेला नाही. वास्तविकताः वि.प.क्र.2 च्या सिपीपी योजनेचे मेंबरशीप फी भरुन सदस्यत्व घेतलेल्या तक्रारकर्त्याप्रती वि.प.क्र.2 यांचा दृष्टीकोन निष्काळजीपणाचा असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे तक्रारकर्त्याला क्षतीग्रस्त मोबाईलसंदर्भात नुकसान भरपाई करुन देण्यास वि प क्र.1 विमा कंपनी सोबत वि प क्र.2 देखील संयुक्तरीत्या जबाबदार आहेत, असे आयोगाचे मत आहे. त्यामुळे तक्रारकर्ता, त्यांच्या क्षतीग्रस्त मोबाईलची किंमत रु.28,990/- विरुध्द पक्ष क्र.1 कडून परत मिळण्यांस तसेच त्याला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी विरुध्द पक्ष क्र.2 कडून उचीत नुकसान भरपाई व तक्रारखर्चापोटी एकत्रीत रु 5000/-मिळण्यांस पात्र आहेत असे आयोगाचे मत आहे. सबब मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यांत येते.
मुद्दा क्रं. 3बाबतः-
12. वरील मुद्दा क्र.1व 2 चे विवेचन व निष्कर्षावरून आयोगखालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
// अंतिम आदेश //
(1) अर्जदारची तक्रार क्र.66/2020अंशत: मंजूर करण्यांत येते.
(2) विरुद्ध पक्षक्र.1 व 2 यांनी वैयक्तीक वा संयुक्तरीत्या तक्रारकर्त्याच्या क्षतीग्रस्त मोबाईलची किंमत रु.28,990/- तक्रारकर्त्याला परत करावी.
(3) विरुद्ध पक्ष क्र.1 व 2 यांनी वैयक्तीक वा संयुक्तरीत्या तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक व मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारखर्चापोटी एकत्रीत रक्कम रु.5000/- तक्रारकर्त्याला द्यावेत.
(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
(श्रीमती.कल्पना जांगडे(कुटे))(श्रीमती. किर्ती वैदय (गाडगीळ))(श्री.अतुल डी.आळशी)
सदस्या सदस्या अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.